मराठी भाषा अस्तित्वात असलेला सगळ्यात पहिला पुरावा पाहिलाय का???

Marathi Explorer
6 Min Read

मराठी भाषा अस्तित्वात असलेला सगळ्यात पहिला पुरावा पाहिलाय का???

दुर्लक्षित वास्तूंमध्ये, मंदिरांमध्ये आजच्या आपल्या असण्याचे,बोलण्याचे ,आपल्या संस्कृतीचे अनेक पुरावे लपलेले आहेत.आपली मराठी भाषा अस्तिवात असल्याचा सगळ्यात जुना शिलालेख ,हा आपल्या जवळच्या सोलापूर जिल्ह्यात आहे. हा शिलालेख 1972 साली सोलापूर चे इतिहास अभ्यासक आनंद कुंभार सरांनी शोधला.सोलापूर जवळ फक्त 30 किमी अंतरावर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर, महाराष्ट्रातील हत्तरसंग कुडल या गावात आहे. हे गाव भीमा आणि सिना नदांच्या संगमावर आहे. सोलापूर विजापूर रोडवरून 10 किमी आत आहे. इथे सीना नदी एकदम काटकोनात भीमा नदीला मिळते. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात तालुका दक्षिण सोलापूर येथे भीमा सीना नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. ठिकाण महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर सोलापूर पासून फक्त 40 किलोमीटर अंतरावर आहे. सोलापूर ते विजापूर राष्ट्रीय महामार्गावर तीस किलोमीटर अंतरावर डावीकडे बरुर फाटा येथून दहा किलोमीटर अंतरावर हत्तरसंग कुडल हे सांस्कृतिक व निसर्ग पर्यटन स्थळ  आहे.

हत्तरसंग आणि कुडल ही दोन गावांची नावे असून कुडल हा कन्नड शब्द आहे .याचा अर्थ संगम असा आहे. कुडल या ठिकाणी भीमा आणि सीना या दोन नद्यांचा काटकोनामध्ये संगम झालेला आहे. उत्तरेकडून येणारी भीमा नदी आणि पश्चिमेकडून येणारी सीना नदी यांचा संगम इंग्रजी Tअक्षराप्रमाणे झालेला आहे. भारतात साधारणपणे Yया इंग्रजी अक्षराप्रमाणे दोन नद्यांचा संगम पहावयास मिळतो. म्हणूनच हत्तरसंग कुडल येथील भीमा सीना नद्यांचा संगम दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.

दोन चालुक्य कालीन स्थापत्य कलेचा अप्रतिम नजारा असलेली ,मंदिर इथे आहेत. एक संगमेश्वर आणि दुसरे हरिहरेश्वर. संगमेश्वर मंदिरातील एका खांबावर हा शिलालेख कोरलेला आहे.  भीमा आणि सीना या दोन नद्यांच्या संगमावर श्री संगमेश्वर मंदिर बांधलेले आहे. हे मंदिर चालुक्यकालीन असून त्रिकूट किंवा तीन  गाभारे असलेले मंदिर आहे. संगेमेश्वर मंदिरात जाताच काळ्या पाषाणातील अद्वितीय नंदी ,गाभाऱ्याच्या समोर बसलेला आहे. चालुक्य कालीन आखीव रेखीव खांब आणि अनेक शिल्प या मंदिरात आहेत. समोर गर्भगृह आहे. गर्भग्रहाच्या बाजूला अजून दोन छोटी गर्भगृह आहेत. हे मंदिर चालुक्यकालीन असून पुढील काळात अनेक वेळा याचा जिर्णोद्धार झालेला आहे. मुख्य गर्भगृहामध्ये श्री संगमेश्वराची प्रतिमा असलेले भव्य शिवलिंग आहे.

इ. स. 1995 पूर्वी हे मंदिर मातीमध्ये गाडले गेले होते. 1990 साली सोलापूर इतिहास अभ्यासक आनंद कुंभार यांनी मातीत गाडले गेलेले हे मंदिर शोधून काढले.महादेवाची पिंड आणि मुरली वाजवत असलेला विष्णू यांचं एकत्रती मंदिर म्हणजे हरिहरेश्वर मंदिर.या मंदिराच विशेष म्हणजे, अनेक शिल्प जी फक्त तुम्ही चित्रात पहिली असतील, ती इथे आहेत. 1000 वर्षा पूर्वीच हे मंदिर अनेक रहस्य आपल्या पोटात लपवत आजही उभं आहे. हे मंदिर अद्वितीय स्थापत्य आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात शैव आणि वैष्णव पंथांचा अपूर्व संगम शिल्पकलेच्या माध्यमातून अविष्कृत करण्यात आला आहे.

हरिहरेश्वर मंदिराला तीन विभाग आहेत. अंतराळ,गर्भगृह आणि स्वर्ग. कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिरात जसे छत नसलेला सभा मंडप आहे अगदी तसाच इथे आहे.त्यालाच स्वर्ग लोक म्हणतात.हत्ती,अप्सरा आणि अनेक जणांनी त्या स्वर्गाला आपल्या बाहुंनी आपल्या खंद्यावर तारले आहे, अशी शिल्प सर्व छतावर आणि स्तंभांवर आहेत.एकच मुख असणारे पण 5 शरीर असलेलं कृष्णाचं शिल्प ,उलट्या दिशेने पुढील बाजूस छतावर आहे.

अंतराळ डावीकडच्या गर्भगृहामध्ये शिवलिंग असून उजवीकडील गर्भगृहामध्ये मुरलीधर श्रीकृष्णाची प्रतिमा आहे. दोन गर्भगृहाच्या मध्ये अंतराळात श्री गणेशाची मूर्ती देव कोष्टामध्ये बसवलेली आहे. स्वर्गमंडपातील छतावर स्वर्गसुंदरी, गंधर्व, किन्नर, यक्ष, विद्याधर, भारवाहक तसेच विविध प्राणी, पक्षी यांची अप्रतिम व आकर्षक शिल्पे आहेत. स्वर्ग मंडपामध्येच शिवाची काळभैरवनाथ स्वरूपातील भव्य मूर्ती आहे.

मंदिराच्या समोर गेल्या गेल्या आपल्याला भैरवाच शिल्प दिसत पण त्याच्या मागेही त्याच दगडावर अजून एक शिल्प आहे.ते अंबिकेच आहे. एकाच दगडावर दोन शिल्प असणारं बहुतेक हे एकमेव मंदिर आहे.मंदिराच्या वास्तूत एक प्रकारची शांतता आहे.बाजूला दोन मोठ्या नद्या वाहत आहेत. परिसरात सगळीकडे अनेक शिल्प दुर्लक्षित असून, अस्ताव्यस्त पडली आहेत.

तसेच येथील उत्खननात 359 शिवाची मुखं , एकाच शिवलिंगावर कोरलेले, एक शिवलिंग सापडले आहे. ते ही अधभुत शिवलिंग मंदिराच्या बाहेर आहे.असे शिवलिंग कुठेच नाही ,अगदी पटेश्वर ला पण नाही. 359 शिवाच्या वेगवेगळ्या मुद्रा एकाच शिवलिंगावर कोरलेल्या आणि मुख्य शिवलिंग धरून 360 शिवलिंग होतात. बहुमुखी शिवलिंग एका अखंड वेळेवर शिवाच्या 359 प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्यामध्ये शिवाची मुखे, बसलेले व काही उभे असलेले शिवाची प्रतिमा कोरलेल्या आहेत. विश्वरूप शिवदर्शन या नावानेही हे शिवलिंग ओळखले जाते. हे अशा प्रकारचे जगामध्ये एकमेव शिवलिंग आहे. मुख्य शिवलिंग आणि 359 प्रतिमा तसेच पंचमहाभूतांनी बनलेले मानवी देह मिळून होतात अशी संकल्पना या पाठीमागे असून वर्षातून एकदा अभिषेक केला किंवा नमस्कार केला तर तो वर्षभराचा अभिषेक केल्याचे पुण्य मिळते; अशी भाविकांची श्रद्धा आहे. ग्रामस्थांनी बहुमुखी शिवलिंगाची विधिवत स्थापना करून त्यावर सुंदर मंदिर बांधले आहे.

श्री संगमेश्वर मंदिरातील सभामंडपाच्या तुळईवर भारतातील मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखाचे वाचन सोलापूरचे प्रसिद्ध शिलालेख तज्ञ श्री. आनंद कुंभार यांनी केले आहे. स्वस्ति श्री शके ९४० कालयुक्त संवत्सरे माघ कधनुळिकाळ छेळा’ तर दुसरी ओळ ‘पंडित गछतो आयाता मछ मि छिमळ नि १०००’ अशी संस्कृतमधील आहे. म्हणजे इंग्लिश वर्षा नुसार इ.स.1018 होतं.या शिलालेखाला 2018 आली 1000 वर्ष पूर्ण झाली आहेत.ज्ञानेश्वरी लिहिली गेली साधारणतः 1290 मध्ये, त्याच्याही आधी जवळपास 200 वर्षा पूर्वीचा मराठी भाषा अस्तित्त्वात असल्याचा, हा अस्सल पुरावा आहे.

शिलालेखातील शेवटच्या तिसऱ्या ओळी आपल्या आजच्या जीवन मानाशी निगडित आहेत…त्या अश्या आहेत.
“यवाछि तो विजेया हो ऐवा”
असे स्पष्ट मराठीत कोरले आहे. याचा अर्थ
“वाचेल तो विजयी होईल”… असा होता
आपला इतिहास पण आपल्याला वाचाल तर नक्कीच यश मिळेल असं सांगतो…
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *