कोल्हापूर ते उज्जैन रोड ट्रिप प्लॅन: ३ दिवसांत २००० किमी शक्य आहे का?

Somesh Nikam
25 Min Read

कोल्हापूर ते उज्जैन रोड ट्रिप प्लॅन अँड गाईड

३ दिवसांत कोल्हापूर – उज्जैन – इंदौर – ओंकारेश्वर – महेश्वर – कोल्हापूर असा तब्बल २००० किलोमीटरचा प्रवास शक्य आहे का? तर याचे उत्तर ‘होय’ आहे, कारण मी तो प्रत्यक्षात केला आहे. या जबरदस्त प्रवासाबद्दल आपण पुढे सविस्तर वाचूया.

मला उज्जैनला जाऊन दोन वर्षे झाली होती आणि पुन्हा महाकालच्या दरबारात जाण्याची तीव्र इच्छा होती. आधी मी एकट्यानेच ट्रेनने जाण्याचा विचार केला होता. पण माझा मोठा भाऊ आणि लहान भाऊदेखील यायला तयार झाले. त्यामुळे तिघांच्याही सुट्ट्या एकत्र जुळून येणे थोडे कठीण जात होते आणि यातच ४ महिने निघून गेले.

असाच एक दिवस, गुरुवारी संध्याकाळी घरात बसून गप्पा मारत असताना पुन्हा उज्जैनचा विषय निघाला आणि “३ दिवसांत जाऊन येऊया का?” असा विचार सुरू झाला. कोल्हापूर ते उज्जैन हे अंतर १००० किमीपेक्षा जास्त आहे, त्यामुळे जावे की नाही, यावर विचार सुरू होता. शेवटी ठरले की, आताच निर्णय घेतला आणि निघालो तरच हा प्रवास शक्य होऊ शकतो. गाडी चालवायला आम्ही दोघजण असल्यामुळे रात्रभर गाडी चालवणे फार अवघड नव्हते. ओढ फक्त महाकाल दर्शनाची होती. त्यातच इन्स्टाग्राम रील्सवर गर्दीचे व्हिडिओ दिसू लागले, तेव्हा ठरवले “जे असेल ते असेल, पण आता जायचं म्हणजे जायचं” आणि अवघ्या ३० मिनिटांत प्लॅन फिक्स करून आम्ही तिघेजण संध्याकाळी ७ वाजता गाडी घेऊन निघालोच.

कोल्हापूरहून उज्जैनला जाण्यासाठी गुगल मॅप्स कोल्हापूर – सातारा – अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर – धुळे – इंदौर – उज्जैन असा मार्ग दाखवतो. पण त्यापेक्षाही चांगला आणि वेळ वाचवणारा दुसरा मार्ग आहे. त्यामुळे आम्ही खालीलप्रमाणे मार्ग फायनल केला.

कोल्हापूर ते उज्जैन रोड ट्रिप Route

कोल्हापूर → पंढरपूर → कुर्डुवाडी → येरमाळा → बीड → छत्रपती संभाजीनगर → चाळीसगाव → धुळे → मध्य प्रदेश → इंदौर → उज्जैन

प्रवास खूप मोठा होता. सर्वाना वाटत होते की ३ दिवसांत हे शक्य नाही, पण मला माझ्या ड्रायव्हिंगच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. मला माहीत होते की दर्शन लवकर झाले, तर आपण आरामात रविवारी रिटर्न येऊ शकतो. यासाठी अगदी रात्रंदिवस गाडी चालवावी लागली तरी चालेल, अशी तयारी होती. या पूर्वी सुद्धा मी अश्या मोठ्या रोड ट्रिप्स पूर्ण केल्या आहेत, जसे पुणे – तिरुपती, पुणे – पॉण्डेचेरी. पुणे – कन्याकुमारी, इत्यादी. स्वतःवरचा हाच आत्मविश्वास तुम्हाला अशा मोठ्या ट्रिप्स यशस्वीपणे पार पाडायला मदत करतो. आणि हा आत्मविश्वास प्रवास केल्यानेच येतो.

अशा प्रकारे, गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता देवाचा आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या या भक्तिपूर्ण प्रवासाला महिंद्रा बोलेरो गाडीने सुरुवात केली. संध्याकाळी ७ वाजता कोल्हापूरहून निघून आम्ही रात्री ९ वाजता पंढरपूर येथे थांबलो. थोडा वेळ ब्रेक घेऊन तिथून थेट येरमाळा गाठले. रात्रीचे साडेअकरा वाजले होते, त्यामुळे वाटेत एका धाब्यावर पोटपूजा उरकून आम्ही बीडच्या दिशेने प्रवास सुरू केला. त्यावेळी आम्ही ठरवले होते की, थेट छत्रपती संभाजीनगरला जाऊन एखादी रूम घेऊन झोपायचे.

रस्त्यांचा दर्जा इतका उत्तम होता की प्रवासात कुठेही त्रास किंवा तक्रार करायला वावच मिळाला नाही. त्यामुळे आमचा प्रवास निवांत, गाणी ऐकत आणि गप्पा मारत मजेत चालला होता. याचा फायदा असा झाला की, अपेक्षेपेक्षा कितीतरी लवकर, रात्री अडीच वाजताच आम्ही छत्रपती संभाजीनगर गाठले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अंगात एवढा जोश होता की अजिबात झोप येत नव्हती. त्यामुळे ठरवले की चहा पिऊन प्रवास असाच पुढे सुरू ठेवायचा आणि जर कधी डोळा लागलाच, तर एखाद्या पेट्रोल पंपवर गाडी थांबवून विश्रांती घ्यायची.

रात्रभर गाडीचे स्टिअरिंग सांभाळत चाललेला हा प्रवास कसा पार पडत होता, हे समजतच नव्हते. कसलाही कंटाळा नव्हता, उलट एक वेगळाच उत्साह होता. छत्रपती संभाजीनगरच्या पुढे आल्यावर मात्र रस्त्यावर थोडे वेगळेच दृश्य दिसले. जंगलातून बाहेर आलेले कोल्हे आणि त्यांच्या चक्क झुंडीच्या झुंडी रस्त्यावरून फिरताना दिसत होत्या, निसर्गाचा हा अनोखा अनुभव घेत, पहाटे ४:४५ वाजता आम्ही चाळीसगाव गाठले.अजूनही झोप आल्यासारखे वाटत न्हवते तरी सुद्धा आजून खूप प्रवास बाकी आहे त्यामुळे मुद्दाम एक एक झोप काढूया म्हणून आम्ही चाळीसगाव पोलीस स्टेशनजवळ गाडी लावली आणि स्वतःला थोडे ताजेतवाने करण्यासाठी सुमारे ३० मिनिटे छोटीशी डुलकी काढली. त्यानंतर व्यवस्थित उठून फ्रेश झालो, गरमागरम चहा-नाश्ता केला आणि सकाळी ७ वाजता धुळ्याच्या दिशेने मार्गस्थ झालो.

आता शुक्रवारचा सूर्य उगवला होता. विशेष म्हणजे, आदल्या रात्रीपासून ते आतापर्यंत रस्ते अगदी ‘टॉप क्वालिटी’चे मिळाले होते. एकाच रात्रीत महाराष्ट्राच्या दक्षिण टोकावरून थेट उत्तर टोकाला पोहोचल्याची ती फिलिंगच एकदम भारी आणि अंगावर काटा आणणारी होती. जसजसा दिवस पुढे जात होता, तसतशी रस्त्यावरील वाहनांची गर्दी वाढू लागली होती. आकाश पूर्णपणे ढगाळ झाले होते आणि त्यामुळे ऊन-पावसाचा सुंदर खेळ सुरू होता. यावर्षी जरी पावसाचे प्रमाण कमी असले, तरी आजूबाजूची जमीन आणि डोंगर हिरवेगार दिसत होते, जे डोळ्यांना शांतता देत होते. निसर्गाच्या या प्रसन्न वातावरणात आम्ही हळूहळू धुळ्याच्या दिशेने जात होतो आणि अखेर सकाळी साधारण ९ वाजता आम्ही धुळ्यात पोहोचलो. तिथे पोहोचताच गाडीची टाकी पुन्हा फुल्ल केली, कारण पुढचा मध्य प्रदेशचा लांब पल्ला खुणावत होता.

धुळ्यातून महाराष्ट्र-मध्य प्रदेश बॉर्डर ८६ किलोमीटर अंतरावर आहे. इथे आम्ही थेट मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला (NH 3) येऊन कनेक्ट झालो. या रस्त्याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे यावर असलेली प्रचंड ट्रकची संख्या. त्यामुळे आदल्या रात्रीपासून गाडीचा जो स्पीड कायम होता, तो आता थोडा मंदावला. मी आयुष्यात पहिल्यांदाच एकाच रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर ट्रक पाहिले आणि मग मुंबई-आग्रा हायव्हेचे खरे महत्त्व माझ्या लक्षात आले.

आता महाकालच्या दर्शनाची ओढ मनामध्ये आणखीनच तीव्र होत चालली होती. उज्जैनमध्ये नेमके किती वाजता पोहोचू, याची कोणतीही खात्री नसल्यामुळे आम्ही आधीच ‘शीघ्र दर्शन’ (VIP pass) बुकिंग केले नव्हते. तिथे प्रत्यक्ष पोहोचल्यावर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे आम्ही ठरवले होते. कोल्हापूर जिल्ह्यापासून थेट धुळे जिल्ह्यापर्यंतच्या प्रवासात भौगोलिक परिस्थितीत खूप मोठा बदल जाणवला. थोडी उष्णता जाणवू लागली होती, पण येथील शेती खूप सुधारलेली दिसली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ऊस, कापूस, मका आणि सोयाबीन यांसारखी पिके वारंवार दिसत होती. आणि त्याचे कारण हि लक्ष्यात आले. थोड्या वेळात भव्य तापी नदीचे पात्र दिसू लागले. कोल्हापूरच्या पंचगंगा ४ ते ५ वेळा ऍड केल्यानंतर एक तापी नदीचे पात्र पूर्ण होतील असेल वाटले. पण नदी लगत कुठे इर्रीगेशन पंप स्टेशन दिसले नाहीत. असो हे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात कैद करून आम्ही पुढे निघालो.

या हायवेवर नाश्ता आणि चहासाठी ब्रँडेड रेस्टॉरंट्स किंवा कॅफे (McDonald’s, KFC) थोडे कमीच आहेत, पण रस्त्याच्या कडेला खवय्यांसाठी चक्क धाब्यांची रेलचेल पाहायला मिळते. थोड्याच वेळात आम्ही महाराष्ट्राची सीमा ओलांडून मध्य प्रदेशात अधिकृत एन्ट्री केली आणि बॉर्डर ओलांडताच एक मोठा घाट आमची परीक्षा घेण्यासाठी उभा होता. या घाटात ट्रकच्या अफाट ओव्हरलोडमुळे प्रचंड ट्रॅफिक जाम लागला होता, आणि त्यातच टू-व्हेलरची वाढलेली संख्या यामुळे आमचा तब्बल एक तास तिथेच गेला.

अखेर तो अडथळा पार करून आम्ही मध्य प्रदेशात दणक्यात चेक इन केले. गाडीच्या म्युझिक सिस्टीमवर मस्त गाणी लावली आणि वातावरणातील आळस घालवण्यासाठी एक कडक कॉफी मारली. मध्य प्रदेश हा राज्य प्रामुख्याने खाण्यापिण्यासाठी आणि तिथल्या अस्सल लोकल खाद्यपदार्थांसाठी ओळखला जातो. एक गमतीशीर गोष्ट म्हणजे, आम्हाला या संपूर्ण मध्य प्रदेशच्या हायवेवर मॅकडोनाल्ड, केएफसी यांसारखे एकही जगप्रसिद्ध चेन आऊटलेट्स दिसले नाहीत. त्याऐवजी, मध्य प्रदेश सरकारने हायवेच्या कडेलाच मोठे आणि स्वच्छ ‘फुड स्टेशन’ उभे केले आहेत, जिथे प्रवाशांसाठी जेवण आणि नाश्त्याची अत्यंत उत्तम सोय पाहायला मिळते.

इथून पुढे अजून ३०० किलोमीटरचा प्रवास बाकी होता. मध्य प्रदेशची वेगळी भौगोलिक रचना आणि तिथली जीवनशैली अनुभवण्याची उत्सुकता आता आणखीनच वाढली होती. महाराष्ट्राच्या तुलनेत इथल्या प्रत्येकच घटकात मोठा फरक जाणवत होता. इथल्या शेतीबद्दल सांगायचे तर, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेला पूर्ण सपाट प्रदेश आणि त्यात प्रामुख्याने फक्त एकच मुख्य पीक सोयाबीन. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मका आणि कापूस ही पिके मोठ्या प्रमाणावर दिसत होती. इथली प्रगत आणि विकसित शेती पाहून मनाला एक वेगळेच समाधान वाटले. याचबरोबर तिथल्या लोकांच्या पोशाखातही बदल जाणवू लागला. या भागात कदाचित सरकारी वाहतूक सेवांचा तुटवडा असावा, कारण रस्त्यावरून धावणाऱ्या प्रत्येक टू-व्हीलरवर तीन ते चार जण, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण एकत्र प्रवास करताना दिसत होते.

प्रवासात पुढे जातानाच एक अत्यंत सुखद धक्का बसला, आई नर्मदा नदीचे दर्शन. नर्मदा नदी आणि तिच्या काठावर वसलेली मंदिरे म्हणजे जणू एक वेगळेच पावन विश्व आहे. नर्मदेचा साधा सहवासदेखील मनाला अफाट समाधान देऊन जातो. त्या नदीकडे पाहतच राहावेसे वाटत होते. तिला केवळ ‘नदी’ म्हणावे की ‘समुद्र’, असा प्रश्न पडावा इतके तिचे पात्र अथांग आणि विशाल होते. वरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पाण्याच्या उमटणाऱ्या लहरी आणि तो परिसर पाहून अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहिले. हे अदभुत सौंदर्य डोळ्यात साठवून, तिथे थोडा वेळ थांबून काही सुंदर फोटो काढले आणि आम्ही मध्य प्रदेशला न्याहाळत पुढे निघालो.

दुपारी २ वाजता आम्ही इंदौर शहरात पोहोचलो. छप्पन दुकान (56 Dukan) आणि सराफा बाजारसारख्या खाऊगल्ल्यांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या या इंदुरी शहरात पाऊल ठेवताच तिथल्या अस्सल खवय्येगिरीने आमचे स्वागत केले. तिथे गरमागरम पोहे, कचोरी आणि इंदुरी चव चाखत मस्तपैकी पोटपूजा केली आणि लगेच उज्जैनच्या दिशेने मार्गस्थ झालो. जाताना आम्ही देवास मार्गे गेलो, हा रस्ता अतिशय उत्तम आणि तुलनेने कमी ट्रॅफिकचा आहे. जसजसे उज्जैन जवळ येत होते, तसतशी महाकालच्या दर्शनाची ओढ आणि आतुरता अधिकच तीव्र होत चालली होती. शेवटी, उज्जैन शहरात प्रवेश करण्यापूर्वीच कारमध्ये बसूनच एक छानसा होमस्टे बुक केला. आणि अखेर, देवाच्या कृपेने बरोबर २२ तासांनंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता आम्ही उज्जैन नगरीत यशस्वीरीत्या पोहोचलो. विशेष म्हणजे, एवढा मोठा आणि न थांबता केलेला प्रवास करूनही अंगात कसलाही कंटाळा किंवा थकवा अजिबात जाणवत नव्हता. उज्जैन नगरीत पाऊल ठेवताच तिथल्या पवित्र आणि अध्यात्मिक वातावरणाने आमच्यात एक वेगळीच नवी ऊर्जा भरली होती.

रूमवर जाऊन फ्रेश होऊन आम्ही अवघ्या अर्ध्या तासात, म्हणजेच संध्याकाळी ६ वाजता श्री महाकालच्या दर्शनासाठी बाहेर पडलो. बाहेर हलका-फुलका पाऊस सुरू झाला होता. त्यातच तो श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पवित्र दिवस असल्यामुळे, पावसाची ती सर जणू वातावरणात अधिकच प्रसन्नता आणि भक्तीमय वातावरण निर्माण करत होती.

उज्जैन हे मध्य प्रदेशातील एक अतिशय प्राचीन, पवित्र आणि ऐतिहासिक शहर असून ते क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. हे हिंदू धर्मातील सात पवित्र मोक्षदायिनी नगरांपैकी एक मानले जाते. येथील महाकाल मंदिरामध्ये विराजमान असलेले भगवान शिव यांचे ज्योतिर्लिंग हे जगप्रसिद्ध आहे, जिथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. दर १२ वर्षांनी येथे भरणाऱ्या महाकुंभमेळ्यामुळे (सिंहस्थ) या शहराला जागतिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. राजा विक्रमादित्यची राजधानी राहिलेल्या उज्जैनमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरे आणि प्राचीन ज्योतिषशास्त्राशी निगडित वेधशाळा (जिवाजीराव ऑब्झर्व्हेटरी) पाहायला मिळतात. हे शहर धार्मिक श्रद्धा, समृद्ध इतिहास आणि भारतीय संस्कृतीचे एक सुंदर प्रतीक आहे.

उज्जैन शहराची एक खासियत म्हणजे तिथे मोठ्या प्रमाणावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक रिक्षा (इ-रिक्षा) आहेत, जिथे थोडी बारकाईने घासाघीस (बार्गेनिंग) केली की अगदी स्वस्तात संपूर्ण शहरात फिरता येते, ज्यामुळे आपली स्वतःची गाडी वारंवार बाहेर काढण्याची गरज भासत नाही. महालोक कॉरिडॉरच्या अगदी जवळ असलेल्या ‘स्मार्ट पार्किंग’मध्ये एकदा गाडी लावली की ती पूर्णपणे सुरक्षित राहते आणि पार्किंगच्या कुठल्याही टेन्शनशिवाय या पवित्र नगरीचा आणि आधुनिक सुविधांचा मनसोक्त अनुभव घेता येतो.

आम्ही रूमवरून निघालो ती वेळ नेमकी क्षिप्रा नदीच्या आरतीची होती. त्यामुळे आम्ही ठरवले की आधी घाटावर जाऊन आरतीचा अनुभव घ्यावा. क्षिप्रा नदीच्या काठावरचे ते अत्यंत सुंदर, नयनरम्य आणि भक्तिपूर्ण वातावरण पाहून मनाला अफाट शांतता लाभली. तिथे आरती दर्शन घेऊन आम्ही तिथून अगदी जवळ असलेल्या महाकाल मंदिराच्या दिशेने निघालो. वाटेतच प्रसिद्ध ‘हरसिद्धि माता मंदिर’ लागले, तिथे थांबून आम्ही श्री हरसिद्धि माता चे दर्शन घेतले.

त्यानंतर महाकाल मंदिराची मुख्य एन्ट्री कुठे आहे, हे शोधण्यासाठी आमची थोडी शोधाशोध सुरू झाली. इथे आल्यावर नेमकी दिशा समजण्यात थोडा गोंधळ होतो, कारण परिसरात योग्य त्या मार्गदर्शनाचे बोर्ड्स लावले नव्हते आणि स्थानिक लोकांना विचारले असता प्रत्येकजण वेगवेगळीच माहिती देत होता. बरीच शोधाशोध केल्यानंतर अखेर एका लाईनमध्ये आमचा नंबर लागला आणि संध्याकाळी ७ वाजता आम्ही अखेर मंदिरात प्रवेश केला.

मी मनात विचार केला होता की गर्दी पाहता दर्शनाला कमीत कमी दोन तास तरी नक्कीच लागतील, पण देवाचे अपरंपार आभार, आमचे दर्शन अवघ्या २० मिनिटांतच अतिशय सुरळीत आणि झटपट झाले. ते दर्शन इतके जवळून आणि सुंदर होते की मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पाऊल ठेवण्याची इच्छाच होत नव्हती. तिथून बाहेर यावेसे वाटतच नव्हते.

श्री महाकालच्या सानिध्यात एक अद्भूत ऊर्जा आणि वेगळीच दैवी शक्ती कार्यरत असल्याचा अनुभव मला स्पष्टपणे जाणवला. तेव्हा माझ्या मनात एक विचार आला, आपण कितीही प्लॅन केला तरी काही होत नाही, प्रत्यक्ष महाकालनेच जर आपल्या आगमनाचा आणि दर्शनाचा प्लॅन केला असेल, तरच सर्व काही अगदी सहज आणि वेळेवर घडते. हा अत्यंत भावूक आणि आनंदाचा क्षण अनुभवत, रात्री ७:४५ वाजेपर्यंत आम्ही मंदिराच्या बाहेर आलो.

मंदिराबाहेर आल्यानंतर आम्ही पोटभरून मस्तपैकी जेवण केले आणि रात्री १० वाजता रूमवर जाऊन गाढ झोपलो. दुसऱ्या दिवशी थेट पहाटे ५ वाजताच आमचा डोळा उघडला. आज आम्हाला उज्जैनमधील इतर काही महत्त्वाची मंदिरे आणि ठिकाणे पाहयची होती, त्यामुळे सकाळी लवकर आवरून आणि बाहेरच छानपैकी नाश्ता करून आम्ही थेट श्री कालभैरव मंदिराच्या दर्शनासाठी निघालो. तिथले दर्शन अवघ्या ५० मिनिटांत अगदी सुरळीत पार पडले. कालभैरवाचे दर्शन घेऊन आम्ही तिथून पुढे महर्षी सांदीपनी आश्रमाकडे गेलो, हेच ते पवित्र ठिकाण जिथे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या बालपणी शिक्षण घेतले होते. तो इतिहास अनुभवून आम्ही पुन्हा महाकाल मंदिराच्या परिसराजवळ परतलो, कारण तिथला भव्य ‘महाकाल महालोक कॉरिडॉर’ पाहणे बाकी होते.

तो अद्भूत कॉरिडॉर पाहत असतानाच आम्ही आमच्या आजच्या पुढच्या प्रवासाचे नियोजन करायला सुरुवात केली. पण गणित मांडताना लक्षात आले की, जर आम्हाला रविवारी रात्री घरी कोल्हापूरला पोहोचायचे असेल, तर आजचे दुपारचे जेवण चक्क कॅन्सल करावे लागेल. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचले. अशा लाँग रोड ट्रिप्स करताना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेकदा असे कठीण निर्णय घ्यावेच लागतात.

आज शनिवार होता आणि घड्याळात दुपारचे साडेबारा वाजले होते. इथून आम्हाला अजून १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि नर्मदा नदीच्या तीरावर वसलेल्या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जायचे होते. विशेष म्हणजे, गुगल मॅप्सवर या १५० किमी अंतरासाठी तब्बल ४ तासांचा वेळ दाखवत होता. जर ठरल्याप्रमाणे दुपारी १२:३० वाजता जेवण करून निघालो असतो, तर प्रवासात अजून एक तास वाढला असता. त्यामुळे आम्ही जेवण पूर्णपणे कॅन्सल केले आणि थेट दुपारी १२:३० वाजता उज्जैनमधून ओंकारेश्वरच्या दिशेने गाडी पळवली.

इंदौर च्या पुढे गेल्यावर रस्ता अचानक थोडा लहान झाला आणि वाहनांची गर्दी झपाट्याने वाढू लागली. त्यातच वाटेत एक जबरदस्त आणि अवघड घाट लागला. त्या दाट घाटातील ट्रॅफिकमध्ये आमची गाडी अक्षरशः दोन तास अडकून पडली. आजूबाजूला पूर्ण सागवानाची घनदाट जंगले, नागमोडी घाटरस्ता, एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला उंचच उंच डोंगर असे विहंगम दृश्य होते. निसर्गाचे हे रूप डोळ्यांचे पारणे फेडणारे होते, पण ट्रॅफिकमुळे गाड्या इंचभरही पुढे सरकत नव्हत्या. तेव्हा कुठे माझ्या लक्षात आले की, गुगल मॅप्स त्या १५० किमी अंतरासाठी तब्बल ४ तासांचा वेळ का दाखवत होता.

अखेर तो खडतर घाट पार करून पुढे आल्यावर रस्ता बरा मिळाला आणि आम्ही वेगाने पुढे निघालो. संध्याकाळी ५:३० वाजता आम्ही अखेर ओंकारेश्वर येथे पोहोचलो. ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या काठावर वसलेले अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण हिंदू धर्मातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ओमकारेश्वर ज्योतिर्लिंगासाठी जगभरात ओळखले जाते. नर्मदा नदीच्या पात्रात तयार झालेला हा द्वीप ‘ॐ’ (ओम) आकाराचा असल्यामुळे या पवित्र स्थानाला ‘ओमकारेश्वर’ असे नाव मिळाले आहे. येथील द्वीपवर ओमकारेश्वर आणि नर्मदा पात्राच्या दुसऱ्या बाजूला ममलेश्वर अशी दोन मुख्य ज्योतिर्लिंगे आहेत, ज्यांचे दर्शन एकत्र घडणे अत्यंत शुभ मानले जाते. या मंदिराची सुंदर वास्तुकला, भव्य घाट आणि आजूबाजूचा निसर्गरम्य विंध्य पर्वत परिसर भाविकांचे मन मोहून टाकतो. दरवर्षी महाशिवरात्री आणि कार्तिक पौर्णिमेला येथे मोठी जत्रा भरते, जिथे हजारो भाविक नर्मदा स्नानासाठी आणि महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी करतात.

दुपारी जेवण झाले नसल्यामुळे पोटात कावळे ओरडत होते, पण वेळेची किंमत लक्षात घेता आधी एक गरमागरम चहा घेतला आणि थेट मंदिराच्या दिशेने पावले वळवली. तिथे पुन्हा एकदा श्री नर्मदा मातेचे पवित्र दर्शन झाले आणि मनाला असीम शांतता लाभली. संध्याकाळची वेळ झाल्यामुळे घाटावर आणि मंदिरांवर हळूहळू रोषणाईचे दिवे लागायला सुरुवात झाली होती. दिव्यांच्या पिवळ्या प्रकाशात नर्मदा नदीचे पात्र आणखीच सुवर्ण आणि देखणे भासत होते. आम्ही घाटावर छोटीशी आरती अनुभवली आणि थेट ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी गेलो. इथे पोहोचल्यावर आम्हाला पुन्हा एकदा एक सुखद धक्का बसला.

मंदिरात अजिबात गर्दी नव्हती. अवघ्या १५ मिनिटांत अतिशय निवांत आणि जवळून दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. त्यानंतर थोडा वेळ मंदिराच्या शांत परिसरात आणि काही वेळ नर्मदा नदीच्या विशाल पात्राकडे पाहत तिथेच बसून राहिलो. ती मनःशांती शब्दांत सांगण्यासारखी नव्हती. आता रात्रीचे ८ वाजत आले होते आणि आमच्या नियोजनानुसार सर्व काही अगदी वेळेत घडत होते. तिथून पुढे निघण्यापूर्वी पोटपूजा उरकून, आम्ही ओंकारेश्वरपासून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक महेश्वर शहराकडे मार्गस्थ झालो आणि रात्री ११:३० वाजता तिथे पोहोचून सरळ विश्रांतीसाठी मुक्कामाच्या ठिकाणी झोपी गेलो.

महेश्वर हे मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात पवित्र नर्मदा नदीच्या दक्षिण पात्रावर वसलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिक शहर आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या राजवटीत मराठा साम्राज्याची राजधानी राहिलेले हे शहर त्यांच्या उत्कृष्ट नगररचना आणि मंदिरांच्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. नर्मदा नदीच्या विशाल घाटांवर बांधलेली कोरीव शिल्पकलेची मंदिरे, भव्य राजवाडा आणि येथील प्रसिद्ध हाताने विणलेल्या महेश्वरी साड्या यांमुळे या ठिकाणाला वेगळी ओळख मिळाली आहे. घाटावर संध्याकाळी होणारी नर्मदा आरती आणि शांत वातावरणात वाहणारे नदीचे पाणी पर्यटकांना आणि भाविकांना भुरळ घालते. इतिहास, संस्कृती आणि मनःशांतीचा अनुभव देणारे महेश्वर मध्य प्रदेशातील एक अत्यंत सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजेच रविवारी, पहाटे ६ वाजताच आम्ही महेश्वरमधील प्रसिद्ध मंदिरांच्या दर्शनासाठी बाहेर पडलो. मंदिरांचे दिव्य दर्शन घेऊन आम्ही थेट नर्मदा नदीच्या काठावर उभे असलेल्या ऐतिहासिक महेश्वर किल्ल्यावर गेलो आणि तो किल्ला सविस्तर पाहिला. त्यानंतर काही वेळ नर्मदा नदीच्या घाटावर निवांत येऊन बसलो. सकाळची ती अतिशय प्रसन्न वेळ, मंदिरातून ऐकू येणाऱ्या पूजेच्या घंटा आणि मंत्रांचा आवाज, घाटावर सुरू असलेली लोकांची लगबग, पाण्यात पोहणारे मासे आणि आकाशात उंच भरारी घेणारे पक्षी, असे ते विहंगम वातावरण मनाला अक्षरशः मोहून टाकणारे होते. त्या नयनरम्य सौंदर्याने आणि शांततेने मनातील सगळा ताण कुठल्याकुठे पळून गेला.

तिथून मग मस्तपैकी गरमागरम नाश्ता करून, सकाळी ८:३० वाजता आम्ही आमची गाडी थेट कोल्हापूरच्या दिशेने वळवली. येताना ज्या मार्गाने आलो होतो, त्याच ठरलेल्या रस्त्यान धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, पंढरपूर मार्गे अखंड प्रवास करत रविवारी रात्री बरोबर १ वाजता आम्ही सुखरूप कोल्हापुरात पोहोचलो.

अवघ्या ३ दिवसांत तब्बल २००० किलोमीटरचा हा महाप्रवास कोणत्याही शारीरिक त्रासाशिवाय आणि अगदी नियोजित वेळेत पार पडल्याचा प्रचंड आनंद आमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आणि अर्थातच, देवाच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नव्हते.

कोल्हापूर ते उज्जैन रोड ट्रिप – महत्त्वाच्या टिप्स

या रोड ट्रिपचा अनुभव घेतल्यानंतर काही गोष्टी नक्की सांगाव्याशा वाटतात. तुम्हीही कोल्हापूर ते उज्जैन, ओंकारेश्वर आणि महेश्वर असा प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर या टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील.

१. निवांत प्रवास करायचा असेल तर किमान ५ दिवसांचे नियोजन करा

३ दिवसांत ही ट्रिप शक्य आहे, पण त्यासाठी बराच वेळ गाडी चालवावी लागते. जर निवांत प्रवास करायचा असेल आणि वाटेतली ठिकाणे व्यवस्थित पाहायची असतील, तर किमान ५ दिवसांचे नियोजन करणे योग्य ठरेल.

२. वाटेतली काही महत्त्वाची ठिकाणेही पाहता येतात

थोडे जास्त दिवस हाताशी असतील तर Route मध्ये पंढरपूर, वेरूळ, शिर्डी आणि शेगाव यांसारखी ठिकाणेही समाविष्ट करता येतील. त्यामुळे ही ट्रिप केवळ उज्जैनपुरती मर्यादित न राहता एक मोठी धार्मिक आणि ऐतिहासिक रोड ट्रिप बनू शकते.

३. किमान दोन ड्रायव्हर असणे आवश्यक

असा २००० किलोमीटरचा लांब पल्ल्याचा प्रवास एकाच व्यक्तीने ड्राइव्ह करणे टाळावे. किमान दोन अनुभवी ड्रायव्हर असतील तर एकमेकांना आराम देता येतो आणि लांब प्रवास तुलनेने सुरक्षित आणि आरामदायी होतो.

४. उज्जैनसाठी पूर्ण एक दिवस राखून ठेवा

उज्जैनमध्ये फक्त महाकाल दर्शन करून लगेच पुढे जाण्यापेक्षा किमान एक पूर्ण दिवस राखून ठेवणे चांगले. महाकालेश्वर, महाकाल महालोक, कालभैरव, हरसिद्धी माता, सांदीपनी आश्रम आणि क्षिप्रा नदी घाट अशी अनेक ठिकाणे पाहता येतात.

५. उज्जैन आणि ओंकारेश्वरची ठिकाणे दिवसाच्या उजेडात पाहा

उज्जैन आणि ओंकारेश्वरमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे असल्यामुळे शक्यतो दिवसाचा वेळ या दोन्ही ठिकाणांसाठी राखून ठेवा. मंदिरांबरोबरच परिसर, घाट आणि आसपासची ठिकाणे बघायला वेळ मिळतो.

६. महेश्वर संध्याकाळी किंवा सकाळी अनुभवणे उत्तम

महेश्वरचे घाट, मंदिरे आणि नर्मदा नदीचा परिसर संध्याकाळी किंवा सकाळच्या प्रसन्न वातावरणात पाहण्याचा अनुभव वेगळाच असतो. विशेषतः नर्मदा घाटावर थोडा वेळ निवांत बसण्यासाठी वेळ नक्की काढा.

७. उज्जैनमध्ये स्वतःची गाडी वारंवार वापरू नका

उज्जैनच्या शहरातील धार्मिक परिसरात गर्दी असल्यामुळे स्वतःची गाडी घेऊन प्रत्येक ठिकाणी जाण्यापेक्षा उपलब्ध E-Rickshaw किंवा स्थानिक वाहतूक वापरणे अधिक सोयीचे ठरू शकते. त्यामुळे पार्किंगची कटकटही कमी होते.

८. मंदिरांच्या दर्शनाची वेळ आधी तपासा

महाकालेश्वर आणि इतर प्रमुख मंदिरांमध्ये दर्शनाच्या वेळा, प्रवेश व्यवस्था आणि विशेष दर्शनाची पद्धत बदलू शकते. त्यामुळे प्रवास सुरू करण्यापूर्वी अधिकृत मंदिराच्या वेबसाइटवरून किंवा अधिकृत स्रोतांवरून ताज्या वेळा आणि नियम तपासणे चांगले.

९. लांब प्रवासासाठी गाडीची सर्व्हिस करून घ्या

२००० किलोमीटरच्या रोड ट्रिपपूर्वी गाडीची सर्व्हिस, टायर प्रेशर, इंजिन ऑइल, ब्रेक्स, कूलंट, बॅटरी आणि स्पेअर टायर व्यवस्थित तपासून घ्या. लांब प्रवासात गाडीपेक्षा तिची तयारी महत्त्वाची असते.

१०. रात्रीच्या प्रवासात झोपेला अजिबात कमी लेखू नका

रात्रभर गाडी चालवण्याचा अनुभव असला तरी शरीराला आणि डोळ्यांना विश्रांती आवश्यक आहे. झोप येत असल्यास गाडी थांबवून पॉवर नॅप किंवा पुरेशी विश्रांती घ्या. काही मिनिटांचा उशीर चालेल, पण सुरक्षित प्रवास सर्वात महत्त्वाचा.

११. Google Maps वर दाखवलेल्या वेळेवर पूर्णपणे अवलंबून राहू नका

Google Maps अंतर आणि अंदाजे वेळ सांगते; मात्र घाटातील ट्रॅफिक, ट्रकची गर्दी, रस्त्यावरील कामे किंवा स्थानिक वाहतूक यामुळे प्रत्यक्ष वेळ वाढू शकतो. विशेषतः उज्जैन–ओंकारेश्वर Route साठी अतिरिक्त वेळ हाताशी ठेवणे चांगले.

१२. वेळेचे नियोजन करताना Buffer Time ठेवा

लाँग रोड ट्रिपमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या प्लॅनप्रमाणे होईलच असे नाही. त्यामुळे दर्शन, ट्रॅफिक, जेवण, पेट्रोलिंग आणि विश्रांतीसाठी थोडा Buffer Time ठेवला तर प्रवासाचा ताण कमी होतो.

१३. जेवण आणि पाण्याची सोय सोबत ठेवा

लांब प्रवासात प्रत्येक वेळी चांगले रेस्टॉरंट मिळेलच असे नाही. त्यामुळे पाणी, हलके snacks, चहा-कॉफी किंवा काही आवश्यक खाद्यपदार्थ गाडीत ठेवणे उपयोगी ठरते.

१४. ३ दिवसांची ट्रिप शक्य आहे, पण ती Road Trip आहे हे लक्षात ठेवा

ही ट्रिप ३ दिवसांत पूर्ण करता येते, हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवले आहे. पण हा निवांत पर्यटनाचा प्लॅन नसून लाँग-डिस्टन्स रोड ट्रिपचा अनुभव आहे. त्यामुळे कुटुंबासोबत, लहान मुलांसोबत किंवा ज्येष्ठ नागरिकांसोबत प्रवास करत असाल तर अधिक दिवसांचे नियोजन करणे योग्य ठरेल.

१५. प्रवासाचा आनंद घ्या, फक्त Destination गाठण्याची घाई करू नका

लांब रोड ट्रिपमध्ये गंतव्याइतकाच Route देखील महत्त्वाचा असतो. वाटेत येणारा निसर्ग, नद्या, घाट, गावं, शेती आणि स्थानिक खाद्यसंस्कृती अनुभवण्यासाठी थोडा वेळ काढा. कारण शेवटी रोड ट्रिपची खरी मजा फक्त आपण कुठे पोहोचलो यात नसते, तर तिथे पोहोचेपर्यंत आपण काय-काय अनुभवलं यात असते.

धन्यवाद.

 

 

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *