केरळ बॅकवॉटर मधील बोटिंग चा माझा अनुभव | My experience of boating in Kerala backwaters

Hosted Open
9 Min Read

मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही वाचले असेल की, आम्ही कशा पद्धतीने अचानक रस्ता बदलून कोचीमधून पुढे अलेप्पी या ठिकाणी आलो आणि मुक्काम केला. पण ऑनलाईन जे हॉटेल आम्ही मुक्कामासाठी पाहिले होते तिथे गाडी पार्किंग करण्यासाठी कोणतीही जागा नसल्यामुळे मी निर्णय घेतला की आपण दुसऱ्या हॉटेलला जाऊ. सर्वजण म्हणत होते एवढ्या रात्री दोन अडीच वाजता हॉटेल कुठे मिळणार? पण एक किलोमीटर वर चांगले हॉटेल मिळाले.

रूम वगैरे प्रशस्त होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सात-साडेसात वाजले उठयला कारण सलग सात आठ दिवसांपासून व्यवस्थित झोप झालेली नव्हती, आणि कोणालाही लवकर उठायची इच्छा झाली नाही. तिथून आवरून साडेआठ वाजता आम्ही अलेप्पी बॅक वॉटर ला निघालो वाटेत जात असताना आम्हाला नाश्ता करायचा होता. पण नाश्ता कुठेच मिळत न्हवता, किंबहुना हॉटेलच सापडत नव्हते.

एका ठिकाणी एक जुने हॉटेल मिळालं तिथे आम्ही मेदुवडा आणि इडली जे बाय डिफॉल्ट नाश्ता करावाच लागतो तो केला, आणि त्याच्यावर चहा घेतला. आम्ही अलेप्पी च्या दिशेने निघालो आणि पाणी दिसल्यानंतर एका ठिकाणी पार्किंग मध्ये गाडी लावली आणि पार्किंग मॅनेजरच्याच ओळखीने एक बोट रेंट केली.

बोट रेंट करण्याचा पण एक मजेदार किस्सा आहे. नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये जर अलेप्पी ला गेला तर तुम्हाला एक बोट ही साधारण तीन हजार ते सहा हजार च्या आसपास पडते पण आम्हाला तीच बोट आठशे रुपयाला मिळाली. कारण आमच्याकडे दीपक सर होते.

दीपक सरांचे दुसरे नाव हे बार्गेनिंग किंग असे आहे. ते खूप व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने एखाद्या गोष्टीचा दर मॅनेज करतात त्यामुळे आम्ही त्यांना डील करण्यासाठी पाठवले होते आणि त्यांनी चक्क आठशे रुपयात पूर्ण बोट फिक्स करून टाकली

कॅप्टन बोट घेऊन आला त्यामध्ये आम्ही बसलो बोट मध्ये बसल्या बसल्या आम्हाला एका वेगळ्याच दुनियेत गेल्याचा भास झाला बेसिकली बोटचा route असा होता की बॅक वॉटर मधून पूर्णपणे फिरवून आणणार वेगवेगळे निसर्गाचे चमत्कार दाखवणार आणि पुन्हा आणून जिथून चढलो तिथेच सोडणार. अशी आमची पाण्यातली ride सुरु झाली. ६ दिवसांपासून रोड वरून फिरत असताना आज पाण्यावरून फिरताना मजा येत होती.

बोट कॅप्टनलाही काही काम नव्हते आणि दुसरे भाडे पण नव्हते त्यामुळे त्याने आम्हाला भरपूर फिरवले. या मध्ये फेरफटका मारताना निसर्गाची कीमया मला दिसली आणि जे आतापर्यंत आम्ही हॉलीवुड च्या मुव्हीज मध्ये पाण्यातले सीन वगैरे बघितले होते ते आता प्रत्यक्षात बघत होतो, आणि स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. अलेप्पी बॅकवॉटर हे खूप म्हणजे खूपच सुंदर आहे.

पूर्ण अलेप्पी हे पाण्यावरती वसलेले शहर म्हणा, गाव म्हणा किंवा वसाहत म्हणा हे वसलेलं आहे. मेन ट्रान्सपोर्टेशन हे बोट द्वारेच होते. छोट्या बोटी, मोठ्या बोटी, मोटर बोटीचे वेगवेगळ्या बोट मधूनच मेन ट्रान्सपोर्ट होते. अलेप्पी तील माणसे खूप प्रेमळ आणि चांगल्या स्वभावाचे आहेत असं मला वाटले. त्यांचे बोलणं आणि वागणे खूप नम्र आहे, आपण किती चिडलो कसेही वागलो तरी ते नम्रपणे रिस्पेक्ट देतात. ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे.

अलेप्पी मध्येच भारत सरकारचं कायाकिंग च ट्रेनिंग सेंटर आहे जिथे आपल्याला ऑलम्पिक लेव्हलचे players तयार केले जातात. मला वाटते बहुतेक ते स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याद्वारे संचलित केलेले होते. त्यानंतर बॅकवॉटर मधून फेरफटका मारत असताना नानाविध पक्षी आणि त्यांचे आवाज बघायला आणि ऐकायला मिळाले. त्याचबरोबर निरनिराळ्या प्रकारच्या बोटी पाहायला मिळाया.

आमचा कप्तान इतका मनमिळावू आणि गप्पा मारणारा होता. त्याने केरळची पारंपारिक उत्सव जे पूर्णपणे पाण्यावर साजरे केले जातात त्यापैकीच एक कोणता तरी सांगितलं ज्याच्यामध्ये बोटिंग ची रेस केले जाते, जो एक सीन टायगर श्रॉफ च्या पिक्चर मध्ये दाखवल्यावर कुठल्यातरी. आणि ती बघण्यासाठी फार लांबून लांबून लोक येतात. त्यासाठी गव्हर्मेंट ने स्टँड्स आणि स्टेडियम पण बांधलेले आहे. अशा पद्धतीने आम्ही अलेप्पी चा पूर्णपणे आस्वाद घेतला आणि पुढील ठिकाण श्री पद्मनाभस्वामींच्या दर्शनाला निघालो.

अलेप्पी ते तिरुअनंतपुरम जी केरळची राजधानी आहे हा पूर्ण रस्ता सध्या सिंगल रोड आहे. 100 किलोमीटर ला आम्हाला साडेचार तास लागेल, कारण ह्याच रस्त्यांवर पूर्ण लोकल ट्राफिक आणि हायवे ट्राफिक एकत्र येतं. त्यामुळे खूप ट्राफिक जामचा त्रास सहन करावा लागतो. सध्या या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे आणि हा रस्ता नॅशनल हायवे 66 यामध्ये वर्ग झाल्यामुळे पनवेल ते कन्याकुमारी या रस्त्याच्या क्वालिटी सारखाच हा हि रस्ता होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो.

इथून निघाल्यानंतर आम्हाला लवकरात लवकर श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात पोहोचायचे होते कारण ऑनलाईन माहिती अशी मिळाली होती की रात्री साडेआठ वाजता आहे मंदिर दर्शनासाठी बंद होते. त्यामुळे त्याच्या आधी आम्हाला तेथे पोहोचणे भाग होते, आणि ठरवल्याप्रमाणेच आम्ही सहा सव्वा-सहा वाजता मंदिराजवळ पोहोचलो.

somesh-nikam-kerala-backwater

गाडी पार्किंग केली आणि आम्ही दर्शनाला निघालो. इथला असा नियम आहे की दर्शन पूर्णपणे पारंपारिक वेशभूषा करूनच घ्यावे लागते. त्यामुळे तिथे लुंगी विकत घेतल्या आणि त्या नेसून आम्ही दर्शनाला गेलो.

मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर मला पहिल्यांदा एखादी गोष्ट जाणवली होती ती म्हणजे शांतता आणि समाधान. श्री पद्मनाभ स्वामी मंदिर हे मी आतापर्यंत पाहिलेल्या सर्व मंदिरांपैकी सर्वात जास्त शांत आणि समाधानकारक मंदिर मला वाटले, कारण इथे कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय मंदिरासाठी केला जात नाही. आलेल्या भाविकांना थेट दर्शन दिले जाते. जेमतेम तीन ते चार शॉप आहेत तिथे तुम्ही काही गोष्टी खरेदी करू शकता. आणि मंदिराचा आवारा इतका मोठा आहे की फिरण्यासाठी तुम्हाला बराच वेळ द्यावा लागतो.

त्याचबरोबर मंदिराच्या आतील आवारात समुद्राची वाळू आहे. आम्ही गेलो त्यावेळेला मंदिरामध्ये प्रदक्षिणा आणि पालखी हे उत्सव चालू होते. ते आम्हाला पाहायला मिळाले हे आमचे भाग्यच. देवाचे सुंदर दर्शन झाले. साउथ मधील मंदिरांमध्ये मला एक गोष्ट जाणवली, तिथे मूळ गाभाऱ्यामध्ये कोणत्याही लाइट्स लावल्या जात नाहीत. तिथे फक्त आणि फक्त तुपाचे दिवे लावलेले असतात. आणि त्या दिव्यांच्या प्रकाशातच तुम्हाला देवाचे दर्शन घ्यावे लागते.

मंदिराचा थोडक्यात इतिहास आणि महत्व:

तिरुवनंतपुरममधील श्री पद्मनाभस्वामी मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. त्याच्या सहा तिजोरीत आणि त्यांच्या अनेक अँटीचेंबर्समध्ये किती संपत्ती आहे हे अद्याप पूर्णपणे निश्चित केले गेलेले नाही.

या मंदिराचा इतिहास आणि कीर्ती गूढ आणि समृद्ध प्राचीनतेमध्ये गुंफलेली आहे. कोणतीही अचूकता नसलेल्या अनेक कथा त्याच्या अमूल्य मौल्यवान रत्न, सोने, चांदी आणि अद्याप उघडलेल्या तिजोरीच्या प्रचंड संग्रहातून उद्भवल्या आहेत. मंदिराची ख्याती इतकी आहे की दररोज अनेक लोक भगवान पद्मनाभांच्या या मंदिराला भेट देतात.

आठव्या शतकात मूळ असलेले हे मंदिर भारतातील १०८ विष्णू मंदिरांपैकी एक आहे. येथील देवता अनंतशयन स्थितीत आदिशेषावर विसावलेली आहे.

१६८६ मध्ये एका मोठ्या आगीने मंदिर जवळजवळ नष्ट केले होते. १७२९ मध्ये त्रावणकोरचा राजा झालेल्या मार्तंड वर्माने नूतनीकरण आणि पुनर्बांधणीची कामे हाती घेतली. त्यानंतर मंदिराचे पाच मजले बांधण्यात आले आणि नंतर संस्थानावर राज्य करणाऱ्या धर्मराजाने सहाव्या आणि सातव्या मजल्यांचे बांधकाम पूर्ण केले.

Padmanabhswami temple

मंदिरातील दर्शन वेळ:

सकाळ
पहाटे 03:30 ते 04:45 पर्यंत
सकाळी 06:30 ते 07:00 पर्यंत
सकाळी 08:30 ते 10:00 पर्यंत
सकाळी 10:30 ते 11:15 पर्यंत
दुपारी 12:00 नंतर (15-20 मिनिटे)

संध्याकाळ
दुपारी 04:30 ते 06:10 पर्यंत
संध्याकाळी 06:45 ते 07:20 पर्यंत

वरील वेळापत्रक सण आणि विशेष प्रसंगी बदलू शकतात याची नोंद घ्यावी.

 

श्री पद्मनाभ स्वामींचे मन भरून दर्शन घेतल्यानंतर जेव्हा घड्याळ पहिले, तेंव्हा फक्त साडेआठ वाजले होते. त्यामुळे असा निर्णय घेतला की एवढ्या लवकर इथे न थांबता, 80 किलोमीटर वर असलेल्या कन्याकुमारीला जाऊन झोपू, म्हणजे उद्या उठून कन्याकुमारी फिरायला वेळ मिळेल.

त्यानुसार आम्ही इथून निघालो. इथून पुढे रास्ता ४ लेनचा आहे. त्यामुळे गाडी चालवायला जास्त त्रास झाला नाही. वाटेत एका ठिकाणी जेवलो. आणि पुढे मार्गस्थ झालो. एक गोष्ट नमूद करावीशी वाटे ती अशी कि, सौथ मध्ये आता बऱ्यापैकी पंजाबी आणि नॉर्थ इंडियन जेवण मिळते. आणि सर्व वेग जेवणाची हॉटेल्स हि ५ स्टार सारखी पॉश आहेत, पण जेवणाचे बिल मात्र तुलनेने खूपच कमी येते.

आमचा प्रवास सुरु होता. रात्री १ वाजता कन्याकुमारी म्हणजेच आपल्या देशाच्या सर्वात दक्षिणेकडील टोकावर finally मी पोचलो होतो.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *