मराठा साम्राज्याच्या इतिहासात शनिवारवाडा ऐतिहासिक घटनांच्या दृष्टीने महत्वाची आणि नशीबवान वास्तू आहे. शनिवारवाड्याने विजयाचे आनंद अनुभवले तसेच काही दुर्दैवी प्रसंगही अनुभवले आहेत. शनिवारवाड्याच्या सुखदुखाच्या या घटना इतक्या भरमसाट आहेत कि विस्तारभयास्तव त्याची येथे नोंद घेणे शक्य नाही. एका किंवा काही घटनेची नोंद घ्यावी तर दुसऱ्या अनेक नोंदींवर अन्याय होईल.
१० जानेवारी १७३० रोजी पुण्यातील शनिवार वाड्याचा पाया घातला गेला आणि २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवार वाड्याची वास्तुशांती झाली. त्यानंतरही अगदी पेशवे बाजीराव दुसरे यांच्या काळापर्यंतही शनिवार वाड्यात टप्प्याटप्याने बांधकामे होतच होती. पेशवे बाजीराव पहिले यांना त्या जागेवर एक ससा कुत्र्याचा पाठलाग करतांना दिसला म्हणून त्या जागेत काहीतरी विलक्षण आहे असे गृहीत धरुन त्यांनी ती जागा वाड्यासाठी निवडली अशी एक (दंत)कथा सांगितली जाते.
नोंदीनुसार ०७ जुन १७९१ रोजी शनिवारवाड्याला लागलेल्या पहिल्या आगीत कोठी आणि सातखणी बंगल्याचे वरचे पाच मजले जळाले. आग आणखी पसरु नये म्हणून यावेळी माजघर स्वयपाक घर असे काही भाग पाडण्यात आले.
१८०८ मध्ये शनिवारवाड्याला लागलेल्या दुसऱ्या आगीला वेळेतच आटोक्यात आणता आल्याने फारसे नुकसान झाले नाही.
२५/२६ फेब्रुवारी १८१२ रोजी शनिवारवाड्याला लागलेल्या आगीत उरलेले दोन मजले आणि अस्मानी महाल जळून खाक झाले.
१० सप्टेंबर १८१३ मध्ये शनिवार वाड्याला लागलेल्या आगीत दिवाणखाना जळून गेला.
२१ फेब्रुवारी १८२८ रोजी शनिवार वाड्याला लागलेल्या आगीत शिल्लक राहिलेला बहुतेक संपूर्ण शनिवारवाडा जळाला. ही आग तब्बल पंधरा दिवस धुमसत होती.
१७ नोव्हेंबर १८१७ च्या येरवड्याच्या लढाईनंतर शनिवार वाडा इंग्रजांच्या ताब्यात गेला. १८२१ नंतर इंग्रजांनी शनिवारवाड्यात कैदी ठेवण्यास सुरुवात केली. १८२५ च्या आसपास तेथे तळमजल्यावर कैदी असत, दुसऱ्या मजल्यावर सामान्य दवाखाना आणि तिसऱ्या मजल्यावर वेड्यांसाठी हॉस्पिटल होते.
पेशवे बाजीराव दुसरे यांनी स्वतःसाठी म्हणून पुण्यात शुक्रवारवाडा नावाचा स्वतंत्र वाडा निर्माण केला. त्यासाठी त्यांनी पुण्यातच एक जुना वाडा शुक्रवार पेठेत विकत घेतला. त्या वाड्यामागे काही बांधकाम करून नंतर तो जुना वाडा पाडण्यात आला. आणि त्याच जागेवर पुन्हां बांधकाम केले गेले.
१८०३ मध्ये पेशवे बाजीराव दुसरे शुक्रवार वाड्यात सहकुटुंब राहायला गेले. पुढे १८०८ च्या आसपास शुक्रवार वाड्याच्या आसपासची घरे विकत घेऊन वाड्याचा आणखी विस्तार करण्यात आला. हा वाड्याचे बांधकाम सहा मजली झाले होते.
१८२० मध्ये शुक्रवार वाडा आग लागून जळाला. आगीतून वाचलेला वाडा पाडून त्यात निघालेले सामान इंग्रजांनी विकले.
पेशव्यांनी बांधलेल्या वाड्यामध्ये शुक्रवार वाडा हा असा अल्पवयीन ठरला. शुक्रवार वाड्याच्या समोरील बाजूला पेशवे बाजीराव दुसरे यांनी दरबार व इतर कार्यक्रमांसाठी तालीमखाना म्हणून स्वतंत्र इमारत निर्माण केली होती. शुक्रवार वाडा जळाल्यानंतर तालीमखान्यात इंग्रजांनी १८३० मध्ये शाळा चालू केली होती. १८८५ च्या आसपास तालीमखान्यात नगरपालिकेची कचेरी होती. १९२२ मध्ये तालीमखाना कंत्राटदाराच्या ताब्यात गेला.
१० जानेवारी १७३० रोजी पुण्यातील शनिवार वाड्याचा पाया घातला गेला आणि २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवार वाड्याची वास्तुशांती झाली. त्यानंतरही अगदी पेशवे बाजीराव दुसरे यांच्या काळापर्यंतही शनिवार वाड्यात टप्प्याटप्याने बांधकामे होतच होती.
– मोकदम पाटील थोपटे गायकवाड