पुणे ते साऊथ इंडिया ९ दिवसांची अनप्लॅन्ड रोड ट्रिप | कन्याकुमारी, रामेश्वरम, केरळ संपूर्ण गाईड

Hosted Open
21 Min Read

पुणे ते साऊथ इंडिया ९ दिवसांची अनप्लॅन्ड रोड ट्रिप

कोणतीही ठोस योजना नसताना, शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमध्येच अचानक फिरायला जाण्याचा निर्णय घेतला. कुठे जायचं आणि किती दिवसांसाठी? यापैकी काहीच ठरलेलं नव्हतं. आमच्यातील एकाला गोवा पाहायचा होता, म्हणून “दक्षिणेकडे जाऊया” आणि येता जाता गोवा बघूया एवढं ठरलं आणि आम्ही तात्काळ तयारीला लागलो. ऑफिसमधून घरी जाऊन घाईघाईत बॅग भरल्या आणि अवघ्या दोन तासांत पुन्हा सगळे एकत्र आलो. त्या क्षणापासून आमच्या अनपेक्षित रोड ट्रिपची खरी सुरुवात झाली.

आमच्यापैकी कुणालाही कल्पना नव्हती की केवळ २–३ दिवसांसाठी निघालेली ही ट्रिप थेट ९ दिवसांपर्यंत वाढेल आणि आयुष्यभरासाठी जपून ठेवावी अशी अविस्मरणीय आठवण बनून राहील.

कुठे थांबायचं, किती अंतर कापायचं, कुठे मुक्काम करायचा… काहीच ठरलेलं नव्हतं. फक्त एकच ठरलं होतं. गाडी सुरू करायची आणि निघायचं.

कधी कधी आखीव-रेखीव प्लॅनपेक्षा अनपेक्षित वळणं जास्त सुंदर ठरतात. या प्रवासात आमचा प्लॅन दररोज बदलत गेला. कुठे एखादं ठिकाण अपेक्षेपेक्षा जास्त आवडलं म्हणून तिथे जास्त वेळ थांबलो, तर कुठे थकवा किंवा हवामानामुळे रूट बदलावा लागला. या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमच्या या ९ दिवसांच्या प्रवासाचा सविस्तर रोड मॅप, दिवसनिहाय अनुभव, आणि आलेल्या चांगल्या-वाईट प्रसंगांमुळे कसा संपूर्ण ट्रिपचा चेहरामोहरा बदलत गेला हे सगळं वाचायला मिळेल.

पुण्याहून थेट दक्षिण भारताच्या टोकावर असलेल्या Kanyakumari पर्यंत आणि पुढे पवित्र तीर्थक्षेत्र Rameswaram पर्यंत गाडीने जाणं हा केवळ प्रवास नव्हता. ते एक स्वप्न होतं. प्रत्येक किलोमीटरसोबत रस्ते बदलत गेले, भाषा बदलली, लोकांचे चेहरे बदलले, आणि खाद्यसंस्कृतीची चवही बदलत गेली. महाराष्ट्रातील झुणका-भाकर ते दक्षिणेतील डोसा, फिल्टर कॉफी आणि सीफूड हा प्रवास चवींचाही होता.

या प्रवासातील सर्वात मोहक गोष्ट म्हणजे रस्त्यांची अप्रतिम गुणवत्ता आणि त्यांची निखळ सुंदरता. कधी वळणावळणाचे घाट, कधी दुतर्फा हिरवीगार झाडं, तर कधी समुद्रकिनाऱ्यालगत धावणारे महामार्ग. गाडी चालवताना थकवा जाणवतच नव्हता. जंगलाच्या मध्यभागी अचानक दिसलेले धबधबे, समुद्रावर अनुभवलेला सोनेरी सूर्यास्त, रस्त्याच्या कडेला पसरलेल्या कॉफी आणि रबरच्या बागा, उंच चंदनाची जंगले. निसर्ग प्रत्येक पाऊलावर आम्हाला थक्क करत होता.

हा प्रवास सह्याद्रीतील मुसळधार पावसातून सुरू झाला. घाटातील धुकं, ओलसर रस्ते आणि थंड वारा यांच्यातून आम्ही पुढे सरकलो. त्यानंतर कर्नाटकातील निसर्गरम्य Coorg च्या टेकड्या आणि Mysuru च्या शांत, स्वच्छ रस्त्यांचा अनुभव घेतला. आणि शेवटी तमिळनाडूच्या कडक उन्हात, अंगावर भाजून काढणाऱ्या उष्णतेत, कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी उभं राहून तीन समुद्रांच्या संगमाचा क्षण अनुभवला. तो क्षण आयुष्यभर लक्षात राहणारा होता.

ही फक्त रोड ट्रिप नव्हती; हा प्रवास होता अनुभवांचा, निसर्गाच्या प्रेमात पडण्याचा आणि क्षण जगण्याचा. पुढे आपण या संपूर्ण पुणे ते कन्याकुमारी रोड ट्रिपचा सविस्तर रोड मॅप, दिवसनिहाय प्लॅन आणि प्रत्येक टप्प्यावर आलेले रोमांचक अनुभव पाहूया.

Route: पुणे – गोवा – गोकर्ण – होन्नावर – मुरुडेश्वर – उडुपी – मंगलोर – संपजे – कूर्ग – म्हैसूर – सत्यमंगलम टायगर फॉरेस्ट – कोईमतूर – पल्लकड – कोची – अल्लेपी – तिरुअनंतपुरम – कन्याकुमारी – रामेश्वरम – धनुषकोडी – मदुराई – बेंगलोर – पुणे

१) पहिला दिवस: पुणे ते गोवा – पूर्ण वाचा

ठरल्याप्रमाणे शुक्रवारी रात्री सुमारे १०-११ वाजता आम्ही पुण्यातून गाडी काढली आणि निघालो. पुणे पार करून जेवायला थांबलो. आमच्यातील दीपक सर यांनी गोवा पहिला न्हवता तर त्याच्या आग्रहास्तव पहिला मुक्काम गोव्यात करायचा आणि दुसऱ्या दिवशी पहाटे उठून गोकर्णला निघायचं असा साधा प्लॅन ठरला.

पण निसर्गाने सुरुवातीलाच आमची परीक्षा घेतली. मुसळधार पावसामुळे प्रवास अतिशय संथ झाला आणि गोव्यात पोहोचायला आम्हाला शनिवारी सकाळी जवळपास ९ वाजले. रात्रभर ड्रायव्हिंग केल्यामुळे अंगात ताणचं राहिला न्हवता. नाश्ता केला आणि रूम बघून झोपलो ते थेट संध्याकाळीच जाग आली.

संध्याकाळीही पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता, त्यामुळे बाहेर फिरणं शक्यच झालं नाही. अशा प्रकारे पहिल्याच दिवशी आमचा प्लॅन पूर्णपणे कोलमडला. शेवटी परिस्थिती स्वीकारून रविवारी सकाळी गोकर्णला निघायचं ठरवलं. आणि इथूनच आमच्या ट्रिपमध्ये प्लॅनपेक्षा परिस्थिती महत्त्वाची ठरणार हे स्पष्ट झालं.

मार्ग: पुणे – सातारा – कोल्हापूर – निपाणी – आजरा – आंबोली – सावंतवाडी – गोवा
अंतर: ५७० km
टीप: सध्या कोकणात उतरणाऱ्या बऱ्याच रस्त्यांची रुंदीकरणाची कामे सुरु आहेत, त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

goa highway

२) दिवस दुसरा: गोवा ते मंगलोर – पूर्ण वाचा

रविवारी सकाळी लवकर उठून आम्ही गोव्याहून गोकर्णच्या दिशेने निघालो. गोवा ते गोकर्ण साधारण १०० किमी अंतर, पण त्या दिवशी अंतरापेक्षा हवामान जास्त महत्त्वाचं ठरत होतं. आजचा बेसिक प्लॅन ठरला होता गोकर्ण, मुरुडेश्वर, होन्नावर पाहायचं आणि रात्री उडुपीत मुक्काम करायचा, दुसऱ्या दिवशी उडुपी बघून परत निघायचं.

पण पुन्हा एकदा मुसळधार पावसाने आमचा प्लॅन बदलायला सुरुवात केली. समुद्रकिनाऱ्यालगत जाणाऱ्या सुंदर रस्त्यांवरून आम्ही निवांत गाडी चालवत होतो. आज कुठे पोहोचायचं याची घाई नव्हती. कधी उसळणारा समुद्र, तर कधी दुतर्फा उंच सागवानाची जंगले, हा ड्राइव्ह चा टप्पा अविस्मरणीय होता.

थोड्या वेळाने आम्ही गोकर्णला पोहोचलो. पाऊस असल्यामुळे गर्दी फार नव्हती, त्यामुळे मंदिरात शांतपणे दर्शन घेता आलं. त्यानंतर आम्ही थेट Murudeshwar कडे निघालो. तिथे पोहोचल्यावर प्रचंड वारा आणि पावसाने अक्षरशः स्वागत केलं. समुद्राच्या काठावर उभी असलेली भव्य शिवमूर्ती आणि लाटांचा आवाज, त्या वातावरणात दर्शन घेताना वेगळीच ऊर्जा मिळाली.

त्यानंतर आम्ही उडुपीकडे निघालो. मूळ प्लॅननुसार तिथे मुक्काम करायचा होता, पण उडुपीत पोहोचण्याच्या अवघ्या ३० मिनिटं आधी आम्ही पुन्हा प्लॅन बदलला. आणि मुक्काम उडुपी ऐवजी मंगळुरूमध्ये करायचं ठरवलं. त्याच वेळी अचानक “म्हैसूर पण बघूया” असा विचार पुढे आला. कारण म्हैसूरवरून एका दिवसात पुण्याला परत जाता येईल, असा हिशोब आम्ही लावला.

अशा प्रकारे रविवारी रात्रीचा मुक्काम आम्ही Mangaluru मध्ये केला. हे शहर खरोखरच सुंदर आहे. मोठमोठी बंदरं, समुद्री व्यापार, आणि पावसातही जिवंत भासणारे रस्ते. समुद्राच्या वाऱ्यासोबत आम्ही दिवसाचा शेवट केला, आणि पुन्हा एकदा जाणवलं. आमच्या ट्रिपमध्ये प्लॅनपेक्षा परिस्थिती आणि उत्स्फूर्त निर्णय जास्त महत्त्वाचे ठरत होते.

मार्ग: गोवा – गोकर्ण – मुरुडेश्वर – उडुपी – मंगलोर

अंतर: ३६५ km
टीप: पूर्ण रास्ता हा NH ६६ (४ लेन) आहे. एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर असा हा सुंदर रास्ता आहे. पण अचानक येणाऱ्या डायव्हर्जन मुळे गाडी काळजीपूर्वक चालवावी.

goa to manglore

३) दिवस तिसरा: मंगलोर ते म्हैसूर – पूर्ण वाचा

आज सोमवार. Mangaluru मध्ये सकाळी लवकर उठून आवरलं, आणि काल पावसात झालेलं पंक्चर दुरुस्त करून घेतलं. अजूनही आम्ही समुद्रकिनाऱ्याच्या पट्ट्यातच होतो, त्यामुळे पाऊस सुरूच होता. पण कालपेक्षा त्याची तीव्रता थोडी कमी झाली होती. आजचा प्लॅन स्पष्ट होता, मंगलोर बघणे आणि म्हैसूरला पोहोचायचं, तिथे मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हैसूर फिरायचं.

म्हैसूरकडे निघण्यापूर्वी मी वाटेवरच्या ठिकाणांचा थोडा शोध घेतला. अनेक पर्याय समोर आले, आणि त्यातून आम्ही एक रूट निश्चित केला. आम्ही प्रवासाला सुरुवात केली. सॅटेलाइट मॅपवर रस्ता पाहताना लक्षात आलं होतं, आजचा ड्राइव्ह सरळसोट नसणार, तर खरा अॅडव्हेंचर असणार आहे.

जसजसं आम्ही पूर्वेकडे जात डोंगर चढायला सुरुवात केली, तसतसा पाऊस कमी होत गेला आणि धुक्याचं प्रमाण वाढू लागलं. समुद्रसपाटीवरून उंचावर जात असल्यामुळे हवामानातला बदल स्पष्ट जाणवत होता. मंगळुरू ते म्हैसूर हा घाटमाथ्याचा रस्ता अत्यंत सुंदर आहे, वळणावळणाचे रस्ते, दुतर्फा दाट हिरवाई आणि मधूनच दिसणाऱ्या खोल दऱ्या.

जाताना आम्ही संपाजे परिसर पाहिला, जो रबर उत्पादनासाठी ओळखला जातो. पुढे आम्ही निसर्गरम्य Coorg पहिले तिथले धबधबे बघितले. कॉफीच्या बागांनी नटलेलं हे ठिकाण जगप्रसिद्ध आहे आणि “भारताचं स्कॉटलंड” म्हणूनही ओळखलं जातं. धुक्यात हरवलेले रस्ते आणि कॉफीचा मंद सुगंध, हा प्रवास मनात साठवून ठेवावा असा होता.

तिथून पुढे आम्ही अखंड ड्राइव्ह करत संध्याकाळी सुमारे ८ वाजता Mysuru ला पोहोचलो. दिवसभराच्या प्रवासानंतर शहरात पोहोचताना एक वेगळीच समाधानाची भावना होती. आणखी एक सुंदर टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला होता.

मार्ग: मंगलोर – संपजे – कूर्ग – म्हैसूर
अंतर: २६० km
टीप: मंगलोर ते म्हैसूर हा रस्ता सुंदर आहे, पण संपूर्ण रस्ता सिंगल लेन व घाट आणि वळणांचा आहे, त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ लागतो.

manglore to mysuru

४) दिवस चौथा: म्हैसूर दर्शनअल्लेपी पर्यंतचा थरारक प्रवास – पूर्ण वाचा

Mysuru चे वातावरण अक्षरशः प्रसन्न वाटत होते. आकाश निरभ्र, पाऊस अजिबात नाही आणि हवेत हलकीशी गारवा. शुक्रवारपासून सतत पावसात भिजत प्रवास केल्यानंतर हे हवामान आमच्यासाठी एखाद्या गिफ्टसारखं होतं. छत्री आणि रेनकोटपासून मिळालेली सुटका हीच त्या आनंदामागची मोठी कारणं होती.

आधीच ठरवल्याप्रमाणे सकाळी लवकर आम्ही चामुंडेश्वरी (Chamundeshwari) मंदिरात दर्शनासाठी गेलो. डोंगरावर वसलेलं मंदिर, थंड वारा आणि शांत, भक्तिमय वातावरण… दिवसाची सुरुवात खूप सकारात्मक झाली. त्यानंतर जवळच असलेल्या भव्य नंदी पुतळ्याचे (Nandi Statue) दर्शन घेतले. पुढे शहरात येऊन मैसूर पॅलेसची (Mysore Palace) भव्यता अनुभवली, एका सुंदर चर्चला भेट दिली आणि स्थानिक मार्केटमध्ये थोडी खरेदीही केली. हे करत असताना आमच्यातला एक जण ऑफिसच्या संपर्कात होता. अजून दोन दिवस ऑफिसमध्ये काहीही तातडीचे (Urgent) काम नसल्यामुळे आम्हाला फिरण्यासाठी एक दिवस जादा मिळाला होता. त्यामुळे आमच्यापैकी एक जण म्हणाला, “रामेश्वरमला जायचंय”, तर दुसरा म्हणाला, “श्री पद्मनाभस्वामी मंदिर बघायचे.” मी म्हणालो की, “मदुराईला जाऊन येऊ.” त्यानुसार जेवताना पुन्हा नियोजनाला सुरुवात झाली. मी दक्षिण भारतातील सर्व प्रसिद्ध ठिकाणे पॉईंट केली, रस्ते आखले आणि किती वेळ आणि किलोमीटर लागणार हे सर्वांसमोर मांडले. त्यानंतर मदुराई ला जायचा प्लॅन ठरला.

दुपारनंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पुढे लागला दाट जंगलातून जाणारा Sathyamangalam Tiger Reserve चा रस्ता. वळणावळणाचे घाट, शांत जंगल आणि त्या जंगलामध्ये रस्त्यावर दिसलेले हत्ती, आणि हरीण कळप हा अनुभव अंगावर रोमांच उभे करणारा होता. निसर्गाच्या सान्निध्यातून जाताना वेळ कसा गेला कळलंच नाही.

आजचा मूळ प्लॅन होता मदुराईला जाऊन मुक्काम करण्याचा. पण आमच्या ट्रिपमध्ये प्लॅन बदलणं हे जणू ठरलेलंच होतं. काही कारणास्तव आम्ही दिशाच बदलली आणि पुन्हा एकदा समुद्रकिनाऱ्याकडे निघालो. संध्याकाळपर्यंत आम्ही केरळमधील सुंदर बॅकवॉटरसाठी प्रसिद्ध असलेल्या Alappuzha (अलेप्पी) येथे पोहोचलो.

म्हैसूर ते अलेप्पी हा प्रवास सुद्धा “न भूतो न भविष्यती” असा ठरला. डोंगर, जंगल, घाट आणि पुन्हा समुद्र… एका दिवसात इतके बदल अनुभवणे हे खरोखरच अविस्मरणीय होतं. या संपूर्ण टप्प्याचा सविस्तर अनुभव तुम्ही “म्हैसूर ते अलेप्पी” या स्वतंत्र ब्लॉगमध्ये वाचू शकता.

मार्ग: म्हैसूर – सत्यमंगलम फॉरेस्ट – धिमबाम – बेन्नारी – एरोडे – कोईमतूर – पल्लकड – कोची – अल्लेपी

अंतर: ६२४ km
टीप: जर म्हैसूर वरून अलेप्पी ला जात असाल तर दिवस असताना प्रवास करावा. कारण संध्याकाळी ऊटी च्या आसपासचे सर्व नॅशनल फॉरेस्ट मध्ये एन्ट्री बंद असते. आणि म्हैसूर ते कोईमतूर असा डायरेक्ट रास्ता आहे त्या रस्त्याने प्रवास करावा.

mhaisur to kerla

kerla

५) दिवस पाचवा: अलेप्पी – श्री पद्मनाभस्वामी मंदिर – कन्याकुमारी – पूर्ण वाचा

काळ रात्री अचानक मदुराईला न जात सालेम कोची रोड पकडून सरळ कोचीला आलो. पुन्हा प्लॅन चेंज. कारण होते श्री पद्मनाभस्वामी मंदिर दर्शन. आणि मग पुन्हा शोध सुरु झाला कि या वाटेत अजून काय काय बघू शकतो याचा. रात्री उशीर झाल्यामुळे आम्ही National Highway च्या कडेला, एक रूम घेऊन मुक्काम केला होता. सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठलो आणि आवरून पलक्कड, कोची शहर बघून जगप्रसिद्ध अलेप्पी बॅकवॉटरमध्ये बोटिंगसाठी पोहोचलो.

गाडी पार्क करून आम्ही बोटीत बसलो आणि शांत, निसर्गरम्य बॅकवॉटरच्या प्रवासाला सुरुवात झाली. पहिल्यांदाच एवढ्या विशाल प्रमाणात पसरलेले बॅकवॉटर जवळून पाहत होतो. पाण्यावर तरंगणारी किंवा पाण्याने वेढलेली छोटी छोटी बेटे, त्यावरची घरं, नारळाची झाडं, आणि पाण्यावर चालणारे दैनंदिन जीवन. हे सगळं पाहून आम्ही अक्षरशः अवाक झालो. शहराच्या गोंगाटापासून दूर, पाण्याच्या शांत लाट मध्ये हरवून जाण्याचा तो अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे.

अलेप्पीचा अनुभव मनात साठवून आम्ही पुढे केरळची राजधानी Thiruvananthapuram कडे निघालो. तिथे प्रसिद्ध Padmanabhaswamy Temple येथे दर्शन घेण्याचा आमचा मानस होता. संध्याकाळी सुमारे ७ वाजता आम्ही पोहोचलो. मंदिरातील शिस्तबद्ध आणि आध्यात्मिक वातावरणात दर्शन घेतल्यावर मन अतिशय प्रसन्न आणि शांत झालं.

इथून खरेतर प्लॅन करायचं बंद केला होत. पण जवळच ८० KM वर कन्याकुमारी दिसल्यावर तिकडे जायचं ठरला. यानंतर आजचा अंतिम टप्पा होता. भारताच्या टोकावर असलेलं Kanyakumari. तिरुवनंतपूरममधून पुढे निघून आम्ही अखेर रात्री साधारण १ वाजता कन्याकुमारीला पोहोचलो. दिवसभरातील प्रवास, बॅकवॉटरची शांतता, मंदिरातील अध्यात्म आणि शेवटी देशाच्या टोकावर पोहोचल्याची जाणीव. हा दिवस खरोखरच अविस्मरणीय ठरला.

मार्ग: अलेप्पी – तिरुवनंतपूरम – कन्याकुमारी
अंतर: २६० km
टीप: हा रास्ता NH ६६ असून याचे अलेप्पी ते तिरुवनंतपूरम टप्याचे काम सुरु आहे. त्यामुळे खूप वेळ लागतो. त्याच सोबत समुद्राला लागून हा रोड जात असल्याने केरळ राज्यातील मुख्य वाहतूक या रस्त्यावरूनच चालते. त्यामुळे ट्राफिक पण जास्त आहे.

Shree Padmanabhswami Temple

Shree Padmanabhswami temple

६) दिवस सहावा: कन्याकुमारी ते रामेश्वरम – पूर्ण वाचा

आज सकाळी नाश्ता करून आम्ही Kanyakumari फिरायला बाहेर पडलो. सर्वप्रथम बोटीने जाऊन Vivekananda Rock Memorial येथे भेट दिली. समुद्राच्या मध्यभागी उभं असलेलं ते स्मारक आणि तिथलं शांत वातावरण मनाला वेगळंच समाधान देणारं होतं. पुढे आम्ही हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांचा त्रिवेणी संगम प्रत्यक्ष पाहिला. तीन समुद्र एकत्र येण्याचा तो क्षण डोळ्यांत साठवून ठेवावा असा होता. मंदिरात दर्शन घेतलं आणि स्थानिक मार्केटमधून थोडी खरेदी करून कन्याकुमारी फिरून घेतल. आणि सुरु झाला आता पुढे काय करायाच. २ पर्याय होते, सरळ पुण्याला परत जायचं किंवा मदुराई राहिला आहे ते बघून दर्शन घेऊन पुढे पुण्याला जायचं. पण ठरतो तो प्लॅन कसला…

संध्याकाळी सुमारे ५ वाजता आम्ही हॉटेलमधून चेक-आउट करून सरळ Rameswaram कडे मार्गस्थ झालो. एवढ्या टोकाला आलोच आहे तर रामेश्वरम पण बघू म्हणालो. एकूण अंतर साधारण ३१० किमी होतं. त्यापैकी सुरुवातीचे सुमारे ९० किमी आम्ही कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर जोडणाऱ्या National Highway 44 वरून प्रवास केला. आणि खरंच सांगतो, इतका रुंद, गुळगुळीत आणि सुंदर रस्ता पाहून आम्ही सर्वजण थक्क झालो. दोन्ही बाजूंना पसरलेलं मोकळं आकाश, दूरवर दिसणारी टेकड्यांची रांग आणि संध्याकाळच्या प्रकाशात चमकणारा महामार्ग ड्राइव्हचा खरा आनंद तिथे मिळाला.

रात्रीच्या शांततेत, निवांत गप्पा मारत आणि प्रवासाचा प्रत्येक क्षण एन्जॉय करत आम्ही अखेर रात्री सुमारे १२ वाजता रामेश्वरमला पोहोचलो. थकवा होता, पण त्याहून जास्त समाधान. आणखी एक महत्त्वाचा टप्पा आम्ही पार केला होता.

मार्ग: कन्याकुमारी – तिरुनेलवेल्ली – रामेश्वरम
अंतर: ३१० km
टीप: हा रास्ता खूप सुंदर आहे, आणि दिवसा प्रवास करण्याचा प्रयत्न करा म्हणजे निसर्ग पाहता येईल. कन्याकुमारी ते रामेश्वर अशी बस सेवा पण आहे.

Kanyakumari

Kanyakumari to Rameshwaram

७) दिवस सातवा: रामेश्वरम, धनुषकोडी आणि मदुराई चा प्रवास – पूर्ण वाचा

सकाळी लवकर उठून सर्वप्रथम आम्ही Ramanathaswamy Temple येथे दर्शनासाठी गेलो. रामेश्वरममध्ये उन्हाची तीव्रता खूप जास्त जाणवत होती, त्यामुळे रांगेत उभं राहणं थोडं कठीणच होतं. साधारण एक ते दीड तासानंतर दर्शन झालं पण त्या क्षणी सगळा थकवा नाहीसा झाला. मंदिरात एक विलक्षण सकारात्मक ऊर्जा जाणवते. भव्य वास्तू, कोरीव काम आणि विशेष म्हणजे जगातील सर्वात लांब मानल्या जाणाऱ्या मंदिर कॉरिडॉरमधून चालताना इतिहास आणि अध्यात्म दोन्हींची अनुभूती येते.

दर्शनानंतर आम्ही रूमवर परतलो, चेक-आउट केलं आणि थेट भारताच्या शेवटच्या टोकांपैकी एक असलेल्या Dhanushkodi कडे गाडी वळवली. समुद्राच्या मध्यावर जाणारा रस्ता, दोन्ही बाजूंना पसरलेलं निळंशार पाणी. हा ड्राइव्ह अविस्मरणीय होता. पौराणिक कथेनुसार याच परिसरातून प्रभू श्रीरामांनी रामसेतूची उभारणी केली, अशी श्रद्धा आहे. इथे बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर एकत्र येतात, त्यामुळे त्या ठिकाणाला वेगळंच महत्त्व आहे.

धनुष्कोडीचं वातावरण खूपच भारावून टाकणारं आहे. शांत, थोडंसं रहस्यमय आणि तरीही सुंदर. वर्षभर असंख्य पर्यटक इथे येतात आणि या टोकाच्या भूमीवर उभं राहून समुद्राचा विस्तार अनुभवतात.

संध्याकाळी आम्ही पुन्हा Rameswaram ला परतलो आणि आणखी एक ऐतिहासिक शहर आमची वाट पाहत होतं. तर तिथून पुढे लगेच Madurai कडे प्रस्थान केलं. सलग प्रवास करत अखेर रात्री साधारण १ वाजता मदुराईला पोहोचलो.

मार्ग: रामेश्वरम – मदुराई (उत्तम प्रकारचा सिंगल रोड आहे, ८० च्या स्पीड ने क्रूझ करू शकतो.)

अंतर: १८० KM

Rameshwaram mandir

 

८) दिवस आठवा: मदुराई (दर्शन) आणि पुण्याला प्रस्थान – पूर्ण वाचा

आज सकाळी मी लवकर उठून एकटाच Meenakshi Amman Temple मध्ये दर्शनासाठी जाऊन आलो. सकाळच्या शांत वातावरणात मंदिराचा अनुभव वेगळाच होता. त्यानंतर सर्वांसोबत पुन्हा एकदा दर्शन घेतलं. मदुराईचं हे प्राचीन मंदिर त्याच्या भव्य वास्तुशिल्पासाठी प्रसिद्ध आहे. उंचच उंच गोपुरम, त्यावर केलेलं बारकाईनं कोरलेलं शिल्पकाम आणि रंगसंगती. प्रत्येक गोष्ट लक्ष वेधून घेणारी आहे. मंदिरातील आध्यात्मिक वातावरण आणि ऐतिहासिक भव्यता मनात खोलवर ठसली.

दर्शन आटोपून दुपारी सुमारे २ वाजता आम्ही रूमवर परतलो. आजचा मूळ प्लॅन होता सुमारे ४०० किमी अंतरावर असलेल्या Bengaluru ला जाऊन मुक्काम करण्याचा. पण आमच्या ट्रिपमध्ये अचानक निर्णय घेणं हे जणू नित्याचंच झालं होतं. पहिल्या दिवसासारखंच पुन्हा माझ्याच पुढाकाराने ठरलं कि बेंगळुरूमध्ये थांबायचं नाही, तर सलग ड्राइव्ह करत थेट पुण्याला पोहोचायचं. कारण होत सोमवारी ऑफिस ला जाणे फार गरजेचे होते, आज येतो उद्या येतो करत आठवडा इकडेच काढला होता. आता ऑफिस ला दांड्या मारणे शक्य न्हवते.

त्याप्रमाणे संध्याकाळी ५ वाजता आम्ही Madurai मधून प्रस्थान केलं. पुढचे २४ तास आम्ही गाडी चालवत राहिलो. अर्थात मध्ये मध्ये चहा, जेवणचे ब्रेक घेत. रात्रीचा प्रवास, पहाटेची शांतता, आणि बदलत जाणारे राज्यांचे रस्ते. हा शेवटचा मदुराई, बेंगलोर, चित्रदुर्ग, बेळगाव, कोल्हापूर, पुणे टप्पा सुद्धा तितकाच स्मरणीय ठरला.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कोल्हापूरमध्ये माझ्या घरी नाश्त्यासाठी थांबलो. घरच्यांना भेटल्यावर थकवा थोडा हलका झाला. आणि अखेर संध्याकाळी सुमारे ५:३० वाजता आम्ही पुण्यात सुखरूप पोहोचलो.

९ दिवसांचा, हजारो किलोमीटरचा, पाच राज्यांचा आणि असंख्य आठवणींचा हा प्रवास शेवटी पूर्ण झाला. पण मन मात्र अजूनही त्या रस्त्यांवरच धावत होतं.

madurai temple

९ दिवस, हजारो किलोमीटर, पाच राज्यं, बदलत गेलेले प्लॅन, मुसळधार पाऊस, कडक ऊन, जंगलातील रस्ते, समुद्रकिनाऱ्यावरील सूर्यास्त, मंदिरे, बॅकवॉटर. या सर्वांचा संगम म्हणजे आमची ही पुणे ते कन्याकुमारी रोड ट्रिप. सुरुवात झाली ती फक्त “चल फिरायला जाऊया” या एका वाक्याने, पण शेवटी हा प्रवास आयुष्यभरासाठी जपून ठेवावी अशी आठवण बनून राहिला.

या ट्रिपने आम्हाला शिकवलं की प्रत्येक गोष्ट प्लॅनप्रमाणेच झाली पाहिजे असं नसतं; कधी कधी अनपेक्षित वळणं, अचानक घेतलेले निर्णय आणि थोडंसं वेडेपणच सर्वात सुंदर अनुभव देतं. रस्ते फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत नाहीत, ते आपल्याला स्वतःकडेही परत आणतात.

आजही त्या रस्त्यांची आठवण आली की मन पुन्हा एकदा इंजिन सुरू करतं… आणि वाटतं. पुढची अनपेक्षित ट्रिप कधी करायची?

पुणे ते कन्याकुमारी संपूर्ण ट्रिप In Short:

१) शुक्रवारी रात्री १० ला पुण्यातून निघालो. दुसऱ्यादिवशी शनिवारी सकाळी ९ वाजता गोवा येथे पोचलो.

२) शनिवारी पूर्ण दिवस अराम केला आणि संध्याकाळी पाउसातच बीच आणि चर्च बघून आलो.

३) रविवारी सकाळी ९ वाजता गोव्यातून निघून गोकर्ण, मुरुडेश्वर, उडुपी, करून रात्री मंगलोर ला मुक्काम केला.

४) सोमवारी सकाळी मंगलोर मधून निघून संपजे, कूर्ग, करत म्हैसूर ला पोचलो.

५) मंगळवारी म्हैसूर बघून संध्याकाळी तिथून निघून बुधवारी पहाटे ४ वाजता आलेप्पी ला मुक्कामाला पोचलो.

६) बुधवारी अलेप्पी बॅकवॉटर बघून तिथून तिरुअनंतपुरम ला गेलो, श्री पद्मनाभस्वामींचे दर्शन घेऊन कन्याकुमारी ला जाऊन मुक्काम केला.

७) गुरुवारी पूर्ण कन्याकुमारी फिरून रामेश्वरम ला पोचलो आणि तिथे मुक्काम केला.

८) शुक्रवारी रामेश्वरम, धनुषकोडी बघून मदुराई ला पोचलो.

९) शनिवारी मदुराईचे मंदिर बघून संध्याकाळी ५ ला निघालो आणि दुसऱ्या दिवशी रविवारी संध्याकाळी ५.३० ला पुण्याला पोचलो.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *