नेसरीचा संग्राम – २४/०२/१६७४
महाराष्ट्राला ख-या अर्थाने महान राष्ट्र बनवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने व शेकडो मावळ्यांच्या बलिदानाने मराठा स्वराज्य उभारले गेले. महाराजांशी निष्ठा व स्वराज्यासाठीची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसांत भिनली होती.
सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी शौर्य गाजवलेला तो दिवस होता २४ फेब्रुवारी १६७४. यावेळी त्यांच्यासोबत सरदार विसाजी बल्लाळ, दिपाजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोजी होते. या सात जणांनी खानाच्या सैन्याशी निकराचा लढा दिला, मात्र सातही जणांना वीर मरण आले.
म्यानातुनि उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात!
ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात
वेडात मराठे वीर दौडले सात!
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात!
खालून आग, वर आग, आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात!
दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणि वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात!
प्रतापरावांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याफतील ताम्हाणे उर्फ गोरेगाव होते. प्रतापरावांचे मूळ नाव कडतोजी. शिवरायांच्या सैन्यातील एक शिलेदार म्हणून काम करतच पराक्रमाच्या व जिद्दीच्या जोरावर ते स्वराज्याचे सरनोबत झाले.
कडतोजींचा पराक्रम पाहून त्यांना प्रतापराव किताब देवून गौरवण्यात आले होते. उमराणीच्या लढाईत प्रतापरावांच्याकडून अभय मिळालेला बेहेलोल खान पुन्हा स्वराज्यात धूमाकूळ घालू लागला होता. राज्याभिषेक सोहळा जवळ येत असतानाच खान पुन्हा स्वराज्यावर चालून येत आहे. वेळीच त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हास तोंड दाखवू नका अशा आशयाचा खलिता महाराजांनी प्रतापरावांना पाठविला.
आपल्या प्राणापेक्षा प्रिय असणा-या महाराजांचा हुकूम पाळायचा या उद्देशाने प्रतापराव गुजर संधी शोधत होते. एकेदिवशी ते आपल्या सहा सरदारांसोबत फेरफटका मारायला निघाले असताना बहलोल खान जवळच असल्याचे त्यांना समजले. यावेळी त्यांच्यासोबत सरदार विसाजी बल्लाळ, दिपाजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोजी होते. या सात जणांनी खानाच्या सैन्याशी निकराचा लढा दिला, मात्र सातही जणांना वीर मरण आले.