गजेंद्र मोक्षाचे शिल्प | Sculpture of Gajendra Moksha

Marathi Explorer
3 Min Read

हळेबिडूच्या होयसळेश्वर मंदिरातील गजेंद्र मोक्षाचे भन्नाट शिल्प –

होयसळेश्वर मंदिराच्या बाह्यभागावर कोरलेल्या असंख्य शिल्पकृतीमंध्ये गजेंद्र मोक्ष ही भागवत पुराणातील ८ व्या स्कंधात येणारी विष्णूंच्या भक्तवत्सलपणाची कथादेखील उत्कृष्टपणे कोरली आहे. यात भगवान विष्णू गरुडावर बसून, गजेंद्र या हत्तीला मगरीच्या तावडीपासून वाचवण्यासाठी पृथ्वीवर आले, आणि श्रीविष्णूंच्या मदतीने, गजेंद्राला मोक्ष मिळाला हे अप्रतिम शिल्पातून दर्शविले आहे.(गजेंद्र मोक्षाचे शिल्प, Sculpture of Gajendra Moksha)

गजेंद्र मोक्षाची कथा :

एकेकाळी गजेंद्र नावाचा हत्ती वरुणाने निर्माण केलेल्या ऋतुमत नावाच्या उद्यानात राहत होता. हे उद्यान त्रिकुट पर्वतावर होते. हा गजेंद्र त्याच्या कळपाचा प्रमुख होता. एके दिवशी नेहमीप्रमाणे तो जलक्रीडा करण्यासाठी व त्यानंतर विष्णूची प्रार्थना करण्यासाठी कमळाची फुले घेण्यासाठी जवळच्या तलावावर गेला. अचानक तलावात राहणाऱ्या मगरीने गजेंद्रावर हल्ला केला आणि त्याचा पाय पकडला. गजेंद्रने मगरीच्या तावडीतून सुटण्याचा बराच वेळ प्रयत्न केला. त्याचा सर्व कळप, नातेवाईक आणि मित्र त्याला मदत करण्यासाठी आजूबाजूला जमले, पण व्यर्थ. मगर त्याला सहजासहजी सोडणार नाही व म्हणूनच गजेंद्राचा अंत जवळ आल्याचे लक्षात येताच त्याच्या कळपातील साथीदारांनी त्याला एकटे सोडले. तो वेदनांनी कळवळत आर्ततेने विव्हळू लागला आणि जेव्हा त्याला आपला अंत जवळ आल्याची जाणीव झाली तेव्हा गजेंद्राने त्याच्या दैवताला, भगवान विष्णूला, त्याला वाचवण्यासाठी आर्त साद घातली.

आपल्या भक्ताची साद ऐकून विष्णू घटनास्थळी धावले. देव येताना दिसताच गजेंद्राने आपल्या सोंडेने कमळ उचलले. हे पाहून विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने मगरीचे पोट फाडले. गजेंद्राने विष्णूंना साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी श्रीविष्णुंनी गजेंद्राला आठवण करून दिली की तो, त्याच्या मागील एका जन्मामध्ये, प्रसिद्ध पांड्य राजा इंद्रद्युम्न होता. हा राजा विष्णूचा परम भक्त होता, परंतु महर्षी अगस्त्यांचा अनादर केल्यामुळे, त्याला हत्तीच्या रूपात पुनर्जन्म घेण्याचा शाप मिळाला होता. राजा इंद्रद्युम्न हा विष्णूचा भक्त असल्याने त्याला गजेंद्र म्हणून जन्म मिळाला व इंद्रद्युम्न जेव्हा (गजेंद्र म्हणून) सर्व स्वतःला विष्णूला पूर्णपणे शरण जाईल तेव्हा त्याला मोक्षप्राप्ती होईल असा त्याला उशाप मिळाला होता.याचप्रमाणे मगर रूपातून भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्रामुळे मुक्ती मिळालेला “हुहू” नावाचा गंधर्व होता.

हळेबिडूच्या या गजेंद्रमोक्षाच्या शिल्पामध्ये गरुडावर बसून येणारे भगवान विष्णू, गजेंद्राने त्यांच्या स्वागतासाठी सोंडेने उंचावलेले कमलपुष्प व मगर रूपातून मुक्त होणारा “हुहू” गंधर्व, पाण्यातील मासे,कासव व त्या तळ्यातील कमलपुष्पे इतके सगळे बारकावे दर्शविले आहेत. याप्रसंगी गजेंद्राने केलेली भगवान विष्णूंची प्रार्थना गजेंद्र स्तुती नावाचे प्रसिद्ध स्तोत्र बनले.

… महेश नाईक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *