Therapy: भणभनलेलं डोकं शांत करण्यासाठी एकदा हे करून पहाच

Hosted Open
3 Min Read
-शांत-करण्यासाठी-एकदा--हे-करून

कामाचा कोलाहल, ताण-तणाव ह्यामुळे भणभणलेलं डोकं निवांत क्षण शोधत असते. आणि हा निवांतपणा शहरात मिळणे मुश्किलच. मग त्यासाठी जावे लागते कोकणातल्या गावी.

जानेवारी – फेब्रुवारी दरम्यान गावात गेले की आधी श्रावणात गणपतीत बघलेल्या हिरवागार शितल अश्या निसर्गात आता थोडी रूक्षता दिसते. अनायसे ईथे एक गोष्ट मस्त असते ती म्हणजे मोबाईलला रेंज नसतेच, आणि ती शोधायचा वेडेपणा मी करतच नाही. मग काय सगळेच शांत .जोराचा पाऊस, थंडी अनुभवून आता उन्हाळयाकडे सरकताना निसर्ग थोडासा प्रौढत्वाकडे झुकलेला जाणवता होता. पण निसर्गाची ही प्रत्येक अवस्था तितकीच भावणारी असते.

शेतीच्या कामाचा हंगाम आता पाऊस पडे पर्यंत हा जोर असाच. घरातले बहुतेक सगळेच शेतात. सगळ चिडीचूप. आपण फक्त अंगणात बसुन आपले मन, कान, ध्यान सगळे निसर्गाच्या स्वाधीन करायचे. अश्या वेळी अविरत चालु असलेल निसर्गाचा आवाज अगदी स्पष्टपणे ऐकता येतो. सात ते आठ कधी कधी त्याहुन जास्त असे पक्षांचे आवाज कुठूनतरी येत असतात.

त्यांच सगळं अगदी सुरातच चाललेलं असत हा. मिले सुर मेरा तुम्हारा करत. एखादा पक्षाचा आवाज भावला तरी त्याला किती शोधा दिसणारच नाही. अदृष्य असल्यासारखा. कदाचित बाथरुम सिंगर असेल तो. जोरदार वार्‍याची झुळुक आणि त्या सोबत होणारी पानाची सळसळ, खुपच गुढ भासते. उन्हात तापलेले तरी वार्‍याच्या तालावर डोलणारे वाळत घातलेले कपडे.

एखाद्या बॅलेडान्सरला नक्कीच लाजवतील ईतका त्यांच्यात लवचिकपणा. मधेच त्या वार्‍याच्या अंगात खोडकर मुलगा शिरतो आणि त्याचा वेग अचानक वाढतो. तो येतो आणि झाडांवर टपली मारून जातो. जोरात आलेल्या वार्‍या मुळे अंगणात उलगद पडणारी शेवग्याची पांढरीशुभ्र फुले आणि त्यांचा एक अनामिक सुगंध.

अंगणात परतुन येणारी सुकलेली पाने. दुरवर चरायला जाणारी गोठ्यातली जनावरे त्यांच्या गळ्यातला हलका घंटानाद. हळुवार दबक्या पावलानी कानोसा घेत फिरणारी मांजर. जास्वंदीच्या फुलांवर बसणारी छोटीशी चिमणी. एका जाग्यावर बसायची सवयच नाही तिला सारखी जाते आणि परत येते. अगं थांब, मला निट तुला बघु तरी दे.

घरातल्या एका कामसु बाई सारखी लगबगीत धावणारी खारूताई. एखाद्या मांजरीला आलेली निसर्गाची साद बर ती आपले विधी आटपुन त्यावर अगदी व्यवस्थित माती घालते किती शहाणपण हे.

सुर्याची किरणं तिरपी होत एक मस्त सोनेरी-गुलाबी रंगाचा मिलाफातून बनलेल्या नवीनच रंगात रंगलेली असतात. निसर्गाच्या कारागिरीला बहर वाढतच असतो. फक्त शांत बसावे आणि ह्या सगळे अनुभवायचे कसलं भारी वाटतं हे. निसर्गानं किती भरभरून सौंदर्याची उधळण करत असतो.

पण आपण आनंद शोधतो ह्या कृत्रिम जगात. तर हे सगळं अगदी हळुवार, तरल चालु असते अश्यातच तंद्री लागते. आणि अचानक येतो मर तो रूक्ष रहाटाचा खडखड कर्कश आवाज. कोणी तरी पाणी न्यायला आलेली असते आणि दुपारी शांत झोपलेला तो रहाट झोपेतून अवेळी उठवल्यासारखा चिडचीड करत असतो…

पण काही म्हणा काही क्षणांकरता अनुभवलेली ही निसर्गाची therapy एक वेगळीच जादु करून जाते आणि तन मन अगदी प्रफुल्लित करते. बोले तो एकदम Refresh

 

– मनोज वि सारंग
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *