मुसळधार पाऊसात सुधागड ट्रेकिंग आणि कॅम्पिंग अनुभव
मी आणि माझे मित्र मिळून बऱ्याच दिवसांपासून कुठेतरी कॅम्पिंग ला जायचा विचार करत होतो. प्रत्येक वीकेण्ड ला तर ताम्हिणी किंवा सह्याद्रीत कुठेतरी फेरफटका आम्ही मारताच असतो. पण कॅम्पिंग चा योग्य काय जुळत न्हवता.
जुलै चा महिना सुरु झाला, प्रचंड पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि आमची पाऊसात कॅम्पिंग करायची हौस अजूनच वाढली. या वर्षी पाऊस बऱ्यापैकी चांगला चांगला असल्याने सह्याद्रीने एव्हाना हिरवा शालू ओढला होता, जिकडे बघेल तिकडे प्रसन्न वातावरण होते. एका विकेंडला ताम्हिणी त फिरताना निसर्ग पाहून मन प्रसन्न झाले. आणि लगेच ठरवले कि पुढच्या शनिवारी सुधागड ला कॅम्पिंग ला जायचे.
आम्ही ३ जण तयार झालो आणि ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी सुधागड ला निघालो. २ गाड्या, ३ जण. सर्व कॅम्पिंग चे सामान गाड्यांवर बांधून पुणे – ताम्हिणी – भागड – सुधागड असा हा आमचा ३, ४ तासांचा प्रवास सुरु सुद्धा झाला.
पाऊस प्रचंड असल्याने २ – २ रेनकोट घातले होते, त्याच सोबत गडावर राहण्यासाठी टेन्ट पण घेतलेला. बरोबर थंडीचे कपडे हि होते. सामान खूप होते आणि भिजूही द्याचे न्हवते म्हणून त्यालाही प्लास्टिक घालून तोडकंमोडक जुगाड करून पॅक केले आणि आम्ही निघालो ताम्हिणीकडे.
ताम्हिणी प्रत्येक आठवड्यात पाहत असल्याने आम्ही ताम्हिणीत न थांबण्याचा निर्णय घेतला. माझा एक अनुभव आहे..
सह्याद्री कधीच कोणाला नाराज करत नाही. प्रत्येकवेळी तुम्हाला काही ना काही नवीन देतच असतो.
आणि वरील ओळींप्रमाणेच इतक्या वेळा ताम्हिणी पाहूनही आज तोच रास्ता अत्यंत सुंदर, वेगळा दिसत होता. थांबायचं नाही असा ठरवून हि एका ठिकाणी थांबण्याचा मोह आवरला नाही, आणि एक धबधब्याजवळ थांबलो आणि फोटो वगैरे काढून पुढे निघालो.
२ तासातच ताम्हिणी पार करून घाटाखाली नाश्त्याला थांबलो. मस्त पैकी मिसळीवर ताव मारला आणि चहा पिऊन तरतरी आल्यावर पुढील प्रवासाला निघालो. २ रेनकोट घातल्यामुळे एवढ्या पाऊसात गाडीवर प्रवास करूनही जराही भिजलो नाही.
इथून सुधागड २६ km होता पण वेळ १ तासापेक्षा जास्त लागत होता. ५० – ६० च्या स्पीड ने गाड्या पळवत आम्ही सुधागड लवकरात लवकर जवळ करण्याचा प्रयत्न करत होतो. कारण अंधार पाड्याच्या आधी आम्हाला गडावर जायचे होते. आणि कॅम्पिंगला एक जागा फिक्स करून सेटअप करायचा होता.
रस्ता अतिशय सुंदर आणि वातावरण तर एकदम कडक होते. गाड्या चालवायला अजूनच मजा येत होती. इथे निसर्गाचे एक गणित आहे, सह्याद्रीला जे ढग तटतात आणि त्यातून जो पाऊस पडतो ते सर्व पाणी पश्चिम दिशेला वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते. त्यामुळे वर पडणाऱ्या पाऊसाचे पाणी उसळत खाली येताना पाहून एक नंबर वाटत होते.
प्रवासाची मजा घेत घेत दुपारी १ वाजता सुधागडच्या पायथाला पोचलो. मिसळ दाबून खाल्याने अजून भूक काय लागली न्हवती, पण आमच्या बरोबर खायला प्यायला काय तोटा न्हवता. सर्व सामन आधीच टोप अप केले होते.
एक रेनकोत घेऊन आणि सर्व सामान पाठीवर बांधून गाड्या लॉक केल्या आणि आम्ही गड चढायला सुरुवात केली.
साधारण दुपारी दीड दोन च्या दरम्यानला आम्ही गडावर चढायला सुरुवात केली. वातावरण म्हणाल तर पाऊस आता थांबला होता पण समुद्र सपाटी ला आम्ही असल्यामुळे हवेत दमटपणा भरपूर होता. त्यामुळे थोडं चाललं तरी पण लवकर दम भरायचा, असं वाटत होते की वारा वाहत नाही की काय? का ते समजत नव्हतं पण खूपच दम लागत होता. बसत उठत हाल्या हाल्या करत आमचा ट्रेक चालू होता.
सुधागडचा ट्रेक नॉर्मली करायचा असेल तर दोन अडीच तासात पूर्ण व्हायला पाहिजे, पण आम्हाला एवढा वेळ का लागत होता हे समजत नव्हते. मध्येच भरपूर पाऊस यायचा अचानक धुके यायचं असं सगळं निसर्गचा खेळ चालू होता. वातावरण एक नंबर झाल होतं, गडाच्या मध्यावर गेल्यानंतर एक लोखंडी शिडी लागते, आणि तिथून वर गेल्यानंतर वारे वाहायला सुरुवात झाली आणि हवा सुद्धा एकदम बदलली.
इथून पुढे एकदम एनर्जी आणि हुरूप आला असं म्हणू शकता, मग मात्र तिथून पुढे आम्ही कुठेही थांबलो नाही वीस पंचवीस मिनिटातच नॉनस्टॉप गडावर पोचलो. जे टार्गेट होतं अंधार पडायच्या आधी गडावर पोहोचणे ते पूर्ण झाले पण मुक्कामाचे ठिकाण अजून दूर होतं. जिथे मुक्काम करायचा होता त्या ठिकाणी जायला अजून अर्धा ते पाऊण तास पायपीट करावी लागणार होती, आणि तेव्हा देवाकडे एकच प्रार्थना करत होतो पाऊस किती पण पडू दे, पण धुकं पडायला नको.
कारण धुकं पडलं तर अजिबात रस्ता दिसत नाही आणि एकदा का रस्ता चुकला तर परत योग्य रस्त्यावर यायला सकाळच होत्या, हा आमचा मागच्या ट्रेकचा अनुभव होता त्यामुळे शिवाजी महाराज की जय म्हणून आम्ही होते नव्हते ते सगळे बळ एकत्र आणले आणि झपाझप पावले टाकायला सुरुवात केली अंधार पडायला साधारण पंधरा-वीस मिनिटे बाकी असतील सहा सव्वासाच्या दरम्यानला आम्ही वाघजाई मंदिराजवळ पोहोचलो.
गेल्या गेल्या तंबू सेट केला आणि चहा बनवला. आम्ही सगळं सामान सोबत घेतल होत. गॅस होता चहा पावडर, साखर असं सगळंच होतं. पावसामुळे साखरेत पाणी गेल्यामुळे साखर हळूहळू वितळायला सुरुवात झाली होती पण थोडीशी शिल्लक होती ती आम्ही वापरली, चहा पिला, बिस्कीट खाल्लं, आणि जी काही एनर्जी आली. बास्स.. काटाच.
चहा पितानाचे जे अनुभवत होतो ते शब्दात सांगता येणार नाही, पाऊस, धुके, वर आणि निसर्गरम्य सुधागड असे सर्व समोर होते. आणि आम्ही चहाचा आस्वाद घेत होतो.
बऱ्याच दिवसांपासून जो ठरवलेला ट्रेक होता तो 50% पूर्ण झाला असं म्हणायला काही हरकत नव्हती. अंधार एव्हाना चहा पिऊ पर्यंत पूर्ण पडला होता, वाघचाई मंदिराजवळ सोलारचा एक दिवा बसवलाय तो हळूहळू चालू होतो होता.
आमच्याकडच्या बॅटऱ्या वगैरे काढून आम्ही अंधारातच जागा सेट केली. अख्या गडावर आमच्या तिघांनी व्यतिरिक्त कोणीही नव्हतं. अराम झाल्यावर आम्ही घरातून आणलेले जेवण खाल्ले आणि मस्तपैकी झोपी गेलो, ते थेट सकाळी दुसऱ्या दिवशी डायरेक्ट ६ ला जाग आली.
पाऊस थांबलेला नव्हता मुसळधार पाऊस चालू होता सगळ्यात टेन्ट च्या चारी बाजूने पाणी वाहत होत. वॉटरप्रूफ टेन्ट असल्यामुळे आम्हाला त्याचं काय जाणीव झाली नाही सकाळी उठल्यानंतर थोडासा पाऊस थांबलेला बघून त्यांच्या बाहेर येऊन आम्ही चहा आणि मॅगी बनवून मनसोक्त निसर्गाचा आस्वाद घेत त्यावर ताव मारला. कारण किल्ला पाहायला आणि सर्व सामान घेऊन खाली उतरायला ताकत पाहिजे कि.
सकाळी सर्व आवरून सात वाजता आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. परतीचा मार्गही तितकाच सुंदर होता, पाऊस चालू होता, अधून मधून धुकं येत. रात्रीच्या मुसळधार पाऊसाने डोंगरावरचे ओढे नाले ओसंडून वाहत होते, जिथे रिस्क आहे होते ते ओढे नाले आम्ही क्रॉस करताना विशेष काळजी घेत घेत मजल दरमजल करत आम्ही साधारण 10, 11 च्या दरम्यान गडाच्या खाली आलो.
गाडी सोडून कुठं जायचं म्हंटलं कि माझ्या जीवावर येत. आल्याआल्या गाड्या तपासल्या, गाड्या सुरक्षित होत्या. गडाखाली आल्यानंतर स्थानिक लोकांना विचारल्यानंतर एका ठिकाणी चहा मिळाला. त्यांनी जो प्रेमाने आम्हाला चहा पाजला त्याची चव कुठेच येणार नाही.
सर्व सामान बांधलं, पॅकिंग केलं, डबल रेनकोट घातले, आणि बॅक टू पुणे.
परत येतानाचा रस्ता तोच होता. काल आम्ही तामिनी घाट बघितला होता त्यापेक्षा आज तामिनी घाट पूर्ण वेगळा जाणवत होता. रविवार असल्यामुळे आज गर्दी जास्त होती. त्याचबरोबर शनिवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे आज धबधबे ओसंडून वाहत होते. मजल दरमजल करत, आनंद घेत आम्ही संध्याकाळी ४ वाजता पुण्याला पोचलो.
बऱ्याच दिवसांपासून चे अपूर्ण राहिलेले ट्रेकिंग अँड कॅम्पिंग चे नियोजन आज देवाच्या कृपेने पूर्ण झाले. सुधागड ट्रेक पूर्ण करायला ३ तास लागतात. आम्ही जो अनुभव घेतला ते कितीही शब्दात सांगितलं तरीही वाचून त्याची १००% अनुभूती होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी पावसाळ्यात सुधागड ला भेट नक्की द्यावी. शक्य असल्यास मुक्काम करावा. गडाच्या खालच्या गावातील काही जण आहेत, त्यांना आधी कल्पना दिली तर ते गडावर जेवणाची सोय करतात, आणि श्री वाघजाईच्या मंदिरात झोपण्याची उत्तम व्यवस्था आहे.
सुधागडला कसे जायचे?
1. मुंबईहून: पालीमार्गे भोरगिरी गाठा. भोरगिरी येथून किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचता येते. सुमारे 110 किमी अंतर असून 3-4 तास लागतात.
2. पुण्याहून: ताम्हिणी घाटमार्गे पाली आणि तिथून भोरगिरीपर्यंत. पुण्यापासून सुमारे 120 किमी अंतर असून 3.5-4.5 तास लागतात.
चढाईसाठी लागणारा वेळ:
सुधागड किल्ल्याच्या चढाईसाठी सुमारे 2-3 तास लागतात. हा सोपा ते मध्यम श्रेणीतील ट्रेक मानला जातो, त्यामुळे नवशिक्यांसाठीही योग्य आहे.
किल्ल्यावर पाहण्यासारखे:
1. भव्य दरवाजे: महादरवाजा आणि परिसरातील तटबंदी.
2. भोराई देवीचे मंदिर: या मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे.
3. पुष्करणी तलाव: गडावर असलेले पाण्याचे मोठे स्रोत.
4. टकमक टोक: येथून खालचा निसर्गरम्य नजारा पाहता येतो.
5. गडाचे विस्तृत पठार: गडाच्या शिखरावरून भोरगड, रायगड आणि सरसगडाचे सुंदर दृश्य दिसते.
सुधागडची उंची:
सुधागड किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे 2,030 फूट (620 मीटर) आहे.
किल्ल्याचे महत्त्व:
सुधागड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महत्त्वाचा गड होता. रायगडाचा पर्याय म्हणून याचा विचार झाला होता. किल्ल्याचे भौगोलिक स्थान, संरक्षक रचना, आणि व्यापारी दृष्टिकोनातून याला मोठे महत्त्व आहे.
भेट देण्याचा सर्वोत्तम काळ:
ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा किल्ला पाहण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. पावसाळ्यानंतर हिरवळ भरते आणि वातावरण आल्हाददायक असते. ट्रेकसाठी उन्हाळ्याच्या दिवसांपेक्षा हिवाळा अधिक सोयीचा आहे.
सर्वानी गडकिल्ले नक्की फिरा पण कोणत्याही प्रकारे कचरा करू नका, किंवा आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असे वागू नका. हि विनंती.
धन्यवाद.