नमस्कार मित्रांनो,
कोकण ट्रिप च्या पहिल्या ब्लॉगमध्ये आपण वाचले असेल की, कशा पद्धतीने आमची ट्रीप प्लॅन झाली आणि आम्ही कसे सकाळी लवकर पहाटे निघालो आणि ताम्हिणी घाट मार्गे दिवेआगर फिरून श्रीवर्धनला येथे येऊन पोहोचलो. आता आमच्या ट्रीपचा दुसरा दिवस होता.
आमचे आजचे बेसिक प्लॅनिंग हे होतं की श्रीवर्धन मधून निघायचे हरिहरेश्वरला जायचे तेथून दर्शन घेऊन जेवण करून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पुण्यात पोहोचायचे. पण ठरवलेल्या सगळ्याच गोष्टी वेळेवर पार पडत नाहीत. कारण त्याला काही गोष्टी कारणीभूत असतात जसे की फोटो काढणे, जो स्पॉट चांगला दिसेल ते थांबून गप्पा मारणे, तलफ आली की चहा पिणे, भूक लागली की गाडी साईडला घेऊन भजी आणि वड्यावर ताव मारणे. अश्या अनेक गोष्टी याला कारणीभूत असतात.
आज आमचे परम मित्र केतन भाऊ यांचा वाढदिवस असल्याने आम्ही आधी तो साजरा केला, केक कापून खाऊन झाल्यानंतर आम्ही सकाळी नऊ वाजता रूममधून चेक आउट केले. त्यानंतर जवळच श्रीवर्धन मध्ये असणाऱ्या श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्या स्मारकला भेट दिली. त्यानंतर तिथून अर्ध्या तासाच्या अंतरावर असणाऱ्या श्री हरिहरेश्वर च्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले.
रस्ता अतिशय सुंदर होता. घनदाट झाडी आणि नवीन केलेला एक्दम टॉपचा डांबरी रस्ता. मस्तपैकी बाईक राईड करत करत आम्ही साडेदहा वाजता हरिहरेश्वर मध्ये पोहोचलो. इथे सकाळी साडेदहा वाजताच उन्हाचा इतका तडाका जाणवत होता कि बाहेर पडणे सुद्धा त्रासदायक झाले होते. आम्ही गाड्या पार्क करून दर्शनाला जाऊन लाईन मध्ये उभा राहिलो.
आज भरपूर गर्दी होती. याच्या आधीही मी दोन वेळा हरिहरेश्वरला आलो होतो. पण मला कधीही पाच मिनिट पेक्षा जास्त दर्शनाला वेळ लागला नाही. आज बऱ्यापैकी गर्दी होती एक दीड तास लागणार असं अंदाज होता. काही वेळाने दर्शन सुंदर दर्शन घेऊन आम्ही हरिहरेश्वर ची प्रसिद्ध गणेश खिंड बघायला निघालो. मंदिराच्या पाठीमागून वर जाणाऱ्या पायऱ्यांवरून आम्ही हळूहळू वर चढायला सुरुवात केली, अर्ध्या रस्त्यात गेल्यावर कृष्णा सरांना त्यांच्या ऑफिसमधून अर्जंट टास्क आला.
आम्ही सर्वजण तिथेच थांबलो. आम्ही डोंगराच्या मध्ये होतो पण तिथे चांगले नेटवर्क होते, तिथून दिसणारे समुद्राचे सुंदर दृश्य पाहत त्यांनी त्यांचे काम सुरू केले आणि आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू केल्या. आम्ही अशा ठिकाणी थांबलो होतो तिथे कधीच कंटाळा येणार नाही. कारण पाठीमागे उंच डोंगर आणि समोर हरिहरेश्वरचा सुंदर समुद्रकिनारा दिसत होता, त्यांचे काम झाल्यानंतर आम्ही पुन्हा उरलेले पायऱ्या चढायला सुरुवात केल्या आणि दहा-पंधरा मिनिटातच खिंडीजवळ पोहोचलो. गणेशखिंडीच्या च्या समोर उभे राहिल्यावर एक प्रचंड ऊर्जा जाणवते. समुद्रावरून येणारा वारा आणि त्या वाऱ्याबरोबर येणारा लाटांचा आवाज हा तुम्हाला एक वेगळीच अनुभूती देऊन जातो.
आज पर्यंत कधी खिंड उतरून पूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालून पुन्हा मंदिराकडे जाण्याचा योग आला नव्हता, पण आज समुद्राचे पाणी थोडे आत मध्ये असल्याने खाली उतरून त्या डोंगराला प्रदक्षिणा घालून मंदिरात आलो. हा पण एक विलक्षण अनुभव होता. मंदिरात आल्यानंतर जेथे आम्ही आमचे सर्वसामान ठेवले होते त्या दुकानातून सर्वांनी त्यांना हवी ती खरेदी केली आणि साधारण दोन अडीचच्या दरम्यान ला आम्ही गाडी घेऊन परतीचा प्रवास सुरू केला.
थोडे पुढे आल्यानंतर एक चांगले हॉटेल दिसले आणि तिथे जेवायचा निर्णय घेतला, आज एकादस असल्याने प्रॉपर व्हेज जेवण मिळावे हीच इच्छा होती. जेवण करून आम्ही साडेतीन, पावणेचार वाजता हरिहरेश्वर सोडले आणि पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला.
दोन दिवसात आम्ही इतक्या आठवणी आयुष्यभरासाठी गोळा केल्या होत्या त्या सर्व आठवणी परतीच्या प्रवासात डोळ्यासमोरून जात होत्या. सर्वजण शांत होते आणि मागचे दोन दिवस अनुभवत होते. समुद्रकिनारी मारलेल्या गप्पा, एकमेकांची केलेली चेष्टा या सर्व गोष्टी ठरवून होत नाहीत, त्या आपोआप होत असतात आणि आपण फक्त त्याबरोबर वाहत जायचं असतं.
त्यामुळेच आयुष्यात मित्र असणे फार गरजेचे आहे. तुम्हाला स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी कुठल्याही डॉक्टर आणि औषधाची गरज पडणार नाही. पाठीमागे सूर्यास्त होत होता आणि आम्ही पुण्याच्या दिशेने गाड्या चालवत होतो. माणगाव जवळच्या एका घाट रस्त्यावरून डोंगर चढत असताना अचानक यु टर्न घेतला आणि अतिशय सुंदर आणि मनमोहक सूर्यास्त पाहण्याचा योग आला. सर्वजण तिथे थांबलो वीस पंचवीस मिनिटे चांगले फोटो काढले, सूर्यास्त अनुभवला आणि पुन्हा आम्ही गाड्या सुरू करून पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला.
माणगाव क्रॉस करून ताम्हिणी घाटाच्या पायथ्याला आम्ही सर्वजण येऊन संध्याकाळी साडेसात वाजता थांबलो. इथे चहा घेतला आणि ताम्हिणी घाट चढायला सुरुवात केली.एकापाठमाग एक चार गाड्या लावल्या आणि हळूहळू घाट चढत पुण्याकडच्या दिशेने आलो. साधारण रात्री साडेनऊच्या सुमाराला आम्ही सर्वजण पुण्यात सुखरूप पोहोचलो आणि अशा तऱ्हेने आमची अचानक ठरलेली दोन दिवसांची कोकण ट्रिप स्मरणीय झाली. या ट्रिपमध्ये आम्ही आयुष्यभरासाठी अनेक आठवणी आपल्या मनामध्ये साठवून घेतल्या होत्या आणि इथून पुढच्या ट्रीप साठी प्रेरणाही घेतली होती.
धन्यवाद