देशातील पहिले सरस्वती मंदिर | ज्ञानसरस्वती मंदिर, बासर

Marathi Explorer
3 Min Read

देशातील पहिले सरस्वती मंदिर | ज्ञानसरस्वती मंदिर, बासर –

आंध्र प्रदेशातील बासर येथील गोदावरी नदीच्या काठावर असलेले ज्ञान सरस्वती मंदिर हे भारतातील विद्येची देवी सरस्वतीच्या काही प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. भारतात विद्येची देवता असणाऱ्या सरस्वतीचं मंदिर तीन ठिकाणी आहे. पहिलं काश्मीरमधलं वैष्णोदेवीचं मंदिर, दुसरं शृंगेरी मधलं शारदादेवी मंदिर आणि तिसरं म्हणजे तेलंगणा मधलं बासर इथं असलेलं ज्ञानसरस्वती मंदिर. नव्याने तयार झालेल्या तेलंगण राज्यातील निर्मल जिल्ह्याच्या मुधोळ तालुक्यात बासर येथे श्री ज्ञानसरस्वती मंदिर आहे. आधी ते आंध्र प्रदेशात होते. तेलंगणातल्या निर्मल जिल्ह्यात बासर हे तिर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण नांदेड-मुखेड-हैदराबाद रस्त्यावर निजामाबादपासून ३५ किलोमीटर अंतरावर, हैदराबादपासून २०० किलोमीटरवर, तर आदिलाबादपासून १०८ किलोमीटर अंतरावर आहे देशातील पहिले सरस्वती मंदिर.

श्री सरस्वतीचे एक रूप शृंगेरी येथील शारदा पीठात गुप्त रूपाने वास करते. त्यालाच अर्धे पीठ म्हटले जाते. बासर येथील हे सरस्वती मंदिर व्यासमुनींच्या वास्तव्याने पवित्र झालेले आहे. या तीर्थक्षेत्राबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. ती म्हणजे, महाभारताच्या लिखाणानंतर महर्षी व्यास हे मनःशांतीसाठी दक्षिण भारतात गेले होते. जात असताना गोदावरी काठी असलेलं हे ठिकाण त्यांना खूप आवडलं. मनाला अगदी प्रसन्न वाटावं असं हे ठिकाण होतं. त्यामुळं ते तिथं विश्रांतीसाठी थांबले. असं म्हटलं जातं की, गोदावरीकाठी स्नान करून झाल्यावर त्यांनी वाळूपासून एक सरस्वतीची मूर्ती बनवली आणि तिची प्रतिष्ठापना केली. आजही मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली मूर्ती वालुकेचीच आहे.ही मूर्ती पद्मासनामध्ये बसलेल्या सरस्वतीची आहे. तसेच सरस्वती, लक्ष्मी आणि काली अशी देवीची तिन्ही रूपे या ठिकाणी पाहायला मिळतात. दुसर्‍या कथेनुसार वाल्मिकींनी येथे सरस्वतीची मूर्ती बसवून रामायण लिहिले. मंदिराजवळ महर्षी वाल्मिकी यांची मूर्ती आणि समाधी आहे. हे मंदिर मंजिरा आणि गोदावरी नद्यांच्या संगमावर अष्टकूट राजांनी बांधलेल्या तीन मंदिरांपैकी एक असल्याचेही मानले जाते.

ज्ञानसरस्वती मंदिरात एक संगीत स्तंभही आहे. त्यावर प्रहार केल्यास विविध नाद ऐकू येतात.  वसंत पंचमी आणि माघ कृष्ण चतुर्दशीला बासरमध्ये मोठा शिवरात्री महोत्सव असतो. अगदी लांबून लांबून लोक या ठिकाणी या महोत्सवाला येत असतात.

कसे जाता येईल?
बासर मुखेड-निजामाबाद मार्गावर आहेत. नांदेड- बिलोली-निजामाबाद-बासर या मार्गानेही जाता येईल. नागपूर-अमरावतीकडून येताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात निर्मलमध्ये येतो. तेथून बासरला पोहोचता येईल.

मुंबईहून मनमाड-नांदेडमार्गे येणे सोयीस्कर असून, बासर हे रेल्वेस्टेशन मनमाड-काचीगुडा रेल्वेमार्गावर आहे. त्यामुळे मनमाडमार्गे बासरपर्यंत थेट रेल्वेगाड्या आहेत. मुंबई किंवा पुण्याहून येताना कोणार्क एक्स्प्रेसने वारंगळ येथे उतरून, तेथून निजामाबादमार्गे जाता येते.

विमानाने जायचे असल्यास हैदराबादमध्ये येऊन तेथून रस्त्याने २०० किलोमीटर अंतरावर बासर आहे.

राहण्याच्या व्यवस्थेसाठी बासरमध्ये साधारण दर्जाची हॉटेल्स आहेत आणि निर्मलमध्येही काही हॉटेल्स, धर्मशाळा आहेत. त्यामुळे तेथे सोय होऊ शकते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *