अशक्य गोष्टी शक्य करता येतात । One day Trip: पुणे – रेवदंडा – कोर्लई – चौल – पुणे

Hosted Open
4 Min Read
पुणे-रेवदंडा-कोर्लई-चौल-पुणे

एकदिवसात सुद्धा अश्यक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करता येतात । पुणे – रेवदंडा – कोर्लई – चौल – पुणे । २१ तास – ३२० किमी

मित्रानो सर्वाना धाकडकीच्या जीवनातून आणि रोज चालणाऱ्या एकसारख्या कामातून काही वेळा बाहेर फिरून यावा असे नक्कीच वाटत असणार. मला तरी तसे नेहमी वाटते, मी प्रत्येक शनिवार आणि रविवार कुठेतरी नवीन काहीतरी फिरायचा प्लॅन नेहमीच करत असतो.

नुकताच मी मागच्या शनिवारी कोकणातील रेवदंडा, कोर्लई, चौल हि एकदिवसीय ट्रिप करून आलो.

कोर्लई-किल्ल्यावरून-दिसणारा-भव्य-समुद्र
कोर्लई-किल्ल्यावरून-दिसणारा-भव्य-समुद्र

थोडक्यात काय तर कोकणात जाऊन परत आलो, तेही ४ ठिकाणे निवांत फिरून. सुरुवातीला मलाही अश्यक्य वाटत होते, पण म्हणतात ना “योग्य नियोजन असेल तर कार्यक्रम करेक्ट होतो”, त्याच पद्धतीने शुक्रवारी रात्री अचानक प्लॅन केला.

प्रवासाला निघताना नेहमी सकाळी लवकर निघावे कारण पूर्ण दिवस व्यवस्थितपणे फिरत येते असा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. त्यानुसार मी शनिवारी पहाटे ४ वाजता पुण्यातून निघालो. सकाळच्या नयनरम्य, डोळ्यांना आणि मनाला शांती देणारा सूर्योदय मी ताम्हिणी घाटातून आणि मुळशी धरणाच्या पाण्याच्या लाटांतून पहिला. जंगलातील पक्ष्यांचे झोपेतून जागे होणे आणि चहुबाजूनी किलबिलाट करत नवीन दिवसाची सूर्याच्या दर्शनाने सुरुवात करणे हे खूप अविस्मरणीय होते. आणि हा अनुभव माझ्यासाठी खूपच विलक्षण होता.

ताम्हिणी-घाटातील-सूर्योदयापूर्वी-ची-वेळ

ताम्हिणी-घाटातील-सूर्योदयापूर्वी-ची-वेळहा प्रत्येकाने एकदातरी असा अनुभव घेणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढे निघालो आणि थोडा थांबत, फोटोग्राफी करत करत कोलाड पास करून रोहा याठिकाणी पोहोचलो. तेथे भरपेट नाश्त्यावर आडवा हात मारला आणि समुद्र साद घालू लागला. त्यानंतर गाडी थेट समुद्राच्या दिशेने वळवली आणि मी सकाळी ८ वाजता जाऊन पोहोचलो कोर्लई किल्ल्याच्या पायथ्याशी. किल्ला अतिशय सुंदर आहे. समुद्राच्या किनारी वसलेला हा पोर्तुगीजांनी वास्तव्य केलेला किल्ला आहे. त्यानंतर तिथून ११ च्या दरम्यान निघून थेट चौल या गावी पोचलो. चौल या गावात खूप पुरातन मंदिरे आहेत. आणि या गावाला मंदिरांच्या खूप जुना इतिहास सुद्धा आहे.

येथील राम मंदिर आवर्जून बघण्यासारखे आहे. मंदिरात दर्शन घेऊन मी रेवदंड्याच्या दिशेने निघालो. जेवणाची वेळ झाली होती. दुपारचे २ वाजले होते वाटेत एका हॉटेल मध्ये मस्त शुद्ध शाकाहारी जेवण करून रेवदंड्याचा किल्ला बघायला गेलो.

चौल
चौल

किल्ला बघून झाल्यावर तेथूनच बीच वर जाण्यासाठी रस्ता आहे. दुपारी ४ ला समुद्रकिनारी पोचलो होतो पण ऊन खूप असल्याने ४ ते ५ मस्त थंड वाऱ्यात झाडाखाली झोपलो. (बीच च्या शेजारी खूप झाडे आहेत, तिथे दुपारी बसू शकतो). ५ वाजता उठून फ्रेश झालो आणि मस्त पुन्हा फोटो सेशन केले. आणि नयनरम्य अवर्णनीय असा सूर्यास्त पाहायला निवांत वळून बसलो.

अश्या वेळी सूर्यास्त पाहत असताना खूपदा आपल्या जबाबदाऱ्या आणि भविष्य यांचेच विचार जास्त डोक्यात येतात. सूर्यास्त संध्याकाळी ६.४० वाजता झाला आणि मग तिथून सामानाची आवाराआवर केली आणि पुण्याला निघायचे ठरवले.

सूर्य जाताजाता मला एक नवीन च ऊर्जा आणि उमेद देऊन गेला होता. त्याच वेळी काही नवीन निश्चय केले आणि शांतपणे पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली.

रेवदंडा-बीच-सूर्यास्त
रेवदंडा-बीच-सूर्यास्त

आपली जिवाभावाची गाडी सोबतीला होतीच. येताना वाटेत ९ ते ९.३० च्या दरम्यान रात्री जेवण केले आणि पुन्हा ताम्हिणी घाट मार्गे रात्री १ वाजता पुणे गाठले.

तर मित्रानो एकंदरीत एकदिवसात मी इतक्या साऱ्या गोष्टी आणि ठिकाणे पहिली कि दुसऱ्या दिवशी माझाच माझ्यावर विश्वास बसला नाही. रेवदंड्याचा किल्ला, कोर्लईचा किल्ला, चौल गावातील ऐतिहासिक मंदिरे आणि बरेच काही. पण हे खरेआहे. आणि तुम्हीही हे एका दिवसात करू शकता.

माझी पूर्ण दिवसाची Trip मी खाली देत आहे, त्यानुसार जर तुम्ही गेलात तर खूप आरामात तुमचा प्रवास होईल. त्याच सोबत रेवदंडा येथे बीच वर राहण्यासाठी सुद्धा खूप छान सोयी आहेत. त्यामुळे तुम्ही राहण्यासाठी जरी विचार करत असाल तरी काहीही हरकत नाही.

पुणे – रेवदंडा – कोर्लई किल्ला – चौल एकदिवसीय प्रवास : २१ तास – ३२० किमी

१. सकाळी ४ वाजता पुण्यातून निघणे.

२. मार्ग: पुणे – पिरंगुट – ताम्हिणी घाट – कोलाड – रोहा – कोर्लई किल्ला – रेवदंडा – चौल

३. निवांत प्रवास करत ८ पर्यंत रोहा येथे पोहोचतो.

४. येथे भरपूर नाश्ता करून थेट येथून ४० किमी अंतरावरील समुद्राच्या काठावर असलेल्या कोर्लई किल्ल्याला जायचे. (सकाळी लवकर उन्हाचा जास्त त्रास होत नाही)

५. पूर्ण किल्ला २ तासात बघून होतो.

६. त्यानंतर तोडा अराम करून चौल या ३ किमी अंतरावरील गावी जाणे.

७. येथे खूप पुरातन मंदिरे आहेत. त्याच बरोबर मराठी शिलालेख हि येथे आढळून आलेत.

७. मंदिरे बघून झाल्यावर दुपारी २ ते ३ च्या मध्ये जेवण करणे.

८. त्यानंतर रेवदंडाचा किल्ला बघणे. (या किल्ल्याला जास्त चढाई नसल्यामुळे दुपारी सुद्धा हा किल्ला आपण बघू शकतो.)

९. त्यानंतर येथूनच समुद्रावर उतरून सुंदर सूर्यास्ताचा आनंद घेणे.

१०. सूर्यास्त झाल्यावर थोडाफार पुन्हा नाश्ता करून पुण्याला परत येणे. येताना रात्रीचे जेवण करून आले तरी सुद्धा १ पर्यंत पुण्यात पोचता येते.

धन्यवाद !!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *