पुणे ते कन्याकुमारी रोड ट्रिप: ९ दिवस, ४५०० किलोमीटर | Pune to Kanyakumari Road Trip: 9 days, 4500 kms

Hosted Open
13 Min Read

पुणे ते कन्याकुमारी ४५०० km, ९ दिवसांची रोड ट्रिप

४ मित्र, एक कार, काहीही न ठरवता केलेली ९ दिवसांची पुणे ते कन्याकुमारी ट्रिप, आणि ती पूर्ण करताना आलेले चांगले वाईट अनुभव आणि कश्यापद्धतीने आमची पूर्ण ट्रिप बदलत गेली हे सर्व आपण या ब्लॉग मध्ये पाहू. त्याच बरोबर संपूर्ण ट्रिप चा रोड मॅप सुद्धा पाहू.

पुण्यापासून ते कन्याकुमारी, रामेश्वरम अशा विविध पर्यटन स्थळांचा प्रवास करणे हे एका धाडसापेक्षा काही कमी नव्हते. प्रत्येक किलोमीटर जसजसा पुढे जाईन तस-तसा मी निसर्ग आणि त्याची किमया, रस्ते, लोकं, खाद्यपदार्थ हे सर्व पाहून आणि अनुभवून आश्चर्य चकित झालोय.

या प्रवासातील सर्वात आश्चर्यकारक पैलूंपैकी एक पैलू म्हणजे रस्ते आणि त्यांची निखळ सुंदरता, ज्यामुळे मला गाडी चालवताना कधीही थकल्यासारखे वाटले नाही. शिवाय, निसर्गाने मला दिलेले धक्के काही कमी नव्हते. जंगलाच्या मध्यभागीच अचानक दिसलेले धबधबे असो, समुद्रावरील मनमोहक सूर्यास्त असो, किंवा रस्त्याच्या कडेला बहरलेल्या कॉफी आणि रबर च्या बागा असोत, किंवा उंच घनदाट चंदनाची जंगले असोत, निसर्गाने मला सतत त्याच्या अमर्याद सौंदर्याची आणि जाणीव करून दिली आहे.

हा प्रवास सह्याद्रीतील रौद्र मुसळधार पाउसातून सुरु झाला आणि कूर्ग, म्हैसूर च्या थंडीतून कन्याकुमारी, रामेश्वरम च्या भाजून काढणाऱ्या कडक उन्हापर्यंत गेला.

Route: पुणे – गोवा – गोकर्ण – होन्नावर – मुरुडेश्वर – उडुपी – मंगलोर – संपजे – कूर्ग – म्हैसूर – सत्यमंगलम टायगर फॉरेस्ट – कोईमतूर – पल्लकड – कोची – अल्लेपी – तिरुअनंतपुरम – कन्याकुमारी – रामेश्वरम – धनुषकोडी – मदुराई – बेंगलोर – पुणे

मी व माझे ऑफिस मधील ३ मित्र, असे चौघांनी मिळून २ – ३ दिवस कुठेतरी फिरायला जाऊ असा ठरवलं होत. आणि जुलै महिना आणि मुसळधार पाऊस असतानाही आम्ही गोकर्ण, मुरुडेश्वर, इथे जायचा प्लॅन फिक्स केला. पण काही चांगल्या गोष्टी घडल्या आणि आमचा प्लॅन ९ दिवसांवर गेला.

१) पहिला दिवस: पुणे ते गोवा – पूर्ण वाचा

आणि आम्ही ठरल्याप्रमाणे शुक्रवारी रात्री १० – ११ च्या दरम्यान पुण्यातून निघालो. आमच्या मध्ये दीपक सर यांच्या आग्रहास्तव गोव्यात मुक्काम करायचा, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून गोकर्ण ला जायचे असा प्लॅन झाला. अतिशय मुसळधार पाऊस असल्याने आम्हाला गोव्यात पोचायला शनिवारचे सकाळी ९ वाजले आणि आमचा प्लॅन पूर्ण फेल झाला. रात्रभर ड्रायविंग मुळे रूम वर जाऊन जे झोपलो ते थेट संध्याकाळीच उठलो. संध्याकाळी सुद्धा पाऊस सुरूच असल्याने बाहेर जात आले नाही. त्यामुळे रविवारी सकाळी गोकर्ण ला जायचं असा निर्णय झाला.

मार्ग: पुणे – सातारा – कोल्हापूर – निपाणी – आजरा – आंबोली – सावंतवाडी – गोवा
अंतर: ५७० km
टीप: सध्या कोकणात उतरणाऱ्या बऱ्याच रस्त्यांची रुंदीकरणाची कामे सुरु आहेत, त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

goa highway

२) दिवस दुसरा: गोवा ते मंगलोर – पूर्ण वाचा

रविवारी सकाळी लवकर उठून आम्ही गोकर्णच्या दिशेने निघालो. गोवा ते गोकर्ण अंतर १०० km होते. आज चा प्लॅन असा झाला कि गोकर्ण, मुरुडेश्वर, होन्नावर, हे पाहून उडुपीला मुक्काम करायचा. पण प्रचंड पाऊसामुळे ठरल्याप्रमाणे काहीही होत न्हवते. आम्ही समुद्रकिनाऱ्याच्या सुंदर रस्त्यांवरून आनंदात गाडी चालवत प्रवास करत होतो. कुठेही पोचण्याची घाई न्हवती. मध्ये मध्ये उंच सागवानचे जंगल पण लागत होते.

काही वेळाने गोकर्णाला पोचलो. पाऊस असल्यामुळे गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन लवकर झाले. त्यानंतर थेट आम्ही मुरुडेश्वरला गेलो. इथेही प्रचंड पाऊस आणि वारा होता. पण देवाचे दर्शन घेऊन प्रसन्न वाटले. आणि आम्ही इथून थेट उडुपीला गेलो आणि तिथे जाऊन ठरवले कि मंगलोर ला जाऊया मुक्कामाला कारण दुसऱ्या दिवशीचा प्रवास थोडा कमी होईल. हे आम्ही उडुपीत पोचायच्या जस्ट ३० मिनिटे आधी ठरले कि आपण म्हैसूर पण बघू, कारण म्हैसूर वरून एक दिवसात पुण्याला जाता येईल. त्यामुळे आम्ही रविवारी रात्रीच्या मुक्कामासाठी मंगलोर मध्ये गेलो. मंगलोर शहर खूपच सुंदर आहे. मोठमोठे बंदर आणि जल वाहतुकीचा व्यापार इथून चालतो.

मार्ग: गोवा – गोकर्ण – मुरुडेश्वर – उडुपी – मंगलोर
अंतर: ३६५ km
टीप: पूर्ण रास्ता हा NH ६६ (४ लेन) आहे. एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर असा हा सुंदर रास्ता आहे. पण अचानक येणाऱ्या डायव्हर्जन मुळे गाडी काळजीपूर्वक चालवावी.

goa to manglore

३) दिवस तिसरा: मंगलोर ते म्हैसूर – पूर्ण वाचा

आज सोमवार, मंगलोर मध्ये सकाळी लवकर उठून आवरले, आणि पंक्चर झालेले चाक दुरुस्त करून घेतले. आम्ही अजूनही समुद्रकिनारीच असल्याने पाऊस होताच, पण तीव्रता थोडी कमी होती. आज म्हैसूर ला जाऊन मुक्कामाचा आणि दुसऱ्या दिवशी म्हैसूर फिरायचा प्लॅन होता.

मी म्हैसूरला जाताना वाटेत कोणकोणती प्रसिद्ध ठिकाणे लागतात याचा थोडा शोध घेतला आणि आम्हाला बरेच ऑप्शन मिळाले. त्यापैकी आम्ही एक रूट फिक्स केला आणि नाश्ता करून वाटेला लागलो. satellite map मुळे आजचा प्रवास भयंकर adventurous होणार होता याची कल्पना आधीच आली होती.

जसजसे आम्ही पूर्वेला जात डोंगर चढत होतो तसतसा पाऊस कमी होऊन धुक्याचे प्रमाण वाढत होते, कारण आम्ही समुद्रसपाटीपासून उंचावर निघालो होतो. मंगलोर ते म्हैसूर हा रास्ता खूपच सुंदर आहे. जाताजाता आम्ही संपजे (रबर उत्पादनासाठी प्रसिद्ध) पाहिले, कूर्ग पाहिले. कूर्ग हे कॉफी उत्पादनासाठी जगप्रसिध्द आहे. आणि याला भारतातील स्कॉटलँड असेही म्हणतात. तिथून पुढे निघालो आणि संध्याकाळी ८ वाजता म्हैसूर ला पोचलो.

मार्ग: मंगलोर – संपजे – कूर्ग – म्हैसूर
अंतर: २६० km
टीप: मंगलोर ते म्हैसूर हा रस्ता सुंदर आहे, पण संपूर्ण रस्ता सिंगल लेन व घाट आणि वळणांचा आहे, त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ लागतो.

manglore to mysuru

४) दिवस चौथा: म्हैसूर दर्शनअल्लेपी पर्यंतचा थरारक प्रवास – पूर्ण वाचा

म्हैसूरचे वातावरण खूपच प्रसन्न होते, पाऊस अजिबात नव्हता आणि थोडी थंडी जाणवत होती. शुक्रवार पासून सतत पाऊसात असल्याने आम्हाला हे वातावरण खूपच भारी वाटन्याचे मुख्य कारण म्हणजे छत्री आणि रेनकोट पासून सुटका.

काल रात्रीच आम्ही प्लॅन करून ठेवल्याप्रमाणे सकाळी लवकर आम्ही श्री चांमुडेश्वरी देवीच्या दर्शनाला गेलो. तिथे तर खूपच शांत आणि भक्तिपूर्ण वातावरण होते, त्यानंतर नंदी दर्शन, म्हैसूर पॅलेस दर्शन, चर्च बघितले, थोडी मार्केट मध्ये खरेदी केली आणि पुढच्या प्रवासाला लागलो. घनदाट सत्यमंगलम टायगर फॉरेस्ट आणि हत्ती पाहून आम्ही पुढे आलो. आज आमचे ठरलं होते कि मदुराई मध्ये जाऊन मुक्काम करू पण काही कारणास्तव आम्ही थेट पुन्हा समुद्र किनारी येऊन पोचलो, अलेप्पी केरळ येथे. हा प्रवास सुद्धा न भूतो न भविष्यती असा होता. या सर्व गोष्टी तुम्ही डिटेलमध्ये म्हैसूर ते अलेप्पी या ब्लॉग मध्ये वाचू शकता.

मार्ग: म्हैसूर – सत्यमंगलम फॉरेस्ट – धिमबाम – बेन्नारी – एरोडे – कोईमतूर – पल्लकड – कोची – अल्लेपी
अंतर: ६२४ km
टीप: जर म्हैसूर वरून अलेप्पी ला जात असाल तर दिवस असताना प्रवास करावा. कारण संध्याकाळी ऊटी च्या आसपासचे सर्व नॅशनल फॉरेस्ट मध्ये एन्ट्री बंद असते. आणि म्हैसूर ते कोईमतूर असा डायरेक्ट रास्ता आहे त्या रस्त्याने प्रवास करावा.

mhaisur to kerla

kerla

५) दिवस पाचवा: अलेप्पी – श्री पद्मनाभस्वामी मंदिर – कन्याकुमारी – पूर्ण वाचा

काल रात्री उशीर झाल्यामुळे अलेप्पी मधेच NH ६६ च्या कडेला रूम घेऊन झोपलो होतो. सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून १० वाजता आम्ही जगप्रसिद्ध अलेप्पी बॅकवॉटर जवळ बोटिंग साठी पोचलो.

गाडी पार्क करून आम्ही सुंदर निसर्गरम्य अश्या अलेप्पी च्या बॅकवॉटर मधून फिरत होतो, म्हणजे बोट राइड करत होतो. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात बॅकवॉटर पहिले, आणि त्यामुळे निर्माण झालेली छोटी छोटी बेटे आणि त्यावरील घरे पाहून आम्ही अवाक झालो होतो.

अलेप्पी फिरून झाल्यावर आम्ही श्री पद्मनाभसवामी यांच्या दर्शनाला केरळची राजधानी तिरुवनंतपूरम ला निघालो. संध्याकाळी ७ वाजता तिथे पोचलो, देवाचे दर्शन घेऊन अतिशय प्रसन्न वाटले.

त्यानंतर आमचा आजचा मुक्काम कन्याकुमारीला होता, त्याप्रमाणे आम्ही पुढे कन्याकुमारीला मार्गस्थ झालो आणि रात्री १ वाजता कन्याकुमारी इथे पोचलो.

मार्ग: अलेप्पी – तिरुवनंतपूरम – कन्याकुमारी
अंतर: २६० km
टीप: हा रास्ता NH ६६ असून याचे अलेप्पी ते तिरुवनंतपूरम टप्याचे काम सुरु आहे. त्यामुळे खूप वेळ लागतो. त्याच सोबत समुद्राला लागून हा रोड जात असल्याने केरळ राज्यातील मुख्य वाहतूक या रस्त्यावरूनच चालते. त्यामुळे ट्राफिक पण जास्त आहे.

Shree Padmanabhswami Temple

Shree Padmanabhswami temple

६) दिवस सहावा: कन्याकुमारी ते रामेश्वरम – पूर्ण वाचा

आज आम्ही सकाळी नाश्ता करून कन्याकुमारी फिरायला बाहेर पडलो, स्वामी विवेकानंद स्मारक, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, आणि अरबी समुद्र यांचा त्रिवेणी संगम पहिला. मंदिर पहिले आणि लोकल मार्केट मधून थोडी खरेदी केली.

संध्याकाळी ५ वाजता आम्ही चेक आउट करून रामेश्वरम ला मार्गस्थ झालो. ३१० km पैकी सुरुवातीचे ९० km च्या आसपास चा रास्ता हा कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर या राष्ट्रीय महामार्गावरून होता. आणि विश्वास ठेवा.. इतका सुंदर रस्ता पाहून आम्ही सर्वजण अवाक झालो.

प्रवासाचा आनंद घेत रात्री १२ वाजता रामेश्वरम येथे पोचलो.

मार्ग: कन्याकुमारी – तिरुनेलवेल्ली – रामेश्वरम
अंतर: ३१० km
टीप: हा रास्ता खूप सुंदर आहे, आणि दिवसा प्रवास करण्याचा प्रयत्न करा म्हणजे निसर्ग पाहता येईल. कन्याकुमारी ते रामेश्वर अशी बस सेवा पण आहे.

Kanyakumari

Kanyakumari to Rameshwaram

७) दिवस सातवा: रामेश्वरम, धनुषकोडी आणि मदुराई चा प्रवास – पूर्ण वाचा

सकाळी पहिल्यांदा देवाचे दर्शन घ्यायला रामनाथस्वामी मंदिरात गेलो. इथे उन्हाची तीव्रता जास्त होती. एक ते दीड तासानंतर दर्शन झाले. दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटते. या मंदिरात खूप सकारात्मक ऊर्जा आहे. याच मंदिरात जगातील सर्वात लांब कॉरिडॉर सुद्धा आहे. तो बघून झाल्यावर आम्ही थेट रूम वर गेलो, तिकडून चेक आऊट करून गाडी घेऊन थेट भारताच्या सर्वात शेवटच्या टोकाला म्हणजेच धनुष्कोडीला गेलो. इथून च प्रभू श्री राम यांनी रामसेतू बांधला होता. इथे बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांचा संगम आहे.

हे ठिकाण खूप भारावून सोडणारे आहे. इथे खूप पर्यटक वर्षभर येत असतात. इथून आम्ही संध्याकाळी पुन्हा रामेश्वरम ला जाऊन तिथून मदुराई ला निघालो. रात्री १ वाजता मदुराईत पोचलो.

मार्ग: रामेश्वरम – मदुराई (उत्तम प्रकारचा सिंगल रोड आहे, ८० च्या स्पीड ने क्रूझ करू शकतो.)
अंतर: १८० KM

Rameshwaram mandir

 

८) दिवस आठवा: मदुराई (दर्शन) आणि पुण्याला प्रस्थान – पूर्ण वाचा

आज सकाळी मी लवकर उठून एकटाच मंदिरात जाऊन आलो, त्यानंतर सर्वांसोबत पुन्हा दर्शनाला गेलो. दर्शन खूप सुंदर झाले. मदुराईचे मीनाक्षी मंदिर हे खूप जुने असून त्याचे बांधकाम लक्षवेधी आहे. मंदिराचे उंच गोपुरम आणि त्यावरील कोरीव काम लक्षणीय आहे. मंदिर दर्शन वगैरे करून दुपारी २ ला रूम वर आलो. आज आमचा प्लॅन होता कि ४०० km असलेल्या बेंगलोर ला जाऊन मुक्काम करायचा, पण सेम पहिल्या दिवसाप्रमाणे माझ्या पुढाकाराने बंगलोरला न थांबता सलग २४ तास गाडी चालवायचा आणि पुण्याला पोचायला प्लॅन नक्की झाला.

त्याप्रमाणे आम्ही संध्याकाळी ५ वाजता मदुराई मधून निघालो आणि सलग २४ तास गाडी चालवून दुसऱ्यादिवशी कोल्हापूरमध्ये माझ्या घरी नाश्त्यासाठी थांबून संध्याकाळी ५. ३० ला आम्ही पुण्यात सुखरूप पोचलो. (या २४ तासामध्ये आम्ही चहा व जेवणाचे ब्रेक घेतले होते).

madurai temple

तर अश्या प्रकारे आमची ९ दिवसांची न भूतो न भविष्यती अशी ट्रिप पार पडली.

पुणे ते कन्याकुमारी संपूर्ण ट्रिप In Short:

१) शुक्रवारी रात्री १० ला पुण्यातून निघालो. दुसऱ्यादिवशी शनिवारी सकाळी ९ वाजता गोवा येथे पोचलो.

२) शनिवारी पूर्ण दिवस अराम केला आणि संध्याकाळी पाउसातच बीच आणि चर्च बघून आलो.

३) रविवारी सकाळी ९ वाजता गोव्यातून निघून गोकर्ण, मुरुडेश्वर, उडुपी, करून रात्री मंगलोर ला मुक्काम केला.

४) सोमवारी सकाळी मंगलोर मधून निघून संपजे, कूर्ग, करत म्हैसूर ला पोचलो.

५) मंगळवारी म्हैसूर बघून संध्याकाळी तिथून निघून बुधवारी पहाटे ४ वाजता आलेप्पी ला मुक्कामाला पोचलो.

६) बुधवारी अलेप्पी बॅकवॉटर बघून तिथून तिरुअनंतपुरम ला गेलो, श्री पद्मनाभस्वामींचे दर्शन घेऊन कन्याकुमारी ला जाऊन मुक्काम केला.

७) गुरुवारी पूर्ण कन्याकुमारी फिरून रामेश्वरम ला पोचलो आणि तिथे मुक्काम केला.

८) शुक्रवारी रामेश्वरम, धनुषकोडी बघून मदुराई ला पोचलो.

९) शनिवारी मदुराईचे मंदिर बघून संध्याकाळी ५ ला निघालो आणि दुसऱ्या दिवशी रविवारी संध्याकाळी ५.३० ला पुण्याला पोचलो.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *