रामनाथस्वामी मंदिर हे भारतातील तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटावर स्थित असून शिवाला समर्पित मंदिर आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे.
कन्याकुमारीहून संध्याकाळी ५ वाजता निघालो तेव्हा सूर्य क्षितिजाच्या खाली जात होता, आकाशाला ज्वलंत रंग देत होता. हिरवळीतून जाणारा सुंदर रस्ता, बाजूने उंच नारळीची झाडे, भातशेती आणि त्यातून वाहणारे पाणी, समुद्रकिनाऱ्याची खारट वाऱ्याची झुळूक मागे सोडून आम्ही आमच्या गाडीतून संध्याकाळच्या हवेचा गार वारा अनुभवत रामेश्वरमच्या दिशेने प्रवासाला लागलो.
रस्ता अतिशय विलोभनीय, वेल मेंटेन अँड मॅनेज होता सर्व ठिकाणी रस्त्यावरती स्पीड लिमिट चे बोर्ड आणि सीसीटीव्ही कॅमेरा आम्हाला दिसत होते. कोणीही पोलीस लक्ष ठेवण्यासाठी इथे नव्हते. सर्व लोक इथे ट्राफिकचे रुल पाळत होते. साधारण 80 ते 90 किलोमीटर नंतर आम्ही कन्याकुमारी-जम्मू काश्मीर हायवे सोडून उजवीकडे वळालो आणि मदुराई-रामेश्वरम या रस्त्याला लागलो अजून रामेश्वरम २२५ किलोमीटरच्या आसपास होते.
गाडीमध्ये आम्ही मस्तपैकी गप्पा मारत चाललो होतो आणि सोबतीलाच गुलजार आणि ए आर रहमान हे सुद्धा होते. त्यामुळे प्रवास एकदम आनंदात सुरू होता. काही वेळानंतर आम्हाला घनदाट जंगल लागले. जंगल लागल्यानंतर गुगल मॅप ने सुद्धा काम करायचे बंद केले. प्रत्येकाच्या मनातच थोडीफार भीती जाणवू लागली पण आजपर्यंतच्या अनुभवाच्या जोरावरती आम्ही गाडी पुढे चालवत होतो.
रस्ता विचारायला सुद्धा कोणी आजूबाजूला माणूस किंवा टपरी सुद्धा दिसत नव्हती. एक साधारण एक तासाच्या प्रवासानंतर आम्हाला एक पेट्रोल पंप भेटला तिथे जाऊन चौकशी केल्यानंतर समजले की आम्ही योग्य रस्त्यावरच आहोत. त्यानंतर आम्ही हळूहळू पुढे निघालो थोड्या वेळाने मोबाईल नेटवर्क सुद्धा आले आणि रामेश्वरम चे बोर्ड सुद्धा दिसायला लागले.
आम्ही रात्री साडेबारा – एक वाजता रामेश्वरम येथे पोहोचलो. अंधार असल्यामुळे रामेश्वरम मध्ये सर्वत्र शांतता होती आणि वातावरण थंड होते. रात्रीच्या वेळेला पम्बम ब्रिज बघता आला नाही त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी परत जात असताना बघायचं निर्णय घेतला आणि आम्ही हॉटेल शोधायला सुरुवात केली. एका ठिकाणी घरगुती रूम मिळाली अतिशय उत्तम दर्जाची रूम होती एक दीडच्या दरम्यानला आम्ही सर्वजण निद्राधीन झालो.
सकाळी लवकर उठलो आवरलं, आजच्या दिवसाचा असा प्लॅन केला की रामेश्वरम मंदिरात जाऊन सर्वात आधी दर्शन घेऊ, त्यानंतर इतर ठिकाणी फिरायला जाऊ.
नवीन कपडे घालून मंदिरात दर्शनासाठी निघालो. मंदिरात जायचं असल्यामुळे आम्ही चपला रूम वरतीच ठेवल्याने अनवाणी चालत निघालो. रूम पासून मंदिर दोन किलोमीटर अंतरावर होते, पण सकाळी आठ-साडेआठच्या दरम्यानला इतके कडक ऊन असेल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. त्या दोन किलोमीटर मध्ये आमचे पाय असे भाजून निघाले, जे की आम्ही आयुष्यभर विसरणार नाही.
त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो, थोडावेळ दर्शनाची रंग होती पण व्यवस्थित दर्शन झाले. मंदिर हे भव्य आणि मनमोहक कलाकुसर असलेले आहे. मुख्य मंदिरात फोटो काढण्यास बंदी आहे. पण मंदिराच्या आवारात असलेला जगप्रसिद्ध कॉरिडॉर बघायला गेलो. हा कॉरिडॉर जगातील सर्वात लांब म्हणून ओळखला जातो, त्याची उंची सुमारे 6.9 मीटर, पूर्व आणि पश्चिमेला प्रत्येकी 400 फूट आणि उत्तर आणि दक्षिणेस सुमारे 640 फूट आहे.
रामनाथस्वामी मंदिर हे भारतातील तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटावर स्थित असून शिवाला समर्पित मंदिर आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे.
साधारण दोन तासा नंतर आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो. सरळ रूमवर आलो आणि दोन अडीचच्या दरम्याला रूमवरून चेक आउट करून गाडी घेतली आणि जगप्रसिद्ध धनुष्कोडीच्या च्या दिशेने प्रवास सुरू केला.