मित्रांसोबत ची कोणतीही लहान-मोठी ट्रीप असो किंवा साध्यातली साधी चहाची भेट असो, त्या भेटीमध्ये किंवा ट्रीप मध्ये तुम्ही स्वतःचे सर्व प्रॉब्लेम विसरून भरपूर आनंदी आणि समाधानी असता, कारण टेन्शन , त्रास हे सर्व गोष्टी विसरायला लावतात ते फक्त मित्रच आणि अशाच माझ्या पहिल्या ऑफिस मधील मित्रांबरोबर कोकणात दोन दिवसाच्या ट्रिपला जायचा प्लॅन झाला.
माझा मित्र महेश, याचा मला एक दिवस फोन आला आणि तो म्हणाला की आपण सहा-सात म्हणजे मी, महेश, कृष्ण सर, तरुण, केतन, जयेंद्र, संकेत आम्ही सर्वजण कुठेतरी फिरायला जाऊया, आणि कोकणात दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर ला जायचा प्लॅन झाला. खरंतर नियोजन हे २ आठवडे नंतरचे होते, पण तेंव्हा मला गावी जायच असल्याने सर्वजण येणाऱ्या विकेंडलाच तयार झाले.
टोटल आम्ही सात जण होतो त्यामुळे मोठी फोर व्हीलर शोधत होतो पण ती काय मिळाली नाही. शेवटी गुरुवारी आम्ही असं ठरवलं की आपण सर्वजण टू व्हीलर ने जाऊ मग आम्ही सात जणांच्या मध्ये चार टू व्हीलर घेतल्या आणि आम्ही ठरवलं कि शनिवारी सकाळी पहाटे तीन ते चार वाजता निघायचं.
सर्वानी पहाटे चार ला चांदणी चौक येथे पोहोचायचं हे आमचं फिक्स झालं होतं. थंडीचे दिवस असल्यामुळे भयानक थंडी होती. मला बाईक रायडींग चे अनुभव असल्यामुळे मी अधिच सांगितले होते की, थंडीसाठी डबल तयार व्हा! सगळ्याच दृष्टीने जसे कि जॅकेट, हेल्मेट, शूज सर्व गोष्टी प्रॉपर घ्या जेणेकरून जास्त त्रास होणार नाही. त्या पद्धतीने सर्वांनी तयारी केली होती.
कोकणात फिरायला जायचं उत्साह एवढा होता कि बोलायची सोया नाही. त्यात मी आणि महेश सोडून सर्वांसाठी इतक्या लांब राईड हि पहिल्यांदाच होती.
कोकण म्हंटले कि डोळ्यासमोर येतो अथांग समुद्र आणि मनमोहक किनारे, कोकण म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याची मुक्त उधळण, लहान लहान वड्या, टुमदार घरे, हिरवगार डोंगराळ रांग, आंबा, नारळ, काजू यांच्या बागा, वळणावळणाचे रस्ते, समाधानी आणि प्रेमळ माणसे यांनी कोकण नटलेलं आहे.
शुक्रवारी रात्री ऑफिसची कामे संपवून आम्हाला झोपायला सर्वांना साधारण एक ते दोन वाजले होते आणि परत सगळेजण तीन साडेतीनला उठून आवरून डॉट सव्वाचारला चांदणी चौकात हजर. केतन आणि तरुण यांना याला थोडसं कन्फ्युज झाला कारण चांदणी चौकाचे नवीन बांधकाम झाल्यामुळे कोणताही नवीन माणूस येथे आधी चार-पाच वेळा चुकतो आणि मग योग्य लोकेशन वर पोहोचतो. तर असो चांदणी चौकत चहा घेतला आणि आम्ही आमच्या ट्रिप ला सुरुवात केली.
आमचा आजचा प्लॅन असा होता की, चांदणी चौकातून पिरंगुट मार्गे ताम्हिणी घाट क्रॉस करून खाली माणगाव मध्ये उतरणे, त्यानंतर तिथून राईट टर्न घेऊन दिवेआगार ला जाणे. दिवेआगार मध्ये सुरुवातीला सुवर्ण गणेश दर्शन घेऊन थोडे समुद्रकिनारी फिरणे त्यानंतर तिथून सागरी मार्गाने समुद्राचे कडेकडेने श्रीवर्धनला पोहोचणे आणि श्रीवर्धन मध्ये शनिवारचा मुक्काम करणे. हे आमचं बेसिक प्लॅनिंग होत.
आता हे कितपत शक्य होते की नाही होते याचा आम्ही विचार जास्त करायचा सोडून दिला होता. तसेच शक्य होईल तसं पूर्ण करणे एवढंच ध्येय होतं आणि जास्त लोड घेऊन कुठली गोष्ट करायचे नाही किंवा गाडीही चालवायची नाही हा पण आम्ही एक नियम घालून घेतला होता. जिथे थंडी वाजेल तिथे थांबणे, जिथे भूक लागली तिथे थांबणे, हे आमचे बेसिक तत्व आणि सुरक्षिततेपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही हे आमच्या ट्रिपचे मुख्य उद्धिष्ट. जे काय करायचं ते सुरक्षित राहूनच.
तर अशा तऱ्हेने आम्ही चांदणी चौकातून पिरंगुटच्या दिशेने निघालो तेव्हा आम्हाला थंडीची जाणीव व्हायला चालू झाली होती पण जसा आम्ही पिरंगुट क्रॉस केलं आणि पौडच्या दिशेला लागलो अचानक थंडीची लाट अंगाला येऊन धडकली असं जाणवलं. क्षणात आम्ही सर्वांनी गाड्या थांबवल्या हातातून रक्तप्रवाह बंद व्हायची वेळ आली होती थोडसं सर्वांनी वॉर्म अप केलं सर्वजण मेंटली प्रीपेअर झाले आणि पुन्हा गाड्यांची इंजिन धडधडायला लागले आणि आम्ही पुन्हा ताम्हिणी च्या दिशेने मार्गक्रमण करायला सुरुवात केली.
त्या सह्याद्रीच्या भीतीदायक घाटातून, अंधाऱ्या वळणदार रस्त्यांवरून, किर्रर्र जंगलातून आम्ही हळूहळू 40 ते ६० च्या स्पीडने जात होतो. एकापाठोपाठ एक आम्ही गाड्या लावल्या होत्या. सगळ्यात पहिली गाडी माझी होती कारण मला सगळे रस्ते माहीत होते. त्याच्यानंतर कृष्णा सर, त्यांच्या मागे संकेत आणि सगळ्यात पाठीमागे तरुण यांची गाडी होती. अशा पद्धतीने आम्ही ताम्हिणीतुन जात होतो.
एवढ्या पहाटे आम्हाला फक्त पक्षांच्या आवाज आणि रात्र किड्यांचा आवाज याच्या व्यतिरिक्त त्या ताम्हिणी च्या घाटात काही ऐकायला येत नव्हतं. कोणतीही दुसरी गाडी आम्हाला ओव्हरटेक करून ना पुढे जात होती किंवा पुढून एखादी आम्हाला गाडी पास करून पुण्याला जात होती. त्यामुळे पूर्ण प्रवासात ताम्हिणी क्रॉस होईपर्यंत आम्हीच सात जण होतो.
ताम्हिणी संपायच्या आधी थोडेसे उजाडले होते. सूर्योदय झाला असेल पण आम्हाला डोंगराच्या आड असल्याने आम्हाला दिसत न्हवता. आम्ही तिथे थोडेफार फोटो काढले आणि तिथून निघालो ते डायरेक्ट माणगाव येथे जाऊन थांबलो. माणगावला चहा घ्यायचा आमच्या ठरलं होतं. पुण्यातून कोकणात जायचा ताम्हिणी मार्गे रस्ता अतिशय सुंदर यामुळे आम्हाला प्रवासाचा कसलाही त्रास झाला नाही. उलट थंडीत गाडी चालवायला मजा आली जे पहिल्यांदा राईड करत होते त्यांचाही अनुभव विलक्षण होता. माणगाव मध्ये मी बऱ्याच वेळेला नोटीस केलेला आहे की नॉर्मल विकेंड ला सुद्धा ट्राफिक जॅम चा त्रास सहन करावा लागतो. पण असो त्याशिवाय पर्यायच नाही. माणगाव मधून चहा घेतला आणि आम्ही राईट टर्न घेऊन दिवेआगर च्या दिशेने निघालो.
आता थोडं ऊन बऱ्यापैकी लागत होते, त्यामुळे थंडी जाणवत नव्हती त्यामुळे जॅकेट वगैरे काढून ठेवले होते. माणगाव पासून दिवेआगर ला जायला हा रस्ता नवीन झालाय आणि पूर्ण सिमेंटचा रस्ता आहे. काही ठिकाणी अचानक मोठमोठे वळण आणि तीव्र उतार आहेत तिथे थोडीशी गाडी चालवताना काळजी घ्यावी लागते बाकी विशेष असं काही नाही सर्व रस्ता चांगला आहे.
त्यानंतर आम्ही अकराच्या दरम्यानला दिवेआगार ला पोहोचलो ते थेट सुवर्ण गणेश मंदिरात गणपतीच्या दर्शनाला गेलो. गणपतीचे दर्शन घेऊन प्रसन्न मनाने बाहेर पडलो आणि तिथून जवळच असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावरील रूप नारायण मंदिरात गेलो. रूप नारायण मंदिर हे अतिशय जुने आणि ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिरामध्ये दर्शन घेऊन तिथून आम्ही निघालो आणि समुद्रकिनाऱ्यावर गेलो.
आता बऱ्यापैकी चांगलीच भूक लागली होती, बारा – साडेबारा वाजता आले होते भूक लागली होती. समुद्रकिनाऱ्यावरती एक राउंड मारून आलो आणि कडक उन्हाचा तीव्र झटका बसला आणि लक्षात आले की ही वेळ समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी योग्य नाही. भूक लागल्याने नाश्त्याला काय काय ऑप्शन आहे ते बघायला लागलो आणि कोकणातील घावणे या पदार्थावर सडकून ताव मारला.
त्यानंतर आम्ही तिथून कोकम सरबत पिऊन थेट श्रीवर्धनच्या दिशेने निघालो. गुगल आम्हाला नेहमी मेन रोड चा रस्ता दाखवत होते, पण आम्ही आसपासच्या माणसांना विचारून रस्ता शोधला आणि समुद्राच्या कडेकडेने श्रीवर्धन मध्ये पोहोचलो.हा रास्ता उत्तम आणि सुंदर आहे. साधारण दुपारी दोनच्या दरम्यानला आम्ही श्रीवर्धन मध्ये पोचलो आणि आधीच बुक करून ठेवलेल्या रूमवरती जाऊन आराम केला.
जेवायची इच्छा नव्हती कारण घावणे भरपूर खाल्ले होते. झोपून उठल्यावर संध्याकाळी सहा वाजता समुद्रकिनाऱ्यावर गेलो. श्रीवर्धन समुद्रकिनारा नितांत सुंदर आहे संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी झाली होती. थोडावेळ पाण्यात खेळून निवांत वाळूत जाऊन बसलो. सूर्य मावळतीला आला होता. आकाशातील रंग बदलू लागले होते. हळूहळू अंधार पडायला लागला आणि आणखी एक सुंदर सूर्यास्त बघता बघता त्याच्या आठवणी आयुष्यभरासाठी डोळ्यात साठवून ठेवला.
त्यानंतर आम्ही थोडा वेळ तिथेच गप्पा मारल्या आणि रात्री ९ वाजता जेऊन पुन्हा रूम वर आलो आणि झोपी गेलो. उद्याच्या दिवशी आम्हाला हरिहरेश्वर ला जाऊन तिथून पुन्हा पुण्याला परत जायचे होते.