देवकुंड धबधबा ट्रेक माहिती (Devkund Waterfall Trek Guide in Marathi)

Hosted Open
6 Min Read
सह्याद्रीतील-स्वर्गाचे-दार-असं-का-म्हणतात_

सह्याद्रीतील स्वर्गाचे दार: देवकुंड धबधबा ट्रेक माहिती

ताम्हिणी घाट उतरल्यावर भिरा गावाजवळ असलेल्या भिरा धरणाजवळ वनात आहे.तिथे जाण्यासाठी भिरा धरणापासून साधारण 2तास वेळ लागतो.धबधबा जिथून खाली पडतो तिथे वर प्लस व्हॅली आहे.पावसाळ्यात तिथे जाणे थोडे कठीण आहे कारण जाताना दोन ओढे लागतात जे पार करणे कठीण आहे.पावसाळा संपल्यावर या ठिकाणी जाण्यास योग्य वेळ आहे.

सर्वार्थाने सुंदर गिर्यारोहणाचा अनुभव देणारी जागा म्हणजे ‘प्लस व्हॅली’. देवकुंड किंवा भिरा गावाच्या अलीकडे मुक्काम करता येतो. तसेच भिरा गावातून फक्त देवकुंड धबधबा एका दिवसात पाहून येता येईल. या भागात उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध असल्यानं उन्हाळ्यात हा ट्रेक करता येतो.

पुण्यापासून कोकणात उतरणाऱ्या ताम्हिणी घाटात, ताम्हिणी गावाच्या पुढे डोंगरवाडी जवळ घाटातच पर्यटकांसाठी एक चौथरा बांधलेला आहे. या चौथऱ्यापासूनच आपण दरीत उतरायला सुरुवात करतो. या ठिकाणी दोन दऱ्या एकमेकांना छेदत गेल्या आहेत, अवकाशातून तसेच या घाटातूनही बघितले असता तो आकार ‘+’ या चिन्हासारखा दिसतो. म्हणून या दरीला नाव ‘प्लस व्हॅली’ दिले गेले.

दरीत उतरण्यास सुरुवात केल्यावर ठिसूळ दगडांची मालिका लागते. उजवीकडे उंच कातळकडा ठेवत आपण पुढे मार्गक्रमण करतो. पट्टीच्या गिर्यारोहकांनी या कातळ कड्यावरही रोहणाचा सराव केलेला दिसून येतो. तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये आपण दरीत पोहोचतो. गर्द झाडांनी हा भाग नटलेला आहे. दगडांच्या कपाऱ्यांमधून वाहत आलेलं पाणी बऱ्याच ठिकाणी आढळून येतं.

उन्हाळ्यातही या ठिकाणी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असते. झाडीमधून उजवीकडे वळून आपण एका लहानशा डोहापाशी येतो. वाहतं आणि स्वच्छ पाणी असल्यानं पाण्याचा तळ स्पष्टपणे दिसतो. पाण्याच्या वाटेनं न जाता डोहाच्या डावीकडून झाडीतून आपण एका कड्यावर पोहोचतो. इथून खाली १०० फुटांचा एक रॅप्लिंगचा टप्पा आहे. योग्य त्या साधनांसह व प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच हा टप्पा उतरणं आवश्यक आहे. पाण्याच्या वेगामुळे दगडालाही कसे आकार प्राप्त होतात ते इथं पाहता येईल.

खाली उतरल्यावर आणखी एक पाण्याचा डोह नजरेस पडतो. या पाण्याच्या सान्निध्यामुळे हा टप्पा सुखावह वाटतो. इथून पुढे असाच एक रॅप्लिंगचा पॅच आहे. या ठिकाणाहून खाली पाहिलं असता एक कुंड दिसतं. हेच ते प्रसिद्ध देव कुंड.

आता आपण ज्या मार्गाने उतरणार तो मार्ग जलप्रपाताचा आहे. व्यवस्थित साधनं लावून उतरण्यास सुरुवात केल्यावर ४०-५० फुटांपर्यंत पायाला दगड लागतो, त्याच्या मदतीनं आपण हळूहळू खाली उतरतो. जवळजवळ १२५-१५० फुटांचा हा पुढचा टप्पा आपल्याला सरळ देवकुंडामध्ये उतरवतो. रॅपल करत असतानाही पाण्याची संततधार आपल्या शिरावर अभिषेक करीत असते. हवेतून दिसणारं खालील दृश्य इथे येऊनच पाहण्यात मजा आहे.

कुंडाच्या आजूबाजूला पावसाळ्याव्यतिरिक्त मुक्काम करता येतो. दोन्ही बाजूंनी अंगावर येणारे खोलगट कडे व मध्ये साठलेलं पाणी.ज्यांना आवड आहे अशांना कुंडात जलविहारही करता येईल. जर मुक्काम केला तर सकाळी लवकर उठून आवरून पुढे चालण्यास सुरुवात करावी. पाण्याच्या मधूनच प्रवाहमार्गातून चालत गेल्यास सप्तकुंडापाशी आपण येतो.

येथेही मुक्काम करता येईल. आजूबाजूची किर्र झाडी चालताना सुखावून जाते. या सरळ वाटेनं आपण एक-दीड तासात भिरा गावात पोहोचतो. रस्त्याने येताना आपण भिरा धरणाच्या बाजूनेच चालत असतो. उजवीकडे घनगड, कुंडलिका दरी लक्ष वेधून घेतात. भिरा गावात उतरल्याने आपण कोकणातील रायगड जिल्ह्यात प्रवेश करतो.

म्हणजेच पुणे जिल्ह्यातून प्लस व्हॅली मार्गे आपण कोकणात उतरतो. भिरा गावातून देवकुंडपर्यंतचा सोपा ट्रेक उन्हाळ्यापर्यंत करता येतो. रस्ता व्यवस्थित असल्यानं वाटाड्याशिवाय सुद्धा देवकुंडापर्यंत पोहोचता येते.

देवकुंड धबधबा कुठे आहे?

देवकुंड धबधबा हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील भिरा गावाजवळ, ताम्हिणी घाटाच्या पायथ्याशी वसलेला आहे. पुण्यापासून सुमारे 110 किमी अंतरावर आणि मुंबईहून 170 किमी अंतरावर हे ठिकाण ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी प्रसिद्ध आहे.

देवकुंड धबधब्यापर्यंत कसा जावे? (How to Reach Devkund Waterfall)

  • पुणे मार्ग: पुणे – ताम्हिणी घाट – विळे – पाटणूस – भिरा कॅंप – सावंतवाडी – देवकुंड
  • मुंबई मार्ग: मुंबई – पनवेल – खोपोली – पाली – भिरा – देवकुंड
  • ट्रेकचा सुरुवात बिंदू: भिरा धरणाजवळील भिरा गावापासून 2 तासांचा चालण्याचा ट्रेक.

देवकुंड धबधबा ट्रेकची वैशिष्ट्ये

  • ट्रेकचा स्तर: मध्यम (Moderate)
  • ट्रेक वेळ: 2 ते 2.5 तास (एक मार्ग)
  • एकूण अंतर: साधारण 6 किमी
  • सर्वोत्तम काळ: ऑक्टोबर ते फेब्रुवारी

देवकुंड धबधब्याचा निळसर रंग – नैसर्गिक सौंदर्य

देवकुंड धबधब्याचं पाणी उन्हाळ्यात आणि पावसाळ्यानंतर निळसर दिसतं. सूर्यप्रकाश आणि कुंडाच्या पृष्ठभागावरील खडक यामुळे हे नैसर्गिक सौंदर्य निर्माण होतं, जे फोटोग्राफर्ससाठी पर्वणी ठरतं.

प्लस व्हॅली – देवकुंडजवळील अजून एक रोमांचक ठिकाण

देवकुंडाच्या वरच्या बाजूस असलेली प्लस व्हॅली (Plus Valley) ही ‘+’ चिन्हासारखी दिसणारी दरी आहे. येथे गिर्यारोहक आणि ऍडव्हेंचर प्रेमींसाठी रॅपलिंग आणि ट्रेकिंगचा अनोखा अनुभव मिळतो.

देवकुंड ट्रेक करताना आवश्यक सूचना

  • पावसाळ्यात टाळा: जोरदार पावसात मार्गावर दोन ओढे पार करावे लागतात, जे धोकादायक ठरू शकतात.
  • परवाना आवश्यक: अलीकडे वनविभागाने परवाना सक्तीचा केला आहे. अधिकृत वाटाड्या घेणे आवश्यक.
  • स्वच्छता राखा: कृपया प्लास्टिक आणि कचरा येथे फेकू नका.
  • मोबाईल नेटवर्क: फक्त भिरा गावात मर्यादित नेटवर्क उपलब्ध आहे.

देवकुंडधबधब्यासह इतर ठिकाणांचा आनंद घ्या

  • सप्तकुंड धबधबा: देवकुंडपासून पुढे चालत गेल्यास सप्तकुंड नावाचे सात छोटे धबधबे लागतात.
  • घनगड किल्ला ट्रेक: भिरा गावातून सुरू होणारा हा ट्रेकही साहसी अनुभव देतो.

देवकुंडमध्ये मुक्काम करता येतो का?

पावसाळ्याच्या बाहेरच्या काळात (ऑक्टोबर ते फेब्रुवारी) देवकुंड परिसरात कॅम्पिंग करता येते. मात्र स्थानिक प्रशासनाचे नियम व मार्गदर्शक यांचं पालन करणं आवश्यक आहे.

देवकुंड ट्रेकसाठी काय सोबत न्यावं?

  • चांगले ट्रेकिंग शूज
  • पाण्याची बाटली
  • स्नॅक्स आणि एनर्जी बार्स
  • रेनकोट (पावसाळ्यात)
  • कचऱ्याचा डबा/बॅग (आपला कचरा परत नेण्यासाठी)

Thank you…

Source: स्वर्गाहुन सुंदर आपलं कोकण

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *