गणपतीच्या दिवसांतच ठरवलं होतं कि यंदाच्या वर्षभर साठलेल्या सुट्ट्या डिसेंबरमध्ये एकत्र घ्यायच्या आणि कुठेतरी नवीन ठिकाणी फिरायचं. नियोजन तर ठरवलं होतंच, पण प्रत्यक्ष घडतंय की नाही, यावर थोडा साशंक होतो. योगायोगानं, डिसेंबर 2024 मध्ये तो क्षण आलाच. साधारण दोन आठवड्यांच्या सुट्ट्या घेऊन मी पुण्यातून थेट कोल्हापूरला माझ्या गावी आलो.
गावाकडं आलो की, एक वेगळाच गारवा, आणि मनाला शांतता किंबहुना निवांतपणा जाणवतो. शेतामधली कामे चालूच होती. ऊस कारखान्याला चालला होता, यात थोडाफार हातभार लावला, पण तरीही काही दिवस फक्त स्वत:साठी काढायचं ठरवलं.
कोल्हापूर पासून जवळ कुठे फिरायचं? या प्रश्नाचे उत्तर आणि शोध येऊन थांबला तो संबंध महाराष्ट्र भर पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यापाशी.
सिंधुदुर्गच्या या किनारपट्टीवर पावलोपावली निसर्गाची नवलाई अनुभवायला मिळते. समुद्राच्या लाटांची गाज, पायाखाली पसरलेली शुभ्र वाळू, कधी मोत्यांसारखी चमकणारी, तर कधी सूर्यकिरणांत न्हालेली. त्या अथांग समुद्राच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग, आणि देवगडसारखे अभेद्य किल्ले म्हणजे जणू समुद्रालाही थोपवणारे रक्षणकर्तेच.
सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे निसर्गाचं वरदान. इथल्या माणसांच्या साधेपणात, निसर्गाच्या प्रत्येक ठिकाणी, आणि किनारपट्टीवरच्या प्रत्येक वाळूच्या कणात जणू एक सौंदर्य दडलेलं आहे. उंच नारळ-सुपारीच्या बागा, आंबा-काजूच्या बागा होय.
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुमारे 100 ते 120 किमी लांब उत्तर-दक्षिण पसरलेली अथांग किनारपट्टी पूर्ण अनुभवायची आणि तिचं सौंदर्य मनमुराद जगायचं, हे ठरवलं होतं. या प्रवासाचे नियोजन आणि वेळोवेळी मिळालेलं मार्गदर्शन हे माझ्या भाऊजींच्या सल्ल्यामुळे शक्य झालं, ज्यांच्यामुळे मला खऱ्या कोकणाच्या सौंदर्याचं दर्शन घडू शकलं.
पहिल्या दिवशीचा मुक्काम वैभववाडीत केला. कारण पश्चिम महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार सर्वात सोयीचा आणि फेमस मार्ग म्हणजे कोल्हापूर – गगनबावडा – करूळ घाट, आणि हाच घाट जिथे उतरतो ते ठिकाण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुका.
वैभववाडी हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले ठिकाण आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने या तालुक्यावर उधळण केलेली आहे. वैभववाडीत काही अप्रतिम धबधबे आणि निसर्गाचे चमत्कार पाहायला मिळतात, वैभववाडी हा फक्त निसर्गाने समृद्ध असलेला तालुका नाही, तर सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. इथे वावरताना इथल्या लोकांचे साधं, पण विचारांना चालना देणारं आयुष्य पाहून मन भरून आलं. दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून पुढच्या प्रवासाला निघालो.
प्रवासाची सुरुवात विजयदुर्ग किल्ल्यापासून झाली. वाघोटन नदीच्या खाडीवर वसलेला विजयदुर्ग किल्ला, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना विभाजित करणाऱ्या खाडीवर आहे. देवकृपेने या वर्षी बऱ्यापैकी थंडी पडली आहे. मला आजपर्यंत कोकणात कधीच थंडीची जाणीव झाली न्हवती पण ती आज होत होती. सकाळचा नाश्ता उरकून गाडी चालवायला सुरुवात केली, थंडीच्या वातावरणात गारव्याचा अनुभव घेत. खूप दिवसांनी मी एकटा, कोणत्याही पूर्वनियोजनाशिवाय प्रवासाला निघालो होतो. जिथे जे मिळेल ते खाणे, आणि जिथे झोप लागेल तिथे झोपणे याच विचाराने हा प्रवास सुरू केला.
वैभववाडीतून पुढे तळेरे गाव ओलांडल्यानंतर साधारण ६-७ किमी अंतरावर पांडवकालीन मंदिर असल्याची माहिती गुगलवरून मिळाली. मुख्य रस्त्यापासून २ किमी आत वळलो, आणि त्या वाटेवर पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असल्याचे पाहिले. सुरुवातीला खोदकामामुळे मला थोडा राग आला, पण नंतर कुतूहलाने मी त्या माणसांजवळ जाऊन गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांच्या कामात थोडी मदतही केली, जेणे करून काम लवकर होईल.
या अनुभवातून मला कोकणातील माणसांचा साधेपणा आणि आनंदी वृत्ती पुन्हा जाणवली. ते हसतखेळत काम करायचे, कुठलाही ताण नाही, कोणतीही तक्रार नाही. त्या भागात दवाखाना, शाळा किंवा दुकानांसारख्या सोयी कमी होत्या, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि सहजता होती. कश्याबद्दलही तक्रार न करणाऱ्या अशा लोकांच्या सहवासात वेळ कसा गेला, कळलंच नाही.
पुढे पांडवकालीन मंदिराजवळ पोचलो. मंदिर आणि त्याभोवतालच्या गुहांचे प्राचीन सौंदर्य पाहून मन प्रसन्न झालं. मंदिराच्या शिल्पकलेतून इतिहासाचा स्पर्श जाणवत होता, आणि त्या शांत परिसराने खूप भारावून टाकलं. असा अनुभव म्हणजे केवळ प्रवास नाही, तर निसर्गाशी आणि इतिहासाशी जोडला गेलेला एक अद्भुत संवाद आहे. यानंतर दर्शन घेऊन निघालो ते थेट पडेल कॅन्टीन ला पोचलो. आणि तिथून विजयदुर्ग ला.
विजयदुर्गला पोहोचल्यावर प्रथम विजयदुर्गच्या जेट्टीवर नजर गेली. तिथेच गाडी पार्क केली आणि चालत गडाच्या दिशेने निघालो. शनिवार-रविवारची गर्दी टाळल्यामुळे वातावरण शांत आणि रम्य होते. वाघोटन नदीच्या खाडीवर वसलेला विजयदुर्ग किल्ला, जिथे अरबी समुद्र आणि वाघोटन नदी एकत्र येतात, हा वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे. तीन पदरी तटबंदी असलेला हा किल्ला अनेक लढायांचा साक्षीदार असूनही आजही तेवढ्याच कणखरतेने उभा आहे.
थंडगार समुद्रवार्यामुळे वातावरण आल्हाददायक होते, विशेषतः हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे उन्हाचा त्रास जाणवत नव्हता. विजयदुर्गबद्दल आधीच थोडी माहिती घेतली होती, परंतु गडावर पोहोचल्यावर पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधून अधिक माहिती मिळवली. किल्ला संपूर्ण फिरण्यासाठी साधारणतः एक ते दोन तास लागतात, पण हे तुम्ही चालण्याचा वेग आणि फोटो काढण्यासाठी दिलेला वेळ अवलंबून असतो.
किल्ला पाहताना दरबार, गोळा-बारूद साठवण्याची ठिकाणे, धान्य कोठार, तोफा, खलबतखाना आणि इतर वास्तू पाहिल्या. या सगळ्यातून शिवरायांच्या दूरदृष्टीची पुन्हा एकदा जाणीव झाली. किल्ला पाहून झाल्यानंतर दुपारी तिथेच जेवण केले आणि पुढील प्रवास सुरू केला.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या किनारपट्टीला धरून पुढे जाण्याचा विचार होता. या प्रवासात रस्त्याच्या आजूबाजूच्या मंदिरांपासून समुद्रकिनारे आणि विविध स्थळे पाहत दक्षिण दिशेला जायचे ठरवले. विजयदुर्गपासून पुन्हा पडेल कॅन्टीनजवळ आलो आणि तिथून राईट टर्न घेतला. हा रास्ता सरळ जामसंडेकडे जातो. जामसंडेतून देवगडला जाता येते. या प्रवासात पडेल कॅन्टीनजवळ मला एटीएम सेंटर दिसले, तिथे थोडे पैसे काढले आणि प्रवास चालू ठेवला.
वळणदार रस्ते, उंच उंच नारळाच्या बागा, आंब्याच्या बहरलेल्या झाडांचे रान, काजूच्या झाडांनी व्यापलेले डोंगरकडे, वाहणाऱ्या नद्या आणि निसर्गरम्य खाड्या… अशा नयनरम्य परिसरातून माझा प्रवास सुरू होता. या प्रवासात अनेक मंदिरे बघायला मिळाली, पण त्यापैकी एक उल्लेखनीय मंदिर म्हणजे विमलेश्वर मंदिर.
विमलेश्वर मंदिर हे पडेल कँटीन पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आहे. पुढे एक फाटा लागतो आणि तिथून साधारण दोन-तीन किलोमीटर मुख्य रस्ता सोडून आत गेल्यानंतर हे मंदिर दिसते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे वर्षभर वाहणारी एक सुंदर नदी आहे.
या नदीकाठचे आणि मंदिराचे वातावरण इतके शांत, प्रसन्न आणि आल्हाददायक आहे की तुम्हाला वेळेचे भानच राहत नाही. येथील गार वारा, नदीचा आवाज, आणि सभोवतालच्या निसर्गाची सौंदर्यश्री यामुळे मन अगदी ताजेतवाने होते.
मंदिरात महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर, तिथे थोडा वेळ बसलो आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला. मग पुन्हा पुढील प्रवासाला निघालो. अशा ठिकाणी वेळ घालवल्यावर वाटते की निसर्गाचे हे अद्भुत देणे आपण जपायला हवे.
मंदिरातून निघाल्यानंतर, माझा प्रवास पुन्हा जमसंडे ते देवगड या दिशेने सुरू झाला. या प्रवासात गूगल मॅपचा वापर करत असाल, तर मॅप तुम्हाला मुख्य रस्त्याने जाण्याचा सल्ला देईल. मात्र, तुम्हाला खऱ्या सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर जमसंडेहून देवगडला आणि नंतर देवगडहून कुणकेश्वरला समुद्रकिनारी जाणारा मार्ग निवडा. हा रस्ता एका बाजूला अथांग समुद्र, तर दुसऱ्या बाजूला नारळ-सुरुची घनदाट झाडे अशा अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.
मी हा मार्ग निवडला आणि अनुभव अत्यंत अद्भुत होता. जमसंडे पार केल्यानंतर वाडातर खाडी ओलांडून देवगड गाठले. देवगडमध्ये मी विंडमिल गार्डन आणि ऐतिहासिक देवगड किल्ला पाहिला. किल्ल्यावरून समुद्राचा विहंगम नजारा मनात घर करून गेला. यानंतर मंदिरांना भेट देऊन पुढचा प्रवास सुरू केला, तोही समुद्रकिनाऱ्यावरूनच.
कुणकेश्वरकडे जाताना तारामुंबरीच्या समुद्रकिनाऱ्यावर भेट दिली. या मार्गावर विठ्ठल-रुक्मिणीचे एक सुंदर मंदिर लागते, जिथे थांबून नक्की दर्शन घ्यावे. त्यानंतर मीठमुंबरीचा समुद्रकिनारा पाहिला. इथे समुद्राचा किनारा आणि रस्त्याची पातळी जवळपास सारखी असल्याचा अनुभव विस्मयकारक होता. समुद्राच्या शेजारी, सुरुच्या बागांमधून गाडी चालवण्याचा आनंद अवर्णनीय होता.
प्रत्येक वळणावर निसर्गाचा नवा आविष्कार आणि गार वाऱ्याची सोबत ही या प्रवासाची खरी गंमत होती. अशा रम्य आणि मनमोहक रस्त्यावरून प्रवास करत मी शेवटी कुणकेश्वरला पोहोचलो.
मागील वेळी कुणकेश्वरला आलो होतो तेव्हा दर्शनासाठी खूप गर्दी होती, पण या वेळेला वीकेंड टाळून आलो असल्यामुळे परिसर पूर्णपणे शांत आणि निवांत होता. अवघ्या दहा मिनिटांतच मंदिराचे दर्शन झाले. मंदिरातील प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेत, काही वेळ मंदिर परिसरात घालवला. प्रसाद घेतल्यानंतर पुढील प्रवासाची तयारी सुरू केली.
स्थानिक लोकांकडून पुढील मार्गाची विचारपूस केली असता, त्यांनी समुद्रकिनाऱ्याच्या रस्त्याने प्रवास करण्याचा सल्ला दिला. कुणकेश्वरहून निघाल्यावर कटवण, तांबळबेग , मिठबाव, मोरवे असे करत माझा प्रवास सुरू झाला.
या प्रवासात मी अनेक ठिकाणी मुख्य रस्ता सोडून ३-४ किलोमीटर आत समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने गेलो. हे मार्ग अतिशय सुंदर, ग्रामीण भागातून जाणारे आणि शांत जंगलांनी व्यापलेले होते. यातील काही रस्ते आणि ठिकाणे आयुष्यात पुन्हा पाहायला मिळतील का, याची शाश्वती नाही. त्यापैकी उल्लेखनीय ठिकाण म्हणजे मुणगे बीच.
मुणगे बीचकडे जाताना वाटेत नदीचे प्रवाह आणि सुपारी-नारळाच्या झाडांनी भरलेले बागायती क्षेत्र दिसले. मुंडगे बीचच्या रस्त्याने तर माझे मन पूर्णपणे जिंकून घेतले. एक बाजूला उंच झाडे आणि दुसऱ्या बाजूला वाहणारी नदी, या सोबतीने प्रवास अधिकच रोमांचक झाला. या समुद्रकिनाऱ्यांवर पोहोचल्यानंतर मला जाणवले की संपूर्ण किनारा फक्त माझ्या स्वाधीन होता—निवांत, शांत आणि अपरिमित सौंदर्याने नटलेला.
या अप्रतिम स्थळांचा आस्वाद घेत, मी पुन्हा मुख्य रस्त्याला लागलो. मजल दरमजल करत, संध्याकाळपर्यंत आचरा येथे पोहोचलो. तिथे पोचल्यानंतर मला समजले कि आज पर्यंत मी फक्त बातम्यांमधून ऐकत असलेली आचरा गावची गावपाळण प्रथा. ती त्यावेळी तिकडे सुरु होती आणि सर्व गाव हा त्याच्या पाळीव प्राण्यांसह गावाबाहेर राहत होता. तर मला त्या प्रवासात तेही अनुभवायला मिळाले.
तोंडिवली आणि तळाशील सारखे सुंदर समुद्रकिनारे फिरत फिरत मी मालवणला पोहोचलो. मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याचे भव्य वैभव अनुभवले, तसेच इतर काही ठिकाणांचीही सैर केली. दिवसभराच्या प्रवासाचा गोड शेवट निवांत बीचवर बसून सूर्यास्त पाहण्यात झाला. पिवळसर-लालसर प्रकाशात समुद्राची लाटांची चमकणारी नजाकत मनाला सुखावून गेली.
एव्हाना रात्र होत आली होती, आणि आता मुक्कामासाठी ठिकाण शोधायची वेळ आली. सुरुवातीला मालवणमध्ये थांबण्याचा विचार होता, पण शांत आणि निवांत ठिकाण हवे असल्याने देवबागकडे जाण्याचा निर्णय घेतला.
मालवण ते देवबागचा प्रवास हा वेगळ्याच प्रकारचा होता. हा मार्ग समुद्रात आत गेलेल्या जमिनीच्या अरुंद भागातून जातो. एका बाजूला अथांग समुद्र आणि एका बाजूला कर्ली नदी यांचे अप्रतिम दृश्य पाहताना रात्रीचा अंधारसुद्धा सुंदर वाटत होता. रस्त्यात तारकर्लीचा देखणा समुद्रकिनारा लागला.
देवबागला पोहोचल्यानंतर एका होमस्टेमध्ये मुक्काम केला. त्या होमस्टेचे वातावरण इतके आपुलकीचे होते की जणू मी माझ्याच घरी आहे असे वाटत होते. त्यांच्या उबदार आदरातिथ्याने दिवसाचा थकवा पार गायब झाला. रात्रीचे जेवण इतके चविष्ट होते की शब्दांत वर्णन करणे कठीण आहे.
जेवणानंतर समुद्रकिनारी फेरफटका मारला. शांततेत गूढ लाटांचा आवाज आणि रात्रीच्या गार वाऱ्याचा स्पर्श मनाला प्रफुल्लित करत होता. या अनुभवाने दिवसाच्या प्रत्येक क्षणाला एक प्रकारचे पूर्णत्व दिले. शेवटी, या सुखद अनुभवांसह मी माझ्या होमस्टेमध्ये शांत झोप घेतली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो आणि देवबागच्या रमणीय समुद्रकिनाऱ्यावर चालत फिरलो. हा किनारा शांतता आणि सौंदर्याने भरलेला आहे. चालताना समुद्राच्या लाटांचा आवाज, गार वारा आणि किनाऱ्याच्या सभोवतालची निसर्गसंपत्ती मनात साठवण्याचा प्रयत्न करत होतो.
देवबागच्या समुद्राचा आणि कर्ली नदीचा संगम हा मुख्य आकर्षणाचा भाग आहे. तिथे गेल्यावर समजले की संगमाच्या ठिकाणी सध्या मोठे दगड टाकून बांधकाम सुरू आहे, कारण जमिनीची धूप रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भरतीचे पाणी आल्यामुळे मला संगमाच्या वाळूत उतरता आले नाही, पण तिथून दिसणारा भोगवे समुद्रकिनारा अप्रतिम होता. मी परत होमस्टेवर आलो, फ्रेश झालो, आणि नंतर स्कुबा डायव्हिंगसाठी निघालो. देवबागमध्ये स्कुबा डायव्हिंगसाठी चांगली सोय आहे आणि तुलनेने वाजवी दरात (₹1000-₹1200 प्रति व्यक्ती).
तुम्ही पिक्चर्समध्ये पाहून जर त्या अपेक्षांवर स्कुबा डायव्हिंग करायचे ठरवून आला असाल तर तसे करू नका, कारण प्रत्यक्ष अनुभव हा प्रत्येकासाठी वेगळा असतो. समुद्रात जाऊन खाली असलेल्या जीवनाचा अनुभव घेताना भीती आणि थरार यांची अनोखी सांगड अनुभवायला मिळाली. वरून वाटणारे सोपे स्कुबा डायव्हिंग प्रत्यक्षात तितकेच आव्हानात्मक आहे, पण तेवढेच खासही आहे.
स्कुबा डायव्हिंगचा थरार अनुभवून परत आल्यावर, दुपारचे जेवण न करताच मी गाडीला स्टार्टर मारला आणि पुढील प्रवासाला निघालो. पुन्हा मालवणमध्ये येऊन चिपी विमानतळ मार्गे वेंगुर्ल्याच्या दिशेने प्रवास सुरु केला. मध्ये मध्ये येणारे सर्व बोर्ड आणि त्यावरील गावांची नावे मी वाचत होतो. अचानक मला भोगावे समुद्रकिनारा असा बोर्ड दिसला आणि सकाळच्या देवबाग – कर्ली नदीच्या संगमावर उभा राहून दिसणारा भोगावे किनारा आठवला.
मी लगेच तिकडे गाडी वळवली. त्याच बरोबर माझ्या भाऊजींनीही मला निघायच्या आधी भोगावे किनारा नक्की बघण्यासाठी आवर्जून सांगितले होते. ५ किमी आत येऊन मी भोगावे किनाऱ्यावर थांबलो. आणि बीच वर जाऊन मी पाहतो तर काय, अप्रतिम असा स्वछ वाळूचा सुंदर समुद्रकिनारा पाहून माझा विश्वास बसेना कि हा भारतात आहे. भोगावे च्या बाजूने दिसणारे देवबागच्या दृश्य अजूनच सुंदर आहे.
भोगावे किनारा अतिशय शांत, समाधानी, सुंदर आणि राहणीय असा होता. तिथे बराच वेळ बसून मी एक कोकम सरबत पिऊन पुन्हा गाडी सुरु केली ती वेंगुर्ल्याच्या दिशेने जाण्यासाठीच.
इथून निघाल्यानंतर, निवती बीच आणि मापनसारख्या अनेक सुंदर ठिकाणांना भेट देत, समुद्रकिनाऱ्याच्या रमणीय रस्त्यांचा मनमुराद आनंद घेत, सोबत गाण्यांचा साथसोहळा सुरू होता. हा प्रवास फक्त निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यापुरता मर्यादित नव्हता, तर जिथे वेळ आणि संधी मिळेल तिथे मी स्थानिक लोकांशी संवाद साधून त्यांच्या जीवनशैलीचे, संस्कृतीचे आणि त्यांच्या भोगोलिक परिस्थीचे पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो.
माझ्या या प्रवासात पुढचा थांबा होता वेंगुर्ला. वेंगुर्ल्यात पोहोचल्यावर गाडीत पेट्रोल भरून घेतले आणि एका छोट्या टपरीत गरमागरम चहा घेतला. चहा संपल्यावर पुन्हा प्रवास सुरू केला. वेंगुर्ल्याच्या पुढे जाणाऱ्या रस्त्यावर आंबा आणि नारळाच्या बागा नजरेस पडल्या. आत्तापर्यंत पाहिलेले निसर्ग सौन्दर्य आणि वेंगुर्ल्याच्या पुढील निसर्ग हा एक्दम वेगळाच जाणवत होता. झाडांचे प्रकार बदलेले इथे मला प्रामुख्याने जाणवले, त्याचबरोबर त्यांची घनताही थोडी वाढली होती.
प्रवास सुरु असतानाच एका वळणावर, आरवली या सुंदर गावी पोहोचलो. आरवलीचा समुद्रकिनारा जितका मनमोहक आहे, तितकेच प्रसिद्ध आहे वेतोबा मंदिर. त्या मंदिराच्या भव्यतेने आणि शांततेने भारावून गेलो. दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न झाले आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला लागलो.
प्रवास करताना शिरोडा बीचच्या सौंदर्याने मन मोहून गेले. महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला, सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा राज्याच्या सीमारेषेवर वसलेले रेडी हे ठिकाण गाठण्याचा निर्धार केला. रेडीला पोहोचायला अंधार पडला होता, पण गणपती मंदिरात अजून दर्शन सुरु होते. योगायोगाने त्या दिवशी संकष्टी चतुर्थी असल्याने मंदिरातील वातावरण अधिक मंगलमय होते. रेडीचे गणपती मंदिर पाहताना त्याच्या भव्यतेने आणि शिल्पसौंदर्याने मन भारावून गेले. दर्शन घेतल्यावर समजले की रात्री नऊ वाजता महाप्रसाद होणार आहे.
मी जवळच्या एका हॉटेलमध्ये रूम घेतली, थोडा फ्रेश झालो आणि पुन्हा मंदिरात गेलो. मंदिरात आरती सुरु झाली, आरती आणि घंटानादानी रात्रीच्या अंधारातही परिसर दूमदूमून गेला. सर्व वातावरण प्रसन्न झाले. नंतर दर्शन घेऊन महाप्रसाद घेतला आणि रात्री हॉटेलवर परतलो आणि दिवसभराच्या प्रवासाच्या आठवणी मनात साठवत शांत झोप घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी परतीचा प्रवास कुडाळ, ओरस, कणकवली, वैभववाडी मार्गे केला. हा प्रवास सुद्धा अतिशय सुंदर झाला.
अशापद्धतीने, मी महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा अशी ओळख असलेला संपूर्ण सिंधुदुर्ग पहिला, आणि अनुभवला. मला खात्री पटली कि “महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा” अशी ओळख योग्यच आहे. इथे प्रवास करताना मी बहुदा ग्रामीण भागातून फिरलो. तेथील स्थानिक लोकांशी संवाद साधले, त्यांचं जीवनचक्र जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
त्यावरून मला एक गोष्ट कळली ती म्हणजे आपण विनाकारण लहान सहान गोष्टीं बद्दल तक्रारी करत असो. इथल्या लोकांच्या मानाने आपण खूप सुखी आहोत. इथे साधं एखादे १५ मिनिटाचे किंवा १ तासाचे काम असेल किंवा साधा घरातील किराणा भरायचा असेल किंवा एखाद्या डॉक्टर कडे जायचे असेल तरी राहत्या गावातून ३ ते ४ किमी पायी प्रवास करायचा आणि तिथून मग एखादी ST बस आली तर त्यात बसून बाजारपेठ असलेल्या गावात जायचे. त्यानंतर काम झाल्यावर लगेच परत यायचे असेही नाही. जेंव्हा संध्याकाळी ST असेल तेंव्हाच परतीचा प्रवास शक्य आणि पर्यायाने ST स्टॉप पासून पुन्हा गावा पर्यंत ३ ते ४ किमी पायी प्रवास.
हे तर फक्त मी एक उदाहरण दिलेलं अशी अनेक अडचणी इथल्या लोकांना आहेत, शिक्षणाची तर मोठी अडचण आहे, त्याचबरोबर शिक्षणा बद्दलची जागरूकताच इथे कमी आहे असे मला वाटले. १०, १२ नंतर पुढे कोणते शिक्षण घेणे योग्य आहे हे ठरवणे कठीण. कारण इथे उपलब्ध नसलेल्या शिक्षण सेवा. साधं पुण्याला किंवा मुंबईला जरी जायचं म्हंटलं तरी ते इतके सहज आणि सोपे काम नाहीये. तरीही तिथले लोक कोणत्याही प्रकारची तक्रार न करता निसर्गात एकरूप होऊन आपले सुशेगात जीवनपद्धती अवलंबून सुखात जीवन जगात आहेत.
हा सिंधुदुर्ग जिल्हा फिरल्यामुळे अनेक निसर्गाचे रूपे पाहायला मिळाली. खरा निसर्ग आणि खरे कोकण काय असते ते मला इथे बघायला मिळाले.
तळकोकणाबद्दल प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. कोणी रत्नागिरीला तळकोकण म्हणता तर कोणी कश्याला. त्या भानगडीत न पडत मी निघालो आणि सर्व काही अनुभवले आणि समजले की तळकोकण म्हणजे केवळ पर्यटनस्थळ आणि निसर्ग नाही, ती एका जीवनशैलीची साक्ष आहे जी दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही. ती अनुभवायला तुम्हाला सिंधुदुर्गलाच यायला लागतंय.
हाच प्रवास मी पुन्हा पुन्हा करायला तयार आहे. प्रत्येक वेळी काहीतरी नवं सापडेल, काहीतरी मनाला भिडेल. कारण, तळकोकण म्हणजे एक प्रेमळ गोष्ट आहे, ती पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटणारी, आणि प्रत्येक वेळेला नव्याने अनुभवायची.