रायगडावरील शिलालेख आणि शिवछत्रपतींचा राज्याभिषेक यावरील लेखांची माहिती

Hosted Open
5 Min Read

शिवछत्रपतीनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. किले रायगडावर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा संपूर्ण शिव चरित्रातील एक वैभवशाली आणि गौरवशाली प्रसंग आहे. हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवरायांनी संपूर्ण राज्याची एक सुसंघटित अशी स्वराज्य संस्था उभारून महाराष्ट्राला विश्वास दर्शक संस्कृती स्थापन करून दिली.

रायगडावरील शिवसमाधी समोरील नगारखान्याच्या भिंतीवर बसवलेला शिलालेख, म्हणजे रायगडावर बांधकामासंबंधी व राज्याभिषेकासंबंधी घडलेल्या घटनेचा अस्सल साक्षीदारच होय, या शिलालेखातून राजधानी रायगडाचे नवे रूप समोर येते.

किल्ले रायगडावरिल शिलालेख:

१. श्री गणपतये नमः ।।
२. ।।प्रासादोजगदीश्वरस्यजगतामानंददोनु
३. ।। ज्ञय श्रीमछत्रपतेशिवस्यनृपते सिंहासने तिष्ठतः
४. ।। शाके षण्नवबाण भुमिगणनादानंदसंवत्सरे ज्योतीराज
५. ।। मुहूर्त्त कीर्तिमहितेशुक्लेशसार्ष्णे तिथौ ।। १ ।। वापीकूपतडागराजिरू
६. ।। चिरैहम्यैर्वनैर्वीथिके । स्तंभैः कुंभिगृहैरिंद्रसदनैरभ्रंलिहै
७. ।। मंडिते श्रीमद्रायगिरौगिराम विषये हीराजिनानिर्मितो
८. ।। यावच्चंद्र दिवाकरौ विलसत स्तावत्समुज्जृंभते ।। २ ।।

अर्थ:

श्री गणपतीला नमन करून शालिवाहन शके १५९६ आनंदनाम संवत्सरात शोभायन झाल्यावर (सुर्यास्तानंतर एक मुहूर्त) जेष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच ६ जुन १६७४ शनिवारी रोजी उषकाली सकाळी पाच वाजता महाराज शिवाजीराजे सिंहासनाधिश्वर झाले.

किल्ले रायगडावरती पाण्याची टाकी, विहरी, तलाव, (नैसर्गिक वृक्ष) राजी (यांनी नटलेल्या) वाडे ,बागा ,रस्ते, स्तंभ गजशाळा. गगनचुंबी राजवाडे, मनोरे, अश्या वास्तू तसेच (प्रासादो जगदिश्वराचे) श्री शंकराचे जगदीश्वर नावाचे मंदीर त्यांचा वास्तुविशारद हवालदार हिरोजी इंदुलकर याच्या हस्ते जगाला आनंद देणारे करविले आणि या सर्व वास्तूची कीर्ती यावत चंद्रो। दिवाकरों म्हणजे जो पर्यंत आकाशात सूर्य चंद्र आहेत. ती पर्यंत तेजाने तळपत राहिल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या समकालीन काळातील शिलालेखा वरून तसेच बखरीवरून व अवशेषावरून कोणती व किती बांधकामे रायगडावर झाली. यांची संपूर्ण माहिती मिळते . याचबरोबर मंदिराच्या नगारखान्याच्या पायरीवरती “सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदूलकर” असा उल्लेख असलेला हिरोजी इंदुलकर यांच्या नावाचा दुसरा शिलालेख असल्यामुळे या किल्यावरील सर्व बांधकामे हिरोजीच्या देखरेखे खाली झाली असावीत.

छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्यभिषेकाचे एकून तीन समारंभ होते:

१) राज्याभिषेक
२) सिंहासनरोहन
३) राजदर्शन

राज्यभिषेकाचा सोहळा शुक्रवार पाच जून रोजी सुरू झाला. त्याची वेळ शुक्रवार 22 घटीका उप वेळ द्वादशी अशी होती .मुख्य विधी पहाटे होता. राज्याभिषेकासाठी शिवाजी महाराजांनी 32 मण सोन्याचे सिंहासन बनवले होते . सभासद म्हणतो महाराजांनी 32 मण सोन्याचे हे सिंहासन तयार करून कोषातील मौल्यवान रत्ने त्यामध्ये जडवली होती. अष्टप्रधान मंडळ, ब्राम्हण पंडीत. उत्तर अधिकारी या शुभवेळी सभागृहात उपस्थितीत महाराज सिहांसनास वंदन करून हातात राजदंड घेवून सिंहासनावर आरूढ झाले, राजदर्शनासाठी जगदीश्वर मंदिरापर्यंत हत्ती वरून मिरवणूक काढली गेली होती. राजपथावर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधिश्वर श्री राजा शिव छत्रपती की जय, अश्या घोषणा दिल्या गेल्या महाराजांनी जगदिश्वराचे दर्शन घेतल्यानंतर हा सोहळा पूर्ण झाला.

ऐसा मराठा सम्राट होणे नाही:

राजा साक्षात केवळ अवतारिच जन्मास येवून पराक्रम केला.
नर्मदापासून रामेश्वरपर्यंत द्वाही फिरला, देश काबीज केला.
आदिलशाही, कुतूबशाही, निजामशाही, व मोगलशाही या चारी
पातशाहाच्या व समुद्रातील तेवीस पातशाहा असे जेरजप्त करून.
नवेच राज्य साधून मराठा पातशहा सिंहासनाधिश्वर छत्रपती
जाहला. प्रतिइच्छा मरण पावून कैलासाला गेला, ये जातीचा
कोणी मागे जाहला नाही. पूढे होणार नाही.

(सभासद-१६८९)
शिवाजी महाराजीच्या राज्याभिषेकाचे सभासदाने केलेले यर्थाथ वर्णन जे केले . येणे प्रमाणे शिवाजी राजे महाराज जे कलयुगी सिंहासनारूढ जाहले. या युगी सर्व पृथ्वीवरील म्लेंच्छ पातशाह आहेत. त्यात क्षत्रिय एवढाच छत्रपती जाहला. राज्याभिषेकापासून महारांजांनी नवा शक चालू केला. स्वताची नाणी पाडली तेव्हापासून महाराज शककर्ते शिवराय ठरले. शिवछत्रपती अलौकिक, महापराक्रमी आणि तत्ववेत्ते ही होते.

कलयुगात क्षत्रिय नाहीत या घातकी कल्पनांचा त्याग करून स्वताला क्षत्रिकुलावतंस म्हणून राज्याभिषेक करून घेतला. ही एक मोठी क्रांती होती. हिंदू समाजात या काळातही क्षत्रिय वंश अखंड आहे हा सिध्दांत त्यांनी जगासमोर मांडला. समुद्रगमन निषेध या घातकी धर्मतत्वाने भारताचा साम्राज्य विस्तार झाला नाही. व्यापारासाठी जगभर जाणारे हिंदू दरिद्री बनले होते. शिवरायांनी हा दंडक मानला नाही आरमाराची स्थापन केली “ज्याचे आरमार त्याचा समुद्र “हे जगाला दाखवून दिले.

साडेतीनशे वर्षाच्या यावनी आक्रमणांनी महाराष्ट्रातील रयत गुलामगिरीत खितपत पडली होती. शिवरायांनी इथल्या रयतेच्या मनात स्वराज्य निर्मितीची मुहूर्त मेढ रोवली. हे राज्य रयतेचे आहे हे दाखवून स्वतास राज्याभिषेक करवून घेतला. शेकडो वर्ष या भारत भूमीने एक हिंदू शासक पाहिला नव्हता. ही बाब राज्याभिषेकांनी भरून निघाली.

दिल्लीचे मोगलशाही, विजापुरची आदिलशाही, भागानगरची कुतूबशाही , जंजिऱ्याचा सिद्दी, लंडनचे इंग्रज, पॅरिसचे फ्रेंच, लिस्बेंनचे (पोर्तुगाल) पोर्तुगीज ॲमसरडॅमचे डच, रायगडी नतमस्तक झाले.

या राज्याभिषेकाने भारतवर्षातील इंद्रप्रस्थ, देवगिरी, चित्तोड ,कर्णावती, विजयनगर, वारंगळ अश्या जुलमी राजवटीनी भंगलेले. सार्वभौम सिंहासनाच्या सर्व जखमा, रायगडावरील 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनाने आज भरून पावल्या होत्या. शेकडो वर्षे यावनी आक्रमणांनी दबलेली, खचलेली आणि हवादादिल झालेली रयत हर्षोवल्लित ,होऊन उठली, जागली, आणि चालती झाली. ती केवळ एका गगनभेदी मंत्राने तो मंत्र म्हणजे..

“छत्रपती शिवाजी महाराज की जय “! जो आजही संपूर्ण जगाला प्रेरित आहे.

©अनिल दुधाणे

माहिती साभार – दीपक शेळके

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *