२४५ किमी ची ज्युपिटर ट्रिप (पुणे – कामशेत – लोणावळा – खोपोली – महाड – पाली – सुधागड – ताम्हिणी – पुणे)
गेल्या आठवड्यात ऑफिसामध्ये एवढं कामाचं लोड होतं ना, की डोकंच उठलं, शनिवारी सकाळीच वाटलं, आता गाडी काढायची आणि निघायचं बाहेर हिंडायला. पहाटेच ज्युपिटरला स्टार्टर मारला आणि लोणावळ्याचा रास्ता धरला.
मला असं वाटत कि, की दोन चाकीवरच्या प्रवासाला तोडच नाही. मला नेहमीच असं वाटतं की “मेडिटेशन ऑन २ व्हील्स – Meditation on 2 Wheels” हि कंसेप्ट खरी असावी कारण गाडी १००-२०० किमी मारली कि डोकं हलकं होतं, मनाला फ्रेश वाटतं. म्हणूनच, जेंव्हा मी फ्री असतो किंवा खूप थकल्यासारखं वाटतं, तेंव्हा कुठलाही विचार न करता गाडी काढतो आणि प्रवासाला निघतो. कधी कुठं थांबायचं, किती वेळ फिरायचं, हे ठरलेलं नसतं. रस्ता म्हणेल तसं आणि मन जाईल तसं आपले गाडी चालवची.
आता काही लोक म्हणतील, कि असलं काही नसतं. पण घाटातल्या वळणवाटांवरून गाडी मारताना, अंगावरून थंडगार वारा झेलताना, आजूबाजूच्या हिरव्या डोंगरांकडं बघत, रस्ते, नद्या बगत बगत गाडी चालवायची मजा काही औरच असते.
रस्त्याच्या बाजूला असलेली छोटी गावं, टपर्यांवर टाकलेली शेणमातीची भिंत, तिथं चुलीवर उकळणारा कडक चहा, मध्येच दिसणारी एखादी शांत नदी सगळं काही मन मोहून टाकतं. आणि गंमत म्हणजे या प्रवासाला काही ठरलेलं ठिकाण नसतं. कुठं जायचंय हेच मुळी ठरलेलं नसतं. कारण प्रवासाची खरी मजा ठिकाणी पोहोचण्यात नाही, तर वाटेतल्या प्रत्येक क्षणात असते. मन कुठं जाईल, कुठं थांबेल, काहीच माहीत नसतं. एकच टार्गेट असतं – संध्याकाळपर्यंत मस्त भटकायचं. किती किलोमीटर प्रवास झाला, किती वेळ गेला, हे बघायचं नसतं. कसलीच घाई नाही, कसलीच चिंता नाही. फक्त मस्त गाडी मारायची आणि मनसोक्त निसर्ग अनुभवायचा.
अशावेळी अजून एक गोष्ट आपल्यासोबत हमखास घडत असते. ३०-३०, ५०-५० किलोमीटर कधी पार झाले, हे कळतच नाही. गाडी हाकताना मेंदूत कसलीच गडबड राहत नाही. मन कुठेतरी भलत्याच दुनियेत हरवलेलं असतं. आणि मग अचानक जाग आल्यासारखं होतं “अरेच्या.. आपण तर किती पुढं आलोय” यालाच आमच्या भाषेत “तंद्री” म्हणतात. ही तंद्री म्हणजे काय भन्नाट प्रकार असतो, हात गाडीवर, डोळे रस्त्यावर, पण मन कुठल्यातरी वेगळ्याच जगात फिरत असतं. आणि या प्रवासात मनाशी चाललेल्या गप्पांची मजा काही औरच असते.
आजचा ब्लॉगही माझ्या अनेक ट्रिपपैकीच एक – जी गेल्या आठवड्यात केली. झालं असं की सलग पाच दिवस ऑफिसमध्ये एवढं काम होतं की दिवस कधी सुरू व्हायचा आणि कधी संपायचा कळत नव्हतं. सूर्य उगवलाय का मावळलाय, याचंही भान राहिलं नव्हतं. डोकं अक्षरशः उठलं होतं!
मग काय, शनिवारी सकाळी लवकर उठलो आणि सरळ ज्युपिटरची किल्ली उचलली. काही विचार न करता पुण्यातून लोणावळ्याच्या दिशेने निघालो.
अंगावर झेलणारा गार वारा, रस्त्याच्या कडेला हलकेच झुलणारी झाडं, आणि शांत वातावरण हे सगळं अनुभवत कधी कामशेतला पोहोचलो, ते समजलंच नाही. वाटेत स्पोर्ट्स बाईकवाले fast गाड्या पळवत होते. त्यांचं ते भन्नाट स्पीड पाहून भारी वाटत होतं. काही वेळ गाडी हळू करून त्यांच्याकडं बघत होतो, आणि मनात म्हटलं..
“आपलं वेगळंच विश्व आहे, निवांत जगायचं”
तेवढ्यात पूर्वेकडे तांबडं फुटायला लागलं. पाखरं पिसं झटकत इकडून तिकडं उडत होती. गावातला रहाटगाडा हळूहळू सुरू झाला होता. कुठं शेतकरी बैलजोडी घेऊन शेताच्या दिशेने निघाले होते, तर कुठं हॉटेलवाले नुकतीच टपर्या उघडून पहिल्या चहाच्या किटल्या तापवत होते. त्या पहाटेच्या मोकळ्या वातावरणात गाडी चालवायची मजाच वेगळी होती.
हे सगळं पाहत पाहत मी अखेर लोणावळ्यात जाऊन पोहोचलो, अगदी वेळेत सुंदर असा सूर्योदय पाहण्यासाठी. गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि समोरच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांकडे नजर टाकली. समोरच तांबड्या-सोनेरी प्रकाशात न्हालेलं निसर्गरम्य दृश्य दिसत होतं. थंडगार वारा स्पर्श करत होता, आणि त्या शांत क्षणात मन एकदम निवांत झालं.
इथून दिसणारं दृश्य म्हणजे एक वेगळाच संगम. निसर्ग, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगती यांचा अनोखा मेळ. एकीकडे सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा, दरीत पसरलेला धुक्याचा मखमली गालिचा, आणि दुसरीकडे समोरून वेगाने धावणारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरच्या गाड्या आणि लोहमार्गावरून सुसाट सुटलेल्या रेल्वेगाड्या. एकाच ठिकाणी डोंगररांगांमधून उगवणारा सूर्य आणि त्या खाली वेगाने धावणारी आधुनिक यंत्रणांची गती हे खरंच पाहताना असं वाटलं की, हा निसर्ग आणि माणसाच्या प्रगतीचा एक अनोखा संवादच.
इथेच न थांबता मी पुढे खोपोलीला जायचा निर्णय घेतला आणि मग खंडाळ्याचा घाट उतरायला लागलो. खंडाळ्याचा घाट म्हणजे एक वेगळंच रसायन, तितकाच सुंदर, तितकाच धोकादायक. वळणावळणाच्या रस्त्यावरून आणि तीव्र उतारावरून गाडी सावकाश उतरवत होतो. मध्येच एखाद्या ठिकाणी थांबून दोन-तीन फोटोही काढले. घाट उतरताना डोंगरावरून खाली दिसणाऱ्या दऱ्या, धुकटलेलं वातावरण आणि एक्सप्रेस वरून धावणाऱ्या वाहनांची गर्दी सगळं एक वेगळाच थरार देत होतं.
थोड्याच वेळात मी खोपोलीत पोहोचलो. इथं आल्यावर वाटलं, “एवढं आलोच आहोत, तर महडच्या गणपतीचं दर्शन घ्यावं” लगेच तिकडे गाडी वळवली आणि अवघ्या दहा मिनिटांत गणपती मंदिरात पोहोचलो.
मंदिराच्या गाभाऱ्यात शिरताच एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळाली. गणरायाचं दर्शन घेतलं, मनसोक्त दर्शन झालं आणि मन प्रसन्न झालं. शेवटी, रस्त्यावरचा प्रवास सुंदर असतोच, पण त्याच प्रवासातील मंदिर भेट समाधान देते. एक तासात दर्शनही झालं, आणि नाश्ताही आटोपला. आता परतीच्या प्रवासाची वेळ झाली होती.
या वेळी माझ्या एक गोष्टी लक्षात आली आलेल्याच रस्त्याने परत जाण्यापेक्षा, एक भन्नाट रूट घ्यावा. म्हणजे, इथून सरळ पालीला जाऊन, तिथून सह्याद्रीच्या पायथ्याने ताम्हिणी घाट मार्गे पुण्याला जायचं. म्हणजे एकदम गोल ट्रिप होईल.ही वाट मी आधीही अनुभवली होती. अष्टविनायक यात्रेच्या दर्शनावेळी याच रस्त्याने गेलो होतो, त्यामुळे रस्ता चांगलाच माहीत होता. आता पुन्हा त्याच मार्गाने एक नवीन अनुभूती घ्यायची होती.
गणपतीचं दर्शन घेऊन मी खोपोली-पेण-अलिबाग या मुख्य रस्त्याने गाडी चालवायला सुरुवात केली. काही अंतर गेल्यावर पाली फाटा लागला आणि तिथून मी डावीकडे वळून पाली रोडला लागलो.
हा रस्ता म्हणजे एक वेगळाच अनुभव. पूर्ण सिमेंटचा बनवलेला, गुळगुळीत आणि भन्नाट सुंदर. या रस्त्यावर प्रवास करताना डावीकडे उंच सह्याद्रीच्या रांग होती, तर उजवीकडे पसरलेली भातशेती मधूनच डोकावत होती. अधूनमधून घनदाट झाडांची चक्री वळणं लागत होती. समोर फक्त मोकळा रस्ता आणि सभोवताली निसर्गाची सळसळणारी जादू. अशा निसर्गरम्य वाटांमधून जात पाली गाठणं म्हणजे प्रवासाचं सुख मिळवण्यासारखं.
पाली येथे गणपतीचे सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या अगदी जवळच ऐतिहासिक सरसगड किल्ला आहे. मंदिरात दर्शन घेतले, त्यानंतर थंडगार लिंबू सरबत पिऊन थोडे फ्रेश झालो आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
परत जाताना मी ताम्हिणी घाट मार्गे प्रवास करण्याचे ठरवले होते. पाली ते ताम्हिणी हा सुमारे २६ किलोमीटरचा रस्ता अतिशय निसर्गरम्य आहे. हा रस्ता सुधागड वन्यजीव अभयारण्यातून जातो, त्यामुळे आजूबाजूला घनदाट झाडी आणि निसर्गसौंदर्य अनुभवता येते. संपूर्ण मार्ग वळणदार असून, दोन्ही बाजूंना उंच झाडांनी त्याला सावली दिलेली आहे. असा रस्ता तासनतास प्रवास करण्यासारखा वाटतो.
या संपूर्ण प्रवासात कुठेही ट्रॅफिकचा त्रास झाला नाही, त्यामुळे प्रवास अतिशय आनंददायक आणि आरामदायी झाला. वातावरणही आल्हाददायक आणि थंड होते, त्यामुळे प्रवासाचा थकवा जाणवत नव्हता. थोडे पुढे गेल्यावर माणगाव फाटा लागला. तिथे मी एका हॉटेलमध्ये थांबून मस्तपैकी गरमागरम मिसळ आणि चहा घेतला. नाश्त्याने ताजेतवाने वाटले. त्यानंतर मी पुन्हा पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला.
आता इथून पुढे सह्याद्रीतला निसर्गरम्य आणि अद्भुत ताम्हिणी घाट सुरू होतो, जो चार टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. या घाटाबद्दल संपूर्ण माहिती मी माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये दिली आहे, त्यामुळे येथे त्याची पुनरावृत्ती करत नाही. मात्र, एवढे नक्की सांगतो की, ताम्हिणी घाट तुम्हाला कधीच निराश करत नाही. प्रत्येक वेळी तो काहीतरी नवे दाखवतो, आणि त्या सौंदर्याने तुम्ही पुन्हा पुन्हा थक्क व्हाल.
असाच सुंदर प्रवास करत, रमत-गमत निसर्गाचा, रस्त्यांचा आणि प्रवासाचा आनंद घेत मी संध्याकाळपर्यंत पुण्यात पोहोचलो. गाडीनेही संपूर्ण प्रवासात उत्तम साथ दिली. माझा हा एकूण प्रवास तब्बल २४५ किलोमीटर चा झाला, आणि विशेष म्हणजे कुठलाही त्रास झाला नाही. उलट, मी पूर्णपणे फ्रेश झालो, मानसिकदृष्ट्या निवांत आणि रिलॅक्स झालो.
या प्रवासासोबतच माझ्या आठवणीत अजून एक सुंदर सफर जमा झाली. या ट्रीपमध्ये मी पुणे – कामशेत – लोणावळा – खोपोली – महाड – पाली – सुधागड – ताम्हिणी – पुणे असा प्रवास केला. आणि त्यासोबतच अजून एक रोमांचक अनुभव मित्रांना आणि नातेवाईकांना सांगण्यासाठी तयार झाला.