स्वप्नं सत्यात यावे असे बहुगुणी गाव:
महाड तालुक्यातील राज्य परिवहन महामंडळाची म्हणजेच आपली लालपरी शेवटच्या थांब्यावर पोचते असे एक सुंदर गाव म्हणजे वारंगी.
पूर्वेला किल्ले लिंगाणा बाजूला शिवकालीन घाटमाथ्यावर जाणारा पायी मार्ग खानूचा डिग्गा त्याच्याच बाजूला उंचावरून फेसाळणारा पंधरा शुभ्र अजस्र असा धबधबा. बाजुने अनेक छोट्या मोठ्या पाच धबधब्यांच्या रांगा जणू काही स्वर्ग खाली उतरलाय असा होणारा भास.
पश्चिमेलाआकर्षक असा बावळे गावचा कणा डोंगर त्यामागे सुप्रसिद्ध अशी ऐतिहासिक वारसा लाभलेली सांदोशी गावची कावळा बावळा खिंड. त्या बाजूला दिसणारा पूनाडे गावचा टवळीचे टोक नावाचा उप दुर्ग, खाली शिवकालीन छत्री निजामपूर गाव आणि दक्षिणेला श्रीमान दुर्ग दुर्गेश्र्वर किल्ले रायगड. पूर्व बाजू सिंहाचा जबडा पसरून बसलेले टकमक टोक, आणि उत्तरेला वाघेरी गाव व महाड तालुक्यातील जागृत देवस्थान आई वरदानी माता देवस्थान वाळणकोंडी.
मुळात हे गाव वाळण विभागातील दुसर्या क्रमांकाचे बारा बलुतेदार गाव ओळखले जाते. अनेक मंदिरे त्यात शिवकालीन शिवलिंग असलेले शिव हनुमान मंदिर तसेच गावाबाहेर गाव देवीच्या मंदिरात असलेले पुरातन अवशेष आपले लक्ष वेधून घेतात.
गावामधे अनेक अशी जुन्या पद्धतीची दुमजली लाकडी घरे आहेत ती गेली दोनशे वर्षे अजूनही तशीच आहेत नाहीतर आताची घरे लगेच पडतात. जास्त संशोधन केल्यास या गावात मुख्यता विहिरींची संख्या खूप आहे त्यामधे अनेक विहिरी या जुन्या धाटणीच्या आणि आकाराच्या आकर्षक अश्या आहेत.
गाव वाडी आणि गाव अश्या दोन टप्प्यांत विभागले आहे पण गावातील लोक एकोप्याने राहताना दिसतात. विभागातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून गावामधे विभागीय प्रयत्नातून दहावी पर्यंत चार मजली असे माध्यमिक विद्यालय आहे.
सगळीकडे हिरवाई, तिन्ही बाजूला नद्या आणि मागे प्रलंबित असलेला बहुचर्चित काळ कुंभे प्रकल्प याच गावच्या सीमेवर आहे. शिवकालीन व्यापारी गाव ते आतपर्यंत या गावाची ओळख कायम आहे.
पूर्वी येथे मोठी कोळसा तसेच खारीक सुखे खोबरे यांची व्यापारी पेठ भरत असे असे जाणकार सांगतात.
खरे म्हणजे कोकणातील स्वर्ग म्हणून नावे घेतली जातात त्यामधे वारंगी गावचा उल्लेख आवर्जून घेतला पाहिजे.
– महाड रायगड माझं गाव माझा अभिमान