महाड तालुक्यातील अपरिचित स्थळ
कोंडीवते महाड, येथील अजून एका ठिकाणी असणारे गरम पाण्याची कुंडे.
महाड तालुक्यातील सव येथील गरम पाण्याचे झरे कुंड प्रसिद्ध आहेतच याचबरोबर कोंडीवते गावाच्या हद्दीत देखील सव प्रमाणेच सावित्री नदीच्या दक्षिण किनारी गरम पाण्याचे कुंड आहेत.
कोंडीवते गांव हे महाड येथून 5 किमी अंतरावर असून तेथील ग्रामदैवत असणारे देवस्थान हे सावित्री नदीकिनारी आहे. या मंदिराच्या आवारात दक्षिण दिशेला ही चिरेबंदी बांधकामातील कुंडे आहेत. या मंदिरात चंडकाई, काळकाई आणि पद्मावती या स्थानिक देवतांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. मूळ मंदिराचा जिर्णोध्दार केला त्यावेळी जीर्ण झालेल्या पाषाणातील मूळ मूर्ती मंदिराबाहेर असणाऱ्या चाफ्याच्या झाडाखाली ठेवलेल्या आहेत.
गरम पाण्याचे झरे असणारे कुंड म्हणून जो मुख्य पाणीसाठा दाखवला जातो ती एक छोटी चिरेबंदी विहीरच आहे. मंदिराच्या समोर उजव्या बाजूला असणाऱ्या चौकोनी आकारातील या विहीरीची लांबी 5 फूट रुंदी 4 फूट आणि खोली 10 फूट भासत असली तरी ती जास्त सुद्धा असू शकते.
गरम पाण्याचे झरे सतत प्रवाहित आणि मोकळे राहावेत म्हणून तळाला शिसव लाकडाच्या फळ्या लावलेल्या आहेत, असे गावातील जुने जाणकार लोकं सांगतात.
मंदिराच्या समोर डाव्या बाजूला असणारे चिरेबंदी बांधकाम ही एक चौकोनी आकारातील लहान बारव आहे. या बारवेची लांबी देखील 5 फूट आणि रुंदी 4 फूट आहे,तिची खोली 8 फूट आहे. खाली उतरायला 4 पायऱ्या आहेत. बारवेत गाळ भरला आहे त्यामुळे अचूक अंदाज बांधणे शक्य नाही.
गरम पाण्याची मुख्य विहीर ते बारव हे अंतर 12 फूट आहे. ही दोन्ही कुंडे धातूच्या पाईपने आतून जोडलेली आहेत. कदाचित हा पाईप तांब्याचा असावा. गरम पाण्यात अंघोळ करण्यासाठी 5 फूट खोलीपर्यंत पाणी वापरायला उपलब्ध व्हावे यासाठी ही योजना केली असल्याचे दिसून येते.
या दोन्ही कुंडाना जोडणाऱ्या मधल्या भागात एक चौकोनी खड्डा दिसून येतो. वरून खाली पाणी सुरळीत येत रहावे आणि प्रवाह खंडित झाल्यास त्याची साफसफाई करता यावी म्हणून हा खड्डा ठेवला असावा.
सावित्री नदीला येणाऱ्या महापुरांत या कुंडांत गाळ भरला आहे ,त्यामुळे हे गरम पाण्याचे कुंड लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. मागील दोन पिढ्या अगोदर येथील गंधकयुक्त पाण्याचे तापमान हे सव येथील पाण्यासारखे असायचे स्थानिक ग्रामस्थांचे मत आहे.
अश्या परिस्थितीत येथे श्रमदान करून हा पुरातन ठेवा वाचविण्याच्या प्रयत्न नक्कीच केला पाहिजे, अन्यथा हा वारसा फक्त दगडी अवशेष स्वरुपातच शिल्लक राहील.