सोंड नसलेला एकमेव गणपती !
बाप्पा म्हटलं की डोळ्यांसमोर येणरं रूप म्हणजे त्याचे सुपाऐवढे मोठे कान, लांब सोंड, आशीर्वाद देणारा हात आणि डोळ्यांनी सदैव त्याच्या भक्तांवर असणारी कृपादृष्टी असं गजमुख प्रत्येकाच्या डोळ्यात साठवून राहतं. बाप्पाला असं रूप का मिळालं यांची कथा तुम्हाला माहितीच असेल.जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेले पहायला मिळते. गणपतीच्या अन्य रुपाची कुणी कल्पनाही करू शकत नाही. मात्र,दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे,मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे.मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते. (आदि विनायक मंदिर, Adi Vinayak Temple)
तमिलनाडुच्या कुथनूरपासूनजवळ तिलतर्पणपुरी जवळ कुटनूर येथे हे मंदिर असून ‘आदि विनायक मंदिर’ म्हणून ओळखले जाते. या गणेश मूर्तीला मानवी चेहरा असल्याने त्याला ‘नर-मुख विनायक’ या नावाने सुद्धा ओळखलं जातं.गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदी गणपती संबोधले जाते.
कुटनूर हे तामिळनाडूच्या तिरुवरूर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे तिरुवरूरपासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. तामिळनाडूतील देवी सरस्वतीचे एकमेव मंदिर कुटनूरमध्ये आहे. तिलतर्पण पुरी कुटनूरपासून सुमारे ३ किमी अंतरावर आहे. या शहरात एक आदि विनायक मंदिर आहे. येथे पितृ दोषाच्या शांतीसाठी विशेष पूजा केली जाते. येथे भगवान शंकराचे मंदिर देखील आहे.
तिलतर्पण फक्त पूर्वजांसाठी केले जाते. तिलतर्पण पुरी हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे, पहिला – तिलतर्पण आणि दुसरा पुरी. तिलतर्पण याचा अर्थ आहे – पूर्वजांना तीळ अर्पण करणे आणि पुरी म्हणजे – शहर, म्हणजेच हे शहर पूर्वजांना समर्पित आहे.
गणपतीचे मंदिर असलेल्या भागाला तिलतर्पणपुरी असे संबोधले जाते. मात्र, यामागे एक कथा आहे. ही कथा श्रीरामचंद्रांशी निगडीत आहे. एका पौराणिक कथेनुसार, प्रभू रामचंद्र हे आपला पिता दशरथ यांचे श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी आले. मात्र, पिंडदान केल्यावर त्या पिंडाच्या जागी किडे दिसू लागले. श्रीरामांनी पुन्हा पिंडदान केले. मात्र, पुन्हा तेथे किडे दिसून लागले. असे अनेकदा घडल्यावर शेवटी श्रीरामचंद्रांनी महादेव शिवशंकराची आराधना केली.
महादेवांची आराधना केल्यानंतर महादेव तेथे प्रकट झाले आणि श्रीरामांना सांगितले की, मंथरावन येथे जाऊन श्राद्ध करावे. महादेवांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार, श्रीरामांनी तत्कालीन मंथरावन येथे जाऊन पिंडदान केले. आश्चर्य म्हणजे श्रीरामांनी ज्या ठिकाणी पिंडदान केले होते, त्या ठिकाणी त्या चार पिंडांची चार शिवलिंगे तयार झाली. आजच्या काळातही ती शिवलिंगे पाहायला मिळतात. हा भाग थेथे मुक्तिश्वर म्हणून ओळखला जातो. अनेक जण पितरांना मुक्ती मिळावी म्हणून तिलतर्पणपुरी येथे जाऊन श्राद्ध करतात.