त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग
सह्याद्रिशीर्षे विमले वसन्तं गोदावरितीरपवित्रदेशे |
यद्धर्शनात्पातकमाशु नाशं प्रयाति तं त्र्यम्बकमीशमीडे ||
श्लोकाचा अर्थ –
पवित्र गोदावरीच्या देशात सह्याद्रीच्या शिखरावर सदा निवास करणाऱ्या त्रिमूर्तीरूप श्री त्र्यंबकेश्वराचे मी अनन्य भक्तिभावाने ध्यान करतो. शुद्ध भावाने जे भक्त इथे दर्शनाला येतात त्यांचे सर्व पाप नष्ट होतात.
त्र्यंबकेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.ते तालुक्याचे ठिकाण आहे.
त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय/मुख्य प्रशासकीय केंद्र आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे. गोदावरी नदीचा उगम येथेच झाला.
भौगोलिक स्थान
त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून 35 कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबई पासून १६५ कि.मी. अंतरावर असून पुण्यापासून 240 किलोमीटर वर आहे. हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे. याच ठिकाणी शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नांवाने प्रसिद्ध आहे.
श्री त्र्यंबकेश्वर मंदिर (इतिहास)
दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक हे शिवालय आहे.
ती शिवालये अशी :
गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर
वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय
धारणा नदीच्या उगमाशेजारचे –तऱ्हेळे येथे
बाम नदीच्या उगमाशेजारचे – बेलगावला
कडवा नदीच्या उगमाशेजारचे – टाकेदला
प्रवरा नदीच्या उगमाशेजारी – रतनवाडीतील अमृतेश्वर
मुळाउगमस्थानी असलेल्या – हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर
पुष्पावतीजवळ – खिरेश्वरातील नागेश्वर
कुकडीजवळ्च्या – पूरमधील कुकडेश्वर
मीना नदीच्या उगमाशेजारच्या – पारुंडेतील ब्रह्मनाथ
घोड नदीच्या उगमस्थानी – वचपे गावातील सिद्धेश्वर
भीमा नदीजवळचे –भवरगिरी
ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने सजलेली आहेत. यातच त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचा समावेश आहे. डोंगरामधून लहान असा एक रस्ता आहे. नानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७५५-१७८६ या कालावधीत हेमांडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधवले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला.
“गोदावरीतटी, एका ठायी नांदताती, ब्रह्मा, विष्णू, महेश वैकुंठचतुर्दशी, त्रिपुरीपौर्णिमा आणि महाशिवरात्रीस, भक्त लोटती, भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती”
ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे.
येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते.
गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे. येथून ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे जाणारा नयनरम्य असा घाट रस्ता आहे.
या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. मुख्यतः तांदूळ व नाचणी ही पिके घेतली जातात. ग्रामीण आदिवासींसाठी हे बाजाराचे गाव आहे. आदिवासी संघटना या भागात आदिवासींच्या हक्कांसाठी काम करीत असतात. मठांना इनाम मिळालेल्या जमिनी बहुधा येथील आदिवासी कसतात.
धार्मिक विधी आणि पूजा
त्र्यंबकेश्वर तीर्थ क्षेत्रात विविध प्रकारच्या पूजा व धार्मिक विधी केल्या जातात. त्यापैकी नारायण नागबळी ही विधी संपूर्ण भारतात फक्त त्र्यंबकेश्वर येथेच केली जाते. या व्यतिरिक्त कालसर्प पुजा, त्रिपिंडी श्राद्ध, कुंभ विवाह, रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय जाप, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थ विधी हे व इतर विधी त्र्यंबकेश्वर येथे होतात.
प्रेक्षणीय स्थळे
ब्रह्मगिरी – ब्रम्हगिरी प्रदक्षिणा (फेरी) ( त्र्यंबकेश्वर / नाशिक )
त्र्यंबकेश्वर – १२ ज्योतिर्लिंगापैकी एक, भाविक इथे महादेवाचे दर्शन घेतात, कुशावर्तात अंघोळ करतात, काही पूजा अर्चा ज्या फक्त इथेच होतात त्या करतात, त्यातले काही जण पाठीमागे असलेल्या ब्रह्मगिरी वर शंकराच्या जटा मंदिर पाहून परत येतात. पण मुळात या ब्रह्मगिरी पर्वतावर खूप काही आहे, या पर्वताला पौराणिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व आहे. आजच्या भटकंती मध्ये संपूर्ण ब्रह्मगिरी, आणि ब्रह्मगिरीच्या जोडकिल्ला दुर्गभांडार पाहणार आहोत तसेच मेटघरचा किल्ला म्हणजेच ब्रह्मगिरीच्या पाठीमागच्या बाजूने हत्तीदरवाजा गडाचे अवशेष पाहत खाली उतरू. आणि गडाला वळसा घालून पुन्हा त्र्यंबकेश्वर. थोडक्यात काय तर संपूर्ण ब्रह्मगिरी प्रदक्षिणा.
ब्रह्मगिरी :
त्र्यंबकेश्वर मंदिरामागे आडवी पसरलेली एक लांबच लांब डोंगररांग दिसते, हाच तो ब्रह्मगिरी पर्वत. या रांगेचा उजवीकडील भाग हा मूळ डोंगररांगे पासून थोडा वेगळा झालेला भासतो, एका नैसर्गिक भिंतीने हा उजवीकडील डोंगर मूळ ब्रह्मगिरी शी जोडला गेला आहे. हा ब्रह्मगिरीच्या जोडकिल्ला दुर्गभांडार.
त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कुशावर्तचे दर्शन घेतेले कि आपण ब्रह्मगिरी पर्वताच्या रस्त्याला लागतो, रस्ता व्यवस्थित बांधीव पायऱ्यांचा आहे, खरेतर हे बांधकाम अलीकडचे आहे. १९०८ मध्ये दोन शेठजीनी त्याकाळी ४०००० रुपये खर्च करून या पायऱ्या बांधल्या होत्या, हा मार्ग आजच्या तारखेला खूप चांगल्या स्थितीत आहे.
पुढे कातळात कोरलेल्या पुरातन पायऱ्या दर्शनी पडतात, हा पर्यायांचा मार्ग दगडात कोरून काढलेल्या दरवाजा ओलांडून आपल्यला ब्रह्मगिरी वर प्रवेश देते. पर्वताच्या माथ्यावर येताच आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात आणि बाजूलाच एक छोटेसे पाण्याचे टाके, हा वाडा मोरोपंत पिंगळे यांचा आहे असे सांगितले जाते , तर थोड्या अंतरावर दारुकोठार ही दिसते. पण एक प्रश्न डोक्यात येऊन राहतो कि दारू कोठार वाड्याच्या इतके जवळ कसे काय?
या वाड्याच्या अवशेषांचा रेफ्रेन्स शोधण्याच्या प्रयन्त केला पण काही सापडले नाही. इथून पुढे पायवाटेने आपण डोंगराच्या पलीकडच्या बाजूस पोहचतो. डावीकडे काही मंदिरे दिसतात आणि उजवीकडे थोडे दूर शंकराच्या जटाचे मंदिर दिसत असते. भगवान शंकरांनी या ठिकाणी गुढग्यावर बसून कातळावर जटा आपटल्या आणि गंगेचा इथे उगम झाला अशी अक्खय्यिका आहे .त्या जटा आणि गुढग्यांचे ठसे इथे कातळात पाहता येतात. हा झाला श्रद्धेचा भाग – इथून पुढे एक पाय वाट दुर्ग भांडार गडाकडे जाते. सहसा भाविक या वाटेला जात नाहीत.
पायवाट थोडीसी निसरडी आहे तर थोडे जपून, अर्धा तास चाललो कि समोर दुर्ग भांडारचे दर्शन होते, एका नैसर्गिक भिंतीने हा दुर्गभांडार मुख्य ब्रहागिरी पासून वेगळा झालेला दिसतो. या भिंतीवर उतरण्यासाठी कातळात कोरून काढलेल्या पायऱ्या आपल्याला उतारवय लागतात. नाशिक मधील किल्ल्यांचे हे वैशिष्ट , इथे कातळात कोरलेल्या सुबक पायऱ्या जागोजागी पाहायला मिळतात. दुर्ग-भांडारच्या पायऱ्यांचे वैशिष्ट म्हणजे उतरताना आपल्या तीनही बाजूंनी कातळ असतो फक्त डोक्यवरचे छत काय ते उघडे असते.
पायऱ्या संपल्या कि थोडे रांगत आपण भिंतीवर येतो, या भिंतीच्या माथ्यवरून चालताना दोन्ही बाजूला दरी दिसते – उजवीकडे त्र्यंबकेश्वर तर डावीकडे हरिहर / भास्करगडचा परिसर पाहत आपण दुर्गभांडार पाशी पोहचतो. इथून पुन्हा तश्याच कातळात कोरलेल्या पायऱ्या चढत आपण गडाच्या माथ्यावर जातो. इथून संपूर्ण ब्रह्मगिरी आपण पाहू शकतो. गडाच्या शेवटच्या टोकावर व्यवस्तीत बांधून काढलेला बुरुज पाहून पुन्हा परतीचा मार्ग चालू करावा.
पुन्हा महादेवाच्या जटाकडे आलो कि सरळ गंगेच्या ( गोदावरीच्या ) उगम स्थानाकडे जावे, इथे गौतम ऋषींचा आश्रम लागतो आणि अगदी थोड्या अंतरावर गोदावरीचे मंदिर, नदीचा प्रवाह गोमुखातून होतो. ब्रह्मगिरी वरून तीन नद्यांचा उगम होतो त्यातील अहिल्या आणि गोदावरीचा खाली मंदिराजवळ संगम होतो. भाविक शकयतो इथून मागे वळतात, आपण मात्र इथून सरळ सरळ समोर चालत जाणार आहोत, इथे पुढे आपल्याला किल्ल्याचे अवशेष दिसू लागतात, हा मेटघरचा किल्ला.
पायवाटेवर चालतना वर ब्रह्मगिरीची पाच शिखरे दिसतात, त्यामुळे ब्रह्मगिरीला पंचलिंगी असेही म्हटले जाते. या शिखरांची नावे – साद्य जटा , वामदेव , अघोर , ईशान आणि तट पुरुष. चालत चालत आपण गडाच्या दरवाज्यापाशी पोहचतो – या दरवाजास हत्ती दरवाजा म्हणतात. समोर तटबंदीचे अवशेष आहेत, दरवाजातून बाहेर पडले कि, घळीतून खाली उतरण्याची वाट आहे तर डाव्या बाजूला शेवटच्या टोकावर बुरुज दिसतो, ऐकीव माहितीप्रमाणे या बुरुजास विनय बुरुज म्हणतात ( reference सापडला नाही ).
बांधून काढलेल्या पायऱ्या काही ठिकाणी दिसतात पण वरची तटबंधी ढासळून खाली आल्याने पायऱ्या आणि वाट काही ठिकाणी मोडून गेली आहे. एका ठिकाणी तर लोखंडी शिडी ने खाली उतरावे लागते. गड उतरून खाली आलो कि काही समाध्या आणि वीरगळी दिसतात. इथून पुढे आपण डावीकडे वळतो आणि गडाच्या कातळ भीतीला समांतर चालत समोरच्या खिंडीपाशी येतो. खिंड ओलांडली कि अगदी १५ मिनिटात खाली उत्तरत त्रयम्बकेश्वर पाशी येतो. अश्या प्रकाराने संपूर्ण ब्राह्गिरीची प्रदक्षिणा पूर्ण होते.