नटराज | Natraj Sculpture

Marathi Explorer
3 Min Read

नटराज | Natraj sculpture –

शिवाची जी विविध रूपे आहेत, त्यांपैकी नर्तकरूपातील अथवा नृत्तमूर्ती’ च्या रूपातील शिवाला नटराज असे म्हणतात. ‘नट्’ (नृत्य करणे) या संस्कृत शब्दापासून ‘नट’ (नर्तक) हा शब्द बनला असून, नटराज म्हणजे नटांचा (नर्तकांचा) राजा होय. तो विविध मार्गांनी नृत्याशी निगडित असल्यामुळे त्याचे हे नाव सार्थ ठरते. (नटराज, Natraj sculpture)

कुर्म पुराणात भगवान शिव म्हणतात “मी उत्पत्ती करणारा, परम आनंदात राहणारा देव आहे. मी योगी असून चिरंतन नृत्य करतो.”
शिवाने प्रथम आपल्या तांडवातून नृत्याचा प्रारंभ केला अशी भारतीय परंपरेतील धारणा आहे. त्याचजोडीने संगीत शास्त्राचा उगमही भगवान शिवाच्या डमरू वादनातून झाला असे मानले जाते. नटराजाचा उजवा पाय हा विश्वनिर्मिती व्हावी म्हणून जीवांना मायेच्या बंधनात टाकतो;तर उचललेला पाय भक्तांना मोक्ष देतो. विश्वनिर्मितीच्या वेळी पहिल्यांदा शब्द बनत असल्यामुळे डमरू हे निर्मितीचे प्रतीक, तर अग्‍नी हे प्रलयंकर तत्त्व असल्यामुळे नाशाचे प्रतीक होय. अशा रीतीने पायांच्या स्थितींमधून बंध व मोक्ष आणि हातांच्या स्थितींमधून निर्मिती व नाश या मूलभूत अवस्थांतील समतोल साधलेला आहे. प्रभामंडळ हे प्रकृतीच्या नृत्याचे प्रतीक आहे.

या नृत्यातून विश्वाची जिवंत क्रियाशीलता सूचित होते. त्या प्रभामंडळात प्रकृतीला प्रेरणा देणाऱ्या आद्यप्रेरकाचे नृत्य चालू असते. ही प्रतीके पुढील पद्धतीने ही सांगितली जातात. टेकलेला पाय हा कर्मबंधात अडकलेल्या जीवांना आधार देणारा आहे, डमरूतून शब्दशास्त्र जन्मते, अग्‍नी चराचराची शुद्धी व इष्ट परिवर्तन करतो, अभयमुद्रेतील हात संरक्षण देतो, झुकलेला हात मोक्ष देणाऱ्या पायाकडे निर्देश करतो, अपस्मार हा अविद्येचे प्रतीक आहे, प्रभावळ हे मायाचक्र आहे, शिव पायाच्या व हाताच्या स्पर्शाने ते प्रवर्तित करतो आणि मग माया पंचभूतांच्या रूपाने प्रकट होते.

नटराजाचे नृत्य हा ईश्वराच्या आदिशक्तीचा लयबद्ध आविष्कार आहे आणि ते विश्वातील नियमबद्ध हालचालींचे प्रतीक आहे, ही या नृत्यामागची मूळ कल्पना आहे. खरं पाहायला गेलं तर शिवाशी संबंध जोडल्यामुळे नृत्यकलेला एक प्रकारचे पावित्र्य व प्रतिष्ठा प्राप्त झाली. शिवाय नटराजाच्या प्रतीकात्मकतेमुळे नृत्य, शिल्प, नाट्य, साहित्य व मूर्तिकला अनुप्राणित झाल्या आहेत.

खुद्द भगवान शिवांचे नटराज स्वरूप हेच मुळात अखिल विश्वाच्या नियमबद्ध हालचालींचे लयबद्ध प्रतीक आहे. भगवान शंकर जेव्हा तांडव नृत्य करतात तेव्हा ते नृत्य त्यांच्या सृष्टी (निर्माण) स्थिती, संहार, तिरोभाव (विश्रांती) आणि शेवटी अनुग्रह (मोक्ष) या पंचक्रियांचे प्रतीक मानले जाते. शिव डमरू वाजवतात तेव्हा सृष्टीचे सृजन होते, त्यांची अभयमुद्रा हे स्थितीचे, हातातला अग्‍नी हे नाशाचे, सभोवतालचे प्रभामंडळ हे तिरोभावाचे व उचललेला पाय हे अनुग्रहाचे प्रतीक समजले जाते, म्हणूनच अगदी स्वित्झर्लंड मधल्या भौतिकशास्त्रात प्रगत संशोधन करणाऱ्या अत्याधुनिक पार्टीकल लॅबमध्ये देखील नटराजाची भव्य मूर्ती विराजमान आहे. शिवाच्या नटराज स्वरूपात विज्ञान, तत्त्वज्ञान, धर्म व कला यांचा सुरेख संगम आहे.

हिंदू शिल्पकलेचा विचार करता त्यामध्ये नटराज शिवाला विशेष महत्त्वाचे स्थान असलेले दिसते. दक्षिण भारतातील अनेक मंदिरात अशी शिल्पे आढळतात. चिदंबरम मंदिरात रौद्र आणि शांत अशा दोन्ही रूपातील नटराज नृत्य करतानाचे अंकन केलेले आहे

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *