हंपी एक विलक्षण अनुभव

Marathi Explorer
3 Min Read
PC - Somesh Mahajan

हंपी एक विलक्षण अनुभव –

दगड! हो फक्त दगड एखादी गोष्ट नयनरम्य बनवू शकतात हे अनुभवायचं असेल तर हंपीला भेटू द्या. हरेक ठिकाणी विविध आकारात दिसणारे हे दगड हेच हंपीचं सौंदर्य आहे. त्या दगडांना बघायचं नाही, भेटायचं. मिठी मारायची! याच दगडी प्राचीन सौंदर्याच्या आपण आपोआप प्रेमात पडत जातो. इथे जितका जास्त वेळ घालवू तितकं इथे रुळत जाऊ यात दुमत नसावं! इथ आलं की माणूस आपलं दुःख, आपली निराशा, आपले प्रॉब्लेम सगळं विसरून तिथं रमत जातो.

प्रत्येकानं मरण्याचं आधी हंपी ला एकदा तरी जाऊन यावं . काही गोष्टी, काही स्वप्न असतात ना की जे आपण करण्या साठी आयुष्यभर धडपडत असतो त्यात हे पण एक जोडाव असं मला तरी वाटतं. इथ जगणं म्हणजे काही निराळा अनुभव आहे. इथली लोकं, इथली माती, इथली संस्कृती प्रत्येक क्षणाला आपल्याला काही ना काही नवीन शिकवत असते. काही गोष्टी, शोध, टेक्निक असे असतात जे आपल्याला वाटत की सगळं आताच आलाय पण तस बिलकुल नाही हा कारण या गोष्टी तुम्हाला इथ जागोजागी बघायला मिळतात. इतिहास, युद्ध, प्रेम, दंतकथा, भूगोल, पाककला सगळं सगळं अगदी मनसोक्त अन् अभ्यासपूर्ण इथ तुम्हाला दिसेल. काही गोष्टी विलक्षण आहेत तर काही अविश्वसनीय आहेत. वास्तू, मंदिरं, शिल्प, मूर्ती, भग्न अवशेष, मोठ्ठे मोठ्ठे दगड या प्रत्येक भागाला भेटताना मनात वेगवेगळ्या भावनांची गर्दी होत राहते. प्रेम, सौंदर्याची भुरळ, भोगलोलूपता, उदासीनता, वैराग्य, अलिप्तता या सगळ्यासोबत स्वतःला विसरून समोरच्या गोष्टीशी एकरूप होत हरवून जाणं असं सारं काही मनात वर खाली होत राहतं!

एक महत्त्वाची आणि अत्यंत भारी गोष्ट काय आहे माहितीये? इथं एवढी मंदिरे, ठिकाणं आहेत की ते सर्व बघायला तुम्हाला जवळ जवळ ७-८ दिवस पण कमी पडतील एवढी आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण इथल्या बहुतांश मंदिरात मूर्तीच नाहीये. नवल वाटलं असेल ना पण हो हे अगदी खरं आहे. आजकल माणसाला आपलं चांगुल पणा सिद्ध करायला खुप गोष्टी कराव्या लागतात पण इथल्या मंदिराला त्यांचं महत्त्व पटवून द्यायला कुठल्या मूर्तीची गरज पडत नाही.

“मूर्ती विना मंदिर अन् मंदिरा शिवाय देव जेव्हा आपल्याला समजायला लागेल ना तेव्हा आपल्याला जगात कुठलीही गोष्ट समजून सांगावी लागेल याची गरज पाडणार नाही.”

इथ फिरताना मोकळे बिनधास्त आणि उनाड फिरा! इथली दगडं साद घालतात. मंदिरं अंतर्मुख करतात. सौंदर्याची भुरळ पाडत बहिर्मुख करणारी मंदिरं आणि दगडच हळूहळू अंतर्मुख करतात. ते ते क्षण खूप मस्त वाटतात. मतंग वरचा सूर्योदय आणि हेमकूटावरचा सूर्यास्त. हा सूर्यास्त बघताना विरुपाक्ष मंदिरातून येणारा मंत्रोच्चारांचा आवाज हे सगळं भारी वाटतं. ट्रिप संपली तरी याची स्पंदने आठवत राहतात. स्पर्शत राहतात. आपण आपलं जगणं स्वैर जगलो ना कि, मग स्वतःच स्वतः मधले वैर कमी होत जातं, स्वतःला स्वतःचा शोध लागत जातो…! . स्वतःला स्वतमध्ये शोधण्यासाठी का होईना हंपीला जावं एकदा तरी.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *