पुणे ते रेवदंडा, कोर्लई आणि चौल: एकदिवसीय कोकण रोड ट्रिप (320 किमी, 21 तासात)
एक दिवस, चार ठिकाणं, 320 किमी प्रवास – पुणेहून एक रोमांचक आणि संस्मरणीय कोकण सफर.
अगदी खरं सांगायचं झालं, तर हा अनुभव फक्त एक ट्रिप नव्हता, तो एक दिवसभर जगलेला, अनुभवलेला आणि मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेला एक सुंदर क्षण होता. सगळं अचानक ठरलेलं, पण त्याचं नियोजन एवढं मस्त जमून आलं, की वाटायला लागलं कि “कधी कधी अचानक घेतलेले निर्णय आयुष्यभर लक्षात राहतात”
शनिवारी पहाटे ४ वाजता पुण्यातून गाडी काढली आणि कोकणाच्या दिशेने सुटलो, ताम्हिणी घाटातून जाताना, अचानक समोर सूर्याचे कोवळे किरण झाडांच्या फांद्यांच्या आडून जमिनीवर पडताना दिसले, आणि तो नजारा.. अर्रर्रर्रर्र. मुळशीच्या पाण्यात उमटणाऱ्या हलक्या लाटांवर सूर्यकिरणांचे प्रतिबिंब पाहून क्षणभर भान हरपलं.
घाटामधल्या जंगलात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. झाडांच्या पानांमधून सूर्याकडे पाहणाऱ्या प्रत्येक पक्ष्याच्या आवाजात नवीन दिवसाची ऊर्जा जाणवत होती. तो क्षण अक्षरशः मंत्रमुग्ध करणारा होता. पुढे रोहा ला थांबलो. कोलाड पार करताना मधे मधे थांबत फोटोग्राफी केली, कारण निसर्ग प्रत्येक क्षणी वेगळं काहीतरी दाखवत होता. रोहा गाठल्यावर गरमागरम वडापाव आणि कटिंग घेतला. आणि समुद्राने खुणवायला सुरुवात केली.
आम्ही सकाळी ८ वाजता कोर्लई किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो होतो. समोर विस्तीर्ण समुद्र, आणि त्याच्या कुशीत विसावलेला हा जुना पोर्तुगीज किल्ला. किल्ला बघून झाल्यानंतर तिथून निघालो आणि साधारण ११ च्या सुमारास चौल या गावात पोचलो. इथली मंदिरे खूप पुरातन, पण त्यांचं तेज अजूनही तसंच आहे. खास करून राम मंदिर, अतिशय शांत, सात्त्विक आणि भारावलेलं असं मंदिर आहे.
आता बऱ्यापैकी भटकंती झाल्याने भूक पण लागलेली आणि दुपारचे २ वाजले होते. वाटेत एका हॉटेलमध्ये चविष्ट शुद्ध शाकाहारी जेवण घेतलं आणि मग पोचलो रेवदंड्याच्या किल्ल्यावर. हाच तो क्षण जिथे वाटलं “दुपारच्या उन्हात सुद्धा इतिहासात हरवून जायला हरकत नाही.”
रेवदंडा किल्ल्याजवळच समुद्रकिनारा आहे. मी दुपारी ४ वाजता तिथे पोहोचलो. ऊन खूप होतं, म्हणून बीचलगत झाडांच्या सावलीत थोडा वेळ ताणून झोप काढली, निवांत, शांत, वाऱ्याच्या झुळुकीत डोलत २५ ते ३० मिनिटांची झोप खूपच ताजेतवाने करून गेली.
त्यानंतर फ्रेश झालो, थोडं फोटो सेशन केलं आणि मग बसलो समुद्राकडे पाहत. त्या एका अप्रतिम सूर्यास्तासाठी.
संध्याकाळी ६.४० ला सूर्यास्त झाला. पण त्याच्यासोबत गेलेला दिवस मला एक नवीन उमेद, नवीन उर्जा देऊन गेला होता. त्या निवांत संध्याकाळीत स्वतःशीच संवाद झाला, भविष्याचा विचार, जबाबदाऱ्यांची जाणीव आणि काही नव्या संकल्पांची रुजवण सुद्धा इथेच झाली.
आता अंधार पडायला सुरु झाला, सामान आवरलं आणि पुण्याच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला. जशी रात्र वाढत गेली, तशी गाडी आणि मी दोघंही शांत झालो. वाटेत रात्री ९.३० च्या सुमारास जेवण घेतलं आणि पुन्हा ताम्हिणी घाट मार्गे, रात्री १ वाजता पुण्यात पोहोचलो.
या एका दिवसात मी कोर्लई किल्ला, रेवदंडा किल्ला, चौल गावातील मंदिरं, आणि एक अविस्मरणीय सूर्यास्त अनुभवला. खरंच, दुसऱ्या दिवशी उठल्यावर स्वतःलाच विश्वास बसत नव्हता की हे सगळं एका दिवसात शक्य झालं. पण झालं…
आणि म्हणूनच मी म्हणतो “तुम्ही सुद्धा हे करू शकता” फक्त थोडंसं नियोजन, आणि मनात फिरायची आवड पाहिजे.
का करावी ही ट्रिप?
आपण जर “पुण्याजवळची एकदिवसीय ट्रिप”, “कोकण रोड ट्रिप“, किंवा “कोर्लई किल्ला ट्रॅव्हल गाईड” अशा गोष्टी शोधत असाल, तर ही ट्रिप तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. रेवदंडा बीचचा नयनरम्य सूर्यास्त, कोर्लई किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा आणि चौलची शांतता, हे सर्व एका दिवसात अनुभवता येते.
ट्रिप प्लॅन ओव्हरव्ह्यू:
- पुणे – रेवदंडा – कोर्लई – चौल – पुणे
- प्रवासाचा कालावधी: 21 तास
- एकूण अंतर: अंदाजे 320 किमी
- प्रवासाचा प्रकार: बाईक किंवा कार ट्रिप
- सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते फेब्रुवारी
- मार्ग: पुणे → पिरंगुट → ताम्हिणी घाट → कोलाड → रोहा → कोर्लई किल्ला → रेवदंडा → चौल → पुणे
माझे थोडक्यात प्रवासवर्णन:
पहाटे सुरुवात: ताम्हिणी घाटातला सुर्योदय
सकाळी ४ वाजता पुण्यातून निघालो. ताम्हिणी घाटातून प्रवास करताना सूर्योदयाच्या वेळचे दृश्य अतिशय मंत्रमुग्ध करणारे होते. निसर्गाची शांतता, मुळशी धरणाच्या लाटांमधून झेपावणारे सूर्यकिरण. हा अनुभव शब्दांत मांडता येत नाही.
सकाळचा ब्रेक आणि कोर्लई किल्ला
८ वाजता रोहा इथे नाश्ता करून कोर्लई किल्ल्याच्या दिशेने वाटचाल केली. हा समुद्रकिनारी असलेला पोर्तुगीज काळातील किल्ला आहे. किल्ल्याच्या टोकावरून दिसणारा अरबी समुद्र आणि कोर्लई लाइटहाऊस हे इथे मुख्य आकर्षण आहेत.
चौल गाव: पुरातन मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तू:
कोर्लईहून अवघ्या ३ किमी अंतरावर चौल हे ऐतिहासिक गाव आहे. येथे प्राचीन हिंदू मंदिरे, मराठी शिलालेख आणि शांततेने भरलेले छोटे रस्ते यामुळे इथे वेगळ्याच जगात आल्यासारखे वाटते. विशेषतः येथील राम मंदिर बघणे अत्यावश्यक आहे.
दुपारचे जेवण आणि रेवदंडा किल्ला:
२ वाजता स्थानिक हॉटेलमध्ये शुद्ध शाकाहारी जेवण घेतले. त्यानंतर रेवदंडा किल्ल्याच्या दिशेने निघालो. रेवदंडा किल्ला हा देखील समुद्रकिनारी वसलेला, पुरातन बांधकामाचा नमुना असलेला एक कमी प्रसिद्ध पण अप्रतिम ठिकाण आहे.
रेवदंडा बीचवर सूर्यास्त आणि विश्रांती:
४ वाजता: रेवदंडा समुद्रकिनारा – दुपारी झाडाखाली थोडा आराम केल्यावर, ५ नंतर फोटो सेशन आणि संपूर्ण सायंकाळ सूर्यास्ताच्या रंगांनी भरलेली अनुभवली. हा क्षण जणू आजचा दिवस सार्थकी लावणारा होता.
रात्री पुण्याला परतीचा प्रवास:
७ वाजता परतीस निघालो. रात्री वाटेत जेवण घेतले आणि रात्री १ वाजता पुणे गाठले.
तुमच्यासाठी टाइम वाइज ट्रिप शेड्युल:
4:00 AM: पुण्यातून प्रस्थान
7:30 AM: रोहा येथे पोहोचणे व नाश्ता
8:30 AM: कोर्लई किल्ला दर्शन
11:00 AM: चौल गाव व मंदिरदर्शन
2:00 PM: दुपारचे जेवण
3:00 PM: रेवदंडा किल्ला
4:00 PM: रेवदंडा समुद्रकिनाऱ्यावर आराम
6:40 PM: सूर्यास्त
7:00 PM: पुण्याकडे प्रयाण
1:00 AM: पुणे आगमन