भिवगड/भीमगड ट्रेक कसा करायचा? काय पाहायचे? How to trek Bhivagad/Bhimgad? what to see

Hosted Open
6 Min Read

कर्जतच्या डोंगराळ भागात लपलेला इतिहासकालीन भिवगड किल्ला (Bhivgad Fort) आपल्याला आनंददायी प्रवासाची चुणूक दाखवतो. मुंबई-पुण्याच्या धाकधकीपासून थोड्याच अंतरावर, निसर्गाच्या सान्निध्यात सहज करता येणारा हा ट्रेक आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. जंगलातून जाणारी वाट, पावसाळ्यात वाहणारा धबधबा आणि थोड्या चढाईनंतर येणारी भव्य किल्लेवाट. किल्ल्यावर गेल्यावर इतिहास तुमच्या समोर उभा ठाकतो. किल्ल्यावरून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि हिरव्यागार गाव – वाड्यांचा नजारा डोळ्यांचे पारणे फेडतो. ढग, नद्यांचे सोनेरी दृश्य, थंडी आणि वारा आपल्याला पुन्हा येथे येण्याची आसच दाखवून जातो. तर चला मग हा मुंबई पुण्याच्या जवळचा भिवगड/भीमगड ट्रेक कशापद्धतीने अविस्मरणीय बनवता येईल याची आपण पूर्ण माहिती घेऊ.

मुंबई – पुण्याहून एका दिवसात करता येण्यासारखा सोपा किल्ला म्हणजे भिवगड उर्फ भिमगड. कर्जत जवळील वदप व गौरकामत गावामागे छोट्याश्या टेकडीवर हा किल्ला आहे. ‘‘ढाक’’ ला जाण्याचा एक मार्ग वदप गावातून आहे. या मार्गावर भिवगडच्या खिंडीत पोहचल्यावर उजव्या बाजूची वाट ‘‘ढाक’’ ला जाते, तर डाव्या बाजूची वाट भिवगडावर जाते. भिवगड छोटा किल्ला असल्यामुळे गौरकामत गावातून चढुन किल्ला पाहुन वदप गावात उतरल्यास छान छोटा ट्रेक होतो व किल्ला पूर्ण पाहून होतो.

BHivgad-Bhimgad

 

भिवगड / भिमगड किल्ला ट्रेक माहिती आणि पहाण्याची ठिकाणे:

गौरकामत गावातून किल्ल्यावर चढाई करताना कातळात खोदलेलं पाण्याच टाकं दिसते. या टाक्याच्या डाव्या बाजूला कातळात कोरलेल्या पायर्‍यांचा मार्ग आहे. या पायर्‍या चढतांना उजव्या बाजूला उंचावर दोन गुहा दिसतात. या गुहां जवळ चढून जाण्यासाठी दगडात खोबण्या खोदलेल्या आहेत. पहिल्या गुहेच्या बाहेर एक वीरगळ आहे. दुसरी गुहा पहिल्या गुहे पेक्षा थोडी वरच्या बाजूला आहे. तिथे जाण्यासाठी कातळात पायर्‍या कोरलेल्या आहेत. या दोन्ही गुहांचा उपयोग किल्ल्यावर येणार्‍या वाटांच्या टेहळणीसाठी होत असावा. सध्या दोन्ही गुहेत वटवाघुळांचा वावर आहे. त्यामुळे योग्य काळजी घ्यावी. गुहा बघुन पुन्हा पायर्‍यांच्या मार्गावर आल्यावर ५ मिनिटात आपण प्रवेशव्दारापाशी येतो. हे प्रवेशद्वार बऱ्यापैकी उध्वस्त झाले आहे. येथे तटबंदीचे अवशेष दिसतात. प्रवेशव्दारा जवळील पायर्‍या घडीव दगडांच्या आहेत.

प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच एक खांब टाक पाहायला मिळते. याठिकाणी स्थानिक गावकरी पूजा करतात. टाक्याच्या बाजूने वर चढून गेल्यावर दोन पायवाटा फ़ुटतात. उजव्या बाजूची वाट किल्ल्याच्या उत्तर दिशेकडील टोकाकडे जाते. या ठिकाणी भगवा झेंडा लावलेला आहे. या टोकावरुन खाली गौरकामत गाव आणि गावातून गडावर येणारी वाट दिसते. उत्तर टोक पाहून पुन्हा वाटेवर येऊन सरळ चालत गेल्यावर ५ मिनिटात एक डावीकडे जाणारी एक वाट दिसते.

Bhivgad-bhimagad trek

यावाटेने चालत गेल्यावर आपण दोन टाक्यांपाशी पोहोचतो. यातील एक खांब टाक असून त्यात पाणी आहे. तर दुसरे टाकं कोरडे आहे. या टाक्यावरुन एक वाट पुढे वदप मार्गावरील टाक्याकडे जाते. तिथे न जाता किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावरील अवशेष पाहाण्यासाठी आल्या मार्गाने पुन्हा मुळ पायवाटेवर येऊन २ मिनिटे चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो. इथे पाण्याची दोन टाकी आहेत. यातील मोठ्या टाक्या जवळ वाड्याचे जोतं आहे. या जोत्याच्या बाजूला असलेल्या पायवाटेने पुढे गेल्यावर वाट खाली उतरायला लागते. येथून खालच्या बाजूला एक खिंड दिसते. या खिंडीतून वदपला जाणारी वाट उतरते. खिंडीतून समोरच्या डोंगरावर चढणारी पायवाट ही ढाक किल्ल्यावर जाणारी वाट आहे.

पायवाटेने खिंडीच्या दिशेने उतरायला सुरुवात केल्यावर घरांची जोती पहायला मिळतात. पायवाटेच्या डाव्या बाजूला एक पाण्याचे टाक आहे. हे टाक पाहून थोडे पुढे चालत गेल्यावर तटबंदीचे अवशेष दिसतात. तटबंदी ओलांडून पुढे उतरत गेल्यावर ५ मिनिटात आपण एका खंदकापाशी पोहोचतो. हा मानव निर्मित खंदक आहे. ढाकच्या डोंगर रांगेपासून किल्ल्याला वेगळा करण्यासाठी हा खंदक खोदलेला होता. खंदक ओलांडून ५ मिनिटे उतरल्यावर आपण खिंडीत पोहोचतो. या खिंडीतून ३ वाटा फ़ुटतात एक वदप गावात , दुसरी, भिवगड/ भिमगडकडे तर तिसरी वाट ढाक किल्ल्याकडे जाते. या खिंडीतून उतरणार्‍या मळलेल्या वाटेने १५ मिनिटात वदप गावात उतरता येते. गौरकामत गावातून चढून किल्ला पाहून वदप गावात उतरण्यासाठी २ ते २.५ तास पुरतात.

भिवगड / भिमगड ला पोहोचण्याच्या वाटा :

कर्जतहून ७.५ कि.मीवर वदप गाव आहे. वदपच्या पुढे १ कि.मीवर गौरकामत गाव आहे. या दोन गावांच्या मध्ये भिवगड आहे.

वदप गावा मार्गे :- वदपच्या धबधब्याच्या फाटा सोडल्यावर पुढे उजव्या हाताला एक रस्ता गावातील् घरांमधून् भिवगडकडे जातो. रस्ता संपल्यावर मळलेल्या पायवाटेने भिवगड डावीकडे ठेवत १५ मिनिटे चढल्यावर आपण भिवगडच्या खिंडीत येतो. येथे दोन वाटा फुटतात उजव्या बाजूची वाट ‘ढाक किल्ल्याकडे’ तर डाव्या बाजूची वाट भिवगडवर जाते. खिंडीतुन १० मिनिटात गडावर जाता येते.

गौरकामत गावा मार्गे :- गौरकामत गावातील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या समोरील रस्ता गावातील घरांमधून भिवगडकडे जातो. गावा बाहेर पडून कच्च्या रस्त्याने ५ मिनिटे चालल्यावर, उजवीकडे एक पायवाट खिंडीत जाते. या पायवाटेने खिंडीत पोहोचल्यावर खिंडीत उतरलेल्या भिवगडाच्या डोंगराच्या सोंडेवरुन भिवगडवर २० मिनिटात जाता येते.

भिवगड / भिमगड वर जाण्यासाठी लागणारा वेळ :

गौरकामत व वदप दोन्ही गावातून ३० मिनिटे लागतात.

भिवगड / भिमगड वर जाण्यासाठी उत्तम कालावधी : वर्षभर

Note :- आम्ही गौरकामत गावातून जाऊन तिकडूनच उतरलो होतो सोबत पाणी भरपूर ठेवणे गरजेचे आहे. वरती पाणी आहे पण पिण्यायोग्य नाही. एक दिवसात भिवगड आणि सोनगिरी पाहून होतो आम्ही तसेच केले होते.

– दीपक शेळके

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *