आपल्यापैकी अनेक जणांना गगनबावडा हे नाव नवीन असेल, पण कोल्हापूर, सांगली, आणि सिंधुदुर्ग मधील सर्वाना हे नाव नक्कीच ओळखीचे असणार. कारण गगनबावडा हे ठिकाणच असं आहे. निसर्गाची देणगी लाभलेलं, शांत, आणि सुंदर. कोल्हापूर मधून कोकणात उतरण्यासाठी अनेक घाट आहेत जसे कि करूळ घाट, भुईबावडा घाट, आंबा घाट, अणुस्कुरा घाट, फोंडा घाट, आंबोली घाट. त्यापपैकी करूळ घाट च्या वर असलेले ठिकाण म्हणजेच “गगनबावडा” होय.
घनदाट जंगलं, धबधबे, घाटमाथ्यावर पसरणारे ढग, आणि थंड हवामान यामुळे गगनबावडा हे महाराष्ट्रातील एक अप्रतिम पर्यटनस्थळ बनले आहे. हे ठिकाण कोकण आणि डोंगरमाथा यांचा संगम साधणारे असल्यामुळे याला “कोकणचा दरवाजा” असेही म्हटले जाते.
कोल्हापूर पासून तुम्ही जसजसे पश्चिमेला जाल तसतसे तुम्हाला निसर्ग बदलताना दिसेल. हळूहळू माती, झाडांचे प्रकार, शेती, घरांचे आकार आणि रूप, गावे, हे बदलताना दिसेल. हे सर्व काही वेगळं वाटू लागतं. गगनबावडा हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेले अतिशय सुंदर, निवांत, थंड, ठिकाण असून ते तालुकाचे ठिकाणही आहे, हे ठिकाण कोल्हापूर पासून साधारण ५० किलोमीटर आहे. या ठिकाणाची समुद्रापासूनची उंची साधारण ३००० फूट आहे. त्याचमुळे इथले हवामान वर्षभर थंड असते.
एका बाजूला दाजीपूरचे घनदाट जंगल आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी, तर त्याच्याच मधोमध एखाद्या भिंती सारखा उभा असलेला आपला सह्याद्री, या सर्वांच्या अधेमधे असलेले लहान लहान अणदूर डॅम, गगनबावडा डॅम आणि नद्या, हे सर्व गगनबावड्याला इतर ठिकाणांपासून वेगळे करते. इथे निसर्ग खूपच सुंदर असून हवामान अतिशय उत्तम आहे. उन्हाळ्यामध्येही इथे फॅन लावायची गरज पडत नाही. त्याचमुळे मी तर इथे जाण्यासाठी फक्त कारणंच शोधात असतो. इथे जाऊन फक्त परत आला तरी आपल्याला खूप रिलॅक्स झाल्यासारखे वाटते. फक्त जायचे चहा प्यायचा आणि सनसेट बघून परत यायचं.. बास विषय कट..
सह्याद्री मध्ये अनेक थंड हवेची ठिकाणे आहेतच, त्यात काय वादच नाही पण गगनबावडा इथे त्यांच्या पेक्ष्या थोडे वेगळेपण जाणवते. म्हणजेच इथे महाबळेश्वर प्रमाणेच जंगलांचे प्रमाण अधिक आहे, कदाचित गगनबावडा इथे थोडे जास्तच.
गगनबावडा ची भोगोलिक रचना बघितली तर सह्याद्रीच्या पश्चिम बाजूला एकदम खोल दरी आणि उंच कडे असून जसजसे पूर्वेकडे जाल तसतसे उंची कमी व्हायला किंवा नॉर्मल व्हायाला जवळजवळ कोल्हापुरात यावे लागते.
गगनबावडा इथे मोठ्याप्रमाणात जैवविविधता आढळते, जंगली प्राणी आहेत. आणि बरेच काही. जर मध्यरात्री इकडे गेलात तर बिबट्याचे, गव्यांचे दर्शन सुद्धा घडते.
गगनबावडा इथे गगनगिरी महाराजांचा मठ सुद्धा आहे. हे एक मोठे धार्मिक ठिकाण आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही पंत अमात्य वाडा पाहू शकता. करूळ घाट पाहू शकता, गगनबावडा डॅम वर जाऊन दिवस एन्जॉय करू शकता. जातानाच वाटेत पांडवकालीन लेण्या आहेत, तर त्या सुद्धा पाहू शकता. थोडक्यात काय तर गगनबावड्याला जाणार तर जास्त पळापळ करू नये, हे निवांत ठिकाण आहे, त्याला ठसेल निवांत अनुभवायचे असते.
निसर्गरम्य ठिकाणं आणि घाट:
- गगनगिरी महाराज मठ
- पंत अमात्य वाडा
- गगनबावडा डॅम
- अणदूर डॅम
- पांडवकालीन लेण्या
- करूळ घाट
- भुईबावडा घाट
- सह्याद्री पर्वतरांगांचं दृश्य
गगनबावडा इथून खाली कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरता येते. त्यासाठी दोन सुंदर असे घाट रस्ते आहेत. एक करूळ घाट आणि दुसरा भुईबावडा घाट. हे दोन्ही घाट अनुक्रमे करूळ आणि भुईबावडा या गावात उतरतात म्हणून त्यांची हि नावे आहेत. करूळ मार्गे सरळ वैभववाडी, कणकवली जात येते तर ज्यांना राजापूरला जायचे असेल त्यांच्यासाठी भुईबावडा घाट सोयीचा आहे.
- करूळ घाट मार्गे आपण थेट वैभववाडी, कणकवली या ठिकाणी जाऊ शकतो.
- तर भुईबावडा घाट राजापूरकडे जाणाऱ्यांसाठी सोयीचा आहे.
गेल्या वर्षभरापासून बंद असलेला करूळ घाट आत्ताच नव्याने बांधाला असून आता तो पुर्ण रुंद करून भक्कम केला आहे. कारण इथे प्रचंड पाऊस पडतो. आणि पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रमाण खूप आहे. दुसरीकडे भुईबावडा घाट करुळच्या तुलनेने थोडा अरुंद आहे. पुण्य, मुंबई वरून सिंधुदुर्ग, गोवा इथे जाणाऱ्या अनेक जणांचा करूळ घाट हा आवडीचा घाट आहे.
गगनबावडा इथे पोचण्यासाठी तुम्ही कोल्हापूर मार्गे जाऊ शकता. जवळचे रेल्वे स्टेशन हे कोल्हापूर आहे किंवा जर कोकण रेल्वे ने प्रवास केला तर वैभववाडी हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
गगनबावडा इथे राहण्याचीही उत्तम सोय आहे. इथे अनेक हॉटेल्स, खाजगी रिसॉर्ट्स आणि MTDC रिसॉर्ट सुद्धा आहेत. तर मग एकदातरी अश्या या सुंदर ठिकाणाला नक्की भेट द्या. यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढायची सुद्धा गरज नाही, कोकणात किंवा गोव्याला जात येत सिद्ध इथे तुम्ही थांबून हा अनुभव घेऊ शकता. आणि जर पावसाळ्यात इथे गेलात तर जणू स्वर्गात गेल्यासारखे वाटेल.
जर तुमच्याकडेही गगनबावड्याबद्दल अजून काही माहिती असेल तर आमहाला नक्की कमेंट मध्ये कळवा.
धन्यवाद.