म्हैसूर ला ऐतिहासिक शहराचा दर्जा का आहे? | Why does Mysore have the status of a historical city?

Hosted Open
6 Min Read

हॅलो मी सोमेश, मी स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये.

ही साउथ इंडिया सिरीज आहे. शेवटच्या पार्ट मध्ये तुम्ही पाहिले असेल की कशा पद्धतीने आम्ही काल म्हैसूर मध्ये आलो. पुण्यामध्ये नोकरी करणारे ४ मित्र अचानक शुक्रवारी संध्याकाळी ठरवतो की साउथ इंडिया ला ट्रीप ला जायचं काय, आणि प्रचंड कोसळणारा पावसामध्ये आम्ही रात्री साडेअकरा वाजता प्रवास सुरू करतो काय, आणि त्यानंतर मग गोवा, गोकर्ण, मुर्डेश्वर, उडपी, मंगलोर, पुष्पगिरी, कुर्ग (स्कॉटलंड ऑफ इंडिया) असे मजल दरमजल करत करत तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्ही म्हैसूर मध्ये येऊन धडकलो.

रात्री जेवण करून झोप घेतल्यानंतर आमचा पूर्ण थकवा निघून गेला. आज सकाळी पूर्णपणे ताजेतवाने वाटत होते. आमचे बेसिकली म्हैसूर मध्ये दोनच गोष्टी बघण्याचा प्लॅन होता. एक म्हैसूर पॅलेस आणि चामुंडेश्वरी मंदिर. मैसूर मध्ये आम्हाला एक मराठी व्यक्तीचे हॉटेल भेटले ते नाशिकचे मूळ रहिवासी होते, २० वर्षांपूर्वी म्हैसूर ला स्थायिक झालेत. तिथेच आम्ही सकाळी नाष्टा केला, त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केले.

आम्ही पुढील प्रवासाला निघालो. सकाळी लवकर आठ-साडेआठ वाजता आम्ही थेट चामुंडेश्वरी मंदिर गाठले. चामुंडेश्वरी मंदिर हे म्हैसूर पासून आठ ते दहा किलोमीटर असल्यामुळे आणि डोंगरावरील उंचीमुळे तेथील वातावरण पूर्णपणे वेगळे होते. दाट धुके पसरले होते, वारा वाहत होता, पाऊस पूर्णपणे थांबला होता त्यामुळे थोडे फिरायला आज मजा येईल असे वाटले होते, आणि जे की खरे झाले.

चामुंडेश्वरी मंदिरातील देवीचे दर्शन घेतल्यानंतर मन अतिशय प्रसन्न झाले. एक ते दीड तासात व्यवस्थित मंदिरात दर्शन झाले. सकाळची आरती मिळाली, चामुंडेश्वरी मंदिराचे वैशिष्ट्य असे की इथे महिषासुर या राक्षसाचा वध या देवीने केला होता.

त्यामुळे इथे नवरात्रोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारतभरातून मैसूरचा दसरा आणि नवरात्रोत्सव पाहायला लोक येत असतात. इथून निघण्याचा कोणाचीही इच्छा होत न्हवती, कारण मंदिराच्या परिसरातील वातावरण इतके सुंदर होते की अजून काही वेळ थांबावे असे सर्वांनाच वाटत होते. पण आमचे पुढचे नियोजन बघता आम्हाला निघणे भाग होते. इथून निघत असतानाच आम्हाला एक गाईड भेटले, त्यांना सोबत घेतलं तर त्यांनी बऱ्याच गोष्टींची माहिती आम्हाला सांगितली पण वेळेअभावी या सर्व गोष्टी बघणे शक्य नव्हते.

यानंतर गाईड यांच्या सांगण्यावरून आम्ही भारतातील सर्वात मोठ्या अखंड दगडातील नंदिच्या मूर्तींपैकी एक नंदीची मूर्ती ही म्हैसूर मध्ये आहे. ती पाहायला गेलो. नंदीची मूर्ती पाहून अक्षरशः थक्क व्हायला होते. त्याच्यावरील नक्षीकाम, बारकावे आणि अखंड दगडातील उभे कोरलेली नंदीची मूर्ती हे खरंच आपल्या ऐतिहासिक जुन्या काळातील लोकांच्या कलेचा एक उत्तम नमुनाच म्हणावे लागेल. जे की आत्ता अत्याधुनिक मशनरी वापरून पण जमणार नाही असेच वाटते.

नंदीचे दर्शन घेऊन, महादेवाचे दर्शन घेतले आणि जड अंतकरणाने डोंगर उतरायला सुरुवात केली. यानंतर आम्हाला गाईडने सांगितले की म्हैसूर मध्ये एक चर्च आहे, जे इंग्रजांनी बांधलेले आहे. ते चर्च पाहायला गेलो. सेंट फिलोमिना कॅथेड्रल चर्च बघून अक्षरशः असं वाटलं की कोणत्यातरी युरोपियन कंट्री मध्ये आपण आहोत की काय?

कारण इतकी स्वच्छता, बांधकामाची भव्यता आणि त्याचे बारकावे पाहून खरंच युरोपियन ऐतिहासिक कलेचा उत्तम नमुना पाहून मन प्रसन्न झाले. खूप सुंदर चर्च होते. चर्च पाहून झाल्यानंतर आम्ही म्हैसूर ची प्रसिद्ध नंदिनी डेअरी मध्ये गेलो तिथे अनेक खाद्यपदार्थांची खरेदी केली. अर्थातच म्हैसूर पाक सहा सात किलो घेतला. घरी द्यायचा होता आणि ऑफिसमध्येही द्यायचा होता. त्याचबरोबर आम्ही तिथून निघालो आणि काही स्ट्रीट शॉपिंग पण केली.

त्यानंतर आम्ही थेट गेलो ते जगप्रसिद्ध अशा मैसूर पॅलेस ला भेट द्यायला. म्हैसूर पॅलेस चे मूळ नाव हे आंबा विलास पॅलेस असे आहे. त्या राजवाड्याची भव्यता पाहून पूर्वीच्या काळातील राजांच्या विद्वान बुद्धिमत्तेची आणि प्रजे प्रति असलेल्या कळवळ्याची जाणीव होते. म्हैसूर पॅलेस ची ठेवण उंची भव्यता हे सर्वच वाखाणण्याजोगे जोगे आहे.

चामराजा वडीयारची थोरली मुलगी जयलक्षमन्नी हिच्या लग्नात १८९७ मध्ये लाकडाने बांधलेला मूळ वाडा जळून खाक झाला आणि १९१२ मध्ये रु. 42 लाख सध्याचा राजवाडा इंडो-सारासेनिक शैलीत बांधला गेला आहे. या राजवाड्यात हिंदू, मुस्लिम, राजपूत आणि गॉथिक शैलीच्या वास्तुकला एकत्र आहेत. संगमरवरी घुमट आणि 145 फूट पाच मजली टॉवर असलेली ही तीन मजली दगडी रचना आहे. मध्यवर्ती कमानीच्या वर गजलक्ष्मीचे एक प्रभावी शिल्प आहे, हि संपत्ती, समृद्धी, नशीब आणि तिच्या हत्तींसह विपुलतेची देवी आहे. राजवाडा एका मोठ्या बागेने वेढलेला आहे. सुप्रसिद्ध ब्रिटीश वास्तुविशारद हेन्री इर्विन यांनी डिझाइन केलेला हा राजवाडा जगभरातील उत्कृष्ट नक्षीकाम आणि कलाकृतींचा खजिना आहे.

असा दुसरा पॅलेस मी अजून तरी कुठे बघितला नव्हता, अर्थातच राज्यस्थानलाही अनेक मोठे पॅलेस आहेत पण त्यांच्यापेक्षा हा खूप वेगळा आहे. म्हैसूर पॅलेस फिरायला जवळपास अडीच ते तीन तास लागले पूर्णपणे म्हैसूर पॅलेस बघून आमचा झाला आणि काहीतरी ऐतिहासिक चांगल्या पद्धतीच्या गोष्टी बघितल्यामुळे जणू काही आपण पुन्हा इतिहासात गेलो की काय असा भास निर्माण झाला. आता वाजले होते दुपारचे ३ नि अजून जेवण झाले न्हवते. त्यामुळे इथून आमचा प्लॅन असा ठरलाय कि न जेवताच काहीतरी स्नॅक्स खाऊन पटकन पुढील प्रवासाला निघायचे, कारण इथून आम्हाला मदुराईला जायचे होते.

पण म्हणतात ना देवाच्या मनात जे असेल तेच होते, आपण फक्त नाममात्र हो.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *