केशवराज मंदिर दापोली: माहिती, जाण्याचा रस्ता, जेवणाचे ठिकाण, इत्यादी | Information from Keshavraj Temple Dapoli experience, route, food places, etc

Hosted Open
7 Min Read

दापोलीच्या निसर्गरम्य भागात उभे असलेले केशवराज मंदिर हे एक प्राचीन आणि पवित्र स्थळ आहे. मंदिराच्या परिसरातील हिरवेगार जंगल आणि पक्ष्यांचा किलबिलाट करणारे वातावरण मन प्रसन्न करणारे आहे. केशवराज मंदिरात जाणे म्हणजे निसर्ग आणि धर्म यांचे सुंदर संगम अनुभवण्यासारखे आहे.

केशवराज मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यापासून साधारण ७ कि.मी.वर आसूद गावात आहे. या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे. दापोली-हर्णे मार्गावरून जाताना ६ कि.मी.वर आसूद बाग ठिकाण लागते. तेथून उजवीकडे १५ ते २० मिनिटे चालत गेल्यावर अत्यंत सुंदर असे केशवराज ( विष्णूचे ) मंदिर आहे.

Keshavraj temple

एका छोट्या टेकडीवर केशवराजाचे मंदिर आहे. तिथे जायची वाट सुपारीच्या वाडीतून जाते. मातीच्या पायर्‍या आहेत. पन्नासेक उतरायच्या , मग नदी आहे , ती ओलांडून पलीकडे गेलं की दीडशे मातीच्या पायर्‍या चढायच्या. आजूबाजूला आंब्याची , रातांब्याची झाडे. वर टुमदार दगडी मंदिर. असा हे मनमोहक निसर्गाच्या सानिध्यात वसलेले केशवराजाचे मंदिर.

मंदिरात काळ्या दगडाची केशवराजाची मुर्ती आहे. सुंदर लाकडी मंडप आहे. तिथे गारवा आहे, छान वारा असतो. तिथे एक काळ्यादगडातील गोमुख आहे. त्यातून सतत 24 x 7, बारा महिने पाणी वाहात असते . स्वच्छ, गार पाणी, वरून डोंगरातून एक झरा वाहतो , तेच पाणी गोमुखातून वहात राहतं. त्या झऱ्याच्या कडेने जात-जात त्या भूजलसाठ्याच्या उगमापर्यंत जायची वाट डोंगरातून हिरवाईच्या मधून जाणारी आहे.

पण.. आपल्या परिसरावर प्रेम करण्याची शिकवण कुठल्याच शाळेत न मिळालेले काही पर्यटक त्या जागी येतात आणि झऱ्यात आणि परिसरात प्लास्टिक बाटल्या फेकतात. त्यामुळे एकदा झऱ्याचा प्रवाह तुंबला होता आणि तो स्वच्छ करतांना अनेक प्लास्टिक बाटल्या सापडल्या आणि शेवटी निर्णय झाला की या अजाण पर्यटकांना वर पाण्याच्या उगमापर्यंत जायची बंदी करावी.

केशवराज मंदिर

शेकडो वर्षांपासून अगदी मेहनतीने जपलेला पाण्याचा स्रोत काही वर्षांतच असंवेदनशील पण स्वतःला प्रगतीशील म्हणवणाऱ्या पर्यटकांनी तुंबवला. कधी कधी मला असे वाटते की उथळ शिक्षण पद्धतीत पोसलेल्या तीन चार पीढ्या आपल्या enjoyment मधे इतक्या बेधुंद असतात की आजुबाजच्या स्थानावर प्लास्टिक फेकून, गुटका थुंकून, घाण करू नये ही basic courtesy पण विसरून जातात. कधी कधी पशु देखील अधिक सुजाण असतात असे वाटते. असो…

आता तिथे सगळी स्वच्छता करून तो झरा पूर्ववत केला आहे, वर जायची बंदी कायम आहे पण ते निसर्गरम्य देऊळ सर्वांसाठी खुलं आहे. एक विलक्षण शांती आहे त्या परिसरात. मागे नेटकी छान वाडी सारखी बाग आहे. बाहेर भिंती लगत एक आंब्याचे झाड आहे. आत्ता उन्हाळ्यात त्याचे हिरवे आंबे खाली पडत होते. वास छान येत होता. चवीला अतिशय मधुर फळ होतं ते.

आम्ही तिथे मंडपात बसलो होतो .समोरच हा मंत्र लिहिलेला दिसला

🕉 नारायणाय विद्महे
वासुदेवाय धीमहि
तन्नो विष्णुः प्रचोदयात्

हा मंत्र वाचला. त्याचा अर्थ सांगितला तर बोध आहे नाहीतर नुसतच शब्द वाचन होईल म्हणून तो ही सांगितला.

ओम हे नाव भारतीय अध्यात्मशास्त्रात या संपूर्ण विश्वासाठी दिलेले आहे. या विश्वाला पूर्णपणे जाणून कसे घ्यायचे हे ओम च्या युक्तीचा अभ्यास केल्यास पटकन कळते. या विराट सनातन विश्वरूपाला जाणले तर नराचा नारायण होतो. नर म्हणजे विश्वाला जाणून घेण्याची इच्छा असणारा/असणारी व्यक्ती.(human being- all genders included). नारायण म्हणजे संपूर्ण विश्व जाणणारी व्यक्ती. हे संपूर्ण विश्व जाणून बुद्धित काय स्थिर होते? वासुदेव सर्वमिति!!! म्हणजे हेच की सर्वत्र एक अखंड अस्तित्व आहे आणि त्यातच मी आहे. मी सहित दिसणारे चराचर विश्व हेच एकमेव स्वरूप आहे यात “तू” असे काहीच नाही जे काही आहे ते एकाच विश्वरूपात आहे . हा विचार बुद्धित स्थिर कर . आणि हे केल्यावर जी बौद्धिक उत्क्रांती प्राप्त होईल त्यालाच विष्णु पद म्हणतात.

केशवराज हे विष्णु अवताराचे मंदिर आहे. आपण विष्णु अवतार कसे व्हायचे याचे संक्षिप्त निरूपण या एका मंत्रात सांगितले आहे. विष्णु पद हे मानवीय बुद्धीच्या उत्क्रांत अवस्थेचे स्थान आहे. या विषयाचा अभ्यास केला तरच हि बौद्धिक उत्क्रांती आणि त्या द्वारे मिळणारे उन्नत जीवनमान प्राप्त होते.

हा सगळा परिसर सरकारी नसून खाजगी आहे. तिथे दाबके आणि देपोलकर अशी घरं आहेत. मातीची , शेणाने सारवलेली घरं आहेत. अत्यन्त साधी पण स्वच्छ नेटकी राहणी आहे. अशाच एका दाबके कुटुंबात आम्हाला आमटी भात , पानगी , आंबोळी, फणसाची चविष्ट भाजी , थालीपीठ, मिरगुंड, चटण्या लोणचे सहित मस्त जेवण मिळालं. मुख्य म्हणजे सगळं गरम ताजं आणि आपुलकिने असं काही वाढलं की पोटंही भरलं आणि मनंही तृप्त झालं.

तिथले आजोबा पोटभर जेवा असे प्रेमाने म्हणत होते, आम्ही केशवराज उतरून आल्यामुळे घामाघूम होतो त्यांनी फॅन लावून दिला, 10 मिनीट बसा मग नाही गरम होणार असं म्हणत आमच्याशी गप्पा मारत बसले. शाळेत शिकणारा नातु पंख्याची दिशा adjust करून देत होता. नात आम्हाला सगळं काही हसतमुखाने वाढत होती. आत आजी, काकु गरम आंबोळ्या करत होत्या.

कोणी गिऱ्हाईक आले तर आजोबा आणि दोन नातु सगळे आत बाहेर ने आण करत होते. किंमत अत्यंत वाजवी. तिथला non commercial attitude पाहून आणि आनंदाने होणारा कारभार पाहून असं वाटलं की भारतीयांचा happiness index मोजायचा असेल तर या मातीच्या संस्कृतीशी जोडलेल्या भारतीयांचा मोजावा .तो खूप वर असेल . नक्कीच.

केशवराज मंदिर दापोली/आसूद येथे जाण्यासाठीचा मार्ग:

१) पुणे तो केशवराज मंदिर
पुणे – ताम्हिणी घाट – माणगाव – दापोली = १९० km
पुणे – शिरवळ – वाई – पोलादपूर घाट – दापोली = २५० km
पुणे – खोपोली – पाली – महाड – दापोली = २५० km

२) मुंबई ते केशवराज मंदिर
मुंबई – पेन – माणगाव – महाड – दापोली = २३० km

३) कोल्हापूर ते केशवराज मंदिर
कोल्हापूर – उंब्रज – चिपळूण – दापोली = २३० km

४) सातारा ते केशवराज मंदिर
सातारा – महाबळेश्वर – पोलादपूर घाट – खेड – दापोली = १७० km

दापोली जवळील पर्यटन स्थळे:

मुरुड बीच
कर्डे बीच
केळशी बीच
कोलथरे बीच
आंजर्ले बीच
केशवराज मंदिर
सिद्धी विनायक गणपती मंदिर
परशुराम भूमी
पन्हाळेकाजी लेणी
सुवर्णदुर्ग किल्ला
उन्हवरे गरम पाण्याचे झरे
हर्णै बंदर

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *