भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पसरलेली, सह्याद्री पर्वतरांग, ज्याला पश्चिम घाट म्हणूनही ओळखले जाते, हि एक भव्य डोंगररांग असून त्याची लांबी 1600 किलोमीटरहून अधिक आहे. आणि अश्याच निसर्गाने समृद्ध असणाऱ्या आणि तितक्याच कणखर अश्या डोंगररांगेत अनेक महत्वाचे किल्ले वसलेले आहेत. त्यापैकीच एक वज्रगड.
ठाणे जिल्ह्यात वसई, विरार ते पालघर या पट्ट्यात नाही म्हटले तरी बरेच गड आहेत. त्यांचा विस्तार वा इतिहास फारच छोट्या स्वरुपात असल्याने (अपवाद वसईचा किल्ला) तसे ते दुर्लक्षितच राहिले. वसईचा किल्ला सोडला तर बाकी गड तसे अज्ञातच राहिले. येथील बरेच गड हे आजुबाजूच्या प्रदेशावर पहारा देण्यासाठी वापरले गेले होते. आणि त्यातलाच असा एक गड “वज्रगड” !! (“पुरंदर” चा शेजारी नव्हे !) वसईला ‘हिराडोंगरी’ नावाची एक टेकडी आहे जिथुन सुंदर देखावा दिसतो. या टेकडीचे खरे नाव वज्रगड आहे.
“Fort was built for keeping a watch on movements between Vasai Fort & Arnala Fort during Vasai Mohim of Peshavas during the period 1737 – 1739.” अशी माहिती नेटवर आहे.
वसई किल्ला ते अर्नाळा किल्ला यांच्या दरम्यान असलेल्या गिरीज गावातील टेकडीवर मराठ्यांनी वसई मोहीमेच्या ऎन धामधुमीत वज्रगडाची उभारणी केली. वसई किल्ला, अर्नाळा किल्ला व त्यांच्या दरम्यानच्या समुद्रकिनार्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली गेली. तसेच वसई मोहिमेदरम्यान पोर्तुगिजांवर वचक बसविण्यासाठी मराठ्यांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती. सध्या मात्र हा किल्ला जवळ जवळ नामशेष झालेला आहे. या टेकडीवर (किल्ल्यावर) बांधलेल्या दत्त मंदिरामुळे हा किल्ला “गिरीज डोंगरी/दत्त डोंगरी/हिरा डोंगरी या नावाने ओळखला जातो.
वज्रगड किल्ल्याचा इतिहास:
इ.स. १५२६ साली पोर्तुगिजांनी वसई किल्ल्याची उभारणी सुरु केली. त्याच बरोबर या भागावर वर्चस्व ठेवण्यासाठी शिरगाव, माहीम, केळवे या परिसरात किल्ल्यांची साखळीच तयार केली. पोर्तुगिजांनी स्थानिक जनतेवर धर्मांतरासाठी अत्याचार केले. या जुलमाच्या तक्रारी पेशव्यांकडे गेल्यावर, इ.स १७३७ मध्ये नरवीर चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली गंगाजी नाईक, शंकराजी फडके, बाजी रेठरेकर इ मातब्बर सरदार पोर्तुगिजांचे समूळ उच्चाटण करण्यासाठी पुढे सरसावले. वसई मोहिमेत वज्रगडाची उभारणी करण्यात आली. या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला. वसई मोहिमेत या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
वज्रगड गडावरील पहाण्याची ठिकाणे:
वज्रगड छोट्या झाडीभरल्या टेकडीवर उभा आहे. गिरीज गावाच्या ईशान्येकडे असलेल्या या टेकडीवर जाण्यासाठी पायर्या बनवलेल्या आहेत. पायथ्यापासून १० मिनिटात आपण वज्रगडाच्या भग्न प्रवेशद्वारातून माचीवर प्रवेश करतो. प्रवेशव्दाराचे दोन्ही बुरुज जवळ जवळ नष्ट झालेले आहेत. उजव्या बाजूच्या बुरुजावर नव्याने शौचालय बांधलेली आहेत. डाव्या बाजूचा बुरुज झाडा- झुडुपांमध्ये लपलेला आहे. तो पाहाण्यासाठी पायर्या सोडून डावीकडे थोडे चालत जावे लागते. किल्ल्याचे बुरुज व तटबंदी मोठ मोठे दगड एकमेकांवर रचुन केलेली असावी. किल्ल्याची ऊभारणी युध्द पातळीवर केल्यामुळे या बांधकामात चून्याचा वापर केलेला आढळत नाही.
पुन्हा पायर्यांच्या मार्गावर येऊन वर चढल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. गडमाथ्यावर समोरच पाण्याचे चौकोनी आकाराचे खडकात बांधलेले टाक दिसते. गडाच्या माचीवर भवानगडेश्वराचे जिर्णोध्दारीत मंदिर आहे. टाक्यात भरपूर पाणी साठा आहे. गडावर दत्तमंदिर आहे. बाजूलाच एका झाडाखाली मारुती मुर्ती आहे. गडावरून उत्तरेला अर्नाळा किल्ला व दक्षिणेला वसई किल्ला व आजुबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो.
वज्रगडावर पोहोचण्याच्या वाटा:
पश्चिम रेल्वेवरील वसई व नालासोपारा या स्थानकांवरुन वज्रगडवर जाता येते. वसई पासून १४ किमी व नालासोपार्या पासून ८ किमी अंतरावर गिरीज गाव आहे. दोन्हीपैकी कुठल्याही स्थानकावर पश्चिमेला उतरून गिरीज गावात जाणार्या बसने किंवा ६ आसनी रिक्षाने वज्रगडाच्या पायथ्याशी जाता येते. स्वतःची गाडी असेल तर direct पायथ्याला जाता येते.
– Dipak Shelke