धर्मवीर बलिदान मास – श्लोक क्रमांक क्र. ८
श्री संभाजीसुर्यहृदय
विसरुं कसें कधीं आम्ही “शिवबाव्रताला” ।
सोडू कधीं न कधीं हि धरिल्या पथाला ।।
शिवसूर्य चित्तीं तळपे नित अस्तहीन ।
प्राणासमान आमुच्या उरीं राष्ट्रध्यान ।।८।।
आजच्या या आठव्या श्लोकाचा अर्थ:-
ज्याप्रमाणे शिवछत्रपतींचे स्वराज्य व्रत शंभूराजांनी व त्यांच्या मावळ्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत न विसरता आपल्या चित्तात साठवून ठेवले , या व्रतात शंभूराजे व मावळे शिवमार्गावरुन , स्वराज्य पथावरुन कधीच मागे फिरले नाहीत , आणि याच प्रमाणे आपण आजही आपल्या उरात शंभूराजांप्रमाणे शिवबांचे स्वराज्यव्रत साठवून शंभूराजांचे व शिवछत्रपतींचे अपूर्ण राहिलेले स्वप्न कधीच मागे न फिरता , न हारता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या उरात कधीच न अस्त होणारा शिवसूर्य सतत तळपला पाहिजे जसा तो शंभूराजांच्या उरात तळपायचा.
राष्ट्र हे आपल्यासाठी आपल्या प्राणापेक्षा मोठे असले पाहिजे त्याच्यासाठी आपण कोणत्याही प्रसंगी बलिदान देण्यास तयार असले पाहिजे आणि हे आपल्याला शिवशंभूराजांनी शिकवले आहे.