पुण्यातून निघताना आम्ही असे ठरवले होते की रात्री आठ वाजेपर्यंत प्रवास करायचा आणि दहा वाजेपर्यंत जेवून झोपायचे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पहाटे प्रवास सुरू करायचा, पण या नियोजनाप्रमाणे एकदाही घडले नाही. आमचा प्रत्येक दिवस हा फिरण्यात आणि ठिकाणे बघण्यात जायचा आणि जे आम्हाला दुसऱ्या दिवशी बघायचे आहे तिकडे जायला आम्ही संध्याकाळी निघायचं. त्यामुळे पोहोचायला उशीरच व्हायचा, ही फार गमतीशीर बाब होती जे मला आज समजते.
असो धनुष्कोडी मधून अनेक आठवणी घेऊन आम्ही मदुराईच्या दिशेने निघालो. जाताना रामेश्वरम ला भारताच्या मुख्य भूमीला जोडण्यासाठी बांधल्या गेलेला प्रसिद्ध असा पम्बम ब्रिज पाहिला. थोडेफार ट्राफिक लागली होते पण त्यानंतर रस्ता चांगला असल्यामुळे अंतर पण लवकर तुटत होते. मजल दरमजल करत जेवण करून आम्ही रात्री अकरा बाराच्या दरम्यान मदुराई मध्ये पोचलो आणि मंदिराच्या बाजूलाच झोपलो.
मला सकाळी सहा वाजता जाग आली, मी उठून आवरलं, आंघोळ केली आणि पहिले तर बाकीचे तिघेजण अजूनही झोपले होते. खाली जाऊन चहा पिऊन यावं म्हणून हॉटेलच्या बाहेर पडलो आणि चक्क मंदिराच्या भव्य गोपुरम चे दर्शन झाले. काळ रात्री अंधारात आल्यामुळे दिसले न्हवते. त्यामुळे ते पाहायला मी निघालो, बघताना चालता चालता पूर्ण मीनाक्षी मंदिराला मी एक प्रदक्षिणा घातली आणि मला मंदिराची भव्यता, कलाकुसर, गोपूरम वरती कोरलेले नक्षीकाम याची जाणीव व्हायला लागली कारण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी वैशिष्ट्य लपले होते.
मदुराई, भारतीय उपखंडातील सर्वात जुन्या सतत वस्ती असलेल्या शहरांपैकी एक, मीनाक्षी अम्मान मंदिराच्या भव्यतेचे प्रतीक असलेल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगतो.
तामिळनाडू राज्यातील वैगई नदीच्या दक्षिणेकडील तीरावर वसलेले मदुराई येथील मीनाक्षी अम्मान मंदिर, प्राचीन दक्षिण भारतातील वास्तुशिल्पीय तेज आणि धार्मिक उत्साहाची साक्ष देत आजही उभे आहे. मदुराईच्या कोणत्याही गल्लीतून, रस्त्यावरून जात असताना तुम्हाला या मंदिराच्या ऊर्जेची जाणीव होते.
आर्किटेक्चरल महत्व:
मीनाक्षी अम्मान मंदिर त्याच्या भव्य द्रविडीयन वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे, ज्याचे वैशिष्ट्य उंच गोपुरम (प्रवेशद्वार), थक्क करणारे कोरीवकाम आणि विस्तीर्ण प्रांगण आहेत. मंदिर परिसर 14 एकरांवर पसरलेला आहे आणि असंख्य मंदिरे, भव्य हॉल आणि पाण्याच्या नियोजनबद्ध साठवणुकीने सुशोभित केलेले आहे.
मीनाक्षी अम्मान मंदिर, ज्याला मिनाक्षी-सुंदरेश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील सर्वात जुने आणि सर्वात महत्त्वाचे मंदिर आहे. मदुराई शहरात वसलेल्या या मंदिराला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. असे मानले जाते की भगवान शिवने सुंदरेश्वर चे रूप धारण केले आणि सध्या मंदिर असलेल्या ठिकाणी पार्वती सोबत लग्न केले. हे दक्षिण भारतातील मुख्य आकर्षणांपैकी एक आहे आणि दररोज हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. १० दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या ‘तिरुकल्याणम उत्सव’ दरम्यान, मंदिराला दहा लाखांहून अधिक भाविक भेट देतात.
मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर मला बऱ्यापैकी मंदिराबद्दल माहिती समजली होती, मी सुरक्षारक्षक, पोलीस आणि स्थानिकांशी बोलून ही माहिती मिळवली. त्यानंतर रूमवर आलो आणि बाकी तिघांचे सुद्धा बऱ्यापैकी आवरत आले होते.
सकाळी दहा वाजता खाली जाऊन सर्वांनी नाष्टा केला चहा घेतला आणि मंदिराच्या आत मध्ये मुख्य दर्शनाला गेलो. जेव्हा मी सकाळी आलो होतो तेव्हा अजिबात गर्दी नव्हती पण आत्ता अकरा वाजता फार गर्दी वाढली होती त्यात शनिवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे सुद्धा गर्दी वाढली असावी अशी शक्यता होती. दर्शनाच्या रांगेत थांबल्यानंतर साधारण एक तासानंतर दर्शन झाले, दर्शनांनंतर खूप प्रसन्न वाटलं.
त्यानंतर थोडावेळ आतून मंदिराचा आवारात फिरलो, थोडी ध्यान धरणा केली, आणि रूम वरती आलो. अमित सर न च्या काही वैयक्तिक कारणामुळे आम्ही ऊटी ला जायचा प्लॅन आम्हाला कॅन्सल करावा लागला, याची हुरहूर अजूनही वाटते. पण असो जे होते ते चांगल्यासाठीच. उटी ला पुढच्यावर्षी पुन्हा जाऊ.
आजचा आमचा प्लॅन असा होता की आज संध्याकाळी चार साडेचारला मदुराई मधून निघून ४०० किमी वर असलेल्या बेंगलोर मध्ये जाऊन झोपायचे पण, पुणे मदुराई हे अंतर फक्त १४०० किमी असल्याने बेंगलोरला मुक्काम न करता थेट पुणे गाठायचे हा प्रस्ताव मी सर्वांसमोर ठेवला. आणि बऱ्याच शंका कुशंकांनी तो एकमताने पास झाला.
कारण मी स्वतः एकट्याने कित्येकदा कोल्हापूर – नागपूर १००० किमी चा ड्रायविंग एकट्याने केले आहे, तेही पूर्ण सिंगल रोड असताना २०१७-१८ साली. त्याच बरोबर अनेक मोठमोठया ट्रिप केल्यात, त्यामुळे मला १६ ते १७ तास सलग ड्रायविंग करायची सवय आहे. आणि याच आत्मविश्वासाच्या जोरावर मी मदुराई ते पुणे थेट प्रवासाचे नियोजन केले.
गुगलच्या मॅप नुसार मदुराई ते पुणे १४०० किमी २२ तास असे लागणार होते. आम्ही शनिवारी संध्याकाळी ५ ला मदुराईतून निघालो. प्रवास मजेत सुरु होता. रात्री कर्नाटकात एक ठिकाणी पंजाबी धाब्यावर जेवण केले आणि पुनः प्रवास सुरु झाला. गाडीनेही खुप चांगली साथ दिली आहे.
बघता बघता रात्री बेंगलोर पार करून पुढे आलो आणि सर्वजण थोडे थोडे झोपायला लागले. मी पण गाण्याच्या सोबतीने गाडी चालवणे सुरु ठेवले. आणि सकाळी ६ वाजता बेळगाव जवळ येऊन थांबलो. एका पेट्रोल पंप वर फ्रेश झालो आणि थेट नाश्ता करायला कोल्हापूरला माझ्या घरी गेलो.
त्यानंतर तिथून निघून आम्ही बरोबर संध्याकाळी ५.३० वाजता वाकड, पुणे येथे पोचलो. अश्या तर्हेने आम्ही सलग २४ तास प्रवास करून पुण्याला देवाच्या कृपेने सुखरूप पोचलो. अनेक आठवणी आणि किस्से आयुष्यभरासाठी घेऊन…..
धन्यवाद!
Ekdam Sundar Varnan !!! Aabhari aahe Bhawa !!!
Umesh from Kolhapur
Dhanyawaad bhawa