मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही वाचलेच असेल की, आम्ही कशा पद्धतीने केरळ बॅक वॉटर पाहिल्यानंतर, श्री पद्मनाभ स्वामी मंदिर पाहायला तिरुअनंतपुरम इथे आलो. दर्शन घेतल्यानंतर आम्ही 80 किलोमीटर वर असलेल्या कन्याकुमारी येथे रात्री एक वाजता पोचलो.
रात्री एक वाजता पोहोचल्यानंतर आमचा रूम किंवा हॉटेल शोधण्याचा एक वेगळाच किस्सा सुरू होतो, पण प्रामुख्याने एक गोष्ट नमूद करावे असे वाटते की रात्र असूनही इथे भरपूर एजंट आम्हाला विचारत होते. त्यांच्यापैकीच एकाच्या मार्गदर्शनाने आम्ही तीन-चार हॉटेल बघितले आणि एक हॉटेल फिक्स केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी काहीही करून आम्हाला लवकर उठून मॅक्सिमम आठ वाजता रूम मधून निघायचे होते, कारण पूर्ण कन्याकुमारी एका दिवसात बघून त्याच दिवशी आम्हाला रामेश्वरम इथे मुक्कामाला जायचे होते. कन्याकुमारी ते रामेश्वरम हे ३०० किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे आम्ही संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच कन्याकुमारी मध्ये थांबू शकत होतो.
कन्याकुमारी, भारताच्या मुख्य भूमीचा शेवटचा भाग जिथे बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर एकत्र येतात, सांस्कृतिक वारसा, अप्रतिम सौंदर्य आणि अध्यात्मिक महत्त्व इथे एकत्र येतात.
ठरल्याप्रमाणे सकाळी आठ वाजता आवरून रूममधून निघालो. सर्वप्रथम आम्ही स्वामी विवेकानंद यांचे स्मारक बघायला गेलो. स्मारक हे मुख्य भूमी पासून पाण्यात असल्याने बोटीतून प्रवास करावा लागतो.
स्वामी विवेकानंदांचे स्मारक पाहून अत्यंत समाधान आणि शांत वाटले. इथे चारही बाजूंनी खडकांवर आदळणाऱ्या समुद्रांच्या लाटा आणि त्यातून निर्माण होणारा आवाज आणि त्यामुळे एक विशेष प्रकारचे मेडिटेशन होते. स्वामी विवेकानंद यांनी याच ठिकाणी बसून ध्यानधारणा केली होती. त्याचबरोबर इथून जेव्हा आपण दक्षिण दिशेला पाहतो तेव्हा आपल्याला असं वाटते की आपण काहीतरी वेगळं केले आहे.
आपण भारताच्या सर्वात दक्षिण दिशेला उभे आहोत ही एक भावना मनात येऊन जाते. आणि जेव्हा तुम्ही पुण्यातून रस्त्याने प्रवास करत, फिरत फिरत भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोकाला येऊन पोहोचता तेव्हा तुम्ही दर किलोमीटर ला बदलणारी भौगोलिक परिस्थिती, बदलणारी भाषा, वेशभूषा, निसर्ग, हवामान याचा अनुभव घेत घेत इथेपर्यंत पोहोचलेला असता, त्यामुळे इथे आल्यानंतरची ही भावना नक्कीच वेगळी असते. त्यामुळे माझ्यासाठी तर हा नक्कीच अविस्मरणीय अनुभव होता.
स्वामी विवेकानंदांचे स्मारक बघून झाल्यानंतर मुख्य भूमीकडे परत जात असताना पुन्हा आलेल्याच बोटीतून परत जावे लागते. मुख्य भूमीवर उतरल्यानंतर आम्ही त्रिवेणी संगम येथील मंदिर पाहायला गेलो. इतर ठिकाणे फिरून झाल्यानंतर आम्ही प्रसिद्ध मार्केट मध्ये गेलो तिथून घरी न्यायला थोडी खरेदी केली. आणि संध्याकाळी ५ च्या दरम्यान रामेश्वरम च्या दिशेने निघालो.