हंपी – शिल्प, इतिहास आणि आश्चर्याने नटलेली नागरी | Hampi

Marathi Explorer
4 Min Read
Cr - Jayen Mistry

हंपी | Hampi –

दगड! हो फक्त दगड एखादी गोष्ट नयनरम्य बनवू शकतात हे अनुभवायचं असेल तर हंपीला भेटू द्या. हरेक ठिकाणी विविध आकारात दिसणारे हे दगड हेच हंपीचं सौंदर्य आहे. त्या दगडांना बघायचं नाही, भेटायचं. मिठी मारायची! याच दगडी प्राचीन सौंदर्याच्या आपण आपोआप प्रेमात पडत जातो. इथे जितका जास्त वेळ घालवू तितकं इथे रुळत जाऊ यात दुमत नसावं!

हरिहर आणि बुक्क या दोन भावांनी हरिहरच्या नेतृत्वाखाली विजयनगर राज्याची स्थापना करत तुगंभद्रेच्या दक्षिण तटावर वसलेल्या हंपीला आपल्या राजधानीचे शहर म्हणून निवडले. रामायणातल्या वानरांच्या राजाची, सुग्रीवाची किष्किंधा नगरी ती हीच. सीतेच्या शोधात निघालेल्या प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऋष्यश्रुंग, मातंग, अंजना, माल्यवंत आणि हेमकूट या पाच टेकड्यांच्या कुशीत वसलेली ही हंपी. १३ व्या शतकात स्थापन झालेल्या विजयनगर साम्राज्याचा प्रवास संगम वंशाकडून पुढे चौदाव्या शतकात साळूव, तुळूव पर्यंत येत पंधराव्या शतकात कृष्णदेवरायापर्यंत झाला आणि विजयनगर खऱ्या अर्थाने भरभराटीला आले. १५ व्या शतकात या राजधानीत आलेल्या पर्शियन राजदूताने तिचे वर्णन लिहून ठेवले आहे. तो म्हणतो कि आजपर्यंत कधी कल्पना केली नाही अशी आणि डोळ्यांनी पाहिलीही नाही अशी ही नगरी. सगळ्या जगात तिला तोड नसावी.अतिशय सुंदर, प्रशस्त रस्ते, भव्य देवळे, धर्मशाळा, किल्ले, प्रंचड मोठे हमामखाने, कालवे, हस्तीशाळा, घोड्यांचे तबेले, देखणा आणि मालाने तुडुंब भरलेला बाजार, कोरीव कामाचे स्तंभ यांनी नटविलेले हे साम्राज्य.कस्तुरी, हिरे, मोती, माणके, सिल्क, जर, घोडे अशा अनेक वस्तूंची खरेदी विक्री येथे केली जात असे.स्थापत्य, सुबत्ता, चित्रकला, ग्रंथसंपदा, सामरिक शक्ति सगळ्याच स्तरांवर विजयनगर वैभवाच्या शिखरावर होते. कृष्णदेवराय इतका पराक्रमी योद्धा होता की  त्याच्या वाढत्या ताकदीने इतर राजे त्याला रोखायचं कसं या चिंतेत होते. तिथे काय नव्हतं? चार लाखापेक्षा जास्त खडं सैन्य, घोड्यांचे बाजार, हिऱ्या- मोत्यांच्या पेठा, पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या सर्व वस्तू येथल्या बाजारात मिळतात, अशी याची ख्याती होती. आकाशाला भिडणारी गोपूरं, डोळ्याचे पारणे फेडणारे स्थापत्यशास्त्र, अतिशय सुंदर, प्रशस्त रस्ते, भव्य देवळे, धर्मशाळा, किल्ले, प्रचंड मोठे हमामखाने, कालवे, हस्तीशाळा. एकेकाळी या साम्राज्यातून सोन्याचा धूर निघत असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही. पुढे तालिकोटच्या लढाईत जरी विजयनगर साम्राज्याचा अंत झाला असला तरी आजही हंपी तितक्याच ताकदीने सतत तीन शतके मुस्लिम आक्रमणांपासून दक्षिणेला वाचवणाऱ्या या हिंदू साम्राज्याच्या देदीप्यमान यशाची साक्ष देत आहे.

याच विजयनगरातील शिल्पे मंदिरे वास्तू आजही तत्कालीन एवढ्या मोठ्या साम्राज्याचा इतिहास सांगायचा प्रयत्न करत असतात परंतु ते कधी जाणून घेण्याचा आपला प्रयत्न कधीच नसतो त्यामुळे हंपीमध्ये जेव्हा जाल तेव्हा तेथील इतिहास तत्कालीन राजकीय परिस्थिती तसेच तेथील मंदिरे आणि त्यावरील शिल्पे हे नक्कीच खुणावतील गोष्टी सांगतील. आता हे सारे शोधायचे हे भग्नावशेषातून. मात्र कल्पनाशक्ती चांगली असेल तर आजही कल्पनेतून हे वैभव सहज पाहता येते. आता केवळ शिळा होऊन राहिलेल्या या ठिकाणी हिंडणे म्हणजे गतवैभवाच्या खुणा शोधत केलेला शांत प्रवास. बहुतेक महत्त्वाच्या इमारती दोन भागात आहेत. रॉयल सेंटर आणि धार्मिक सेंटर. भग्नावशेषही या वैभवाचा आरसा दाखविण्यास पुरेसे आहेत. कितीही वेळा येथे भेट दिली तरी दरवेळी कांहीतरी नवे गवसतेच. येथे असलेल्या प्रत्येक अवशेषाची एक कथा आहे. दगडातील रथ, विठ्ठल मंदिर, राजाचा महाल, राणीचा हमामखाना, कमल महाल, पुष्कर्णी, हजराराम मंदिर, विरूपाक्ष मंदिर, लक्ष्मी नरसिंह मंदिर, गणेश प्रतिमा यांचे दर्शन मनाला हळवे करणारे.येथील विठ्ठल मंदिरात म्युझिकल पिलर्स म्हणजे संगीताचे स्वर उमटणारे दगडी खांब आहेत.कृष्ण मंदिरावर तर अक्षरशः कृष्णदेवराया सहित सैन्य ओरिसाच्या गजपतीचा पराभव करून विजयनगरामधे प्रवेश करतानाचे शिल्प कोरलेले आहे. येथील हजारा राम मंदिर म्हणजे अक्षरशः रामायणा मधील सगळ्या शिल्पांचा पट आहे.

कृष्णदेवराया सारखा महान सम्राट याच विजयनगर साम्राज्यातला महान राजा याच्याबद्दल नक्कीच शाळेमध्ये शिकवले गेले पाहिजे. फार फार तर एक पॅराग्राफ किंवा दोन ओळी यामध्ये याच्याबद्दल उल्लेख येतो आणि गोष्टी संपतात. याच्या काळात अक्षरशः विजयनगर एवढे प्रसिध्द झाले होते की दोमिंगुश पाईश आणि फेर्नाव नुनिष यांच्या समकालीन वर्णनामधून तत्कालीन विजयनगर साम्राज्य किती मोठे होते तसेच कृष्ण देवराया याची रोजची जीवनपध्दती कशी होती ही सगळी वर्णने केली आहेत. परंतु याबद्दल सांगणार कोण कारण आपल्याला तेथे जाऊनही जाणून घ्यायचे नसते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *