ताम्हिणी घाट इतका सुरक्षित आणि वेगळा कसा?
नमस्कार मित्रानो, ताम्हिणी घाटाबद्दल आणि त्याच्या सौंदर्याबद्दल तुम्हाला माहितीच असेल, पण पुन्हा मी इथे नमूद करेन कि ताम्हिणी घाट हा सह्याद्रीपर्वत रांगेतील अतिशय सुंदर आणि सुरक्षित घाट आहे. फक्त घाट पाहून यायच म्हंटलं तरी एक दिवस पुरत नाही. निसर्गाने मुक्त हस्ताने सौन्दर्याची उधळण केली आहे कि काय असे वाटते. असंख्य धबधबे, धुके, दऱ्या, वळणदार रस्ते, बॅकवॉटर आणि गर्द वनराई आपल्याला प्रेमात पाडते, आणि याच मुळे आपली पाऊले आपसूकच ताम्हिणी कडे वळतात.
२०२३ पासून सोशल मीडिया मुळे ताम्हिणी घाट अनेक पुण्या-मुंबई करांचे हक्काचे पर्यटनाचे ठिकाण होत आहे. पण आजच्या घडीला पहिले तर पर्यटकांची संख्या इतकी वाढली आहे कि पीक टाइम ला घाटात ट्रॅफिक चा त्रास व्हायला लागलाय. मी स्वतः २०१८ पासून ताम्हिणी घाट फिरतोय आणि अजूनही असे वाटते कि, मी ताम्हिणी अजून पूर्ण बघितलाच नाही. पण असो आज या ब्लॉग मध्ये, मी ताम्हिणी घाट बद्दलचे माझे निरीक्षण सांगणार आहे.
ताम्हिणी घाटाची लांबी:
जर ताम्हिणी घाटाची सुरवात आणि शेवट यांचे जर अंतर काढले तर ते ४८.७ किमी भरते. पुण्याहून जाताना मुळशी धरणाच्या दरवाज्या इथून, ते घाट संपल्यानंतर असलेल्या भागड MIDC च्या कॉर्नर पर्यंत हे अंतर भरते. काहीजण हेच अंतर धमालेवाडी गावापासून मोजत असतील तर ते कमी भरेल याची नोंद घ्या. ताम्हिणी घाट पर्यटन हे मुळशी धरण बॅकवॉटर आणि ताम्हिणी घाट असे एकत्रित पणे आहे. त्यामुळे त्याचे टोटल अंतर ४८.७ किमी आहे.
ताम्हिणी घाटाची भौगोलिक स्थिती:
ताम्हिणी घाट इतका सुरक्षित आणि वेगळा असण्याचे कारण समजून घेण्यासाठी त्याचा ४ टप्प्यातील विस्तार समजून घ्यावा लागेल.
ताम्हिणी घाट इतर घाटांपेक्षा तुलनेने अधिक सुरक्षित असण्याचे प्रमुख कारण म्हणजे संपूर्ण घाटात रस्त्या पासून डोंगर किना डोंगर पायथा हा थोड्या दूर अंतरावर आहे. म्हणजे जरी दरड कोसळली तरी ती थेट रस्त्यावर येत नाही किंवा वाहनांवर पडत नाही. त्याच सोबत रस्त्याकडेला थांबण्यासाठी अनेक ठिकाणी मोठं मोठे मैदाने देखील आहेत. अनेक सुरक्षित जागा आहेत जिथे आपण गाडी लावून पायी फिरू शकतो.
ताम्हिणी घाट हा ४८.७ किमी चा पूर्ण घाट आणि वळणावळणाच्या रस्ता आहे असे नाही, या मध्ये टप्पे आहेत. काही ठिकाणी चढ उतार तर काही ठिकाणी बॅकवॉटर आहे.
पुण्याहुन ताम्हिणी कडे जाताना मुळशी धरणापर्यंत मोठा आणि रुंद रस्ता आहे. मुळशीत पोचल्यानंतर रस्त्याचा आकार, वातावरण सगळंच बदलून जाते. काँक्रीटचा रास्ता डांबरी मध्ये बदलतो. झाडी आणि वळणे वाढतात.
ताम्हिणी घाटाची भौगोलिक स्थिती हि ४ टप्प्यांमध्ये विभागली आहे ते पुढील प्रमाणे:
१) मुळशी धरण आणि त्याचे बॅकवॉटर (२३ किमी):
या टप्प्यात आपल्याला उजव्या बाजूला मुळशी धरणाचे अथांग सुंदर बॅकवॉटर लागते, आणि डाव्या बाजूला उंच हिरवेगार डोंगर लागतात. धमालेवाडी गावच्या थोडं पुढे गेल्यानंतर प्रसिद्ध पळसे धबधबा आहे. तो हि बघता येतो. या टप्प्यात बऱ्यापैकी रस्ता हा उताराचा असून २ ते ३ वळणे सोडली तर जास्त तीव्र वळणे नाहीत. एकूण टप्प्याचे अंतर हे २३ किमी चे आहे.
२) ताम्हिणी घाटाचा दुसरा टप्पा (८ किमी):
बॅकवॉटर संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होते. हा टप्पा ८ किमीचा असून, या भागात रस्ता जास्त वळणदार होतो आणि बऱ्याच ठिकाणी तीव्र वळणे आणि अचानक येणारे चढ उतार देखील आहेत. याच टप्यात प्रसिद्ध कुंडलिका व्हॅली ला जाण्यासाठी उजव्या बाजूला रास्ता जातो. या टप्प्यात सुरुवातीला ३ ते ४ किमी डाव्या बाजूला उंच डोंगर आणि उजव्या बाजूला थोडासा सपाट भाग आहे. इथूनच रिंग धबधब्याला जात येते. आणि पुढच्या ४ ते ८ किमी मध्ये डावीकडे डोंगर आणि उजवीकडे खोल कुंडलिका व्हॅली, प्लस व्हॅली आणि अंधारबन आहे. हा टप्पा जिथे संपतो तिथून Milkybar waterfall ला जात येते. या टप्प्यात दाट झाडीचे प्रमाण खूप आहे.
३) ताम्हिणी घाटाचा तिसरा टप्पा (७ किमी):
या टप्प्यात रस्ता हा कमी अधिक वळणाचा आहे. डावीकडे उंच डोंगर तर उजवीकडे खोल दारी आहे. या टप्प्यात झाडांचे प्रमाण थोडे कमी असून पावसाळ्यात धुके जास्त असते. या टप्प्यात ताम्हिणी धबधबा हि पाहता येतो. इथे रस्ता कमी वळणाचा आणि रुंद असल्याने अनेक view points आहेत. समुद्रावरून येणारा वारा पहिल्यांदा इथेच सह्याद्रीला धडकतो. त्यामुळे इथे पाऊसाचे प्रमाण जास्त आहे.
४) ताम्हिणी घाटाचा चौथा टप्पा (९ किमी):
हा ताम्हिणी घाटाचा शेवटचा आणि कठीण टप्पा आहे. यामध्ये रस्ता अनेक तीव्र वळणे घेत खाली उतरतो. उतार जास्त असल्याने गाडी कंट्रोल करणे पण तेवढेच कठीण. डोंगर आणि दरी यामधून जात असताना अचानक एका पॉईंट नंतर डाव्या बाजूचा डोंगर उजवीकडे आणीन उजव्या बाजूची दारी डावीकडे एका क्षणात होते हे फार कमी वेळा लक्ष्यात येते. या टप्प्यात हि अनेक सुंदर लहान मोठे धबधबे आहेत. याच टप्प्यात एका ठिकाणी फक्त ८० ते १०० मीटर अंतरासाठी रस्त्यापासून थोड्या अंतरावर असणारा डोंगराचा पायथा एकदम रस्ताकडेला येतो आणि इथेच वरून दगड पडण्याची भीती जास्त आहेत.
तर अश्या सुंदर घाटात फिरताना आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि जबाबदारीने पर्यटन करावे. निसर्ग आणि मनुष्य या मध्ये एक रेष असते, ती ओलांडण्याचा कधीही प्रयत्न करू नये.
धन्यवाद!!