काश्मीर ते कन्याकुमारी रोड ट्रिप प्लॅनिंग । In-depth Kashmir to Kanyakumari road trip planning.
आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. भारतात उत्तरेकडील हिमालयापासून ते दक्षिणेकडील हिंदमहासागरापर्यंत, आणि पूर्वेकडील आसाम पासून पश्चिमेकडील अरबी समुद्रापर्यंत अनेक पर्यटन स्थळे आहेत. या ट्रिप मध्ये तुम्ही… हिमालया पासून कन्याकुमारी पर्यंत, बर्फातील थंडी पासून कडक उन्हातील समुद्रकाठापर्यंत, उत्तरेकडील देवदारच्या जंगलांपासून दक्षिणेकडील सागवान, चंदन, आणि निलगिरीच्या जंगलापर्यंत, सरळ हायवे पासून वळणदार रस्त्यांपर्यंत, व्याघ्रप्रकल्पां पासून ते हजारो वर्ष जुन्या आणि आपली संस्कृती जपणाऱ्या मंदिरांपर्यंत आयुष्यभरासाठी असंख्य अनुभव घेऊन पुन्हा घरी याला याची मला खात्री आहे.
आपल्याला लहानपासूनच एक फिरण्याची दांडगी हौस असते. कारण आपण भारतातील हि निरनिराळी पर्यटन स्थळे TV वर पाहिलेली असतात. पण लहानपणी शाळा आणि कॉलेज आणि त्यानंतर नोकरी किंवा व्यवसायाच्या व्यूहचक्रामधून हे स्वप्न मधून मधून डोके वर काढत असते.
तर या ब्लॉग मध्ये आपण भारत देशाच्या उत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर राज्यापासून ते दक्षिणेकडील कन्याकुमारी पर्यंत रोड ने कार चालवत प्रवास कसा करायचा हे पाहूया.
काश्मीर ते कन्याकुमारी रोड ट्रिप प्रवासाची रूपरेषा:
हि ट्रिप काश्मीरपासून सुरू होते आणि कन्याकुमारी येथे संपते. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे.
दिवस 1: श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर)
पहिल्या दिवशी तुम्ही श्रीनगर ला पोचाल. आगमनानंतर तुम्ही थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी लोकल मार्केट आणि आसपासच्या परिसर फिरू शकता. त्याच सोबत गाडीला उद्यापासून सुरु होणाऱ्या ट्रिप साठी थोडा आधीच तयार करू शकता.
दिवस 2: श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर)
दुसऱ्या दिवशी तुम्ही शंकराचार्य हिल च्या नॉर्मल ट्रेकला जाऊ शकता. आणि त्यानंतर डल लेक येथे शिकारा राइडचा आनंद घेऊशकता. त्यानंतर नेहरू पार्कला भेट द्या. इथे तुम्ही रंगीबेरंगी काश्मिरी पोशाखांमध्ये फोटो सुद्धा काढू शकता. त्याचसोबत संध्याकाळी शालीमार आणि निशात या काश्मिर च्या प्रसिद्ध बागांना भेट देता येईल.जर ट्यूलिप सीझन दरम्यान तुम्ही काश्मीर मध्ये असाल तर ट्यूलिप गार्डनला देखील भेट देता येईल.
दिवस 3: श्रीनगर – गुलमर्ग – श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर)
तिसऱ्या दिवशी तुम्ही थोडा दूर असलेल्या गुलमर्गला भेट देऊ शकता. इथे प्रसिद्ध गोंडोला राइडचा आनंद घेता येईल. त्यानंतर इथे तुम्हाला सर्वात भारी म्हणजेच बर्फात खेळण्याचा आनंद घेता येईल, स्कीइंग आणि स्नोबोर्डिंग या सारखे खेळ देखील खेळू शकता. श्रीनगरला परत आल्यानंतर शॉपिंगसाठी थोडा मोकळा वेळ मार्केट फिरून शॉपिंग करता येईल.
टीप: गुलमर्ग गोंडोला राइडसाठी स्लॉटची उपलब्धता जम्मू आणि काश्मीर केबल कार कॉर्पोरेशनद्वारे ठरवली जाते. त्यामुळे तुम्ही याची आधीच चोकशी करून घ्यावी.
दिवस 4: श्रीनगर – पहलगाम (जम्मू आणि काश्मीर)
आज पहलगाम च्या गावात स्वतःला निसर्गाच्या सानिध्यात आहोत असे वाटेल. इथे जाताना वाटेत तुम्ही पंपोर येथील प्रसिद्ध केशरची शेती पाहू शकता. पहलगामला पोहोचल्यावर तुम्ही प्रसिद्ध बेताब व्हॅली पाहून इथे फोटो काढू शकता. बेताब व्हॅली हि १९८३ साली च्या सनी देओल आणि अमृता सिंग यांच्या मूवी मुले फेमस झाली आहे. दिवसभर हे सर्व झाल्यानंतर कदाचित संध्याकाळी पहलगामच्या मॉल रोडवर फिरायला मोकळा वेळ मिळू शकतो. कारण इथले वातावरण खूपच मॅटर करते.
दिवस 5: पहलगाम – जम्मू (जम्मू आणि काश्मीर)
पाचव्या दिवशी तुम्ही जम्मूला जाऊन ते हि एक्सप्लोर करा. वाटेत काश्मिरी क्रिकेट बॅट फॅक्टरी ला भेट देता येईल. जम्मूला एकदाचे पोचल्यानंतर आराम करायला आणि सभोवतालचा परिसर बघायला बराच मोकळा वेळ मिळतो.
दिवस 6: जम्मू – धर्मशाला (हिमाचल प्रदेश)
आज तुम्ही सकाळी लवकर उठून थोडं जम्मू फिरून लगेच धर्मशाळेकडे जाऊ शकता. हिमालयाच्या कुशीत असलेल्या, देवदाराच्या जंगलांनी वेढलेले एक डोंगराळ शहर म्हणून धर्मशाला ओळखले जाते. इथे पोचल्यानंतर विश्रांतीसाठी आणि आसपास फिरण्यासाठी बऱ्यापैकी थोडा वेळ मिळेल.
दिवस 7: धर्मशाळा (हिमाचल प्रदेश)
काल धर्मशाळेत पोचल्याने आज तुम्ही सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन बाहेर पडू शकता. धर्मशाला हे हिमाचल प्रदेश मधील एक शहर आहे. हे जिल्ह्याचे मुख्यालयही आहे. धर्मशाला राज्याची हिवाळी राजधानीसुद्धा आहे.
धर्मशाला हे अतिशय शांत आणि निसर्गरम्य शहर आहे. येथे अनेक मंदिरे, गुरुद्वारे आणि मठ आहेत. दलाई लामा यांचे निवासस्थान देखील धर्मशालामध्ये आहे.
धर्मशाला हिमालयाच्या कुशीत बसल्याने, ट्रेकिंग आणि इतर धाडसी खेळांसाठीही लोकप्रिय ठिकाण आहे. येथे अनेक सुंदर ट्रेकिंग ट्रेल्स आहेत जे तुम्हाला हिमालयाच्या अविश्वसनीय सुंदर नजरे दाखवतात.
दिवस 8: धर्मशाळा – अमृतसर (पंजाब)
धर्मशाळा पाहिल्यानंतर तुम्ही अमृतसरला जाऊ शकता. अमृतसरला संध्याकाळी मार्केट फिरायला जाऊन येऊ शकता.
दिवस 9: अमृतसर (पंजाब)
आज तुमच्याकडे खरेदीसाठी आणि फिरण्यासाठी पूर्णपणे मोकळा वेळ असेल. अमृतसरमध्ये पर्यटकांसाठी अनेक ठिकाणे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे सुवर्ण मंदिर, जे शिख धर्माचे सर्वात पवित्र स्थळ आहे. त्याच्यासोबतच जलियांवाला बाग आहे, जिथे ब्रिटिशांनी केलेल्या नरसंहाराची आठवण होते. त्याचसोबत वाघ बॉर्डर इथून जवळच आहे तिथेही तुम्ही भेट देऊ शकता.
दिवस 10: अमृतसर – चंदीगड (पंजाब)
आज तुम्ही अमृतसर मधून निघून चंदीगडकडे जाऊ शकता. चंदीगड हे भारतातील पहिले नियोजित शहर आहे. प्रसिद्ध फ्रेंच वास्तुविशारद Le Corbusier यांनी या शहराचे डिझाइन केले आहे. चंदीगड ला पोचून तुम्ही विश्रांती घेऊन तुम्ही नेहमीप्रमाणे बाहेर पडू शकता. लोकल मार्केट मध्ये खरेदी करू शकता. आणि त्याचसोबत लोकंल जेवणाचा आनंद घेऊ शकता.
दिवस 11: चंडीगड – कुरुक्षेत्र – पानिपत – दिल्ली (दिल्ली)
चंदीगड हुन तुम्ही दिल्लीला जाऊन मुक्काम करू शकता. प्रामुख्याने हा सर्व रस्ता ४ लेन चा आहे, त्यामुळे अंतर जास्त असले तरी जास्त त्रास होणार नाही. या प्रवासात तुम्ही कुरुक्षेत्रातील ब्रम्हा सरोवरला भेट देऊन पुढे जाऊ शकता. कुरुक्षेत्रातील सर्वात सुंदर आणि चित्तथरारक असे हे स्थळ आहे, असे मानले जाते की भगवान ब्रम्हा ने या सरोवरातुन विश्वाची निर्मिती केली, त्यानंतर पुढे जाताना पानिपतला भेट देऊन एक ऐतिहासिक स्थळ अनुभवता येईल. हे शहर मराठा आणि अफगाण सैन्य यांच्यातील पानिपतच्या युद्धाचे साक्षीदार आहे, पानिपत मध्ये तुम्हाला संग्रहालय, भूतकाळातील पुरातन वास्तू, शिलालेख, शिल्पे, शस्त्रास्त्रे, मातीची भांडी, जुनी आणि मौल्यवान कागदपत्रे, दागिने, कला आणि हस्तकला वस्तू पाहण्याची संधी आहे.
दिवस 12: दिल्ली
काल तुम्ही दिल्लीत पोचला होता त्यामुळे आजचा पूर्ण दिवस तुमच्या कडे दिल्ली एक्सप्लोर करण्यासाठी आहे. आज तुम्ही इंडिया गेट, राष्ट्रपती भवन आणि संसद भवन पाहू शकता, त्यानंतर राजघाट, लोटस टेंपल, कुतुबमिनार आणि लाल किल्ला इथे भेट देऊ शकता. लाल किल्ला आता युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. त्याचसोबत तुम्ही अक्षरधाम मंदिराला देखील भेट देऊ शकता.
दिवस 13: दिल्ली – वृंदावन – मथुरा – भरतपूर (राजस्थान)
आज तुम्ही दिल्लीतून निघून भरतपूरकडे निघताय. वाटेत तुम्ही वृंदावन, मथुरा इथे थांबू शकता. भरतपूरमध्ये तुम्हाला राजवाडे,किल्ले, मंदिरे, आणि इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा दिसतील.
दिवस 14: भरतपूर – आग्रा (उत्तर प्रदेश)
आज तुम्ही भरतपूर पक्षी अभयारण्याला भेट देऊन निसर्गाचा आनंद घेऊ शकता. हे सर्वोत्कृष्ट पक्षी अभयारण्यांपैकी एक असून याला केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान असेही म्हणतात. यानंतर पुढे तुम्ही आग्रा या यमुना नदीच्या काठावरच्या शहराकडे जाऊ शकता. इथे जर लवकर पोचलात तर तुम्ही लोकल मार्केट आणि संध्याकाळच्या वेळी बागेत फेरफटका मारू शकता.
दिवस 15: आग्रा (उत्तर प्रदेश)
आज तुम्ही अप्रतिम आणि जगातील ७ आश्चर्यांपैकी एक अश्या ताजमहालला भेट देऊन त्याचे मनमोहक रूप बघू शकता. हे बांधकाम आणि कलाकुसर यांचा उत्तम संगम आहे. आग्रा हे भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे, मुख्य आकर्षण “ताजमहाल”, हे प्रेमाचे प्रतीक असलेले संगमरवरी स्मारक जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भारतीय आणि परदेशी पर्यटक इथे आवर्जून भेट देतात. तुम्हीही इथे आवर्जून भेट द्या, आणि आयुष्यभरासाठी फोटोरूपी आठवणी कॅप्चर करा.
दिवस 16: आग्रा – ग्वाल्हेर (मध्यप्रदेश)
आग्र्याचा ताजमहाल पाहून तुम्ही आज मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरकडे आज निघा. आग्रा पासून मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरापर्यंतचा प्रवास फारच रमणीय आहे. आग्रा-ग्वाल्हेर द्रुतगती मार्गाने तुम्ही सहज प्रवास करू शकता. प्रवासादरम्यान मनमोहक नजारे तुमच्या वाटेत लागतील, त्याचा मनसोक्त आनंद घेऊन प्रवास पुढे चालू ठेवा.
दिवस 17: ग्वाल्हेर (मध्यप्रदेश)
आजच्या दिवशी तुम्ही ग्वाल्हेर शहर फिरून अनेक ठिकाणे पाहू शकता. उदाहरणार्थ सूर्य मंदिर, विस्तृत जय विलास पॅलेस, गुजारी महाल, इत्यादी अनेक पर्यटन स्थळे ग्वाल्हेर मध्ये तुम्हाला पाहता येईल.
दिवस 18: ग्वाल्हेर – झाशी – ओरछा – खजुराहो (मध्यप्रदेश)
आज तुम्ही ग्वाल्हेर वरून निघून खजुराहोला पोहोचा. वाटेत झाशी इथे भेट देता येईल. इथे 17 व्या शतकात बांधलेला हा एक ऐतिहासिक किल्ला असून राणी लक्ष्मीबाई यांच्या नेतृत्वाखालील ज्वलंत युद्धाचा साक्षीदार आहे. त्यानंतर तुम्ही ओरछा इथे सुद्धा अनेक ठिकाणी भेट देऊन खजुराहो ला पोहोचू शकता.
दिवस 19: खजुराहो (मध्यप्रदेश)
खजुराहो मंदिर मध्य प्रदेशातील छतरपुर जिल्ह्यात आहेत. हे मंदिर त्यांच्या कामुक शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. या मंदिरांची बांधणी ९व्या ते १३व्या शतकांदरम्यान चंदेल राजवंशातील राजांनी केली होती. खजुराहो मंदिरांची शिल्पे अत्यंत सुंदर आणि कलाकुसर असलेली आहेत. या शिल्पांमध्ये देवदेवता, अप्सरा, गंधर्व, यक्षिणी, राजा-राणी आणि सामान्य माणसे यांच्या प्रतिमा आहेत. खजुराहो मंदिर हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. हे मंदिर जगभरातील पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे.
दिवस 20: खजुराहो – भेडाघाट – जबलपूर (मध्यप्रदेश)
आज तुम्ही मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचे प्रशासकीय, औद्योगिक आणि व्यापारी केंद्र जबलपूरकडे प्रवास सुरु करा. वाटेत जगप्रसिद्ध संगमरवरी खडकांचे सुंदर चकाकणारे उंच डोंगर पाहता येतील. जाताना वाटेत तुम्ही नर्मदा नदी चे सुंदर दृश्य पाहून, नंतर भेडाघाट पाहून जबलपूर ला पोचू शकता.
दिवस 21: जबलपूर – कान्हा (मध्यप्रदेश)
आज तुम्ही जबलपूर इथून निघून कान्हा नॅशनल पार्ककडे जाऊ शकता. कान्हा भूमी “व्याघ्र प्रकल्प” म्हणून प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त सर्वात प्रसिद्ध बारासिंगा या राखीव प्रदेशात मुबलक प्रमाणात आढळतात आणि त्यामुळे ही प्रजाती “कान्हा राष्ट्रीय उद्यानाचे रत्न” म्हणून ओळखली जाऊ शकते.
दिवस 22: कान्हा (मध्यप्रदेश)
आज तुम्ही सकाळच्या आणि दुपारी जबरदस्त जीप सफारीच्या आणि घनदाट जंगलाच्या अनुभवासाठी सज्ज व्हा. वाघ, चितळ, सांबर हरिण, बिबट्या, नीलगाय, रानडुक्कर, कोल्हा, कोल्हा, अस्वल इत्यादी पाहण्याचे तुम्हाला संधी आहेत.
दिवस 23: कान्हा – नागपूर (महाराष्ट्र)
आज तुम्ही कान्हा इथून निघून नागपूरला निघू शकता. येथे तुम्ही नागपूर येथील धम्मचक्र स्तूपला भेट देऊ शकता. याला दीक्षा भूमी म्हणूनही ओळखले जाते, हा स्तूप एक अद्भुत वास्तुशिल्पाचा भाग आहे.
दिवस 24: नागपूर – निजामाबाद (तेलंगणा)
एक दिवस नागपूर इथे थांबून तुम्ही ताडोबा किंवा पेंच व्याघ्र प्रकल्प ला भेट देऊ शकता. त्यानंतर सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन पुढे निजामाबाद ला जाऊ शकता. सेवाग्राम आश्रम हा महात्मा गांधींचा आश्रम आहे.
दिवस 25: निझामाबाद – हैदराबाद (तेलंगणा)
आज तुम्ही डिचपल्ली रामालयमला मंदिराला भेट देऊ शकता. 14 व्या शतकात काकतीय राजांनी बांधलेले हे राम मंदिर. मंदिराच्या शैलीत आणि रचनेत बरेच साम्य असल्याने याला निजामाबादचा खजुराहो असेही म्हणतात. या नंतर पुढे आपण हैदराबादकडे जाऊ. ‘द पर्ल सिटी’ म्हणून ओळखले जाणारे, निझामांच्या या सुंदर शहरामध्ये इतिहास आणि आधुनिकतेचे अतुलनीय मिश्रण म्हणजेच ह्यादिराबाद. इथे पोचल्यानंतर तुम्ही हुसेन सागर तलावावर बोट राइडचा आनंद घेऊ शकता. नंतर लुम्बिनी पार्कला भेट देता येईल.
दिवस 26: हैदराबाद (तेलंगणा)
आज बिर्ला मंदिराला भेट देऊ शकता. हे मंदिर त्याच्या प्रभावी आणि उठावदार वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे, मंदिर शुद्ध पांढऱ्या संगमरवरी बनलेले आहे. नंतर चार-मिनारला भेट देता येईल. ज्याला ‘पूर्वेचा आर्क डी ट्रायम्फ’ असेही संबोधले जाते, त्यात चार उत्कृष्ट कोरीव खांब आहेत, प्रत्येक बाजूला एक, त्यानंतर गोलकोंडा किल्ल्याला भेट दिली जाऊ शकते.
दिवस 27: हैदराबाद – रामोजी फिल्म सिटी – हैदराबाद (तेलंगणा)
आज रामोजी फिल्म सिटीला भेट द्या. हे एक असे ठिकाण आहे जे सर्व सिनेमा आणि बॉलीवूड प्रेमींसाठी योग्य आहे. ज्यात कारंजे, बागा आणि डिझायनर गोष्टी आहेत, जे सर्व सिनेमाच्या सिन मध्ये आपल्याला खरे दिसतात. इथे सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण दिवस लागेल.
दिवस 28: हैदराबाद – नागार्जुन सागर धरण (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा)
आज तुम्ही नागार्जुन सागर धरणाकडे जाऊन कृष्णा नदीवरील विशालकाय धरण इथे पाहू शकता. येथे बोट राईडचा आनंद घेतो. त्यानंतर नागार्जुनकोंडा संग्रहालयाला भेट देता येईल. बौद्ध विहाराच्या आकारात बांधलेल्या संग्रहालयात बौद्ध कला आणि संस्कृतीच्या अवशेषांचा एक अद्भुत संग्रह आहे.
दिवस 29: नागार्जुन सागर धरण – कुर्नूल (आंध्र प्रदेश)
नागार्जुन सागर धरण आणि संग्रहालय पाहून झाल्यानंतर आज आपण कुर्नूलकडे जाऊ. कुर्नूल इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमी या दोन्ही प्रकारच्या पर्यटकांसाठी उत्तम स्थळ आहे. येथे प्राचीन लेणी, सुंदर तळे, मनमोहक धबधबे आणि आकर्षक डोंगर रांगा आहेत.
दिवस 30: कुर्नूल – बंगलोर (कर्नाटक)
सकाळी लवकर उठून कर्नुल मधील लेण्यांना भेट दिल्यानंतर तुम्ही बंगलोरला जाऊ शकता. देशाचे प्रमुख IT हब म्हणून किंवा भारताची ‘सिलिकॉन व्हॅली’ म्हणून प्रसिद्ध असलेले असे हे बेंगलोर आधुनिक आणि संकृतीचा संगम आहे. इथे आगमनानंतर, तुम्हाला विश्रांतीसाठी आणि सभोवतालचे बाजारपेठ फिरण्यासाठी मोकळा वेळ असेल.
दिवस 31: बेंगलोर (कर्नाटक)
आज तुम्ही टिपू सुलतानच्या उन्हाळा ऋतूतील राजवाड्याला भेट द्या. इंडो-इस्लामिक स्थापत्यकलेचे हे एक उत्तम उदाहरण आहे, आणि म्हैसूरचा शासक टिपू सुलतानचे उन्हाळी निवासस्थान इथे होते. त्यानंतर एचएएल एरोस्पेस म्युझियम ला नक्की भेट द्या. हे एक संग्रहालय आणि हेरिटेज केंद्र असून विमान उद्योगाचा वारसा जपण्यासाठी आहे. यापुढे तुम्ही लालबाग वनस्पति उद्यानाला भेट देऊ शकता. बंगलोरच्या मधोमध वसलेले हे २५० एकरांवरील उद्यान पाहून तुम्ही थक्क व्हाल.
दिवस 32: बेंगलोर – त्रिची (तामिळनाडू)
आज तुम्ही बेंगलोरहून त्रिचीकडे जा. याला तिरुचिरापल्ली असेही म्हणतात, हे एक प्राचीन शहर असून हे विविध ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. इथे आगमनानंतर आराम करण्यासाठी आणि आसपासचा परिसर एक्सप्लोर करण्यासाठी मोकळा वेळ असेल. येताना वाटेत अनेक सुंदर सुंदर निसर्ग, डोंगर पाहायला मिळतील.
दिवस 33: त्रिची (तामिळनाडू)
त्रिची, किंवा तिरुचिरापल्ली, हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक सुंदर आणि ऐतिहासिक शहर आहे. हे कावेरी नदीच्या काठावर वसलेले असून मंदिरे, किल्ले आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेले आहे.
शहरातील सर्वात भव्य स्थळांपैकी श्री रंगनाथस्वामी मंदिर हे एक आहे. हे भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी असून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकीही आहे. हे मंदिर द्रविडीयन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराच्या आत कोलोसल गेटवेज, अनेक मंडप आणि सुंदर मूर्ती आहेत. या मंदिरात भगवान विष्णूंची भव्य मूर्ती आहे.
दिवस 34: त्रिची – मदुराई – रामेश्वरम (तामिळनाडू)
आज तुम्ही तरीही हुन निघून आधी मदुराईकडे जा. मदुराई ला तामिळनाडूची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. इथे मीनाक्षी अम्मान मंदिराला भेट देऊन चॅन दर्शन घ्या, ज्याला मीनाक्षी-सुंदरेश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. त्यानंतर तुम्ही इथून थेट रामेश्वरमकडे निघा. रामेश्वरम हे पांबन बेटावरील एक शहर असून श्रीलंकेच्या सर्वात जवळ असलेले भारतातील ठिकाण म्हणून उल्लेखनीय आहे.
दिवस 35: रामेश्वरम (तामिळनाडू)
आज आपण रामेश्वरम मंदिराला भेट देतो. रामेश्वरम हे भारताच्या दक्षिण टोकाला असलेले एक सुंदर आणि ऐतिहासिक हिंदू तीर्थस्थान आहे. हे भारताच्या चार धामपैकी दक्षिण धाम आहे, ज्यामध्ये बद्रीनाथ, द्वारका, पुरी आणि रामेश्वर यांचा समावेश आहे. रामेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. पौराणिक कथेनुसार, श्री रामांनी लंकेवर स्वारी करण्यापूर्वी येथे शिवलिंगाची स्थापना केली होती. मंदिराची वास्तुकला उत्तम आहे. समुद्राच्या मोठ्या लाटांपासून संरक्षणासाठी उंच भिंतींनी वेढलेले हे मंदिर आहे. मंदिराच्या आत असंख्य खांब आहेत, ज्यावर नक्षी कोरलेल्या आहेत. हे मंदिर त्याच्या लांब हजार खांबांचे हॉल आणि 22 तीर्थकुंडांसाठी प्रसिद्ध आहे. या तीर्थकुंडांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. रामेश्वरम हे केवळ धार्मिक स्थळच नाही तर नैसर्गिक सौंदर्यानेही नटलेले आहे. येथील समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुंदर आहेत. येथे येणाऱ्या भाविकांना आध्यात्मिक अनुभूती मिळण्याबरोबरच निसर्गाचा सुंदर अनुभवही येतो.
त्यानंतर तुंम्ही इथून जवळच असणाऱ्या धनुष्कोडी इथे भेट देऊ शकता. हे भारताच्या रामेश्वरम बेटावरील दक्षिण टोकावरील एक गाव आहे. भारताचे अंतिम टोक म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण श्रीलंकेपासून फक्त 24 किलोमीटर अंतरावर आहे. 1964 च्या चक्रीवादळामध्ये हे गाव जवळपास पूर्णपणे नष्ट झाले होते. त्यामुळेच आता येथे काही घरे किंवा इमारती राहिल्या नाहीत. मात्र, अलीकडच्या काळात हे स्थान पर्यटकांमध्ये कमालीचे लोकप्रिय ठिकाण बनले आहे.
दिवस 36: रामेश्वरम – कन्याकुमारी (तामिळनाडू)
आज आपण कन्याकुमारीकडे जाऊ. कन्याकुमारी हे भारताच्या दक्षिण टोकाला, तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यात वसलेले एक मनमोहक शहर आहे. भारतातील मुख्य भूमीचा सर्वात दक्षिणी बिंदू असलेल्या या ठिकाणी भौगोलिक चमत्कार पाहायला मिळतात. येथे हिंद महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र एकत्र येतात. या संगमामुळे समुद्राच्या पाण्याचे वेगवेगळे रंग आणि सागर किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांचे वेगळे स्वरूप पर्यटकांना मोहित करते. कन्याकुमारी हे केवळ नैसर्गिक सौंदर्यासाठीच नाही तर धार्मिक स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथील कन्याकुमारी देवीचे मंदिर हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर उंचावर असलेल्या विवेकानंद स्मारक शिला अशी अनेक भेट देण्यासारखी वैशिष्ठे इथे आहेत. त्याच सोबत इथे तुम्ही हॅन्डमेड वस्तूंची खरेदीही करू शकता.
दिवस 37: कन्याकुमारी (तामिळनाडू)
कन्याकुमारी हे भारताच्या दक्षिण टोकावरील एक सुंदर ठिकाण आहे. तीन समुद्रांचा संगम – हिंद महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र येथे होतो. या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळ आहेत जी आपल्याला आयुष्यभर आठवणी देतात. कन्याकुमारी मंदिर हिंदू धर्मात खूप महत्वाचे मानले जाते. समुद्राकाठी पण मुख्यभूमीपासून थोडे आत असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियल हे स्वामी विवेकानंद यांचे स्मारक आहे. इथेच स्वामी विवेकानंदानी ध्यानधारणा केली होती.
त्यानंतर थिरुवल्लुवर या तमिळ कवी आणि संत यांची भव्य मूर्ती विवेकानंद रॉक मेमोरियलच्या जवळच आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त हे कन्याकुमारीमधील सर्वात जबरदस्त पाहण्यासारखे दृश्य आहेत. समुद्र किनाऱ्यावर सुखद वेळ घालवण्यासाठी अनेक बीच उत्तम पर्याय आहे. अशा प्रकारे, कन्याकुमारी हे धार्मिक स्थळांपासून निसर्गाच्या सौंदर्यापर्यंत सर्व काही देते, जे आपल्या भारतातील रोड ट्रिप ला अविस्मरणीय बनवेल.
दिवस 38: कन्याकुमारी – जटायू अर्थ केंद्र – तिरुवनंतपुरम (केरळ)
आज आपण जटायू अर्थ केंद्राला भेट देतो. जे समुद्रसपाटीपासून 350m (1200ft) उंचीवर आहे. जटायू निसर्ग उद्यानाला जगातील सर्वात मोठे पक्षी शिल्प असण्याचा मान आहे, जे जटायूचे आहे. येथे आपल्याला मुख्य आकर्षणाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी केबल कारने प्रवास करावा लागतो. इथे जटायू शिल्पकला, ऑडिओ-व्हिज्युअल संग्रहालय, राम मंदिर आणि मिनी थिएटरला भेट देऊ शकतो. त्यानंतर तुम्ही पुढे आपण भारताच्या केरळ राज्याची राजधानी तिरुवनंतपुरम जाऊ शकता.
दिवस 39: तिरुवनंतपुरम (केरळ)
आज तुम्ही श्री पद्मनाभ स्वामी मंदिराला भेट द्या. हे भगवान विष्णूला समर्पित मंदिर आहे. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते. विष्णूच्या भक्तांसाठी हे अतिशय पवित्र स्थान आहे. मंदिराची वास्तुकला द्रविडीयन शैलीतील असून त्याची नक्षीकाम आणि कोरीव काम अत्यंत देखणे आहे. मंदिराच्या आत पद्मनाभस्वामीची भव्य मूर्ती आहे. त्यानंतर तुम्ही कोवळम बीच या भारतातील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनार्यांपैकी एक असलेला बीचला भेट देऊ शकता. हा बीच त्याच्या सुवर्णी रंगाची वाळू आणि निळ्या पाण्यासाठी ओळखला जातो. येथे सूर्यस्नान, जलक्रीडा आणि आयुर्वेदिक उपचारांचा आनंद घेता येतो.
नेपियर संग्रहालय: इतिहास आणि पुरातत्व प्रेमींसाठी नेपियर संग्रहालय एक उत्तम ठिकाण आहे. या संग्रहालयात प्राचीन दक्षिण भारतीय कला, शिल्पे, नाणी आणि हस्तलिखिते जतन करण्यात आली आहेत. संग्रहालयात केरळच्या इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित वस्तूंचे मोठे प्रदर्शन आहे.
दिवस ४०: परतीचा प्रवास
अश्या पद्धतीने तुम्ही जवळजवळ ४० दिवसांच्या काश्मीर ते कन्याकुमारी या रोड ट्रिप चा अनुभव घेऊन हिमालया पासून कन्याकुमारी पर्यंत, बर्फातील थंडी पासून कडक उन्हातील समुद्रकाठापर्यंत, उत्तरेकडील देवदारच्या जंगलांपासून दक्षिणेकडील सागवान, चंदन, आणि निलगिरीच्या जंगलापर्यंत, सरळ हायवे पासून वळणदार रस्त्यांपर्यंत, व्याघ्रप्रकल्पां पासून ते हजारो वर्ष जुन्या आणि आपली संस्कृती जपणाऱ्या मंदिरांपर्यंत आयुष्यभरासाठी असंख्य अनुभव घेऊन पुन्हा इथून आपल्या घरी जात असता.
जे लोक महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, मुंबई या भागातील असतील ते NH ६६ ने केरळ मार्गे पुन्हा परत जाऊ शकतात, जाताना वाटेल केरळ मधील आणि दक्षिण कर्नाटक मधील अनेक पर्यटन स्थळे याना भेट देता येईल.