कोकणातील धूतपापेश्वर मंदिर: आयुष्यात एकदा तरी जायलाच हवं

Hosted Open
6 Min Read
धूतपापेश्वर Temple

जय धूतपापेश्वर नमो नमः

डोंगराच्या कुशीत दडलेली, निसर्गसौंदर्याचा आणि शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेली मंदिरं म्हणजे आनंदाची पर्वणी असते. मंदिरात गेल्यावर मनाला शांतता मिळावी, काही काळ डोळे मिठून फक्त प्रसन्नता अनुभवावी, याची गरज असते. आडवाटेला, डोंगराच्या सान्निध्यात वसलेली काही शिवालयं असा आनंद देतात. रत्नागिरी जिल्ह्यातलं राजापूरजवळचं धूतपापेश्वर मंदिर हे असंच पाहताक्षणी मन प्रसन्न करणारं, शांत आणि रम्य ठिकाण.

तळकोकणाला लागून असलेलं राजापूर ही एक नदीकाठी वसलेली छोटी बाजारपेठ आहे. राजापूर प्रसिद्ध आहे ते इथे ठराविक कालावधीनंतर उगम पावणाऱ्या गंगेसाठी. ही गंगा काही वेळा नियमित तर काही वेळा अनियमितपणे उगवत असली, तरी तिची ख्याती लांबलांबपर्यंत पसरलेली आहे. मुळातच राजापूर शहर सखल भागात वसलेलं. त्यामुळे नदीला थोडा मोठा पूर आला, तरी शहराची बाजारपेठ पाण्याखाली जाते. अशा या शहरातल्या विशिष्ट भागात दर चार वर्षांनी अवतरणारी गंगा हे एक अद्भुतच.

या गंगेबद्दल नंतर बोलू. आधी राजापूरजवळच्या एका विलक्षण ठिकाणाची माहिती घेऊ या.

रत्नागिरी-पूर्णगड-आडिवरेमार्गे राजापूरला गेलं, तर रानतळे गावाजवळ राजापूर शहराकडे जाण्यासाठीचा फाटा दिसतो. तिथून तीव्र उतार उतरून गेलं, की राजापूरचा जवाहर चौक लागतो. याच उतारात उजवीकडे धूतपापेश्वरला जाण्यासाठीचा एक रस्ता फुटतो. तिथून तीन किलोमीटर आत गेलं, की धूतपापेश्वराचं प्राचीन मंदिर आहे.

हा आतला रस्ता अगदीच अरुंद असल्यामुळे तिथून गाडी बेतानेच चालवावी लागते. देवळापर्यंत चारचाकी गाडी जात असली, तरी गर्दीच्या दिवशी आत वाहनांची गर्दी होत असल्यामुळे गाडी लांब लावूनच आत चालत यावं लागतं. मंदिराच्या परिसरात पोहोचलं, की माडापोफळींची बनं आणि तिथून ऐकू येणारा पाण्याचा खळखळाट लक्ष वेधून घेतो. थोडं अंतर चालून गेलं, की समोरच मंदिराची कमान दिसते. पावसाळ्यात हा परिसर विलक्षण निसर्गसौंदर्यानं नटलेला असतो.

कमानीतून आत प्रवेश केल्यावर समोरच धूतपापेश्वराचं प्राचीन आणि देखणं मंदिर दिसतं. एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला अखंड वाहणारी नदी, अशा पार्श्वभूमीवरचं हे शंकराचं निवासस्थान पाहताक्षणीच मन वेधून घेतं. मंदिराचं आवार प्रशस्त असून, त्याची रचनाही आकर्षक आहे. मंदिराची प्राचीनता आणि आधुनिकता यांचा संगम साधून त्याचा जीर्णोद्धार करण्यात आल्यामुळे त्याचं सौंदर्य आणखी खुललं आहे.

मंदिराच्या बाजूलाच मृदानी नदीचे पात्र आहे. ही नदी शेजारच्याच डोंगरातून उगम पावते आणि खळाळत पुढे झेपावते. धूतपापेश्वर मंदिराच्या बाजूला दोन ठिकाणी तिचं पाणी उंचावरून खाली पडते, त्या ठिकाणी धबधबा तयार झाला आहे. फार उंचावरून कोसळणारा नसला, तरी हा धबधबा विस्तीर्ण आणि आकर्षक आहे. धबधब्याचं हे रूप तासन्तास बघत राहण्यासारखं आहे.

इथून पुढे ही नदी एक छोटं वळण घेऊन संथ वाहत राहते आणि पुढे पुन्हा थोड्या उंचीवरून खाली कोसळून आपला पुढचा मार्ग शोधते. नदीचा हा परिसर आणि धबधबा वेडावून टाकणारा आहे. विशेषतः जुलै ते नोव्हेंबर या काळात इथे पाणी वेगानं वाहत असल्यामुळे हा सगळाच परिसर हिरवाईनं नटलेला असतो. पाऊसही इथे भरपूर असतो.

धबधब्याचा मोठा प्रवाह अतिशय आकर्षक दिसतो. डिसेंबरनंतर हा प्रवाह आटत जातो आणि नंतर अगदीच छोटी धार राहते. या पात्रात डुंबणं हा अतिशय धमाल अनुभव असतो. अर्थात, पाण्याचा वेग आणि खोली पाहूनच इथे पाण्यात उतरणं शहाणपणाचं. जोरात पाऊस असेल, तर अचानक वेगानं पाणी येऊन पाण्याची पातळी वाढण्याचा धोकाही असतो.

तसा इशाराही इथं देण्यात आला आहे. निसर्गाशी खेळ न करता त्याला सांभाळून त्याचा आनंद घेतला, तर तोही आपल्याला अंगाखांद्यावर खेळवतो. धूतपापेश्वरला निसर्गाचं हे विलक्षण लोभस रूप अनुभवायला मिळतं. श्रावणातल्या सोमवारी या मंदिरात दर्शनासाठी गर्दी होते. महाशिवरात्रीला इथे सात दिवसांचा मोठा उत्सव असतो. धूतपापेश्वर हे अनेकांचं कुलदैवत असल्यामुळे इथे उत्सवाच्या काळात मोठी गर्दी उसळते. गर्दीचा हंगाम टाळून या ठिकाणी भेट दिली, तर पर्यटनाचा आणि निसर्गाचा निर्भेळ आनंद घेता येतो.

राजापूरची गंगा हा तर निसर्गाचा विलक्षण चमत्कार आहे. राजापूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरच्या उन्हाळे परिसरात असलेल्या कुंडांमध्ये ही गंगा प्रकटते. दर चार वर्षांनी या कुंडांमध्ये पाणी प्रवाहित होतं. त्याला गंगा असे म्हटलं जातं. तिची साग्रसंगीत पूजा केली जाते, काही धार्मिक विधीही होतात. ठराविक कालावधीनंतर याच ठिकाणी या ११ कुंडांमधून पाण्याचा प्रवाह कसा सुरू होतो, याबद्दल वर्षानुवर्षं संशोधन करण्यात येत आहे.

भूगर्भातील रचना बदलल्यामुळे असं घडत असावं, असा अंदाज आहे. याच भागात गरम पाण्याचे झरेही आहेत. त्यांना ‘उन्हाळे’ नावानं ओळखलं जातं. गंधकाच्या समावेशामुळे हे पाणी गरम होत असावं, असा एक अंदाज आहे; मात्र हे उकळतं पाणी कधीकधी हातातही घेववत नाही. राजापूरची गंगा हा निसर्गाचा चमत्कार असला, तरी त्याचा संबंध पावित्र्य आणि धर्माशीही जोडला गेला आहे.

खऱ्या पर्यटकाला मात्र एक आकर्षक ठिकाण म्हणून या ठिकाणाबद्दल नेहमीच रस वाटतो. पूर्वी नेमानं तीन ते चार वर्षांनंतर ही गंगा अवतरत असे. आता मात्र एवढ्या वर्षांचा कालावधी जाईलच की नाही, याबद्दल खात्री देता येत नाही. गेल्या वेळी तर अवघ्या सात ते आठ महिन्यांतच गंगेचं आगमन झालं होतं. गंगा आल्यावर तिच्या दर्शनासाठी या भागात भाविकांची गर्दी उसळते. पाप-पुण्याचा विचार मनात नसला, तरी निसर्गाची ही किमया पाहायला एकदा तरी राजापूरला भेट द्यायलाच हवी.

कसं जायचं?
कोल्हापूरमार्गे राजापूरला जाण्यासाठी अनेक बसगाड्यांची सोय आहे. रत्नागिरीहून लांजा किंवा पूर्णगडमार्गे राजापूरला पोहोचता येतं. हे अंतर सुमारे ६२ किलोमीटर आहे. लांजामार्गे गेलं,तर त्यात आणखी दहा ते पंधरा किलोमीटरची भर पडते. राजापूरहून धूतपापेश्वर पाच किलोमीटरवर आहे. तिथे जाण्यासाठी खासगी वाहनांची सोय होऊ शकते.

– मनोज वि सारंग

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *