पुणे ते अष्टविनायक दर्शन रोड ट्रिप अनुभव (२ दिवस ६४३ किलोमीटर) – पूर्ण माहिती | Pune to Ashtavinayak darshan by road

Hosted Open
13 Min Read

२ दिवसांची अष्टविनायक तीर्थयात्रा पूर्ण माहिती: Pune to Ashtavinayak darshan by road

Pune to Ashtavinayak darshan by road

गणपती हे प्रिय आराध्यदैवत आहे. अष्टविनायक म्हणजे स्वयंभू गणपतीची आठ मंदिरे. या आठही मंदिरांना भेट देण्याची माझी अनेक दिवसापासून इच्छा होती.

अष्टविनायकाची तीर्थयात्रा म्हणजे पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात वसलेल्या आठ प्राचीन गणपतींच्या मंदिराचे दर्शन. या प्रत्येक मंदिरांचा स्वतःचा असा एक इतिहास आहे. आठही मंदिरातील गणेश मूर्तीचे रूप भिन्न आहे. असे म्हटले जाते की ही यात्रा पूर्णत्वास नेण्याकरिता सर्व आठ गणपतींचे दर्शन घेतल्यावर पुन्हा पहिल्या गणपतीचे दर्शन घ्यावे.

या प्रत्येक आठही मंदिरातील प्रत्येक गणपती हा स्वयंभू असून अतिशय जागृत आहे असे मानले जाते. या विविध मंदिरांमध्ये मोरेश्वर, महागणपती, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर आणि वरद विनायक अशी गणपतीची वेगवेगळी नांवे आहेत. आठही मंदिरांची स्थापत्यकला अतिशय उत्कृष्ठ असून ती मनाला सुखावह वाटतात त्याच सोबत आश्चर्यचकितही करतात.

तर अनेक दिवसांपासूनची असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आणि माझा मित्र अजिंक्य आम्ही २ बाईक घेऊन निघालो. आमचा प्लॅन शुक्रवारी दुपारी ऑफिस मध्ये जेवताना ठरला आणि शनिवारी सकाळी ४.३० ला आम्ही निघालो.

Ashtavinayak 1

आम्ही अष्टविनायक यात्रा हि २ दिवसात बाईक वरून पूर्ण केली. या मध्ये ६४३ km अंतरात ८ मंदिरे पहिली. ही मंदिरे मोरगांव, रांजणगांव, थेऊर, लेण्याद्री, ओझर, सिद्धटेक, पाली आणि महड येथे वसलेली असून ती पुणे, अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात आहेत. आम्ही २ दिवसात एकदम आरामात सर्व ठिकाणी दर्शन घेऊन, काहीही घाई न करता अष्टविनायक यात्रा पूर्ण केली.

हि यात्रा २ दिवसात पूर्ण करत असताना पहाटेच्या कडाक्याच्या थंडीपासून दुपारच्या तळपणाऱ्या उन्हापर्यंत, सकाळच्या मनमोहक सूर्योदयापासून संध्याकाळच्या नितांत सुंदर सूर्यास्तापर्यंत, खळखळत्या नद्यांपासून गावातल्या हिरव्यागार शेतीपर्यंत, सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांपासून खोल दऱ्यांपर्यंत, घनदाट जंगलांपासून मोकळ्या माळरानापर्यंत, अप्रतिम हायवे पासून धुळीने माखलेल्या सुंदर रस्त्या पर्यंत, सर्व अनुभव आयुष्यभरासाठी घेतले.

प्रवासाला सुरुवात करायच्या आधी मनात अनेक प्रश्न होते. जसे कि, काही अडचण येईल का? उन्हाचा त्रास जाणवेल का? राहायला कुठे मिळणार? इत्यादी. पण हे सर्व प्रश्न बाजूला करून एकच ध्येय ठेवले कि, जसे शक्य होईल तसे दर्शन घेत प्रवास करायचा. जिथे गाडी चालवून कंटाळा येईल तिथेच मुक्काम करायचा. अगदी रस्त्याच्या कडेला सुद्धा. त्यामुळे जास्त विचार न करता आम्ही प्रवासाला सुरुवात केली, आणि तो देवाच्या आशीर्वादाने सुखरूप पार पडला.

आम्ही शनिवारी सकाळी पहाटे ४.३० ला प्रवासाला सुरु केले, आणि रविवारी रात्री १० वाजता पूर्ण झाला. या प्रवासात अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही रविवारी एकाच दिवसात महाराष्ट्रातील प्रसिद्ध दोन मोठे घाट, माळशेजचा घाट आणि ताम्हिणीचा घाट दोन्हीही विरुद्ध दिशेला असुनही पार केले. हि एक मोठी अचिव्हमेंट मला वाटते.

या प्रवासात आणि गणपतीच्या दर्शनामुळे अनेक चांगल्या आठवणी कायमच्या स्मरणात राहिल्यात. आम्ही पूर्ण केलेली अष्टविनायक यात्रा पुढे सविस्तर दिली आहे.

मार्ग:
पुणे – थेऊर – मोरगाव – सिद्धटेक – रांजणगाव – ओझर – लेण्याद्री – महड – पाली – पुणे

पहिला दिवस:
पुणे ते थेऊर (४० km)
थेऊर ते मोरगाव (६० km)
मोरगाव ते सिद्धटेक (६५ km)
सिद्धटेक ते रांजणगाव (७८ km)
रांजणगाव ते ओझर (६५ km)

दिवस दुसरा:
थेऊर ते लेण्याद्री (१४ km)
लेण्याद्री ते महड (१४२ km)
महड ते पाली (३७ km)
पाली ते पुणे (११० km)

२ दिवसांची पुणे ते अष्टविनायक यात्रा पूर्ण माहिती:

Ashtavinayak 2.jpg

१) चिंतामणी मंदिर (थेऊर):

वाकड (पुणे) येथून आम्ही पहाटे ४.३० ला निघालो, हवेत प्रचंड गारवा होता, थंडी बरीच जाणवत होती. एवढ्या सकाळी नाश्ता करायची इच्छा न्हवती त्यामुळे वाटेत फक्त चहा घेऊन थेट पहाटे ५.४५ वाजता आम्ही थेऊर येथे पोचलो. सकाळ ची वेळ असल्याने गर्दी अजिबात न्हवती. मंदिराजवळच पार्किंग मिळाले आणि आम्ही मंदिरात गेलो. मंदिरातील वातावरण एकदम प्रसन्न होते. मंदिराचा आवरा मोठा आणि प्रशस्त आहे. सभामंडप हा पूर्णपणे लाकडी कोरीव कामाचा आहे. इथे १५ मिनिटातच चिंतामणी चे दर्शन झाले. अजूनही बाहेर पूर्ण अंधार होता. आमच्या अष्टविनायक यात्रेतील पहिल्या गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही पुढील प्रवासाला निघालो.

वाकड ते थेऊर अंतर: ४२ km, १ तास

२) मोरेश्वर मंदिर (मोरगाव):

६.१५ वाजता थेऊर मधून दर्शन घेऊन निघालो. पुढचे मंदिर मोरगाव होते. आम्ही जेजुरीमार्गे जाण्याचा निर्णय घेतला होता. रस्ते आत्तापर्यंत खूप चांगले होते. एव्हाना पूर्वेकडील आकाश थोडे थोडे लालसर दिसू लागले होते आणि सूर्योदयापूर्वी लाल, केशरी रंग आकाशात हळूहळू पसरू लागला होता. मोरगावला

सूर्योदय बघता बघता कुडकुडणाऱ्या थंडीत आम्ही ७.३० वाजता मोरगाव ला पोचलो. असे वाटत होते कि थंडी मुळे हाताच्या बोटांमध्ये जीवच नाही. गाड्या पार्किंगमध्ये लावून मंदिरात गेलो. याठिकाणी मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होती. आम्ही लवकर पोचल्याने सकाळची ८ वाजताची गणपतीची आरती मिळाली. त्यानंतर मोरेश्वराचे दर्शन घेऊन मस्तपैकी भरपेट मिसळीवर ताव मारला. आणि पुढील प्रवासाला मार्गस्थ झालो.

थेऊर ते मोरगाव अंतर: ५८ km, १ तास १५ मिनटे

३) सिद्धिविनायक मंदिर (सिद्धटेक):

मोरगाव मधून आम्ही ९ च्या दरम्यान निघालो. भरपूर खाणं झाल्याने आता दुपारपर्यंत भीती न्हवती. एव्हाना बऱ्यापैकी सूर्य तोंडावर आला होता त्यामुळे डोळ्यांना तिरप्या सूर्य किरणांचा थोडा त्रास जाणवत होता. पण वारा मात्र अजूनही थंडच होता. त्यामुळे सकाळी घरातून निघताना घातलेलं जॅकेट अजूनही काढलेले नव्हते. रस्त्यांची कंडिशन उत्तम होती.

मोरगाव ते सिद्धटेक प्रवासात एक गोष्ट जाणवली कि या भागात सध्या शेतामध्ये ऊस तुटून गेले असल्याने बऱ्यापैकी रान मोकळी होती. त्यामध्ये गहू आणि कांद्याचे भरपूर उत्पादन घेतलेले जाणवले. मजल दरमजल करत आम्ही सिद्धटेकला १०.३० ते ११ च्या मध्ये पोचलो. इथे अजिबात गर्दी नसल्याने चांगले दर्शन झाले. इथला नदीचा परिसर आणि मंदिर पाहून खूप भारी वाटले. नदीच्या पुलावर अनेक अँगल ने ढीगभर फोटो काढून झाल्यावर आमचा पुढील प्रवास सुरु झाला.

मोरगाव ते सिद्धटेक अंतर: ६५ km, १ तास २० मिनटे

४) महागणपती मंदिर (रांजणगाव):

अर्ध्या तासातच सिद्धिविनायक गणपतीचे चे सुंदर दर्शन झाले. थोडा वेळ मंदिरात बसून त्यानंतर आम्ही पुढील प्रवासाला निघायचा ठरवले. आता बऱ्यापैकी बाहेर सूर्य तळपायला लागला होता. पाण्याची कमतरता भासू लागली. पाणी बॉटल घेऊन आम्ही सिद्धटेक मधून रांजणगांव साठी निघालो.

डोक्यावरच्या तळपणारा सूर्य आणि आजूबाजूची शेती आणि लहान लहान डोंगर असा निसर्गचित्रातून प्रवास सुरु होता. या भागात झाडी थोडी कमी जाणवली. रस्त्यांची कंडिशन आत्तापर्यंत तर उत्तम होती. पुण्यातून निघाल्यापासून कुठेही रस्ता खराब लागला नाही.

साधारण दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही दुपारी १ वाजता रांजणगाव ला पोचलो. इथे बऱ्यापैकी गर्दी असल्याने दर्शनासाठी ४५ मिनिट लागले. दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या आवारात थोडे फोटो काढले आणि महाप्रसाद घ्यायला गेलो. त्यानंतर सर्व आवरून ३ वाजता आम्ही रांजणगावातून महागणपतीचे दर्शन घेऊन ओझर साठी निघालो.

अंतर: सिद्धटेक ते रांजणगाव: ७१ km, दीड ते दोन तास वेळ लागतो.

५) विघ्नेश्वर मंदिर (ओझर):

दुपारी ३ म्हणजे कडक ऊन आणि तापलेला रास्ता. आणि याच वेळेला आम्ही रांजणगावातून ओझर साठी मार्गस्थ झालो होतो. जसे रांजणगाव सोडले तसे आजूबाजूला थोडी हिरवळ कमी झाली होती. आणि उन्हाचा तडाखा वाढला होता. पण वेळेत ओझर ला पोचायची इच्छा असल्याने आम्ही काँटिनू एक तास गाडी चालवली आणि एका ठिकाणी फ्रेश व्हायला थांबलो. गाडीच्या इंजिनला पण एक ब्रेक गरजेचा होता.

इथे अप्रतिम लिंबू सरबत मिळाले. ते घेऊन १५ मिनटे थांबून आम्ही पुढे निघालो. सकाळ पासून आम्ही सोलापूर हायवे, नगर हायवे, आणि आता नाशिक हायवे क्रॉस करून संध्याकाळी ५ वाजता ओझर ला पोचलो.

इथले वातावरण अप्रतिम होते. तलावातील होणार सूर्यास्ताचा नजारा पाहून इथंच मुक्काम करायचा निर्णय घेतला. रूम बुक केली आणि फ्रेश झालो. आणि थेट सूर्यास्त पाहायला तलावाच्या किनाऱ्यावर जाऊन बसलो. वारा नसल्याने पाणी जणू आरश्यासामान भासत होते. सूर्यास्त पाहिल्यानंतर चहा घेऊन मंदिरात दर्शनाला गेलो, सुंदर दर्शन आणि त्याच सोबत धुपारती मिळाली. त्यामुळे मन प्रसन्न झाले. साधारण एक तासाने मंदिरातून बाहेर आलो आणि जेवण करून लवकर झोपी गेलो.

Sunset at Ozar

अंतर: रांजणगाव ते ओझर: ७० km, २ तास

६) गिरिजात्मज मंदिर (लेण्याद्री):

दुसऱ्यादिवशी म्हणजेच रविवारी सकाळी ४ ला उठून सर्व यावरून आम्ही ओझर पासून जवळ असलेल्या लेण्याद्रीला पहाटे ५.४५ ला पोचलो. इथे गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी डोंगरावर चढून जावे लागते. पालखीची पण सोया आहे. १५ मिनट मध्ये तुम्ही खालून डोंगरावरील मंदिरात पोचू शकता.

आम्ही लवकर आलो होतो पण इथे सकाळी ७ शिवाय गेट उघडत नाहीत. तोपर्यंत आम्ही नाश्ता करून घेतला. आणि ७ ला गेट उघडल्यावर पटापट वर गेलो आणि दर्शन घेतले. आम्ही पुढे असल्याने दर्शनाला वेळ लागला नाही, पण पुन्हा खाली उतरत असताना खूप गर्दी जाणवली. गिरिजात्मजाचे दर्शन घेऊन, थोडे फोटो काढून खाली आलो. त्याचसोबत इथून सूर्य उगवताना पाहून खूप आनंद झाला. त्यानंतर खाली येऊन ८. ३० वाजता आमचा पुढील प्रवास सुरु झाला.

Sunrise at lenyadri

अंतर: ओझर ते लेण्याद्री: १४ km, २० मिनटे

७) वरदविनायक मंदिर (महड):

लेण्याद्री इथून आम्ही सकाळी ८. ३० ला निघालो. आता आम्ही इथून रायगड जिल्ह्यातील महड ला जाणार होतो. आजचा प्रवास आमचा अतिशय खडतर आणि अडव्हेंचरस होणार होता याची कल्पना आली होती. २६ km प्रवासानंतर एक धरणाचे बॅकवॉटर लागले, धरणाच्या बॅकवॉटर च्या मागे उंच सह्याद्री आणि सिंदोळा किल्ल्याचे अप्रतिम दृश्य दिसत होते. तिथे थोडे फोटो काढून झाल्यावर आम्ही पुढे निघालो. थोडे अंतर गेल्यावर माळशेज घाट सुरु झाला.

आतापर्यंत मी माळशेज घाट कधीही पहिला न्हवता, पण इच्छा होती ती पूर्ण झाली. माळशेज ची उंची आणि खोली मला जास्तच वाटली. इथे अनेक प्रकारचे फोटो काढून पुन्हा एकदा भरपेट नाश्ता करून घाट उतरायला सुरु केले.

माळशेज घाट खूप लांब आणि वळणदार रस्त्यांचा आहे. प्रत्येक वळणावरती माळशेज घाट तुम्हाला अवाक करतो. अनेक वळणानंतर शेवटी आम्ही माळशेज घाट संपवून खाली उतरलो. वाटेत एका माकडाला गाडीने धडक दिली होती, त्यामुळे ते निपचित पडले होते. त्याला थोडे पाणी पाजल्यावर ते पटकन उठून जंगलात पळून गेले. तिथून थोडे पुढे जाऊन आम्ही मुरबाडला जाणारा रास्ता सोडून कर्जत कडे वळलो. घाट उतरल्यानंतर आता ११ – १२ च्या दरम्यान ला खूप तीव्र ऊन लागत होते. त्यात दमट हवा, खूप त्रास होत होता.

थोड्या थोड्या वेळाने थांबत आम्ही २ वाजता महड ला पोचलो. इथे प्रचंड गर्दी होती. साधारण दीड तासानंतर मस्त दर्शन झाले आणि आम्ही ४ च्या दरम्यान ला आमचा पुढच्या प्रवासाला लागलो.

अंतर: लेण्याद्री ते महड: १४२ km, ५ तास ३० मिनिटे

८) बल्लाळेश्वर मंदिर (पाली):

आम्ही संध्याकाळी ४ वाजता महड येथून निघालो आणि पाली च्या रस्त्याला लागलो. खोपोली वगैरे परिसरात फिरताना खूप हवेचे प्रदूषण जाणवते. अजूनही उन्हाची तीव्रता बरीच होती. इथून एक तासाच्या अंतरावर असलेल्या पाली येथील बल्लाळेश्वर मंदिरात ५ ला पोचलो.

या मंदिराचा भौगोलिक परिसर खूप सुंदर आहे. एकदम निसर्गाच्या सानिध्यात. मंदिराच्या जवळील उंच डोंगर, त्यावरील सुधागड किल्ला आणि भरपूर झाडी यामुळे परिसर सुंदर आणि प्रसन्न आहे. मंदिरात अजिबात गर्दी नसल्याने लवकर दर्शन झाले.

सूर्य पूर्ण मावळतीकडे झुकला होता. हवा थोडी थंड झाली होती. संध्याकाळी मंदिरातून बाहेर पडल्यावर एक चहा घेऊन आम्ही ६ वाजता पुण्याला निघायचा ठरवलं. आणि ६ ते ६. ३० च्या दरम्यान निघालो. पालीहून पुण्याला जाण्यासाठी २ रस्ते आहेत. एक आहे जो पुन्हा खोपोलीकडे जाऊन लोणावळामार्गे पुणे. आणि दुसरा म्हणजे ताम्हिणीमार्गे पुणे.

आम्हाला घाट रस्त्यांवरून राइड करण्यात जी मजा आहे ती हायवे राइडला येत नाही. आणि ताम्हिणी म्हणजे जीव कि प्राण. त्याचसोबत वरचेवर राइड मुळे ताम्हिणीचा रास्ता पूर्णपणे पाठ झालेला आहे. त्यामुळे आम्ही ताम्हिणीमार्गे पुणे हा रास्ता परत पुण्याला जाण्यासाठी निवडला.

मस्त आरामात आम्ही गाड्या चालवत होतो. असंख्य वळणांच्या, घनदाट जंगलांनी वेढलेल्या रस्त्याने गाडी चालवताना मधून मधून उजव्या बाजूला सूर्य मावळात होता याची झलक दिसत होती. एका ठिकाणी उंच टेकडीवर थांबून सूर्यास्त पहिला. २ दिवसात आम्ही दोन्ही वेळेला सूर्य उगवताना आणि मावळताना पहिला होता, तेही वेगवेगळ्या रूपात आणि रंगात. या आठवणी कधीच विसरता येत नाहीत. आता अंधार पडायला सुरवात झाली, आणि आम्ही ताम्हिणीच्या दिशेने निघालो.

आम्ही दोन दिवसांच्या अष्टविनायक यात्रेच्या अनेक चांगल्या आठवणी आयुष्यभरासाठी घेऊन, प्रवास सुखरूप पार पाडल्याबद्दल देवाला मनोमन धन्यवाद देत ताम्हिणी घाट मार्गे पुण्याला सुखरूप पोचलो.

धन्यवाद!!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *