सत्यमंगलम च्या जंगलातील अंगावर काटा आणणारा अनुभव | A spine-tingling experience in the jungles of Sathyamangalam

Hosted Open
9 Min Read

नमस्कार, मी सोमेश.. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये,

आपण सध्या साउथ इंडिया सेरीज पाहत आहोत, मागील ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिला असाल की कशा पद्धतीने आम्ही पुण्यातून निघालो त्याच्यानंतरन प्रचंड पावसातून रात्रभर प्रवास करून गोव्याला पोहोचलो, तो एक भयानक अनुभव होता, ती अतिशय भयानक रात्र होती.

त्यानंतर आम्ही गोवा ते गोकर्ण, गोकर्ण ते मुर्डेश्वर, होन्नावर उडपी, उडपीतून मंगलोर असा प्रवास आणि मंगलोर मध्ये पंक्चर झालेली गाडी. पोहोचायला झालेला उशीर, त्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी उठून मंगलोर ते मैसूर हा प्रवास. या प्रवासात येणारे कूर्ग ज्याला आपण स्कॉटलंड ऑफ इंडिया असे म्हणतो. त्यानंतर मदीकेरी चे धबधबे, पाऊस, पुष्पगिरी चे जंगल असे अनेक अडचणीचे टप्पे पार करत आणि प्रवासाचा आनंद घेत काल मैसूरमध्ये येऊन थांबलो.

आज पूर्णपणे म्हैसूर बघून झालं. म्हैसूर मध्ये चर्च बघितलं, म्हैसूरचा राजवाडा बघितला, चामुंडेश्वरी मंदिर बघितलं, त्यानंतर नंदिनी मध्ये थोडी खरेदी करून आम्ही आमचा प्रवास मदुरेच्या दिशेने सुरु केला.

संध्याकाळचे ४ वाजले होते म्हैसूर मधून बाहेर पडायला. आणि त्यानंतर मला आणि दीपक सर ना ऑफिस चे एक महत्वाचे काम आले. म्हणून पुन्हा आम्ही एका ठिकाणी थांबा घेतला. जेंव्हा काम झाले अर्ध्यातासाने तेंव्हा अजुनबाजूचा परिसर थोडा निरखून पहिला तर चक्क आम्ही एका नारळाच्या आणि सुपारीच्या बागेच्या पुढेच थांबलो होतो. खूपच सुंदर बाग होती ती. थोडा फोटोसेशन करून आम्ही मार्गस्थ झालो. मी गाडी चालवत होतो आणि मस्त गाणी बॅग्राऊंडला सुरु ठेवली होती.

आज आमचा मदुराईला जाऊन झोपायचा प्लॅन होता. दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊ असं आम्ही ठरवलं होतं, पण म्हणतात ना आपण ठरवतो ते सर्वच होता असा नाही. काही वेळेला तुम्हाला रन टाईम मध्ये प्लॅन हा चेंज करावाच लागतो. त्याच प्रमाणे आमच्या बाबतीतही झालं.

जसं जसं म्हैसूर मागे पडत होता तसं तसं आम्ही तामिळनाडू बॉण्ड्रीच्या जवळ जात होतो. कर्नाटक आणि तमिळनाडू यांच्या बॉण्ड्री वरती घनदाट जंगल आहे, आमचे स्वागतच एका धरणाच्या बॅकवॉटरने केले. डाव्या बाजूला समुद्र सारखे पसरलेले निळे पाणी आणि उजव्या बाजूला दिसणारे काळेभोर उंच उंच जंगल, आणि गुगल मॅप वरती आम्हाला सतत दिसत होत की, आम्ही कंटिन्यूअसली थोडा वेळ कर्नाटक मध्ये आणि थोडा वेळ तामिळनाडूमध्ये अशा पद्धतीने गाडी चालवत होतो.

तो रस्ता विस बावीस किलोमीटरचा पूर्ण घनदाट जंगलातून पाण्याने भरलेल्या काठाकाठाने होता, मध्ये मध्ये उसाचे ट्रक्स दिसत होते. त्याचबरोबर मनामध्ये थोडा हूरूप आला होता. कारण की मला गाडी चालवायला अशाच रस्त्यांवरून आवडते.

त्यामुळे मीही आनंदात होतो गाडीचे स्पीड मेंटेन ठेवलं होतं आणि त्याचबरोबर आमच्या गप्पा चालू होत्या की कशा पद्धतीने रस्ते वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या क्वालिटी ठेवले आहेत. असं महाराष्ट्र मध्ये पण द्यायला पाहिजे. आणि गप्पा मारत मारत आम्ही सत्यमंगलम या टायगर रिझर्व फॉरेस्टच्या चेक पोस्टवर येऊन पोहोचलो.

आमचे नशीब इतके चांगले की संध्याकाळी सात वाजता इथून कोणालाही प्रवेश दिली जात नाही. आम्ही फक्त सहा-सव्वासाच्या दरम्यान एंट्री केली, त्यामुळे आम्हाला एन्ट्री मिळाली. एन्ट्री करता क्षणी फॉरेस्ट ऑफिसरने आम्हाला सांगितलेलं होतं की 30 किलोमीटरच्या जंगलामध्ये कुठेही गाडी थांबवायची नाही. कुठेही गाडीतून उतरायचं नाही. ते ऐकून सर्व आम्ही निघालो, सुरुवातीला नॉर्मल जंगल सुरू होते आम्हाला असे वाटले की जशी की महाराष्ट्रातले जंगल आहेत तसेच हे पण असेल उदा. दाजीपूर अभयारण्य किंवा कोयनेचे अभयारण्य अश्या प्रकारचे असेल जिथे काही प्राणी वगैरे दिवसा दिसणार नाहीत.

पण हा आमचा ब्रह्म होता पण तो पुढच्या पाच मिनिटात हवेत विरून गेला. कारण आमच्या स्वागत हे चक्क एका पट्टेही हरणांच्या कळपाने झाले. तो हरणांचा कळप जंगलातल्या डांबरी रस्त्याच्या बाजूलाच हिरव्या गवताच्या कुरणांवर बिनधास्तपणे चरत होता. तेव्हा आमचा कोणाचाच स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

हरणासारखा लाजाळू प्राणी इतक्या रस्त्याच्या कडेला येऊन कसे काय बिनधास्तपणे चरू शकतो? हा आम्हाला प्रश्न पडला होता. त्यानंतर आम्हाला एक गोष्ट जाणवली की इथल्या प्राण्यांना तामिळनाडू आणि कर्नाटक सरकारने इतके सुरक्षित वातावरण तयार करून दिले आहे की त्यांना रोड साईडला फिरायला सुद्धा कसलीही भीती वाटत नाही. त्यामुळेच तर हरणासारखे प्राणी इतक्या बिन्धास पाने फिरतात. तिथे थोडे फोटो घेऊन आम्ही पुढे मार्ग झालो. आता सर्वांच्या मला सूचना आल्या, हे जंगल जितके दिसते तितकं सोपं नाहीये गाडी लक्ष देऊन चालव.

तीनच किलोमीटर पुढे गेलो तेवढ्यात एकाला पाठीमागे कुठून तरी हत्ती दिसला आम्हाला कुणाला दिसला नाही. आम्ही पुढे गेलो आणि आणि एक अर्धा किलोमीटर वरती रस्त्याच्या डाव्या बाजूला बांबूच्या बेटाच्या बाजूलाच चार हत्ती उभे होते.

हत्ती कोणताही पद्धतीने विरोध करत नव्हते, ते एकदम शांतपणे उभे होते. आम्ही शांतपणे दुरूनच त्यांचे फोटो वगैरे काढले, त्यांना मनसोक्त निहाळले आणि तेथून निघालो. त्यानंतर अनेक वेळा आम्हाला पुढे हत्ती आणि हरण यांचे विविध प्रकार भेटले त्यांना पाहून खूप आनंद झाला. वाघ तेवढा दिसला नाही कारण तेवढे आमचे नशीब चांगलं नव्हतं.

पण आम्हाला प्राणी पाहून खूप आनंद झाला होता. आम्ही मदुराई ला जायचा घेतलेला निर्णय योग्य ठरला होता.

पण आमचा हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता कारण, सत्यमंगलम टायगर रिझर्व चे जंगल क्रॉस करतच असताना आम्ही धिमबाम या गावात पोहोचलो. हे जंगलाच्या मधोमध असलेले, मानवी वस्ती असणारे एकमेव गाव आहे. या गावातून आता आम्हाला खाली घाट उतरायचा होता. आम्हाला वाटले की हा नॉर्मल घाट असेल पण तो नॉर्मल नव्हता, तर तो घाट होता बन्नारी घाट. या घाटाचे वैशिष्ट्य म्हणजे या घाटामध्ये 27 हेअर पिन टर्न आहेत. प्रत्येक टर्न या घाटातील जीवघेणा आहे.

आयुष्यात पहिल्यांदा मला गाडी चालवत असताना टेन्शन आलं होतं की, चुकूनही जर गाडीचे ब्रेक फेल झाले, तर काही खरे नाही. इतका तो डेंजर घाट होता. आणि अवजड वाहतूक खूप असल्यामुळे समोरचे ट्रक, पाठीमागचे ट्रक, खालून येणारी अवजड वाहने यांचा सर्वांचा अंदाज घेऊन, बारकाव्याने पुढे मागे बघत, आरशांमधून अंदाज घेत घेत गाडी चालवावी लागत होती. एका टर्नला तर एका स्ट्रोक मध्ये टर्न बसलाच नाही, तर थोडे रिव्हर्स घेऊन पुन्हा टर्न मारावा लागला.

असे काही टर्न होते जिथे गाडीच्या क्षमतेवर शंका निर्माण होत होती. पण देवाच्या कृपेने आम्ही सुखरूप पणे तो घाट उतरून खाली आलो. खाली आल्यानंतर आम्हाला दोन रस्ते लागले, तिथेच आम्ही थांबलो आणि पहिल्यांदा घटाघटा पाणी पिऊन चहा प्यायला टपरीवर गेलो.

त्यानंतर आम्ही तिथे चहा वाल्यांना विचारलं की कोण कोणते रस्ते कुठे कुठे जातात. तर मदुराई ला जाणार रस्ता हा डाव्या बाजूचा होता, आणि त्याच जंगलात एक आम्हाला Bannari Amman मंदिर दिसले बाहेरून मंदिर तर भव्य वाटले. त्यामुळे चौकशीसाठी चहावाल्यांना विचारलं की हे कोणते मंदिर आहे, तर तो आमच्याकडे शंकेने पाहायला लागला. तो म्हणाला की हे जगप्रसिद्ध Bannari Amman मंदिर आहे, आणि तुम्हाला कसं काय माहिती नाही.

इतके प्रसिद्ध मंदिर जंगलामध्ये भेटेल याची आम्हाला अपेक्षा नव्हती. आम्ही चहा पिऊन झाल्यानंतर जाऊन दर्शन घेतले. आणि तिथून मदुराईला पुढे निघालो. रात्र झाली होती, अंधार पडला होता, पूर्ण जंगलातून गाडी चालवताना नऊ-साडेनऊच्या दरम्यानला आम्हाला असं वाटायला लागलं की कधी एकदा हा सिंगल रस्ता संपतो आणि मोठा हायवे लागतो.

त्यानंतर अचानकच माझ्या लक्षात आलं की आपण एका मोठ्या ब्रिजच्या खालून क्रॉस होतोय. पुढे जाऊन थांबलो आणि मागे वळून पाहिलं तर वरून एक हायवे ब्रिज अंधारात दिसत होता. गुगलच्या मदतीने माहिती घेतली तर तो सालेम-कोची हा हायवे होता.

तितक्यात एक ट्रक येऊन आमच्या जवळ थांबला. त्यांच्याकडून माहिती विचारल्यानंतर त्यानेही त्याचे कन्फर्मेशन दिले की हा सरळ हायवे कोचीला जातो. आणि आम्ही रन टाईम मध्ये प्लॅन बनवला की मदुराईला न जाता डायरेक्ट आज कोचीला जाऊ आणि तिकडेच मुक्काम करू.

त्यानुसार आम्ही सरळ तिथेच त्या थोडा पुढे गेल्यानंतर जेवण केले आणि रात्री एक वाजता कोचीमध्ये पोहोचलो. वाटेत कोची च्या पुढे वाटेत जगप्रसिद्ध केरळ बॅकवॉटर आहे हे मला माहित होते. त्यामुळे कोचीत गेल्यानंतर असे वाटले की अजून कोणालाही झोप आली नाही थोडं पुढे जाऊ म्हणून आम्ही थोडं पुढे गेलो आणि रात्री दोन अडीचच्या दरम्यानला आम्ही जगप्रसिद्ध अशा केरळ मधील बॅकवॉटर आलेपी या ठिकाणी जाऊन मुक्काम केला.

अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस पूर्णपणे एडवेंचर आणि आश्चर्याने भरलेला असल्यामुळे आम्हाला खूप भीती, आनंद या सर्व भावनांचा एकाच दिवशी उपभोग घेता आला आणि देवाच्या कृपेने आम्ही सर्व सुखरूप आहोत. उद्याचा दिवस बॅकवॉटरसाठी…..

धन्यवाद!!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *