नमस्कार मित्रांनो,
आज रविवार आमच्या साउथ इंडिया ट्रिपचा हा तिसरा दिवस. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता आम्ही पुण्यातून निघालो होतो, त्यानंतर कोल्हापूर, आजरा, आंबोली, सावंतवाडी असं करत करत भयंकर पाऊस झेलत शेवटी आम्ही शनिवारी सकाळी गोव्यात मुक्काम टाकला. शनिवारचा दिवस हा आमचा पूर्ण गोव्यात गेला गोव्यात काहीही बघण्यासारखं न्हवतं, सर्वत्र उदासीनता आणि भकासपणाच जाणवला.
काल आम्ही लवकर जेवण करून झोपलो कारण थकवा नक्कीच आलेला होता सर्वांना, पण रविवारी मात्र आम्ही सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन निघालो. निघायच्या आधी थोडं गाडीच्या काचेवर पाणी मारण्यासाठी आम्ही हॉटेल चे पाणी वापरलं त्याच्यावरून थोडीशी आमची वादावादी झाली, पण दीपक सरांनी सांभाळून घेतलं. त्या वादाचं वगैरे काही कारण मला माहीतच नव्हतं.
त्यानंतर, आम्ही नाश्ता करून रविवारी सकाळी साधारण नऊ वाजता दक्षिणेकडे निघालो. आमचा आजचे टारगेट होतं की उडपीमध्ये जाऊन मुक्काम करणे. जात असताना पहिला गोकर्णला जाणे तिथून मुर्डेश्वर, मुर्डेश्वर वरून होन्नावर आणि वरून उडपी, असा प्लान ठरवला होता पण म्हणतात ना जे आपण ठरवतो ते सर्वच काही होते असं नसतं. कारण की रँडम ट्रीप प्लॅन ज्यावेळेला आपण करतो तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टींची ऍडजेस्टमेंट रन टाईम मध्ये करावी लागते, नियोजन बदलावे लागतात प्लॅनिंग बदलावे लागतात.
आमच्या बाबतीतही तेच झालं पंधराच मिनिटात आम्ही हायवेला लागलो. पूर्वीचा जो एन एच 17 हायवे होता मुंबई गोवा त्यालाच आता NH 66 (पनवेल ते कन्याकुमारी) म्हणतात. आणि मी खरंच सांगतो, मी पाहिलेल्या सुंदर रस्त्यांपैकी हा एक नक्कीच आहे. इतका सुंदर हायवे निसर्गाच्या सानिध्यातून जात असताना असं वाटत नव्हतं की आपण हायवेवरून जातोय.
बदलणारे डोंगर, झाडी, झाडांचा कलर, पडत असलेला पाऊस, समुद्रावरून ब्रिज बांधलेले आहेत काही ठिकाणी तर काही ठिकाणी बोगदे तयार केलेले, काही ठिकाणी अतिशय रस्त्याच्या जवळ समुद्राच्या लाटा येऊन रस्त्याला धडकतायेत, आणि हे सगळे चित्र आताही माझ्या डोळ्यासमोर उभा राहतंय.
ह्या रस्त्यावरून ज्यावेळेला मी गाडी चालवत होतो त्यावेळेला मी अक्षरशः सुन्न होऊन गेलो होतो म्हणजे मला असं समजतच नव्हतं की काय बोलायचे. पण समजून घ्या रस्ता खरच खूप सुंदर होता.
त्याच्यानंतर आम्ही 100 किलोमीटर प्रवास पूर्ण केल्यानंतर आम्ही गोकर्ण ला पोहोचलो. गोकर्ण मध्ये अतिशय भयानक पाऊस पडत होता. त्यामुळे आम्ही धावत पळत मंदिरात दर्शन घेतलं आणि आणि कार मध्ये येऊन बसलो. समुद्रकिनारी जाण्याचे धाडस झालं नाही इतका वारा वाहत होता. गोकर्ण मध्येच एक व्हेज हॉटेलमध्ये थांबून दुपारचं जेवण केलं. त्यानंतर सरळ मुर्डेश्वर ची वाट धरली.
मुर्डेश्वर ला गेलो तर तिथेही भयानक पाऊस आणि वारा हा सुरूच होता. त्या प्रचंड पावसात आणि वाऱ्यामध्ये जसं जमेल त्या पद्धतीने आम्ही मुर्डेश्वर चे दर्शन घेतले. मुर्डेश्वर आणि गोकर्ण हे ठिकाण मला इतका आवडलं की माझी इच्छा आहे पुन्हा तिथे जायची, नक्कीच थंडीच्या दिवसात.. कारण अतिशय समाधान देणारी आणि मन प्रसन्न करणारी दोन्ही ठिकाणे आहेत आणि दोन्हीही शंकराचे ठिकाण असल्यामुळे तिथे साक्षात भगवान शिव यांचा वास असल्याची जाणीव होते.
दोन्ही समुद्रकिनारी आहेत आणि रस्ते चांगले आहेत गाडी चालवायला मजा येते त्यामुळे परत जायला काही हरकत नाही.
मुर्डेश्वर वरून साधारण आम्ही संध्याकाळी सहा वाजता उडपीकडे निघालो, आणि साडेसात आठच्या दरम्यानच उडपीत पोहोचलो. वाटेत पाऊस असल्यामुळे दोन ते तीन वेळा चहाही झाला होता, गाडीला डिझेल आणि आम्हाला चहा हा लागतोच. त्यामुळे आम्ही वरचेवर चहाला थांबायचो.
उडपीत पोहोचल्यानंतर अशी जाणीव झाली की भूकही लागली नव्हती, त्यामुळे मॅप चेक केलं तर दुसऱ्या दिवसाच्या रस्त्यावरती मंगलोर ही मोठी सिटी आम्हाला दिसली. मग काय, डायरेक्ट मंगलोर ला जाऊन झोपायचा प्लॅन केला. गुगल वरून तर साधारण 65 ते 70 km च्या आसपास मंगलोर पडत होते. सगळा फोर लेन हायवे होता याची आम्ही खात्री करून घेतली लोकल लोकांना विचारून. आणि त्याच प्रमाणे निर्णय बदलला आणि आम्ही सरळ रात्री अकरा वाजता जेवायलाच मंगलोरला गेलो.
मंगलोर मध्ये जेवणाचे एक वेगळाच किस्सा आहे. जिथे आम्ही हॉटेल घेतलं ते एकदम पोलीस हेडकॉटरच्या बाजूलाच होत. त्या हॉटेल वाल्यांनी आम्हाला एक रेस्टॉरंट चे नाव सजेस्ट केलं तिथे गेलो आणि त्या हॉटेलला व्हेज काहीच मिळत नव्हत. नॉनव्हेजसाठीच ते हॉटेल फेमस होते. पण आम्ही चौघे देवदर्शन घेतल्यामुळे व्हेज च खायचा असा आमचा अट्टाहास होता, त्यामुळे आम्ही जेव्हा व्हेज ची ऑर्डर दिली त्यावेळेला आजूबाजूच्या टेबलावरचे काही लोक आमच्या तोंडाकडे बघायला लागले. असो ज्याची त्याची इच्छा असते.
जेवण चांगलं होतं, जेवण करून हॉटेलच्या बाहेर आलो तर आमच्या गाड्या गाडीचा पाठीमागचा उजव्या बाजूचा टायर हा पूर्णपणे फ्लॅट झाला होता. मग काय लहानपणापासून शेतात काम केलेला अनुभव आणि उसाच्या ट्रॉल्या फाडातून बाहेर काढलेल्याचा अनुभव कधी कामाला येणार? त्यामुळे क्षणात निर्णय घेतला आणि दहा मिनिटात स्टेफनी टायर बदलून गाडी मार्गस्थ केली. त्यानंतर ना सरळ जाऊन हॉटेलवर झोपलो. पंक्चर म्हटलं उद्या सकाळी काढता येईल…
धन्यवाद!!