अपरिचित रायगडाचा घेरा ( भाग सहावा ) – अन्नछत्राचं छत्री निजामपूर

Hosted Open
4 Min Read
अपरिचित-रायगडाचा-घेरा-भाग-सहावा

अन्नछत्राचं छत्री निजामपूर

शिवलंका रायगडाशी संबंधित अनेक आख्यायिका, दंतकथा सांगितल्या जातात.

अशीच एक मनोरंजक वाटावी अशी दंतकथा या गावाबद्दल पण ऐकवली जाते. तसं म्हटलं तर रायगड घेर्यामध्ये दोन निजामपूर नावाची गावं आहेत. उपदुर्ग मानगडाच्या पायथ्याशी असलेलं मोठं निजामपूर, आणि दुसरं हे अन्नछत्राचं निजामपूर.

निजाम म्हणजे त्या त्या परिसराचा व्यवस्थापक,आणि तो ज्या महालाचा अधिकारी जिथं राहतो त्या गावाला निजाम + पूर असे निजामपूर नाव पडत असे. आदिलशाही अंमलातील काळात, या गावात कारभारी ( मुलकी व्यवस्थापक ) राहत असावा.

मूळगाव आणि शिंदेकोंड मिळून छत्रनिजामपूर गाव बनलेलं आहे. मूळगावात गायकवाड, सकपाळ आणि कोतेकर तसेच शिंदेकोंडमध्ये बहुतांशी शिंदे आडनावे आढळतात. रायगडवाडीतून उत्तरेकडे खाली उतरताना, तीव्र उतारावर उजव्या बाजूला “शिंदेकोंड” ही वस्ती आहे.

टिपिकल मराठा कालखंडातील गाव पहायचं असेल तर शिंदेकोंड मध्ये जायला पाहिजे. टकमकटोकाच्या पायथ्याशी वसलेल्या या गावात कौलारू घरं, ओटी, पडवी, लाकडी कटारे, सारवलेलं अंगण, गायीगुरांचे वाडे, असं मराठमोळं राहणीमान तिथल्या माणसांमध्ये दिसून येतं.

गावात दोन हनुमान मंदिर दिसून येतात एक शिंदे कोंड येथे आहे आणि दुसरे मारुतीराया छत्री निजामपूर गावात उघडे एका शेतात आहेत. या मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे येथे मंदिर बांधुन देत नाही अशी भावना ग्रामस्थांची आहे.

एक या स्थानाबद्दल आख्यायिका पण सांगितली जाते ती म्हणजे पूर्वी पासून अनेकांना वाटत होते की या मारुती रायाला एक मंदिर बांधावे पण पूर्वजांच्या आख्यायिकेनुसार या ठिकाणावर पौर्णिमेच्या रात्री जो कोणी पण एका रात्रीत निगडी च्या लाकडांचे मंदिर बांधेल तरच मला मान्य असेल नाहीतर नाही. या मध्ये किती तथ्य आहे हे माहीत नाही पण गावकऱ्यांची हीच भावना आहे. काही वर्षांपूर्वी एका बाईने बाजूला दगडांचा चौथरा बनवला आहे पण मारुती राया उघड्यावर विराजमान आहेत.

पूर्वीच्या काळी गावाच्या वेशीवर मारूतीची स्थापना केली जात असे. कदाचित याच कोंडावर गावची वेस असून, कालांतराने मानवी वस्ती झाली असल्याची शक्यता आहे. काळ नदीच्या उत्तर दक्षिण पसरलेल्या लगतच्या भूभागावर मूळ छत्रीनिजामपूर गाव वसलेलं असून, आजमितीस कोणतेही ऐतिहासिक अवशेष मात्र आढळत नाहीत. “पूर” हा शब्द आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य सुचवतं. म्हणजेच जवळची नदीपलीकडची सांदोशीची संपन्न पेठ आणि या गावाचा अर्थाअर्थी संबंध जोडला जाऊ शकतो.

मढेघाट, बिरवाडी आणि कावल्याबावल्या खिंडीतून रायगडाकडे जाणारा मार्ग याच छत्रीनिजामपूरमधून जात असल्याने, शिवकाळात गावाला अनन्यसाधारण महत्व होतं. जंजिरेकर सिद्दी आणि छत्रपती शाहूंच्या सैन्यामध्ये 10 जानेवारी 1734 रोजी रायगड परिसरात घनघोर युद्ध झाले.

छत्रपती शाहूंचा सरदार बाजी भीमराव 9 जानेवारीच्या दिवशी छत्रीनिजामपूर मध्ये येऊन पोहोचल्याची नोंद सापडते. त्याच्यासोबत सोमवंशी बंधू, हरि मोरेश्वर, कृष्णाजी पवार, वाईचा शेखमिरा, कृष्णराव खटावकर यांचंही सैन्य होतं.

या सैन्याने पराक्रमाची शर्थ करून, सिद्दी अंबर अफवानीला मात दिली. खासा सिद्दी अंबर ठार झाला. प्रचंड विजय झाला.

या गावाच्या नावाबद्दलची आख्यायिका सांगितली जाते. टकमक टोकावर छत्रपती शिवाजी महाराज आसपासच्या आसमंताची न्याहाळणी करत असताना, प्रचंड वेगाने वारा वाहू लागला. याचवेळी महाराजांच्या डोक्यावर छत्र धरलेला सेवक हवेत उडून तरंगू लागला. महाराजांनी त्याला ओरडून सांगितलं कि छत्रीचा दांडा फक्त सोडू नको, घाबरू नकोस. जिवाच्या भितीने सेवक महाराजांच्या आज्ञेचे पालन करू लागला.

आत्ताच्या “पॅराशूट” च्या संकल्पनेप्रमाणे हवेत तरंगत तरंगत तो सेवक पायथ्याच्या गावात उतरला. तो सेवक ज्या गावात छत्री घेऊन उतरला, त्या गावाला “छत्री निजामपूर” असं तेव्हापासून बोललं जाऊ लागलं.

तीन साडेतीन शतकांपासून ही आख्यायिका आबालवृध्दांमध्ये प्रचलित झाली आणि रूढही झाली. छत्रीनिजामपूरमधील गायकवाड, सकपाळ आडनावांचा उल्लेख कागदपत्रांमधून सापडतो. मोरोजी नाईक सकपाळ हे पेशवेकाळात गडावर सेवेत असल्याची नोंद आढळते. तसेच येसाजी गायकवाड या सरदारांचा नामोल्लेख अनेकदा दिसून येतो.

आजच्या इतिहास अभ्यासकांसमोर या घराण्यांचा इतिहास, वंशावळ उलगडणं हे खरंतर मोठं आव्हान आहे. गडरहाळातील निष्ठावंत मावळ्यांचं दुर्गदुर्गेश्वर रायगडाशी नातं काय हे सांगितलं पाहिजे. छत्रीनिजामपूरमधून महाड, माणगावमध्ये स्थिरावलेल्या गायकवाड कुटुंबाला शौर्याचा वारसा, परंपरा लाभलेली आहे.

रायरीच्या आसमंतात स्थिरावलेली मराठा कुटुंबं, काळ नदीच्या खोर्यातील घडलेल्या पराक्रमाच्या असंख्य शौर्यकथा, पिढ्यानपिढ्या गुजरल्या तरीही तोच बाणा अंगात भिनलेली माणसं आणि टिपिकल शिवकालीन खेडं पहायचं असेल तर छत्रीनिजामपूरची भटकंती कराच.

Source: महाड रायगड माझं गाव माझा अभिमान Page

Share This Article
1 Comment
  • Hi, Can you please share more details about this sentence ‘येसाजी गायकवाड या सरदारांचा नामोल्लेख अनेकदा दिसून येतो.’ on my whatsapp number

    Thanks
    Sachin Gaikwad
    9822978353

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *