(Jotiba Yatra Mahiti) श्री जोतिबा ची चैत्र यात्रा म्हणजे काय?

Hosted Open
5 Min Read

Jotiba Yatra Mahiti in Marathi

कोल्हापूर येथील दक्षिणाधिश श्री केदारनाथ (जोतिबा) कोट्यावधी भक्तांचे आराध्य कुलदैवत आहे. जोतिबा देवाची चैत्र यात्रा म्हणजे या तमाम कोट्यावधी भक्तांच्या आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा क्षण.

जेंव्हा आपण यात्रेचे फोटो पाहतो, तेंव्हा काही प्रश्न आवर्जून पडतात ते म्हणजे. हि चैत्र यात्रा म्हणजे नेमक काय? काय वैशिष्ट्य आहे या यात्रेच? साऱ्या विश्वाचे मालक का या दिवशी आईच्या (येमाईच्या) भेटीला जातात? यामागच नेमके कारण तरी काय?

तर अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि या चैत्र यात्रेच महत्त्व आपण या ब्लॉग मध्ये जाणुन घेऊया.

Jotiba Yatra Mahiti
Jotiba Yatra Mahiti

गुढी पाडव्याला सासनकाठी उभी करायची आणि मग कामदा एकादशीला ती सासनकाठी घेऊन डोंगरावर नाथांच्या दरबारात जायचं (कुणी एकादशीला येत तर कुणी बार्शीला डोंगरावर सासनकाठी घेऊन दाखल होतात. प्रत्येक जण आपल्या परंपरेनुसार सासनकाठी उभी करून डोंगरावर येतात.) हस्त नक्षत्रावर श्री केदारनाथ आपल्या सर्व लवाजम्यासह यमाईच्या भेटीला निघतात. भक्त सासनकाठी मिरवत, गुलालची मुक्त उधळण करत, चांगभलंचा गजर करत नाथांसोबत यमाईकडे जातात. हि चैत्र यात्रा म्हणजे आई यमाई अर्थात रेणुका आणि ऋषीश्रेष्ठ जमदग्नी ऋषी यांच्या पुनर्मिलनाचा जणू आनंदसोहळाच आहे.

या मूळमाया यमाईने केदारनाथांच्या सहाय्याला हाकेला धावून बलाढ्य राक्षसांचा नाश केला आणि केदारनाथांना दक्षिणदिग्विजयी विजयी केलं म्हणून केदार विजयामध्ये तिचं स्थान खूप वेगळं आहे. कृत युगात परशुरामाने पित्याच्या जमदग्नींच्या आज्ञेवरून रेणुकेचा शिरच्छेद केला, परशुरामाने आज्ञापालन करताच जमदग्नींनी प्रसन्न होऊन वर सांगावयास सांगितला.

Jotiba Yatra Mahiti

परशूरामांनी आईला (रेणुकेला) आणि त्याच बरोबर बंधूला उठवा अशी विनंती केली. त्याप्रमाणे ऋषींनी रेणुकेला संजीवनी मंत्र म्हणून प्रकट होण्याची विनंती केली तेव्हा आपण मातापूर (माहूर) येथे प्रकट होऊ असे सांगितले. त्याप्रमाणे रेणुका माहूर येथे गळ्यापर्यंतच प्रकट झाली. परशुरामांनी आज्ञा न पाळल्यामुळे रुसली. तेव्हा जमदग्नींनी ज्योतीस्वरूप परमेश्वराला रेणुकेचे व आपले मिलन घडवण्याची विनंती केली. त्याप्रमाणे पूर्णब्रह्म ज्योतिस्वरुपाने केदारनाथ रूपात प्रकट झाल्यानंतर रत्नागिरी पर्वतावर चैत्र शुद्ध पौर्णिमेला पुनर्मिलन करण्याचे वचन दिले. हे सर्व आपल्या क्रोधामुळेच झाले असे जाणुन जमदग्नींनी आपला क्रोधाग्नीचा म्हणजेच रागाचा त्याग केला तोच राग केदारनाथांनी धारण केला आणि रवळनाथ नामानिधान झाले.

केदारनाथ महालक्ष्मी च्या विनंतीवरून दक्षिणेस दैत्य संहारासाठी निघाले. तेव्हा शक्तीद्वारे नाथांनी असुरांचा वध करवला. औंध गावात (औंध गावाचे पूर्वींचे नाव कंटकगिरी) औंधासुर नावाचा पराक्रमी असुर राज्य करीत होता. आणि औंधासुराचा वध मूळमायेच्या हस्ते होणार हे जाणून केदारनाथांनी मूळमायेला ये… माई (तीच यमाई) अशी साद घालून डमरूनाद केला. नाथांची साद ऐकून मूळमाया प्रकट झाली. यमाईने अक्राळ विक्राळ रूप धारण करून औंधासुराचा वध केला. औंधासुराने मरतेसमयी माझे नाव अमर होऊदे असा वर मागितला, तेव्हा यमाईने कंटकगिरीला औध असे नाव दिले.

पुढे रक्तभोज रत्नासुराचा वध करून श्री केदारनाथ पुन्हा उत्तरेत हिमालयी निघाले आणि हि माहिती महालक्ष्मी ला समजली, तेव्हा महालक्ष्मी अनवाणी पायाने डोंगरावर आली (तीच परंपरा भक्त आज ‘खेटे’ म्हणून करतात) आणि नाथांना विनवणी केली की आपण या रत्नागिरीवरच थांबावे. आपण जर इथे थांबणार नसाल तर मलाही करवीरचे राज्य नको, मी देखील आपल्या सोबत हिमालयी येते.

Jotiba Yatra Mahiti

मग आईच्या महालक्ष्मीच्या या विनंतीला मान देऊन श्री केदारनाथ रत्नागिरीवर थांबले. त्यांना थांबवून मग महालक्ष्मी ने सर्व देवतांसमवेत श्री केदारनाथांचा रत्नागिरीवर राज्याभिषेक केला (त्यांचा सेनापती म्हणून पट्टाभिषेक केला नाही आणि मुळात नाथमहाराज हे कोणाचेही सेनापती नाहीत). नेमके यावेळी यमाईला आमंत्रण दिले नाही. राज्याभिषेकास आमंत्रण न दिल्यामुळे यमाई रुसली.

यमाई रूसली आहे हे चोपडाईच्या लक्षात येताच तिने केदारनाथांना, यमाईला राज्याभिषेकास न बोलावल्याने यमाई रुसल्याचे सांगितले. तिचा रुसवा काढण्यासाठी औंधला जाण्यास सांगितले. तीचा रुसवा काढायला केदारनाथ आपल्या सर्व लवाजम्यासह चैत्र शुद्ध एकादशीला रत्नागिरी वरून औंधला जाण्यासाठी निघाले आणि चैत्र शुद्ध पोर्णिमेला औंधला पोचले. देवांना पाहताच यनाईने दार बंद केले. हे पाहून केदारनाथांनी सर्व देवांसह यमाईचे स्तवन केले, इतरांना वाटलं देवी रुसली पण नाथांनी बरोबर अर्थ ओळखला.

Jotiba Yatra Mahiti

यमाईने दार लावून जणु नाथांना त्यांनी कृतयुगात जमदग्नींना दिलेल्या वचनाची आठवण करून दिली. जमदग्नी आणि (रेणुका) यमाईचे पुनर्मिलन घडवण्याची वेळ आली हे जाणून केदारनाथांनी कृतयुगात धारण केलेल्या रागाचे म्हणजेच जमदग्नी ऋषींचे आई यमाईशी (म्हणजेच कृतयुगातील रेणुका) चैत्र शुद्ध पौर्णिमेला हस्त नक्षत्रावर लग्न लावले व कृतायुगात झालेली ताटातूट दूर करून दोघांचे पुनर्मिलन घडवले.

ह्या अलौकिक सोहळ्यानंतर केदारनाथांनी यमाईची राजोपचारे पूजा केली. तिसऱ्या वर्षी आई देवाला म्हणाली तुम्ही आता मूळपीठाला येण्याचे कष्ट घेऊ नका मीच आपल्या जवळ रत्नागिरीवर येते असं वचन दिले. आणि दिलेल्या वचनाप्रमाणे यमाई मूळपीठ सोडून रत्नागिरीवर चाफेवनात येऊन स्वयंभू प्रकट झाली.

आजही दरवर्षी नाथ यमाईच्या भेटीला जातात. (देव सदरेवर पालखीत बसतात आणि देवांची कट्यार (जमदग्नी स्वरूप) आत यमाईच्या गाभा-यात जाते. तिथं नाथांच्या आणि भक्तांच्या साक्षीने यमाई आणि कट्यार रुपी जमदग्नींचा विवाह होतों)

असा हा चैत्र पौर्णिमेचा अलौकिक अविस्मरणीय सुखमोहळा.

जोतिबाच्या नावानं चांगभलं

संदर्भ- केदार विजय ग्रंथ

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *